सुभाषितरत्नानि : राजा, नेता, शासनकर्ता

राजा किंवा शासनकर्ता कसा असावा, त्यानं कसं वागावं, त्याची कर्तव्यं कोणती याबद्दल सुभाषितकारांनी काय उपदेश केला आहे ते बघू, आजच्या भागात...
Subhashratnani term the king leader ruler how he should be behave duties
Subhashratnani term the king leader ruler how he should be behave dutiesSakal

- मंजिरी धामणकर

राजा बन्धुरबन्धूनां राज चक्षुरचक्षुषाम्।

राज पिता च माता च सर्वेषां न्ययवर्तिनाम्।।

अनुवाद : राजा बंधु अनाथांचा, अंधांचा डोळा राजा पिता न्यायमार्गींचा आणिक माताही तो राजा

अर्थ : ज्यांना बंधू नसेल त्यांचा बंधू राजाच, जे नेत्रहीन आहेत त्यांचे डोळे राजा, न्यायानं चालणाऱ्या सर्वांचा पिता आणि माताही राजाच (असं राजानं वागलं पाहिजे.)

धर्मे तिष्ठन्ति भूतानि धर्मो राजनि तिष्ठति।

तं राजा साधु यः शास्ति स राजा पृथिवीपतिः।।

अनुवाद : कर्तव्ये सर्वांस आपुली राजाला परि सर्वही ती जो नृप जागे त्या धर्माला तोच खरा हो पृथ्विपती

अर्थ : सर्व प्राणी धर्मानं राहतात, म्हणजे त्यांना त्यांना आपापलं कर्तव्यकर्म आहे, आणि धर्म राजात राहतो, म्हणजे सर्वांबाबत सर्वात मोठं कर्तव्यकर्म राजाचं, म्हणून तो धर्म, ते कर्तव्य जो योग्य रीतीनं पाळतो तोच खरा पृथ्वीपती.

जानन्ति पशवो गन्धाच्छ्रुताज्जानाति पण्डिताः।

चाराज्जानाति राजानश्चक्षुर्भ्यामितरे जनाः।।

अनुवाद : पशू जाणती गंधाने आणिक पंडित ते वेदांनी जाणे राजा हेरांकरवी, बाकीचे ते डोळ्यांनी

अर्थ : भवतालाचं ज्ञान पशूंना हुंगून होतं, विद्वानांना ते वेदांतून होतं, इतरांना डोळ्यांनी होतं आणि राजाला ते हेरांच्या द्वारे होतं. (म्हणून कोणत्याही राजाचं किंवा देशाचं हेरखातं फार महत्त्वाचं.)

भानुः सकृद्युक्ततुरङ्ग एव, रात्रिदिवं गन्धवहः प्रयाति।

शेषः सदैवाहितभूमिभार षष्ठांश वृत्तेरपिधर्म एषः।।

अनुवाद : सदा सज्ज सूर्याचे घोडे, दिवस-रात्र वारा वाहे शेषमस्तकी भार पृथ्विचा, हित लोकांचे नृप पाहे

अर्थ : सूर्य सदैव घोडे जोडून सज्ज असतो...वारा रात्रंदिवस अविश्रांत वाहत असतो...शेष सतत पृथ्वीचा भर शिरावर वाहत असतो... त्याप्रमाणेच प्रजेची अविरत काळजी घेणं हीच राजाची भूमिका आहे. (षष्ठांश वृत्ती : पूर्वी प्रत्येकानं आपल्या उत्पन्नाचा सहावा भाग राजाला कररूपानं द्यायचा असे. म्हणून ‘षष्ठांशाचा अधिकारी’ म्हणजे राजा.)

परोऽपि हितवान्बन्धुर्बन्धुरप्यहितः परः।

अहितो देहजो व्याधिर्हितमारण्यमौषधम्।।

अनुवाद : हित सांगे तुज जरि तो परका, मान आपुला तू त्याते रोग देहिचा विनाशकारी, औषध वनिचे हितकर ते

अर्थ : (हे राजन्) तुझं हित करणारा माणूस जरी परका असला तरी त्याच्याशी बंधुत्व जोड. याउलट, तुझा बंधू जर तुझं अहित करत असेल तर त्याला परकाच मान. एखादा रोग आपल्या स्वतःच्या देहात जन्मला म्हणून तो आपला हितकर्ता नसतो आणि औषध जरी रानात जन्मलं असलं तरी ते आपल्यासाठी हितकर असल्यामुळं त्याला आपलं मानावं आणि रोगाला परकं मानावं.

नियुक्तहस्तार्पितराज्यभारास्तिष्ठन्ति ये सौधविहारसाराः।

बिडालवृन्दार्पितदुग्धपूराः स्वपन्ति ते मूढधियः क्षितीन्द्राः।

अनुवाद : राज्यभार सोपवुन इतरांवर सुखोपभोगी रमती जे दूध राखण्या मार्जारांना देती, मूढमती राजे

अर्थ : राज्याचा सर्व कारभार हाताखालच्या माणसांवर सोपवून जे राजे सुखोपभोग घेत गच्चीवर विहार करतात, ते जणू मांजराच्या टोळक्यावर दूध सांभाळायचं काम सोपवून झोपलेल्या माणसासारखेच मूर्ख असतात.

वैरिणा न हि संदध्यात्सुश्लिष्टेनापि सन्धिना।

सुतप्तमपि पानीयं शमत्येव पावकम्।।

अनुवाद : जरी बांधला तहशर्तींनी, दूर ठेवि तू शत्रूला तापविले जरि कितीही पाणी, विझविणार ते अग्नीला

अर्थ : (हे राजन,) शत्रू तहाच्या अटींनी बांधलेला असला तरी त्याच्याशी फार जवळीक करू नकोस.(कारण तू अग्नी, तर तो पाणी) पाणी कितीही तापवलं तरी अग्नीला विझवतंच.

न राज्यं प्राप्तमित्येव वर्तितव्यमसांप्रतम्।

श्रियं ह्यविनयो हन्ति जरा रूपमिवोत्तम्।।

अनुवाद : सत्ताधारी राजाचे वागणे नसावे अयोग्य ते, रूप जातसे वार्धक्याने तद्वत राजलक्ष्मी जाते.

अर्थ : राज्य मिळालं, सत्ता मिळाली म्हणून राजानं वाट्टेल तसं व्यवहारशून्य वागणं योग्य नव्हे. ज्याप्रमाणे म्हातारपण सुंदर रूप नष्ट करतं, त्याचप्रमाणे उद्दाम वृत्ती राजलक्ष्मीचा नाश करते.

(लेखिका ह्या भाषांतरकार, भाषाप्रशिक्षक, निवेदिका, तसंच एकपात्री कलावंत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com