...साक्षात सरस्वतीच !

कालिचरण हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये शत्रुघ्न सिन्हा पोलिस व गुन्हेगार अशा दुहेरी भूमिकेत होता व चित्रपट ॲक्शन-ड्रामा होता.
Lata Mangeshkar
Lata MangeshkarSakal
Summary

कालिचरण हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये शत्रुघ्न सिन्हा पोलिस व गुन्हेगार अशा दुहेरी भूमिकेत होता व चित्रपट ॲक्शन-ड्रामा होता.

कालिचरण हा माझा दिग्दर्शक म्हणून पहिला चित्रपट. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटामध्ये शत्रुघ्न सिन्हा पोलिस व गुन्हेगार अशा दुहेरी भूमिकेत होता व चित्रपट ॲक्शन-ड्रामा होता. मात्र, या चित्रपटातील एक गाणं आज जवळपास पन्नास वर्षानंतरही सर्वांच्या तोंडी आहे. ‘जा रे जा ओ हरजाई’ हेच ते गाणं व मी ते नुकतंच एका टीव्ही शोमध्ये ऐकलं. संगीताची ताकद आणि लता मंगेशकर यांची ही जादू आहे. ‘कालिचरण’च्या रेकॉर्डिंगच्या वेळी मी प्रथमच स्टुडिओमध्ये गेलो होतो. लताजी स्टुडिओमध्ये पोचल्या होत्या व त्या चहाचा आनंद घेत संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांच्याबरोबर गप्पांमध्ये मग्न होत्या. आनंदजींनी माझी ओळख करून दिली आणि लताजींनी गोड हसत गाण्याची नायिका कोण आहे व गाण्याची पार्श्‍वभूमी काय याबद्दलची माहिती विचारली. मी पुरता गोंधळून गेलो. नर्गीस, मधुबालापासून वैजंतीमालापर्यंतच्या अनेक आघाडीच्या नायिकांना आवाज दिलेली ही गायिका मला माझ्या चित्रपटाच्या नायिकेबद्दल का विचारते आहे, याचं मला आश्‍चर्य वाटत होतं. खरं सांगायचं तर मला काळजीच वाटत होती, कारण त्यावेळी रीना रॉय ही चित्रपटाची नायिका तुलनेनं नवी होती. मात्र, कल्याणजींनी मला काळजी करू नकोस, असं सांगितलं आणि मग मी त्यांच्या सर्व प्रश्‍नांची त्याचं समाधान होईपर्यंत उत्तरं दिली.

त्यांनी मला विचारलेल्या अगदीच किरकोळ प्रश्‍नांचा उपयोग त्यांनी गाण्यातील गोष्ट श्रोत्यांपर्यंत पोचवण्यासाठी, त्यांच्या आवाजाला एक चेहरा देण्यासाठी कसा केला आहे, हे मला मी काही दिवसांनंतर हे गाणं ऐकल्यावरच समजलं.

त्यांनी या गाण्याला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आणि ‘जा रे जा ओ हरजाई’ हे गाणं अजरामर झालं. ‘तेरे बिना ज़िन्दगी से कोई शिकवा तो नहीं, शिकवा नहीं, शिकवा नहीं...’ हे त्यांनी गायलेलं गाणं मला सर्वाधिक आवडतं.

