डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय? (सुधाकर कुलकर्णी)

sudhakar kulkarni write article in saptarang
sudhakar kulkarni write article in saptarang

रकमेचं पेमेंट करण्यासाठी डिमांड ड्राफ्ट (डीडी) हाही एक पर्याय वापरला जातो. विशेषतः शुल्क भरण्यासाठी किंवा दोन व्यक्ती, संस्थांना एकमेकांशी व्यवहार करताना रिस्क घ्यायची नसते, अशा वेळी डीडीद्वारे पेमेंट केलं जातं. डीडी म्हणजे नक्की काय, त्याची वैशिष्ट्यं काय, त्याच्याशी संबंधित नियम काय आदींबाबत माहिती.

दोन व्यक्ती/ संस्था एकमेकांस ओळखत नसतात किंवा त्यांना एकमेकांशी व्यवहार करताना रिस्क घ्यायची नसते; तसंच रोखीनंही व्यवहार करायचा नसतो, अशा वेळी विक्रेता खरेदीदारास डिमांड ड्राफ्टनं (डीडी) पेमेंट करण्याबाबत आग्रही असतो. याशिवाय कंत्राटदारास कामाचं टेंडर भरताना सोबतची बयाणा रक्कम डिमांड ड्राफ्टनंच भरावी लागते. विविध शैक्षणिक संस्थाचे प्रवेश अर्ज, यूपीएससी, एमपीएससी यांसारख्या स्पर्धा परीक्षांच्या अर्जासोबत शुल्क रकमेइतका डिमांड ड्राफ्ट जोडावा लागतो. थोडक्‍यात बऱ्याचशा आर्थिक व्यवहारांत पेमेंट करण्यासाठी डिमांड ड्राफ्ट घ्यावा लागतो.

त्या दृष्टीनं प्रथम आपण डिमांड ड्राफ्ट म्हणजे काय ते जाणून घेऊ. डिमांड ड्राफ्ट हे एक प्रीपेड निगोशिएबल इन्स्ट्रूमेंट असून, ते फक्त बॅंकेतूनच मिळू शकतं. यासाठी आपल्याला जेवढ्या रकमेचं पेमेंट करायचं आहे तेवढी रक्कम आधी बॅंकेत (चेकनं अथवा रोखीनं) भरावी लागते. यासाठी बॅंकेत खातं असलंच पाहिजे असं नाही. डिमांड ड्राफ्ट घेण्यासाठी सबंधित बॅंकेचं डिमांड ड्राफ्टसाठीचं असलेलं चलन घेऊन त्यात कोणास पेमेंट करायचं आहे त्याचं नाव, ज्या गावी/शहरात पेमेंट करायचं त्या गावाचं नाव (या ठिकाणी सबंधित बॅंकेची शाखा असणं आवश्‍यक असतं- अन्यथा डीडी काढता येत नाही), पेमेंट करायची रक्कम अंकी आणि अक्षरी, कमिशनची रक्कम ही सर्व माहिती भरून संबंधित जमा चलन बॅंकेत द्यावं लागतं. आपण पन्नास हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेचा डीडी घेणार असाल, तर आपला पॅन नंबरचा उल्लेख जमा चलनावर करावा लागतो. (बॅंकेत खातं नसल्यास पॅन कार्डची झेरॉक्‍स प्रत सोबत जोडावी लागते.)

