esakal | संघ-मुस्लिम संवाद आणि मोहन भागवतांचं ‘ग्लासनोस्त’
sakal

बोलून बातमी शोधा

Mohan Bhagwat

संघ-मुस्लिम संवाद आणि मोहन भागवतांचं ‘ग्लासनोस्त’

sakal_logo
By
सुधींद्र कुलकर्णी sudheenkulkarni@gmail.com

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे सृजनशील विचारवंत असून ज्यांच्या मतांना महत्त्व दिलं जातं अशा व्यक्तींपैकी एक आहेत. ते जेव्हा बोलतात तेव्हा भारतात त्यांचं मत विचारात घेतलं जातं. केंद्रात निरंकुश सत्ता उपभोगणाऱ्या भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या हिंदू संघटनेचे ते प्रमुख आहेत, हेच एकमेव कारण यामागं नाही. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांमध्ये आणि वर्तणुकीत काही महत्त्वपूर्ण बदल घडवून आणण्याचा ते प्रयत्न करत आहेत हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं कारण आहे. संघात ‘ग्लासनोस्त’ (खुलेपणा) आणि ‘पेरेस्रोइका’ (फेररचना) आणण्याचा भागवतांचा हा प्रयत्न असल्याचं संघपरिवारात प्रतिष्ठित असलेल्या राम माधव यांनी म्हटलं आहे. ऐंशीच्या दशकात कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखालील सोव्हिएत महासंघात बदल घडवून आणण्याचा मिखाईल गोर्बाचेव्ह यांनी प्रयत्न केला होता, त्या वेळी हे दोन शब्द (ग्लासनोस्त आणि पेरेस्रोइका) जगाला माहीत झाले होते.

भागवतांनी दिल्लीत ‘भविष्य का भारत’ या संकल्पनेवर व्याख्यानमाला घेतली होती, त्यानंतर लगेचच सप्टेंबर २०१८ मध्ये, माधव यांनी, ‘हा संघासाठी ‘ग्लोसनोस्त-क्षण’ आहे,’ असं ‘द इंडियन एक्सप्रेस’मध्ये लिहिलं होतं.

(https://indianexpress.com/article/opinion/columns/mohan-bhagwat-rss-event-glasnost-in-rss-hindu-rashtra-muslims-5372558/). भागवतांच्या या व्याख्यानमालेची बरीच चर्चा झाली होती. ‘संघाला ज्या वैचारिक आव्हानांचा सामना करावा लागत होता, त्याबाबत सरसंघचालकांच्या विचारांमध्ये बऱ्यापैकी खुलेपणा दिसत आहे. संघाच्या अंतर्गत वर्तुळातील एक सदस्य म्हणून मी गेल्या दशकभरापासून, म्हणजेच भागवतांनी सूत्रं स्वीकारल्यापासून, या बदलाचा साक्षीदार आहे. हे रूपांतर सहज नाही. भागवतांनी आपल्या ‘ग्लासनोस्त’द्वारे बहुतेक टीकाकारांची तोंडं बंद केली आहेत यात शंकाच नाही. मात्र, ‘संघटनेच्या सर्व पातळ्यांवर हा नवा विचार रुजवण्यासाठी पेरेस्रोइकाशिवाय पर्याय नाही,’ असं माधव यांनी लेखात म्हटलं होतं. भागवतांनी आपल्या भाषणांमधून भारतीय राज्यसंघटनेवरील भूमिकाही अगदी स्पष्ट केली होती.

