कथेची स्टोरी...

film.
film.

जगातला कुठलाही चित्रपट, नाटक तयार करायचे असेल तर आधी त्याची कथा लागते. आपण त्याला मराठीत स्टोरी म्हणूया. आपल्या भारतीय संस्कृतीचा विचार करता आपल्याकडे खूप आधीपासून कथा, पटकथा तयार झाल्या आहेत. जसा संगीताचा, नृत्याचा आविष्कार हा भगवान शंकरापासून अस्तित्वात आला म्हणायला हरकत नाही. तसे मानवाचा जन्म झाला आणि जेव्हा पहिला स्वर त्याला कळला तेव्हापासून भाषेचा उगम झाला म्हणायला हरकत नाही. माणूस बोलू शकतो, स्वत:च्या भावना दाखवू शकतो. इथेच कलेचा जन्म झाला. कारण भावनांना मोकळे होण्याचे साधन माणसाच्या बुद्धीने विकसित केले. भाषा कधी जन्माला आली आणि तिचा आजवरचा प्रवास याची आपल्याला माहिती जाणून घेण्यापेक्षा आपल्या भावना व्यक्त होण्याचे साधन म्हणजे भाषा असा आपण सुटसुटीत अर्थ काढू. कारण आपल्याला कथा हवी आहे आणि जेव्हा भावना व्यक्त करायचे दुसरे साधन म्हणजे आपल्या चेहऱ्याचे हावभाव म्हणजे अभिनय. त्याबद्दल नंतर बोलूच. तर कथा, तांडवनृत्य, नारदसूक्त इथून सुरू झाली म्हणायला हरकत नाही. आपल्या वेद, उपनिषद आणि कथा, पुराणात आपल्याच कथा सापडतात. पुराणात तर स्टोरी टेलिंग प्रकार आढळतो. म्हणजे जगात सिनेमा निर्माण झाला त्याच्या आधी आपल्याकडे स्टोरी उपलब्ध होत्या. त्या कथा मग नाट्यरूपात आपल्याकडे सुरू झाल्या. आपल्या नाट्यशास्त्राचा इतिहास पण खूप जुना, हजारो वर्षांचा आहे. आपण कलेच्याबाबतीत समृद्ध होतोच, फक्त आपले अजूनही दुर्लक्ष झालंय म्हणा किंवा आपल्याकडे सकस साहित्य, लेखन नाही अशी एक ओरड करायची सवय म्हणा. आपले रामायण, महाभारत तर स्टोरी टेलिंगचे मोठे भांडार आहे. त्यातल्यात्यात तर महाभारत. महाभारतात तर व्यासांनी असे काही लिखाण केले की विचारू नका. आजच्या किंवा आतापर्यंतच्या बहुतेक सगळ्या चित्रपट कथांचे बीज महाभारतात दिसेल. महाभारतात काय नाही तर सगळे आहे. कौरव, पांडव दोन मोठी पात्रे, म्हणजे चित्रपटात लागणारी दोन मुख्य पात्रे. हिरो, व्हिलन आणि मग त्या महाभारताची कथा या दोन पात्रांभोवती फिरते. यात भाऊबंदकी, सत्ता, सत्तालोभ त्यातून निर्माण होणारी ईर्ष्या, वादावादी, सत्तेतून बेदखल करण्यासाठी द्यूताचा मांडलेला धूर्त डाव, स्त्री विटंबना आणि त्यातून निर्माण होणारे भीम, अर्जुनाचे पण... म्हणजेच बदला... आणि त्या श्रीकृष्णाचे पात्र... लोभस, प्रेमळ, कूटनीतिज्ञ, मार्गदर्शक ते भगवान पदापर्यंतचा प्रवास. त्याची युद्धभूमीवरची गीता. आजही त्या 18 श्‍लोकांत सगळ्या जगण्याचे सार... बरं, भाषा आणि उपदेश असा की प्रत्येकजण आपल्या सोयीनुसार अर्थ काढू शकतो. पण सगळ्यांच्या अर्थाचा अर्थ हा जीवन कसे जगायचे हाच निघतो... म्हणजे विचार करा, तेव्हा भाषा किती समृद्ध होती. आजही जगातल्या सगळ्या जाती-पंथांतले संत-महात्मे जी प्रवचने, ज्ञान देतात, सत्संग करतात हे सगळे या गीतेच्या आधारे आहे. आपण आपली संतपरंपरा घेतली तरीही तोच प्रकार आढळेल. म्हणजे व्यासमुनींनी जे काही अफलातून महाकाव्य लिहिलंय त्याला आजही तोड नाही. महाभारतात दीन, दुबळे, बहुजनांपासून अठरापगड, राजघराण्यांपासून सगळी पात्रे उभी केली आहेत.
