सीओपी-२६ परिषद आणि हिंदू पर्यावरणदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Environment
सीओपी-२६ परिषद आणि हिंदू पर्यावरणदर्शन

सीओपी-२६ परिषद आणि हिंदू पर्यावरणदर्शन

संयुक्त राष्ट्रांची ‘कॉप-२६’ ही जागतिक नेत्यांची परिषद स्कॉटलंडच्या ग्लास्गो इथं नुकतीच पार पडली. हवामानबदलाच्या विनाशकारी परिणामांपासून पृथ्वीला वाचवण्याबद्दल इथं जागतिक पातळीवर झालेल्या चर्चेत आणि कृतीमध्ये भारताकडून, विशेषतः हिंदू संस्कृतीकडून देण्यासारखं काही होतं का? मानव आणि निसर्ग यांच्यातल्या संबंधांबाबत आणि मानवाचा विकास आणि पर्यावरणसंरक्षण या दोन्ही गोष्टी एकमेकांना अडथळा न आणता कशा साध्य करता येतात, याबाबत हिंदू विचारसरणी आणि सांस्कृतिक परंपरेकडून काही दिशा मिळू शकते का?

असे प्रश्न जेव्हा माझ्या मनात उत्पन्न होतात, तेव्हा मला अत्यंत चिंतनशील असलेला एक वैयक्तिक अनुभव ठळकपणे आठवतो. सुमारे तीस वर्षांपूर्वी माझ्या मुलीचा सांगलीत जन्म झाला. रोज सकाळी कृष्णेच्या किनारी लांबपर्यंत फिरायला जात असताना, या पृथ्वीवर नव्या जीवाचं स्वागत करतानाचा आनंद माझ्या मनात मावत नसे. तसंच, जीवन-मृत्यूच्या या अव्याहतपणे चालणाऱ्या चक्राचं गूढ काय असेल, या अफाट विश्वात मानवाच्या अस्तित्वाचा उद्देश काय असेल याचा मी विचार करत असे. विश्वात अशी कोणती तरी प्रभावी शक्ती आहे, जिला आपण सर्वसाधारणपणे देव असं म्हणतो, की जी मानव, निसर्ग आणि विश्वाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवते, यावर पूर्वी कधी नव्हता इतका माझा ठाम विश्वास बसला होता. देव सर्वत्र आहे आणि सर्व गोष्टींमध्ये आहे, असं हिंदुविचार सांगतो. तो निर्जीव वस्तूंमध्ये आहे, तसाच जीवांमध्येही त्याचा वास आहे, तो निर्गुण आहे तसाच सगुणही आहे. म्हणूनच, निसर्गाबद्दल मनात पूज्य भाव ठेवण्याची हिंदूंची परंपराच आहे. निसर्गाच्या रूपात देव जीवांचं पालनपोषण करतो, असा त्यांचा ठाम विश्वास असतो. हा दृष्टिकोन आणि त्यासंबंधीच्या रूढी आणि परंपरा पाश्चिमात्य वळणावर गेलेल्या शहरी वर्गाच्या तुलनेत शेतकरी, ग्रामीण कलाकार, गोपालक, मेंढपाळ, मच्छिमार आणि अनेक वर्गांतल्या सामान्य भारतीयांनी अजूनही जिवंत ठेवल्या आहेत.

सांगलीला कृष्णाकाठी प्रभातफेरीला जात असताना मला रस्त्याच्या कामासाठी खडी फोडणाऱ्या महिलांचा एक गट दिसत असे, तेव्हा मला या गोष्टीची जाणीव व्हायला सुरुवात झाली.

पहिला दगड फोडण्यापूर्वी त्या महिला त्या दगडाची एक साधी छोटीशी पूजा करत असत. त्या दगडाला पाण्यानं स्वच्छ धुऊन, त्याला हळदी-कुंकवानं माखून आणि उदबत्ती लावून भक्तिभावानं नमस्कार केला जात असे. या सगळ्याचा प्राचीन अर्थ असा की - माझ्यात जे काही दैवी आहे त्याचा, तुझ्यात जे काही दैवी आहे, त्याला प्रणाम आहे. या गरीब आणि बहुधा अशिक्षित असलेल्या या महिलांबरोबर झालेल्या माझ्या संवादातून, मी आतापर्यंत हिंदुपरंपरेबद्दल जे काही वाचन केलं होतं, त्याला पुष्टी मिळाली.