आपल्या लेखाचा शेवट करताना ठळक शब्दांत माधव लिहितात की, ‘भागवतांनी संपूर्ण राज्यघटना सर्वांसमोर वाचली आणि आणीबाणीच्या काळात तीत अंतर्भूत केलेल्या धर्मनिरपेक्षता आणि समाजवाद या शब्दांसह तिच्याबद्दल संघाला संपूर्ण आदर असल्याचं सांगितलं. सुधारणांच्या वाऱ्यावर स्वार झालेल्या गोर्बाचेव्ह यांना त्याबाबत विचारलं असता, ‘मी केलं नाही तर कोण करणार? आणि आता केलं नाही तर कधी करणार?’ असं त्यानं उत्तर दिलं होतं. भागवत मला तितकेच निश्‍चयी वाटतात.’ भागवतांच्या ‘ग्लासनोस्त’ अजेंड्याबाबत माधव यांनी केलेल्या दाव्यापेक्षा वेगळी मतं संघातील काही इतर नेत्यांनी व्यक्त केली आहेत. संघात यावर अंतर्गत चर्चा होत आहे हेच यातून स्पष्ट होत आहे. प्रत्येक सक्रिय संघटनेनं, मग स्थापनेच्या वेळची तिची विचारसरणी कोणतीही असो, बदलत्या काळानुसार बदलायलाच हवं. ज्यांना कालबाह्य ठरण्याचं दु:ख नाही, केवळ त्यांच्याचसाठी बदलांकडे दुर्लक्ष करण्याचा पर्याय खुला आहे.

भागवत यांनी डॉ. ख्वाजा इफ्तिकार अहमद यांनी लिहिलेल्या ‘द मीटिंग ऑफ माइंड्‌स : अ ब्रिजिंग इनिशिएटिव्ह’ या पुस्तकाचं ता. चार जुलैला प्रकाशन करत एक महत्त्वपूर्ण भाषणही केलं, त्या वेळी त्यांचं नवीन चिंतन आणि मुक्त कथन पुन्हा एकदा प्रत्ययाला आलं.

या पुस्तकाचे लेखक इस्लामचे अत्यंत समर्पित अनुयायी असून माझे फार जवळचे मित्र आहेत. अटलबिहारी वाजपेयी यांच्या पंतप्रधानपदाच्या काळात भारतीय जनता पक्षाला मुस्लिमांचा पाठिंबा मिळवण्यासाठी आम्ही एकत्र काम केलं होतं. ते आता संघाच्या ‘मुस्लिम राष्ट्रीय मंचा’शी जोडले गेलेले आहेत. कोणत्याही निःपक्ष व्यक्तीनं भागवतांचं संपूर्ण भाषण निःपक्षपणे ऐकल्यास (https://www.youtube.com/watch?v=Lcx4shmLIrw&t=1s) त्या व्यक्तीच्या लक्षात येईल की, मुस्लिम समुदायापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी किती धाडसी पाऊल उचललं आहे. याचं स्वागतच करायला हवं.

हिंदूंची आणि मुस्लिमांची ‘मनं जुळवण्यासाठी’ भारतात ‘पूलउभारणी’ची गरज आहे का? योग्य दिशेनं विचार करणाऱ्यांना वाटणारं उत्तर एका प्राचीन संस्कृत श्‍लोकाच्या माध्यमातून अत्यंत योग्य पद्धतीनं सांगता येईल : सेतुबंधनम्‌ सर्वरंजम्‌ (सर्वांचं कल्याण आणि आनंद साधण्यासाठी पूल बांधला जावो); सेतुबंधनम्‌ मार्गसाधनम्‌ (नवीन मार्ग निर्माण करण्यासाठी आणि नवीन वाटा उजळण्यासाठी पूल बांधला जावो); सेतुबंधनम्‌ स्नेहकारणम्‌ (व्यक्ती आणि देश यांच्यादरम्यान चांगुलपणा आणि मैत्री वृद्धिंगत करण्यासाठी पूल बांधला जावो); सेतुबंधनम्‌ विहिततारणम्‌ (कायद्याच्या चौकटीत राहून मानवतेसाठी जे योग्य असेल ते करण्यासाठी पूल बांधला जावो).

