

Subhash Awchat Paintings
esakal
हर्ष भटकळ
सुभाष अवचट आपल्या चित्राबद्दल सांगतात, ‘जे तुम्ही अजाणता शिकत असता, तेच टिकत असते.’ त्यांच्या व्यक्तिचित्रणात कृत्रिमता का नसते, ते लक्षात येते. त्यांचा शेतकरी हा निवळ समाजाचा घटक नसतो, कामगार हा प्रतीकात्मक रूप धारण करत नाही, तो विमुक्त साधू हा काही अज्ञानाचा शोध घेणारा ठोकळेबाज धडपडणारा नाही, तर ते सर्व त्यांच्या आठवणीतील वास्तव आहे. ते सांगतात, ‘मी शेतकऱ्यांचे चित्र काढायचे असे ठरवून काढत नाही. मी त्यांच्या सोबतच घडत गेलो.’
सुभाष अवचट यांच्या स्टुडिओत शिरता शिरताच मी काही विचारण्यापूर्वीच ते हळुवारपणे सुरुवात करतात... ‘आपण फार तात्त्विक चर्चेत शिरूया नको, उगाच वायफळ सैद्धान्तिक चर्चा नको. आपण आपले बोलत बसूया.’ असा प्रेमळ आग्रह तांत्रिक शब्दजंजाळातून निसटण्यासाठी नव्हे तर त्यांची ती विचारपद्धतीच आहे. ते कलेकडे एक जीवनपद्धती म्हणूनच पाहतात. समजून घेणे किंवा विश्लेषण करणे म्हणून नव्हे, खरे समरस होणे हे महत्त्वाचे, त्याचे विश्लेषण वगैरे नंतर आणि जर त्यासंबंधी लिहायचे असेलच तर ते अशा भाषेत की लोकांना त्यात न घाबरता सहभाग घेता येईल.
सुभाष अवचट यांना मी अनेक वर्षे ओळखतो. मी लहान असताना माझे प्रकाशक वडील रामदास भटकळ यांचे लेखक, कवी, रंगकर्मी, सामाजिक आणि राजकीय चळवळीत भाग घेणारे कार्यकर्ते अशांचे एक मोठे वर्तुळ होते. पुढील पिढीत ती नाती बदलत गेली तरी आमच्यातला संवाद सुरूच आहे. या स्टुडिओत आजूबाजूला चित्रातून शेतमजूर, भटके साधू, निनावी शोधक आणि पिवळी धमक शेती पाहिल्यावर लक्षात येते की त्यांचा कलात्मक प्रवास याची जडणघडण ही शैलीतील बदल पाहून नव्हे तर जीवनातील आठवणी, विचारांची शिस्त आणि त्यांची सचोटी लक्षात घेऊन जोखण्याची आहे.