वटवृक्षाच्या विलक्षण प्रेमाची सफल गाथा: प्रेम आणि मरण ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Successful saga of the wonderful love of the banyan tree love and death Nashik News

वटवृक्षाच्या विलक्षण प्रेमाची सफल गाथा: प्रेम आणि मरण !

गोविंदाग्रजांच्या नाटकात काव्य अन् काव्यात नाट्यमयता दिसून येते. राजसंन्यास किंवा एकच प्यालातील पल्लेदार संवाद वाचताना आपण नाटक वाचतो की काव्य? असा संभ्रम पडावा इतकी त्यात एकतानता दिसून येते. तीच गोष्ट त्यांच्या काव्याची होय. त्यांच्या अनेक कवितांत नाट्यमय कथानक असते नि त्याला ते काव्यमय उंची देत जातात. शेवटी रसिकाला एकाच वेळी दोन्ही रसांचा संमिश्रित आनंद देत ते विराम घेतात. याचेच आणखी एक उत्तम उदाहरण म्हणजे प्रेम आणि मरण ही चिरंजीवी कविता होय.

कवितेच्या आरंभी ते श्रीहोनाजी बाळाच्या

*जगीं सांगतात प्रीत पतंगाची खरी ।

झड घालून प्राण देतो दीपकाचे वरी ।*

या ओळी देतात होनाजी बाळांना ‘श्री’ लावून गोविंदाग्रज आपल्या पूर्वसूरीविषयी असलेला आदर व्यक्त करताना दिसतात. ज्याकाळी गडकरी हा आदर देतात, त्याकाळी केवळ कवीनाच नाही तर रामदास, तुकाराम, शिवाजी या सा-या इतिहासपुरुषांना सुध्दा एकेरी संबोधनाने संबोधायची प्रथा महाराष्ट्रात दिसून येत होती. या पार्श्वभूमीवर गोविंदाग्रजांचा हा आदरभाव अधिकच उठून दिसतो. असो !

होनाजी बाळ सांगतात, पतंग जणु दिव्याच्या ज्योतीवर झेप घेऊन तिच्यावर असलेले आपले प्रेम प्राणाचे मोल देऊन सिध्द करीत असतो. याच कल्पनाबीजाचा उपयोग करीत गोविंदाग्रजांचे काव्य आकार घेऊ लागते.

कोणत्यातरी जागी एक मैदान पसरलेले आहे. त्या मैदानावर एक भला मोठा वृक्ष वाढत चाललेला आहे. त्याच्या आसपास गुडघ्या एवढ्या उंचीची खुरटलेली झुडपे व काही वेली पसरलेल्या आहेत. त्यातील कित्येक रोज उगवतात नि रोज मरतात. पण त्यांची गणती कोणीच ठेवलेली नाही आणि त्या भल्या मोठ्या वटवृक्षाला त्यांच्याशी काहीही घेणे देणे नाही. त्याच्यासाठी त्या मैदानावर कितीतरी वेली सारख्या तळमळतात, असे वर्णन करीत कवी अचानक नाट्यमयतेकडे वळताना म्हणतो, ‘त्याने त्यावेलीवर प्रेम करावे हे स्वाभाविक ठरले असते पण कर्माची गती काहीतरी वेगळीच असते.’

हेही वाचा: आर्य चाणक्य : भारतीय राज्यशास्त्राचा जनक

*कोणत्या मुहुर्तावरती ।।

मेघांत वीज लखलखती||नाचली ।।

त्या क्षणीं । त्याचिया मनीं । तरंगति झणीं ।

गोड तरि जहरी । प्रीतीच्या नवथर लहरी ।। न कळतां ।।

न जाणो कोणत्या मुहूर्तावर ढगात वीज चमकली नि याच्या मनात प्रीतीच्या लहरी सळसळून गेल्या. त्यांना कवी नवथर अर्थात जीवनातील पहिल्यांदाच अनुभवायला येणा-या संबोधतानाच, गोड तरि जहरी म्हणायला विसरत नाही. कारण ख-या प्रीतीत जशी मनभावक मधुरता असते तशीच दाहक विरहता दडलेली असते.