मुस्लिमविरोधी संघटना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संघाचे प्रमुख असलेल्या भागवतांनी अहमद यांच्या पुस्तकाचं ‘पूल’बांधणीसाठीचा प्रामाणिक प्रयत्न म्हणून कौतुक केलं आहे. ‘मतभेद हा काही तोडगा असू शकत नाही. चर्चा हाच मार्ग ठरू शकतो,’ असं त्यांनी म्हटलं आहे. ते ठामपणे असंही म्हणतात की,‘ ‘भारतात राहण्याचा मुस्लिमांना अधिकार नाही,’ असं म्हणणारी व्यक्ती हिंदू असू शकत नाही. जमावाकडून होणाऱ्या मारहाणीत जे सामील असतात ते हिंदुत्वविरोधी असतात.’ त्यांच्या या भाषणाची संघाच्या समर्थकांमध्ये आणि टीकाकारांमध्येही जोरदार चर्चा झाली. त्यांच्या विधानांचं स्वागत करणाऱ्या व्यक्तींनी - यांमध्ये अनेक प्रतिष्ठित मुस्लिम व्यक्तींचाही समावेश आहे - एक साधार टीकाही केली आहे व ती म्हणजे : ‘नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रं स्वीकारल्यावर जमावाकडून मुस्लिमांची हत्या होण्याच्या अनेक घटना घडल्या त्या वेळी भागवतांचं मौन का होतं?’ ‘भाजप आणि संघपरिवारातील इतर संघटनांचे नेते इस्लामविरोधात आणि मुस्लिमांविरोधात गरळ ओकत होते त्या वेळी संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप का केला नाही?’

संघाला या प्रश्‍नांपासून पळ काढता येणार नाही. तरीही, माध्यमांनी नोंद घेतलेल्या घटनांपेक्षा बरंच काही अधिक त्या पुस्तकात आणि भागवतांच्या भाषणात आहे.

भारतीय मुस्लिमांचा उद्वेग संघाला ऐकू का जात नाही?

मुस्लिम आणि त्यांची मातृभूमी यांच्यात वितुष्ट आणण्याच्या इस्लामी प्रचाराला अहमद यांनी योग्य उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे : ‘हिंदू आणि मुस्लिम समुदाय हे शतकांपासून शांततेनं एकत्र राहत आहेत आणि पुढंही कायम तसेच राहतील. दोघांसमोर दुसरा कोणताही पर्याय नाही. आपली सांस्कृतिक आणि राष्ट्रीयत्वाची पाळेमुळे/मार्ग समान असून एकमेकांशी जोडलेली आहेत. ज्या वेळी एखादा भारतीय मुस्लिम, स्वत:चा भारतीयत्वाचा धागा विसरून आपला वारसा अरब, इराणी, अफगाणी आणि तुर्क यांच्याशी जोडू पाहतो आणि त्यालाच सर्वोच्च अभिमान मानतो, त्या वेळी भेदभाव निर्माण होतो.’ याच वेळी, हा प्रश्‍न अधिक गुंतागुंतीचा करून ठेवल्याबद्दल ते बहुसंख्याक समुदायालाही दोषी मानतात.

यासंदर्भात ते म्हणतात : ‘मुस्लिम आक्रमकांनी आणि सत्ताधीशांनी केलेल्या अत्याचारांवरून हा समुदाय मुस्लिमांना लक्ष्य करत त्यांना ‘बाबर की औलाद’ किंवा ‘गझनी की औलाद’ म्हणून हिणवतो. आमचा या आक्रमकांशी काहीही संबंध नाही. अत्यंत थोडे लोक सोडले तर बहुसंख्य मुस्लिमांचा, त्यांचे पूर्वज हिंदू होते आणि त्यांची मुळे या भूमीच्या प्राचीन संस्कृतीशी जोडली गेली आहेत, यावर विश्‍वास आहे. असं असेल तर मग त्यांना आक्रमकांच्या रांगेत का बसवले जात आहे?’

जातीय दंगलींमध्ये मुस्लिमांची ‘हजारो कोटी रुपयांची संपत्ती नष्ट’ झाल्याबद्दल भारतीय मुस्लिमांना होणाऱ्या वेदना अहमद व्यक्त करतात आणि असंही निदर्शनास आणून देतात की ‘दंगलीप्रकरणी ‘योग्य एफआयआरची नोंद झालेली नाही’ आणि ‘हिंसाचार, लूटमार आणि बलात्कारामागील सूत्रधार आणि प्रत्यक्ष करणारे बहुतेक जण मोकाट फिरत आहेत.’ याउलट, मुस्लिम ज्या वेळी ‘आपला घटनात्मक अधिकार वापरून निदर्शनं करतात तेव्हा त्यांच्यावर गुन्हे दाखल होतात, ते पोलिसांच्या गोळीबारात मारले जातात, त्यांना अटक होते आणि सार्वजनिक मालमत्तेचं झालेलं नुकसान त्यांच्याकडून वसूल केलं जातं. हा न्याय आहे का?’

