उच्च शिक्षणाविषयीचा कन्फ्युशिअन दृष्टिकोन | High Education | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

High Education
उच्च शिक्षणाविषयीचा कन्फ्युशिअन दृष्टिकोन

उच्च शिक्षणाविषयीचा कन्फ्युशिअन दृष्टिकोन

sakal_logo
By
सुधींद्र कुलकर्णी sudheenkulkarni@gmail.com

मी जेव्हा जेव्हा बीजिंगला जातो, तेव्हा वँगफुजिंग रस्त्यावरील इंग्लिश पुस्तकांच्या माझ्या आवडत्या दुकानाला आवर्जून भेट देत असतो. हे ठिकाण तिआनमेन चौकापासून जवळच आहे. इथं मला चिनी तत्त्वज्ञान, संस्कृती, कला आणि राजकारणावरचा नवा खजिना हमखास मिळतो. दोन वर्षांपूर्वी मला ‘हायर एज्युकेशन अँड द युनिव्हर्सल ऑर्डर’ (उच्च शिक्षण आणि वैश्‍विक वारसा) असं आकर्षक नाव असलेलं पुस्तक मिळालं. उच्च शिक्षण म्हणजे शालेय शिक्षण संपवून महाविद्यालयांमध्ये आणि विद्यापीठांमध्ये घेतलं जाणारं शिक्षण, अशी आपली सर्वसाधारण समजूत आहे. हे पुस्तक मात्र सर्वथा वेगळं आहे. कन्फ्युशिअन तत्त्वज्ञानावरील हे एक अभिजात पुस्तक आहे. या तत्त्वज्ञानानंच चिनी संस्कृतीचं पोषण करून ती टिकवून ठेवली आहे आणि या देशाला एक स्वतंत्र ओळख दिली आहे.

कन्फ्युशिअस (ख्रिस्तपूर्व सन ५५१ ते ४७९) हे एक महान शिक्षक-गुरुदेव होते. आजही चीनमध्ये त्यांना अत्यंत आदरणीय मानलं जातं. गेल्या काही दशकांमध्ये मार्क्स, लेनिन आणि माओ झेडाँग यांच्यापेक्षा कन्फ्युशिअस आणि इतर प्राचीन चिनी विचारवंत अधिक लोकप्रिय होत आहेत. कन्फ्युशिअस यांना शिक्षणाबद्दल प्रचंड आत्मीयता आणि त्यांच्या देशाच्या प्राचीन नीती-नियमांबद्दल अत्यंत आदर होता. ‘चिनी इतिहासातील सुवर्णकाळात होऊन गेलेल्या प्राचीन ऋषींच्या विचारांचा मी फक्त ‘प्रसारक’ आहे, उद्गाता नाही,’ असं ते अत्यंत नम्रपणे सांगत. हा सुवर्णकाळ त्यांच्या आधी दोन हजार वर्षांपूर्वी होऊन गेला होता. म्हणूनच, पूर्वजांची पूजा करण्याची पद्धत हा चिनी संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. कुटुंबातील ‘ज्येष्ठांबद्दल प्रेम’ आणि समाजातील, देशातील ‘पूर्वजांबद्दल प्रेम’ असणं हे सुशिक्षितपणाचं लक्षण असल्याची भावना चीनमध्ये खोलवर रुजली आहे.

कन्फ्युशिअस यांच्या मते, उच्च शैक्षणिक ज्ञान मिळवण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यानं पाच नीतिमूल्यं अंगी बाणवायला हवीत व ती म्हणजे रेन, यि, लि, जि, शिन. रेन...म्हणजे परोपकार, करुणा आणि आपल्यावर इतरांनी जितकं प्रेम करावं अशी अपेक्षा असते तितकंच प्रेम इतरांवर करणं, यि (न्यायीपणा), लि (सदाचरण), जि (ज्ञानसाधना) आणि शिन (निष्ठा). केवळ ज्ञानासाठी ज्ञान मिळवणं ही या तत्त्वज्ञ ऋषीसाठी त्याज्य बाब होती.