त्याच्या मनावर उमटलेला तिचा ठसा काही केल्या विसरेना. त्यामुळे तिच्या वेडाने तो नेमधर्म विसरला, जगाशी असलेला त्याचा संबंध तुटला नि मनांत दूसरी कोणतीही आस राहिली नाही. मुसळधार पाऊस पडला; सारे रान हिरवेगार झाले पण याला साधी टवटवी पण आली नाही, वा-याने थैमान घातले तरी याचे एकही पान हलले नाही, कैकवेळा कळ्या आल्या पण त्या न फुलताच झडून गेल्या. याचे कारण पुनरुक्त सांगताना कवि गातो,

*तो योग । खरा हटयोग । प्रीतिचा रोग ।

लागला ज्याला । -- लागते जगावें त्याला ।। हे असें ।।*

त्याच्यात क्षमता असूनही तो अकर्मण्य बनतो. त्याची ही दशा पाहून आसपासची त्याच्या पासंगासही न पुरणारी दुनिया, त्याची कींव करायला लागली, कुणी त्याच्यावर हसू लागले तर कुणी त्याची दशा पाहून मनातल्या मनात तडफडू लागले. एवढ्या भल्या मोठ्या वृक्षावर वीतभर वाढलेली झुडूपे दया करु लागली. स्वर्गातील देव कुत्सितपणे हसू लागले, कुणी निंदा करु लागले तर कुणाला त्याची अवस्था पाहून भीति वाटायला लागली. थोडकयात सा-या जगांस त्याचे ओझे वाटू लागले. गोविंदाग्रजांनी केलेले हे वर्णन वाचताना मर्मज्ञ रसिकांना गालिबच्या ' इश्कने निकम्मा कर दिया गालिब ' या सुप्रसिध्द पंक्तिंची याद येईल. पण अधिक चौकसपणे पाहिले तर गालिबच्या निकम्माचा हा गडकरीमय काव्य विस्तार आहे हे ध्यानांत येईल. अर्थात् येथे हे ही स्पष्ट करणे गरजेचे आहे की गडक-यांच्या काव्यप्रतिभेच्या निर्माणात गालिबची भूमिका किंवा योगदान कणमात्रही नाही. तरीही दोन वेगवेगळ्या विचारात वाढलेल्या प्रतिभावंताच्या अनुभूतीतील एकतानता किती सारखी असते हे दाखवायला हे उदाहरण पुरेसे आहे.

हेही वाचा: ग्रीष्माचे अवतरण

गोविंदाग्रज पुढे वर्णितात, ‘इष्काचा जहरी प्याला ज्याच्या नशिबात येतो; त्याला हृदयाला फसवून हसावे लागते, कोणत्याही टोकाविण मरणे हेच त्याचे जगणे होते. त्याला दुनियादारी पटत नाही. शेवटी काय तर देवाविषयी भावच न राहिल्याने मूर्तितील देवपणा गळून पडतो व केवळ दगडच बाकी रहातो.’ यालाच ते प्रीतितील तप म्हणतात. याप्रमाणे त्याने किती वर्षे तप केले ते ठाऊक नाही. त्याचे ते कठोर तप पाहून इंद्राच्या इंद्रपदाला भीतिने थरकाप सूटला, तसा तो स्वाभाविकही होता कारण सत्ताधा-यालाच सत्ता जाण्याचे भय असते. म्हणून कवी इंद्रपद असा स्पष्ट निर्देश करतो तपस्वी ऋषि मुनिंना त्या वृक्षाचे तप पाहून आश्चर्य वाटू लागले तर अढळपदी असणा-या धृवाला त्याचे अढळ तप पाहून त्याचा मत्सर वाटू लागला.

रसिका! इंद्रपद जाईल म्हणून भय तर आपल्याला स्पर्धक ठरेल म्हणून धृवाला मत्सर अन् वीजेसारख्या एखाद्या अशरीरी बालिकेवरील प्रेमाचा उत्तुंग बिंदूतून निर्माण तप पाहून ऋषिगणांना वाटणारे आश्चर्य कवितेतील या रचना लक्षात घेतल्या तर गोविंदाग्रजांच्या महान प्रतिभा विवेकाचे कौतुकच वाटते.