‘दूरचित्रवाणी वाहिन्यांवरून इस्लाम, मुस्लिम आणि मुस्लिम समाजाला कमी लेखण्याच्या अभियाना’वरही अहमद नाराजी व्यक्त करतात आणि म्हणतात की, ‘हा समाजाला दुखावण्याचा, त्रास देण्याचा आणि अवमान करण्याचा मुद्दामहून केलेला प्रयत्न आहे. माध्यमांतून होणाऱ्या या एकतर्फी आरोपांमुळे शत्रुत्व आणि वैराची भावना निर्माण होते. याला अंत नाही. सर्व दुष्टत्व केवळ मुस्लिम समाजातच आहे का?’

अहमद एक संयुक्त आवाहन करतात - ‘जर बहुसंख्याक हिंदू समाजानं भारतातील मुस्लिमांना एका राष्ट्रीय कुटुंबातील घटक असल्याप्रमाणे वागणूक दिली तर बनावट मुळांशी असलेला संबंध तुटण्याचा वेग आपोआप वाढेल. उपाय सुरू करताना सर्वांत प्रथम म्हणजे दोन्ही बाजूंनी आपल्या जिभांना आवर घालतानाच, लक्ष्य करण्याचं धोरण बदलायला हवं. सुधारणा ही दोन्ही बाजूंनी आवश्‍यक असणारी प्रक्रिया आहे.’

हिंदू-मुस्लिम संबंधांवरील भागवतांचे दहा विचार

डॉ. भागवतांनी त्यांच्या भाषणात अस्वाभाविकपणे स्पष्ट मुद्दे मांडले.

एक : मुस्लिम समुदायातील ‘अलगाव’ आणि ‘अविश्‍वासा’बाबतची वास्तवता मान्य करून ते म्हणाले की, या दोन्ही बाबी दूर करायला हव्यात. मात्र, ते असंदेखील म्हणाले की, ‘हटाने का मतलब छिपाना नही होता.’

वास्तव परिस्थिती जशी आहे तशी समजून घ्यायला हवी.

दोन : ‘एकात्मतेसाठीचे प्रामाणिक आवाहन’ या शब्दांत डॉ. भागवतांनी पुस्तकाचं कौतुक केलं आहे. ‘आत्मीयते’च्या भावनेनं जिथं लोक एकत्र आले आहेत, अशा ‘सुनियोजित समाजा’च्या उभारणीची गरज त्यांनी व्यक्त केली. ‘ज्या वेळी हिंदूंना आणि मुस्लिमांना आपण एक असल्याचं वाटत नाही त्या वेळी अडचणी निर्माण होतात. वादामुळे दोघांचंही नुकसान होतं.’’

तीन : ते म्हणाले की,‘अल्पसंख्याक वर्ग हा आपलाच एक घटक आहे, ते आपले बंधूच आहेत. धार्मिक श्रद्धेच्या आधारावर भेदभाव करता येणार नाही.’ एका प्रचलित कथानकाचा संदर्भ देत त्यांनी दावा केला की,‘जर आर्य (मूर्तिपूजक नसलेले) आणि मंदिरात जाणारे हे दोघंही आपलाच एक घटक/हिस्सा असू शकतात तर मग आपण मुस्लिमांना परकीय कसं समजणार? अखेर, तीदेखील भारतमातेची मुलेच आहेत. आपल्या सांस्कृतिक ठेव्याचे ते वारसदार आहेत. त्यांचे आणि आपले पूर्वज एकच आहेत. आणि आपलं आणि त्यांचं रक्त एकच आहे.’

चार : ‘श्रद्धा को हम बाँधकर नही रख सकते। करेंगे तो वह पाप होगा। प्रायश्चित करना पडेगा।’ हे मान्य करून आपण एकमेकांना समजून घ्यायला हवं आणि सत्य, न्याय आणि राष्ट्रीय एकतेच्या बाजूनं एकत्रितपणे उभं राहायला हवं.’