त्या म्हणाल्या,‘हे फक्त दगड नाहीत, त्यांच्यातही देव आहे. आमचं आयुष्य आणि जीवन म्हणजे या देवाचंच देणं आहे. या दगडांपासूनच रस्ते तयार होतात, त्यांचा सर्वांनाच फायदा होतो. म्हणजेच, देव सगळ्यांचं रक्षण करतो आणि काळजी घेतो.’

शहाणपणाचे हे शब्द सध्या जगात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पर्यावरणाच्या संकटावर महत्त्वपूर्ण प्रकाश टाकतात. जगभरातल्या देशांनी आणि वित्त व प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या दोन घोडचुकांमुळे आणि पूर्णपणे चुकीच्या जागतिक उतरंडीमुळे हे संकट उद्भवलं आहे. पहिली चूक म्हणजे, आधुनिक जगानं तयार केलेल्या अवाढव्य आणि असंवेदनशील यंत्रणेमध्ये देव या संकल्पनेचा अभाव असणं. सध्याचं अर्थयंत्र हे निसर्गाकडे, म्हणजेच जंगल, नद्या, समुद्र, प्राणी (यातील प्रत्येक गोष्ट हिंदूंमध्ये पवित्र मानली जाते), मानवाच्याच उपभोगासाठी अस्तित्वात असलेली वस्तू म्हणून पाहतं. वास्तविक, निसर्ग ओरबाडून घेण्याचा हा प्रकार सर्वच मानवजातीच्या उपयोगासाठी आणि कल्याणासाठी सुरू नाही. तर, या पृथ्वीवरच्या ७.८ अब्ज लोकांमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात असलेल्या निवडक व्यक्तींच्या सुखासाठी, नफ्यासाठी आणि हाव पूर्ण करण्यासाठी हा प्रकार सुरू आहे.

दुसरी चूक हादेखील ओरबडण्याचाच आणखी एक प्रकार आहे. देव ही संकल्पना झुगारून देणाऱ्या अर्थयंत्राला जगातल्या प्रत्येक मानवाची काळजी घेण्याची गरज वाटत नाही. हिंदुविचारसरणीच्या मुळाशी असलेलं ‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ हे काही त्या अर्थयंत्राचं ध्येय नाही. उलट, ‘अल्पजन हिताय, अल्पजन सुखाय’ हे त्याचं धोरण आहे. या यंत्रानं पारंपरिक सामाजिक आणि कौटुंबिक संबंध मोडून काढले, समाजाला कोषात बंदिस्त केलं आणि विशिष्ट व्यक्तिवादाचा विषाणू जोपासला. त्याचा परिणाम म्हणून, ‘सर्वोदय’ नव्हे, तर ‘स्व-उदय’ हाच समाजातल्या लोकांच्या प्रेरणेचा स्रोत बनला. भौतिकवाद, उपभोगवाद आणि आत्मकेंद्रितता यांचा प्रसार- आणि आपल्या अस्तित्वामागच्या खऱ्या उद्देशाचा विसर हा या अर्थयंत्राचा अविभाज्य भाग आहे. सार्वजनिक मालमत्तेच्या जोरावर स्वतःच्या नफ्यात अधिकाधिक वाढ करण्याचा हाच एकमेव मार्ग आहे. ‘पृथ्वी प्रत्येकाची गरज भागवू शकते, हाव नव्हे,’ या महात्मा गांधीजींनी दिलेल्या इशाऱ्याकडं म्हणूनच वारंवार दुर्लक्ष केलं जात आहे. हे धोरण असल्यामुळेच हे अर्थयंत्र ईशोपनिषदामधून सांगितलेलं ज्ञानही नाकारतं. देवानं दिलेल्या देणगीचा गरजेपुरताच वापर करा आणि बाकीचा भाग इतरांना वापर करण्यासाठी असू द्या, असं हे उपनिषद आपल्या प्रत्येकालाच शिकवतं.

