

Hoardings on Public Streetlights
esakal
मित्राने व्हॉट्सअपवर दोन फोटो पाठवले. एका फोटोमध्ये एका चौकातल्या दिव्याच्या खांबावर एक होर्डिंग लावलं होतं. त्यावर ‘प्रिय चिकूला वाढदिवसाबद्दल शुभेच्छा’ असं डिझायनर आणि बटबटीत फॉन्टमध्ये लिहिलं होतं. त्याखाली त्या चिकूचा एक गोड, तोंड उघडलेला फोटो होता आणि खाली शुभेच्छुकांची दमदार नावं होती आणि फोटोही होते. आणि हा चिकू म्हणजे कुणाचा तरी लाडका कुत्रा होता!
दुसऱ्या फोटोही असाच होर्डिंगचाच होता. त्यात कुणाच्यातरी दशक्रिया विधीबद्दलची माहिती आणि त्या दिवंगत वृद्धाचा, ब्लर्ड, पासपोर्ट साइजचा मोठ्ठा फोटो होता. आणि कवितेच्या चार ओळीही छापल्या होत्या. दोन्ही होर्डिंग अर्थातच स्ट्रीटलाइटच्या खांबांवर लावले होते. म्हणजे ते असेच कोणाच्याही परवानगीविना असणार याच शंका नव्हती. ‘आओ जावो घर तुम्हारा’ किंवा हे विश्वचि माझे घर या ज्ञानेश्वरांच्या उक्तीची ‘बरोब्बर’ अर्थ लावून घेतला होता.
मित्र – खास तुला पाठवले हे. तुला आवडतील म्हणून. मग खदाखदा हसणाऱ्या इमोजीची स्मायली.
मी – अरे, परवा मी एक पत्ता शोधत होतो. नवी जागा होती. म्हणून गूगल मॅप लावला. पण शेवटच्या वळणावर गडबड झाली या होर्डिंगमुळे.
मित्र – काय झालं?
मी – मला जायचं असलेल्या इमारतीचं नाव तिच्या समोरील फुटपाथवरच्या एका काळ्या दगडावर छानपैकी, सोनेरी अक्षरांत एम्बॉस केलं होतं. पण त्याच्यासमोर अचानक एक भूछत्र उगवलं होतं!
मित्र – म्हणजे?