पाच : ‘आपला देश एक आहे, समाज एक आहे. लोकांच्या श्रद्धा वेगवेगळ्या असू शकतात आणि श्रद्धास्थानांमधील वैविध्याचा आपल्या देशात कधीही अनादर झालेला नाही,’ हे सांगून भागवतांनी एक विलक्षण ठाम वक्तव्य केलं - ‘जो इतरांच्या भावनांचा अनादर करेल त्याला बाहेर जावं लागेल. उसे बाहर जाना पड़ेगा। यह बात पक्की है!’

सहा : ‘ ‘फुकटची प्रसिद्धी’ मिळवण्यासाठी एखाद्या व्यक्तीकडून अल्पसंख्याकांच्या विरोधात काहीतरी बोललं जाऊ शकतं...पण त्याला हिंदू समाजातीलच लोकांकडून विरोध केला जाईल.’

सात : ‘इस्लामला भारतात धोका नाही. इथं आलेल्या सर्व धर्मांना आपल्या राज्यघटनेनं संरक्षण दिलेलं आहे.’

भारतातील धार्मिक वैविध्याबद्दल आदर व्यक्त करतानाच, भागवत यांनी एक रंजक निरीक्षण मांडलं व ते म्हणजे : ‘भारतातले अनेक हिंदू हे मुस्लिम फकिरांचे भक्त बनले आहेत आणि अनेक मुस्लिम हिंदू संतांचे शिष्य बनले आहेत. माझ्या विदर्भातच अशी अनेक उदाहरणं आहेत.’

आठ : ‘ज्या वेळी जमावाकडून हत्या होण्यासारखे प्रकार घडतात त्या वेळी कायद्यानुसारच कारवाई होणं आवश्‍यक आहे. संपूर्ण निःपक्षपातीपणे न्यायदान व्हायला हवं.’

नऊ : ‘न हिंदू वर्चस्व, न मुस्लिम वर्चस्व। केवल राष्ट्रहित का वर्चस्व’ अशा प्रकारच्या भारताची संघाची संकल्पना आहे.

दहा : भागवतांनी सर्वाधिक जोर देऊन आणि अत्यंत निःसंदिग्धपणे एका मुद्दा स्पष्ट केला - ‘राजकारणातून समाजात एकता आणता येणं शक्य नाही. राजकारण लोकांमध्ये फूट पाडतं, त्यांना एक करत नाही.’ त्यामुळे समाजात एकता आणि सौहार्द निर्माण करण्यासाठी, ‘समझदार लोगों को हौसले के साथ लंबे समय के लिए काम करना होगा। उन को डटे रहना चाहिए। आवाज बुलंद करनी चाहिए। जख्म गहरें है। समझ आने में समय लगता है।’

विशेष म्हणजे, भागवतांनी आपल्या संपूर्ण भाषणात मोदी सरकारची बाजू मांडणारा किंवा स्तुती करणारा एकही शब्द उच्चारला नाही.

‘ध्रुवीकरणाचं राजकारण थांबवा,’ असं नरेंद्र मोदी-अमित शहा-योगी आदित्यनाथ यांना सांगण्याचं धाडस संघात आहे का?

भागवतांच्या भाषणात हे सकारात्मक मुद्दे असले तरी, त्यांत काही जाणवण्याइतपत कमतरता होत्या. भागवत हे आपल्या संघटनेत आणि संघ-भाजप या कक्षेत ‘ग्लासनोस्त’ आणि ‘पेरेस्रोइका’ची किती प्रमाणात अंमलबजावणी करू शकतात याच्या मर्यादा दिसून आल्या. उदाहरणार्थ : वर्तमान भारतीय राजकीय स्थितीबद्दलच्या ढळढळीत सत्याबाबत त्यांनी एकही टिपण्णी करण्याचं धाडस दाखवलं नाही. कारण, ते तसं करूच शकत नव्हते. नरेंद्र मोदी, अमित शहा आणि योगी आदित्यनाथ (अखेरचे दोन नेते हिंदुत्ववादी राजकारणाची प्रतीके आहेत) हे तेच नेते आहेत, ज्यांच्या राजकारणामुळे आणि प्रशासनामुळे भारतीय मुस्लिमांमध्ये वेगळेपणाची, अविश्‍वासाची आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ते अत्यंत पद्धतशीरपणे प्रशासनातून मुस्लिमांना दूर करत आहेत आणि त्यांचं खच्चीकरण करत आहेत. उदाहरणार्थ : मोदी सरकारच्या नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळाच्या महाविस्तारात एकाही मुस्लिम मंत्र्याचा समावेश नाही. यातूनच मोदींच्या ‘सब का साथ, सब का विकास, सब का विश्‍वास’ या घोषणेतील फोलपणा आणि दुटप्पीपणा दिसून येतो. धार्मिक ध्रुवीकरणाशिवाय आणि हिंदू मतपेढीला आकर्षित केल्याशिवाय भाजप सत्ता मिळवू अथवा टिकवू शकत नाही.