महाभारत खरंच एक मोठी स्टोरी आहे. पटकथा आहे, संवाद आहे, विसंवाद आहे, काय नाही त्यात. तर अशी ही आपल्या चित्रपटाच्या कथेची सुरुवात आहे आणि मग विज्ञानाची प्रगती झाली आणि या कथांना दृश्‍य स्वरूप मिळाले. पण चित्रपट क्षेत्र हे एक प्रथमपासूनच व्यावसायिक गणित डोक्‍यात ठेवूनच निर्माण झालेले क्षेत्र आहे. कारण या चित्रपटाच्या निर्मितीचा खर्च मोठा असल्याने त्यात व्यावसायिकपणा आलाच. मग या व्यावसायिकपणाची सुरुवात कुठून होते तर चित्रपटाची कथा कशी असावी... त्याबद्दलचा एक साधा सरळ नियम आहे की ती कथा आणि त्यावरचा चित्रपट व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी हवा. मग कथा कशा निवडायच्या तर त्याचे पण एक गणित आहे आणि ते सामाजिक आहे. दादासाहेब फाळकेंनी पहिला चित्रपट बनवला "राजा हरिश्‍चंद्र' जो 1913 साली आला. त्यावेळी समाज म्हणजे भारतीय समाज जास्त धार्मिक होता, अतिश्रद्धाळू होता. कथा, पुराणात रमणारा होता. मग त्यांच्या त्याच भावनांना हात घातला गेला आणि राजा हरिश्‍चंद्राची कथा निवडली. मग "संत तुकाराम' आला. मग हळूहळू कथा बदलत गेल्या. नंतर पहिला बोलपट आला "आलमआरा'; ही लव्हस्टोरी होती, जी आजपर्यंत चालतेय. कारण माणसाला प्रेम करायला आवडते आणि मुख्य म्हणजे दुसऱ्यांचे प्रेम पडद्यावर बघायला आवडते. मग हीच कथा वेगवेगळे रूप घेऊ लागली. पुरुषप्रधान संस्कृतीमुळे स्त्री अबला आणि व्हिलन पुरुष अत्याचारी आणि मग त्याच पुरुषप्रधान संस्कृतीतला नायक जो मर्यादा पुरुषोत्तम राम असतो तो खलनायकरूपी रावणाचा वध करतो आणि एक आदर्श पुरुष म्हणवतो. म्हणजे गंमत अशी की पुरुषांनी स्वत:ला मर्यादा पुरुषोत्तम म्हणवून घेण्यासाठी आधी स्त्रीवर एक पुरुष अत्याचार करतो आणि दुसरा वाचवतो. म्हणजे पुरुषांचे मर्यादा पुरुषोत्तमामध्ये रूपांतर ज्याला आपण अबला स्त्री म्हणतो तिच्याच माध्यमातून होते. नंतर चित्रपटाची कथा स्वातंत्र्यलढ्याच्या आसपास देशभक्तीवर आधारित होती. मग स्वातंत्र्य मिळाले, देशाचा स्वत: उभे राहण्याचा संघर्ष सुरू झाला. मग उद्योजक-कामगार लढा उभा झाला समाजात. मग त्यावर आधारित चित्रपट कथा आल्या. नंतर भारत थोडा स्थिर झाला. मग रोमॅंटिक स्टोरीच्या कथा सुरू झाल्या. आता भारत आर्थिकदृष्ट्या प्रबळ झाला आणि मग कथांमध्ये बदल सुरू झाले. कारण समाज बदलला, वाण्याच्या दुकानातून किराणा माल घेणारा मॉलमध्ये पोहोचला. आर्थिक सुबत्ता आली आणि मग आशयघन चित्रपट कथांकडे बघायला लोकांना वेळ मिळू लागला. आधी पण आशयघन चित्रपट निघायचे पण फार कमी. आता व्यावसायिक गणिते बदलली आणि कथा पण बदलल्या. आज आयुष्यमान खुराणाचे, राजकुमार रावचे चित्रपट 100 कोटींच्यावर कमाई करतात. हिरो चित्रपटात असलाच पाहिजे हे समीरकण हळूहळू बदलतयं; कारण तेच समाज बदलला. आर्थिक बाजू देशाची व्यवस्थित आहे. विज्ञानाची प्रगती आहे. जगात घरबसल्या फिरता येते. वर्ल्ड सिनेमा बघता येतो. मग त्या स्पर्धेत टिकायला सशक्त कथा आली आणि ती भारतीय विचारधारेशी जोडलेली असेल तर चित्रपट यशस्वीच! म्हणजे काय की, "सामान्यांची व्यथा म्हणजे चित्रपटाची कथा' असा साधा व्यावसायिक नियम आहे आणि तोच हजारो वर्षांपासून कलेच्या क्षेत्रात सुरू आहे. एक गंमत म्हणून सांगतो, महाभारतातल्या प्रत्येक कथेचा आणि जगातल्या सिनेमांचा तौलनिक अभ्यास करा. तुम्हाला जगातल्या सिनेमांचे कथाबीज महाभारतात सापडते का ते बघा! निराश होणार नाही तुम्ही. पण मजा येईल एवढे नक्की.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com