पार्श्‍वगायनातील शेवटचा शब्द

लताजी माझ्यासाठी साक्षात सरस्वतीच होत्या. त्या अत्यंत मृदू भाषेत बोलत. त्यांच्या नजरेत खूप मोठी श्रद्धा आणि प्रेम दिसायचं आणि त्यामुळंच मी त्यांना प्रत्येक भेटीच्या वेळी प्रणाम करीत असे. त्या मला एक उत्तम दिग्दर्शक मानत असत आणि त्यांनी माझा ‘कर्ज’ हा चित्रपट अनेकदा पाहिला असल्याचं समजल्यावर मला खूपच आनंद झाला होता. त्या मला म्हणत, ‘‘प्रत्येक वेळी हा चित्रपट पाहताना तो मला आधीपेक्षा जास्त आवडतो. तुमच्याकडं संगीताचा खूप चांगला कान आहे.’’ ही प्रतिक्रिया मी आयुष्यभराचा ठेवा म्हणून माझ्याजवळ जतन केली आहे. मी ‘मै सोलह बरस की’ या ‘कर्ज’ चित्रपटातील गाण्यासाठी पुन्हा एकदा त्यांच्याकडं गेलो होतो व त्यावेळी त्यांनी मला तुमची नायिका कोण आहे, हाच प्रश्‍न विचारला होता. यावेळी मी भरपूर तयारी करून गेलो होतो आणि मी त्यांना नायिका टिना मुनिमबद्दल माहिती दिली. त्यांनी हे गाणं सोळा वर्षांच्या मुलीसारखं निरागसपणे आणि सळसळत्या उत्साहानं गायलं होतं! लताजी पार्श्‍वगायनातील शेवटचा शब्द होत्या. त्यामुळंच लक्ष्मीकांत-प्यारेलाल माझ्याकडं ‘राम लखन’ या चित्रपटासाठी ‘ओ रामजी बडा दुख दिना’ हे गाणं घेऊन आले, तेव्हा मी त्यांना त्या काळातील आघाडीच्या गायिकांपैकी अलका याज्ञिक, कविता कृष्णमूर्ती किंवा अनुराधा पौडवाल यांपैकी कोणीही या गाण्याला न्याय देऊ शकणार नाहीत, असं स्पष्टच सांगितलं.

आम्हाला सूर, धून आणि गायकीचं शिखर गाठलेल्या गायिकेचीच गरज होती. ‘‘आपण हे गाणं लताजींकडून गाऊन घेतलं पाहिजे,’’ असा आग्रह मी धरला. लक्ष्मीकांतजींनी होकार दिला, मात्र लताजी सध्या कामात खूप व्यग्र असल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्यांची वाट पाहिल्यास गाण्याचं रेकॉर्डिंग लांबणार होतं आणि चित्रपटही. मी थेट लताजी रेकॉर्डिंग करीत असलेल्या स्टुडिओमध्ये गेलो आणि त्यांना म्हणालो, ‘‘मला माहिती आहे, तुम्ही कामात खूपच व्यग्र आहात, मात्र माझ्या चित्रपटातील ‘ओ रामजी’ हे गाणं केवळ तुम्ही आणि तुम्हीच गाऊ शकता. तुम्ही हे गाणं गायला नाहीत, तर मी ते रेकॉर्डच करणार नाही. मी चित्रपटातील प्रसंग बदलून टाकेल.’’ हे सगळं मी अगदी ठामपणे सांगून टाकलं. यावेळीही नायिका माधुरी दीक्षित ही तुलनेनं नवी अभिनेत्री होती. माझ्या शब्दांमुळं त्या हेलावून गेल्या आणि मी स्वतः भेटायला आल्याचं त्यांना खूपच भावलं. त्यांनी हे गाणं रेकॉर्ड करण्याचं मान्य केलं.

‘ओ रामजी...’ हे गाणं आजही अभिजात म्हणून ओळखलं जातं आणि पुढील शंभर वर्षं ते प्रेक्षकांच्या स्मृतीत कायम राहील, याची मला खात्री आहे. हा आहे लता मंगेशकरांचा दर्जा आणि प्रतिभा. इतर कोणताही गायक त्यांच्या जवळपासही पोचू शकत नाही. माझ्या ‘हिरो’ या चित्रपटातील ‘निंदियासें जागी बहार...’ या गाण्याचा अनुभवही संस्मरणीय आहे. हे गाणं मी ऊटीमधील निसर्गरम्य भागात सकाळी ४ ते ६.३० या वेळेत चित्रित करणार होतो. मी गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या दिवशी दोन तास आधीच स्टुडिओमध्ये पोचलो. ‘या गाण्यात मला श्रृंगार रस नको, तर भक्ती रस हवा आहे. हे गाणं खूप सॉफ्ट पद्धतीनं गा,’ हा संदेश मला लताजींना द्यायचा होता. त्या स्टडिओत पोहोचताच मी त्यांना हे सर्व समजावून सांगितलं. त्यांनी माझं म्हणणं लक्षपूर्वक ऐकून घेतलं व खूप मनापासून गाणं गायलं. हे गाणं शुटिंगनंतर तुम्हाला नक्की दाखवेल, असं आश्‍वासन मी त्यांना दिलं. हे गाणं त्यांनी मोठ्या स्क्रीनवर पाहिल्यावर तू खूपच आनंदित झाल्या व म्हणाल्या, ‘मला आत्ता समजलं, तुम्ही हे गाणं मला भक्तिरसात का गायला सांगितलं होतं...’