ध्रुवीकरणाचा अजेंडा राबवण्यासाठी मुस्लिमविरोधी हिंसाचार, द्वेष, दूषित मतांचा प्रचार, संशय आणि खोटी माहिती पसरवत राहणं आवश्‍यक ठरतं; जेणेकरून दोन समुदायांमधील अंतर अधिक वाढत जाईल. हे सर्व काही पूर्णपणे थांबवणं शक्य नसलं तरी, कमी करता येण्यासारखं आहे. त्यासाठी संघाच्या वरिष्ठ नेत्यांनी अशा कृत्यांचा निषेध करत ती करणाऱ्यांच्या विरोधात ठोस कारवाई करणं आवश्‍यक आहे. भागवत आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अद्यापपर्यंत तरी असं काही केलेलं नाही. त्याचा परिणाम म्हणून, जो संघ आतापर्यंत राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या आपल्या स्वयंसेवकांना नैतिक मार्गदर्शन करत होता, तो आता त्यांच्या दुय्यम सहकाऱ्याच्या भूमिकेत गेला आहे. संघपरिवारात आता सरसंघचालकांपेक्षा मोदींना अधिक महत्त्व आहे. यामुळे मुस्लिम आणि इतर अल्पसंख्याकांमध्ये, तसंच धर्मनिरपेक्ष हिंदूंच्या मनातही, - डॉ. भागवत हे सुधारणावादी नेते असून ते आपल्या अभियानाकडे ‘मी नाही तर मग कोण? आणि आताच नाही तर कधी?’ इतक्या ठामपणे पाहतात, अशी विश्‍वासाची भावना निर्माण होणार नाही.

अखेरीस, भारतातील मुस्लिम समाजानंही प्रामाणिकपणे आत्मपरीक्षण करण्याची ही वेळ आहे. समाजातील धार्मिक नेत्यांनी आणि विचारवंतांनी इतिहासातील चुकीच्या वळणांचा - फाळणीसाठीच्या चळवळीपासून ते अयोध्याचळवळीपर्यंत - आढावा घ्यावा. तसंच, सर्व चुकीच्या कृत्यांचा आणि इस्लामच्या नावाखाली त्यांना पाठीशी घालण्याच्या प्रकारांचाही आढावा घ्यायला हवा. या आत्मपरीक्षणातूनच त्यांना भारतीय राज्यघटनेवर विश्वास ठेवताना सामोरं जावं लागणाऱ्या त्यांच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, तसंच हिंदू समाजाबरोबरील बंधुत्वाची भावनाही दृढ होईल. मुस्लिमबहुल देशांमध्ये हिंदू, ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्य समुदायांवर होत असलेल्या अत्याचाराच्या विरोधातही त्यांनी आवाज उठवायला हवा.

या आत्मपरीक्षणाच्या प्रक्रियेत, त्यांना काही कठीण प्रश्नांचा सामना करावा लागेल : राष्ट्रीय स्वयंसवेक संघाबरोबर चर्चेचा मार्ग कायमस्वरूपी बंद करावा का? अर्थातच, नाही. संघ ही सर्वांत मोठी आणि सर्वांत प्रभावी हिंदू संघटना असून तिच्याकडे मुस्लिमच काय; पण भाजपच्या विखारी राजकारणाला विरोध करणारे हिंदूही दुर्लक्ष करू शकत नाहीत, हे वास्तव आहे. संघाशी संवाद साधण्याच्या आणि सहकार्य करण्याच्याही मार्गाचा अवलंब करून तो विस्तारणं हे देश आणि मानवतेसाठी योग्य ठरेल.

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत असून, ‘फोरम फॉर न्यू साऊथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

loading image