एक उदाहरण बघू. संतोष मेहता यांना पंजाबमधल्या अमृतसर इथून मशिनरी विकत घ्यायची आहे आणि त्यासाठी लकी मशीन्स अँड टूल्स यांना पाच लाख रुपये इतकं पेमेंट करायचं आहे, तर ते पुण्यातल्या आपल्या बॅंक ऑफ बडोदा शाखेत जाऊन बॅंक ऑफ बडोदाच्या अमृतसर शाखेवर डिमांड ड्राफ्ट देण्यासाठी वर सांगितल्यानुसार चलन भरून सोबत आपल्या खात्याचा पाच लाख रुपये + कमिशनचा चेक देऊन विनंती करतील. सुमारे अर्ध्या तासात त्यांना लकी मशीन्स अँड टूल्स या नावानं बॅंक ऑफ बडोदा अमृतसर शाखेवर काढलेला डिमांड ड्राफ्ट दिला जाईल व या डिमांड ड्राफ्टवर त्याच्या नावाचा डिमांड ड्राफ्ट खरेदीकर्ता असा स्पष्ट उल्लेख असेल. (आत्तापर्यंत डिमांड ड्राफ्टवर केवळ पेयीचा नावाचा उल्लेख असायचा. तथापि रिझर्व्ह बॅंकेनं नुकत्याच दिलेल्या आदेशानुसार, 15 सप्टेंबर 2018 पासून डिमांड ड्राफ्टवर तो खरेदी करणाऱ्याच्या नावाचा उल्लेख डीडी इश्‍यू करणाऱ्या बॅंकेनं करणं बंधनकारक आहे. यामुळे व्यवहारातली पारदर्शकता वाढून बेनामी व्यवहारास आळा बसू शकेल.'
हल्ली काही बॅंका ऑनलाइन डीडी सुविधा देऊ लागल्या आहेत आणि तो ज्याच्या नावानं काढला आहे त्याला परस्पर पाठवण्याची सुविधा देत आहेत. (उदाहरणार्थ, एचडीएफसी बॅंक). डीडीचं पेमेंट फक्त बॅंकेमार्फतच पेयीच्या खात्यावर ट्रान्स्फर अथवा क्‍लिअरिंगद्वारा जमा होतं- रोखीनं पेमेंट दिलं जात नाही. सर्वसाधारणपणे प्रती हजारी पाच रुपये इतकं कमिशन डीडीसाठी आकारलं जातं; मात्र बॅंकेनुसार ते कमी-अधिक असू शकतं. काही बॅंका बॅंक खात्यातून अथवा चेकनं न घेता रोखीनं घेतलेल्या डीडीसाठी जास्त कमिशन आकारतात.

विशेष म्हणजे चेकप्रमाणं डीडीचं स्टॉप पेमेंट करता येत नाही. मात्र, ज्यानं बॅंकेत रक्कम भरून डीडी घेतला आहे, तो बॅंकेस डीडी परत करून रद्द करू शकतो आणि रद्द झालेल्या डीडीची रक्कम त्याच्या खात्यावर जमा केली जाते. घेतलेला डीडी गहाळ झाला, तर त्याऐवजी दुसरा डीडी मिळू शकतो. पूर्वी असा दुसरा डीडी देण्याआधी तो डीडी ज्या शाखेवर काढला आहे, त्या शाखेकडून सबंधित डीडीचं अद्याप पेमेंट झालं नसल्याची खातरजमा झाल्यावरच दुसरा डीडी दिला जात असे; मात्र आता सबंधित डीडीचं पेमेंट झालं आहे की नाही, हे डीडी इश्‍यू करणाऱ्या शाखेस ऑनलाइन पाहता येतं आणि पेमेंट झालं नसेल, तर तो डीडी "हॉट लिस्ट' करून लगेचच दुसरा डीडी देता येतो. आधीच्या गहाळ झालेल्या डीडीऐवजी नवीन डीडी घेताना पुन्हा कमिशन द्यावं लागतं.

यावरून आपल्या असं लक्षात येईल, की फंड ट्रान्स्फर किंवा पेमेंटसाठी डिमांड ड्राफ्ट हा एक सुरक्षित व पारदर्शी पर्याय आहे आणि म्हणूनच याला बॅंकिंग व्यवहारात विशेष स्थान आहे. सध्याच्या डिजिटल बॅंकिंगच्या जमान्यात उपलब्ध असणाऱ्या एनईएफटी, आरटीजीएस, आयएमपीएस, यूपीआय आणि भीमसारख्या सुविधांमुळं पेमेंट करणं अथवा फंड ट्रान्स्फर करणं खूपच जलद आणि सोपं झालं आहे तेही घरबसल्या. परिणामी डिमांड ड्राफ्टची मागणी हळूहळू कमी होत चालली आहे. नेट बॅंकिंग/डिजिटल बॅंकिंगचा वापर वाढत असला, तरी अजूनही डीडी सुविधेचा वापर करणारा वर्ग मोठा आहे आणि यामुळेच आणखी काही काळ डिमांड ड्राफ्टची गरज निश्‍चितच राहील; मात्र हळूहळू डिमांड ड्राफ्टची मागणी अगदी नगण्य होईल हे निश्‍चित.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com