शोषणावर आधारित या अर्थयंत्राची निर्मिती ही पाश्चिमात्य औद्योगिकीकरण, वसाहतवाद आणि साम्राज्यवादापासून झाली आहे. मानवी संस्कृतीच्या इतिहासाच्या तुलनेत अत्यंत छोटा काळ असलेल्या गेल्या चार शतकांतील हा बदल आहे. हे न बदलता येण्यासारखं वास्तव असून ते मानवजातीच्या मानगुटीवर कायमस्वरूपी बसलं आहे. या वास्तवात निश्चितच सुधारणा करून ते पर्यावरणपूरक आणि मानवी हिताचं करता येऊ शकतं; पण त्यासाठी केवळ हिंदूच नव्हे तर बौद्ध, जैन, पारसी, ज्यू, ख्रिस्ती, इस्लाम आणि शीख या आपल्या सर्वच धर्मांनी दिलेल्या मूलभूत शिकवणीचं आपण पालन करायला हवं.

हवामानबदलाबाबत हिंदू विचारवंतांनी आणि धार्मिक नेत्यांनी जागतिक चर्चेत सक्रिय भाग घेतलेला नाही ही निराशाजनक बाब आहे. त्यातुलनेत, पोप फ्रान्सिस यांच्या नेतृत्वातील कॅथॉलिक चर्चनं घेतलेला भाग प्रभावी ठरला. जून २०१५ मध्ये, ऐतिहासिक पॅरिस पर्यावरणकराराच्या आधी, पोप यांनी ‘लॉडाटो सी’ (आपल्या सामायिक घराची काळजी घेण्यासाठी) या नावानं एक महत्त्वाचं निवेदन प्रसिद्ध केलं.

त्यात ते म्हणतात : ‘खरा पर्यावरणवादी दृष्टिकोन हा नेहमीच सामाजिक दृष्टिकोन ठरतो. पृथ्वीचं आणि गरिबांचं या दोघांचं गाऱ्हाणं सांगणाऱ्या आणि त्यांना न्याय मिळवून देणाऱ्या प्रश्नांचा पर्यावरणाबाबतच्या चर्चांमध्ये समावेश करायला हवा.’ ते असंही सांगतात, ‘देवानं मानवाला केवळ पृथ्वीच भेट म्हणून दिलेली आहे असं नाही, तर ज्या मूळ चांगल्या कारणासाठी ती दिलेली आहे, त्यासाठीच तिचा वापर केला जाणं अपेक्षित आहे आणि मानव हीसुद्धा मानवाला दिली गेलेली एक भेटच आहे, त्यामुळेच मानवानं निसर्गाचा आणि नैतिकतेचा आदर राखावा.’

गेल्या महिन्यात रोममध्ये विश्वशांतीसाठी झालेल्या जागतिक आंतरधर्मीय परिषदेत मी भाग घेतला होता. यात पोप यांचंही भाषण झालं होतं. माझ्या भाषणात मी सांगितलं की, ‘केवळ नवीन तंत्रज्ञान आणि पर्यावरणपूरक विकासात गुंतवणूक केल्यानं पर्यावरणाचं संकट दूर होणार नाही. हे आवश्यकच आहे; पण मानवी विकासाला नवी दिशा देण्यासाठी न्याय आणि समानता या आधारावर पर्यावरण आणि अर्थव्यवस्था यांचा नवं सहजीवन सुरू करणं त्याहून अधिक आवश्यक आहे. त्यामुळे ‘लॉडाटो सी’च्या धर्तीवर ‘हवामानबदलावर सर्वधर्मीय निवेदन’ प्रसिद्ध करायला हवं. जागतिक पातळीवर

हवामानबदलाबाबत कृती करताना मार्गदर्शक दिशा म्हणून मानव-निसर्ग-देव यांच्यातल्या संबंधांना धार्मिक आणि आध्यात्मिक परिमाण देण्याचा आपण सर्वांनी प्रयत्न करायला हवा.’

मला हे समजून घेता आलं, त्यासाठी सांगलीतल्या त्या खडी फोडणाऱ्या महिलांचा मी कायमस्वरूपी ऋणी राहीन.

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत असून, `फोरम फॉर न्यू साऊथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

loading image
go to top