विधात्याशी तादात्म्य पावणारा आवाज

लताजी अतिशय नम्र होत्या व त्या नेहमीच नव्या गायिकांना प्रोत्साहन देत. त्या आपल्यासाठी गाण्याचा मोठा साठा आणि अमूल्य खजिना ठेऊन गेल्या आहेत. मला एकच खंत आहे, ती म्हणजे मी त्यांना माझ्या ‘व्हिसलिंग वूड्स’ या संगीत विद्यालयामध्ये आणू शकलो नाही. मात्र, आम्ही त्यांच्या नावाने २०१९पासून शिष्यवृत्ती देण्यास सुरवात केली आहे. दरवर्षी गायन किंवा संगीतातील प्रतिभावान विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्तीनं गौरविण्यात येतं. मी माझी पत्नी रेहना, माझ्या मुली मेघना व मुस्कान, तसेच तीन विद्यार्थ्यांना घेऊन त्यांच्या घरी ‘लता मंगेशकर शिष्यवृत्ती’ हे नाव वापरण्यासाठी परवानगी मागायला गेलो होतो. आमचा प्रस्ताव ऐकून त्या हेलावून गेल्या आणि त्यांनी आमच्या संस्थेला भेट देण्याची इच्छा व्यक्त केली. मात्र, त्यांच्या घरापासून आमची संस्था दूर असल्यानं आणि त्यांची तब्येतही ठिक नसल्यानं ते शक्य होऊ शकलं नाही. आमच्या शेवटच्या भेटीच्या वेळी आम्ही त्यांचा हाताचा ठसा घेतला व तो आता संस्थेतील हॉल ऑफ फेममध्ये कायमस्वरूपी आपल्या सोबत असेल.

लताजी माझ्यासाठी प्रेमाचं प्रतीक होत्या. त्यांना भेटलेला प्रत्येक जण त्यांच्या आणि त्यांच्या गाण्याच्या प्रेमात पडत असे. याचे कारण त्या गाताना विधात्याशी तादात्म्य पावत असत. वैश्‍विक ऊर्जेशी त्या जोडल्या जात. त्या एक पवित्र आत्मा होत्या व ते त्यांच्या गाण्यात डोकावत असे. त्यामुळंच त्यांना जिवंतपणीच देवत्व प्राप्त झालं. आजचे गायक तंत्रज्ञानाच्या मदतीनं तुकड्या तुकड्यांत गाणं गाऊ शकतात. त्यासाठी त्यांना रियाझ करण्याची गरज पडत नाही. एक-दोन गाणी गाजताच ते शोज करू लागतात व भरमसाट पैसा कमावतात. नव्या तंत्रज्ञानामुळं सर्व गोष्टी बदलल्या असून, आजच्या गायकांना पाश्‍चिमात्य संगीतानं वेढून टाकलं आहे. मी लताजींना पाच ते सहा मिनिटांचं गाणं एका श्‍वासात, कोणताही ब्रेक न घेता गाताना पाहिलं आहे. लताजी स्टुडिओत येत, गाणं काय आहे ते ऐकत व संगीतकाराशी चर्चा करीत, एकदा त्याचा सराव करीत, त्यानंतर संपूर्ण गाण्याचं एका दमात ध्वनिमुद्रण करून टाकत. मी आजच्या पिढीच्या गायिकांना लताजींचा हा गुण घ्यायला सांगतो. मी कविता कृष्णमूर्ती, अलका याज्ञिक किंवा इतर कोणत्याही गायिकेला गाणं देताना सांगतो, ‘‘लक्ष देऊन ऐका व त्यानंतर विचार करा, की लताजींनी हे गाणं कसं गायलं असतं...’’ आणि लता मंगेशकराचं नाव आठवताच त्यांना ते गाणं आणि त्यांची गायकी वेगळ्या उंचीवर घेऊन जाता येते...

(लेखक हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ दिग्दर्शक व निर्माते आहेत)

(शब्दांकन : महेश बर्दापूरकर)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com