हेही वाचा: गुंतवणुकीत परीक्षा संयमाची

तपाचा कालावधी संपताच तपोदेवता प्रकट झाली आणि प्रसन्नपणे त्याला म्हणाली, ‘हे तरुवरा ! तुझे तप फळाला आले आहे. तुला जे हवे असेल ते माग !‘ येथे कवी सूचित करतो कि काहीही मागण्यासाठी आधी तप करावे लागते, वाट पहावी लागते, धैर्य धरावे लागते आणि देणा-याला स्वतः होऊन देण्याची इच्छा व्हावी लागते. तप, धीर अन् देणा-याची इच्छा नसेल तर ती मागणी भीक ठरते अन् भीक मिळलेच याची शाश्वती नसते. येथे सारेच उलटे असल्याने ते वरदान ठरतेय. त्यामुळेच तपो देवता मागण्या आधीच त्याला एकेक वरदान देऊ लागते. ती म्हणते, ‘ तू या क्षणापासून चिरंजीव हो, दूसरा कल्पवृक्ष हो, इतकेच नाही तर प्रलयकाळात वाचणारा एकमेव व भाग्यवान असा वटवृक्ष हो!‘ तो तरुवर तिने दिलेल्या या गोष्टी स्वीकारुन प्रसन्न झाला असता किंवा स्वस्थ बसला असता तर ती तपश्चर्या अर्थहीन ठरली असती. म्हणून तो तिने दिलेले बाजूला सारत, तिला म्हणाला, ‘ देवी तुला जे काही द्यायचे ते दे. पण मला एकच गोष्ट दे माझ्या जीवाची बाला; ती प्रियतमा मला एकदा भेटव.‘

त्यावर तपो देवता त्याला समजावत हिताच्या गोष्टी सांगू लागली. ती स्पर्शासह तुला मरण देईल. ही शुध्द राक्षसी मागण्यापेक्षा जे कुणालाही कधीच मिळाले नाही ते माग. असा पोक्त सल्ला देते. तिच्या बोलण्यावर तो उपहासाने हसतो अन् तिला म्हणतो,

*निष्प्रेम चिरंजीवन तें ।

जगीं दगडालाहि मिळते ।। धिक् तया ।।

क्षण एक पूरे प्रेमाचा ।

वर्षाव पडो मरणांचा ।। मग पुढें ।।

रसिका! या ओळी मराठी साहित्यात अमर झाल्यात. निष्प्रेम चिरंजीवन धिककारत तो मरणामागून मरणांचा वर्षाव करणारे प्रेमाचे क्षणिक जीवन मागतो. व पुनः निग्रहाने बसतो. त्याचा तो निग्रह पाहून निरुपायाने तपो देवता ती वीज; ती गगनातील चंचल बाला त्याला भेटायला पाठवते. ती पण उतावीळ होत त्याकडे धावते. कडकड आवाज करीत ती त्याला स्पर्श करते. तिच्या नुसत्या स्पर्शाने तो पुरातन वृक्ष मूळासकट उन्मळून कोसळतो. कोसळता कोसळता तो खळखळून हसला, हर्षाच्या लहरीवर लहरी येऊन फडफडून त्याची सारी पानें हासली, त्याच्या कळ्या कायमच्या फुलल्या कारण

हेही वाचा: माझिया माहेरा : रसरशीत आठवणी

*तो योग । खरा हटयोग । प्रीतिचा रोग ।

लागला ज्याला । लाभते मरणही त्याला ।। हे असें ।।*

प्रेमयोगात मरणयोग दाखवित गोविंदाग्रज प्रतिभेची रानपालवी फुलवितात नि मराठी रसिकांसाठी धाडून देतात.

व्यक्ती व्यक्तीतील प्रेमाचे सरळ वर्णन न करता, वृक्ष नि वीज या दोन परस्पर विरोधी तत्वांवर पुरुष-स्त्रीत्वाचा आरोप करत फुललेली ही कविता, स्पर्शासह मरण नि मरणातही सफल प्रेम असा अद्भुत उच्चांक गाठते. तेंव्हा रसिक अक्षरक्षः भारावून जातो नि गोविंदाग्रजांच्या लोकविलक्षण प्रतिभेवर कायमचा फिदा होतो.

Web Title: Successful Saga Of The Wonderful Love Of The Banyan Tree Love And Death By Dr Neeraj Dev Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashiksaptarang
go to top