समाजात नैतिक क्रांती घडवण्यासाठी शिक्षण असावं असं त्यांना वाटत असे. व्यक्ती, कुटुंब आणि सरकारची नैतिक वर्तणूक आणि वैश्‍विक नीतिनियम यांचा मेळ घातला जावा असं त्यांचा विचार सुचवतो. त्यांच्याच शब्दांत सांगायचं तर : ‘नैतिक कायदा म्हणजे असे नियम की आपलं अस्तित्व असेपर्यंत एका क्षणासाठीही आपली त्यापासून सुटका नाही...ईश्‍वरी कायदा म्हणजे सत्य. तर, मानवी कायदा म्हणजे मिळवलेलं आणि अमलात आणलेलं सत्य.’ या शब्दांचं महात्मा गांधीजींच्या विचारांशी साधर्म्य आहे.

‘मानवतेचे हे नैतिक कायदे दैवी रचनेशी सुसंगत असतात. याच दैवी रचनेचं वर स्वर्गातील ऋतुबदलांवर नियंत्रण असतं आणि खाली पृथ्वीवर भौतिक स्वरूपात दिसून येणाऱ्या नैतिक रचनेशी ते साधर्म्य साधतात,’ हे कन्फ्युशिअस यांनी दाखवून दिल्याचं पुस्तकाच्या प्रस्तावनेत म्हटलं आहे. ‘हे कायदे मिळून एक यंत्रणाच तयार होते आणि त्या माध्यमातून स्वर्ग आणि पृथ्वी दोहोंवरील सर्व घटनांना आधार दिला जातो आणि त्यांचं पोषण केलं जातं, त्यांच्यावर प्रभाव टाकला जातो, त्यांना सामावून घेतलं जातं. कायद्याच्या याच यंत्रणेनुसार ऋतूंचं कालचक्र फिरतं व सूर्य आणि चंद्र आलटून-पालटून उगवत दिवस आणि रात्र निर्माण करतात. याच कायद्याच्या यंत्रणेद्वारे सर्व उत्पन्न केल्या गेलेल्या गोष्टी एकमेकींना हानी न पोहोचवता त्यांच्या नियमांनुसार आणि पद्धतीनुसार स्वत:ला निर्माण करतात आणि विकसित करतात. नदीच्या प्रवाहाप्रमाणे कनिष्ठ शक्ती सर्वत्र संचार करतात, तर निर्मितीची महान शक्ती मूकपणे आणि सातत्यानं काम करत राहते. ही तीच - एकच यंत्रणा सर्वांमध्ये उपस्थित आहे आणि त्यामुळेच हे विश्‍व अत्यंत महान बनलं आहे,’ असं कन्फ्युशिअस सांगतात. भारतातल्या ऋषींनी प्राचीन काळी ‘यत् पिण्डे तत् ब्रह्माण्डे’ असं सांगून ठेवलं होतं. कन्फ्युशिअस यांचा विचार हा त्याचाच प्रतिध्वनी भासतो.

कन्फ्युशिअन तत्त्वज्ञानाचे अभ्यासक रवी भूतलिंगम् यांच्या मते, ‘या यंत्रणेमुळे शांती-सौहार्द-सद्गुणांचा विकास, नैतिक वर्तन, कुटुंबाच्या मूल्यांचं संवर्धन, ज्ञानाचा शोध आणि सुशासन यांच्यात सुसंवाद निर्माण झाला आहे. कन्फ्युशिअस यांनी त्यांच्या ‘महान शिकवणुकी’त जे म्हटलं आहे ते आजही शास्त्रशुद्ध आणि कालसुसंगत वाटतं.’

‘ज्या वेळी एखाद्या गोष्टीचा शोध घेतला जातो, त्या वेळी ज्ञानाचा विस्तार होतो. ज्या वेळी ज्ञानाचा विस्तार होतो, त्या वेळी विचार परिपक्व होतात.विचार परिपक्व झाल्यावर हृदय आणि मन शुद्ध होतं. ज्यावेळी हृदय आणि मन शुद्ध असतं, त्या वेळी व्यक्तिगत जीवनाला आकार येतो. व्यक्तिगत जीवनाला ज्या वेळी आकार येतो, त्या वेळी कुटुंब नियंत्रित होतं. कुटुंब नियंत्रित झाल्यावर, देश सुनियोजित होईल. आणि ज्या वेळी देश सुनियोजित होईल, त्या वेळी जगभरात शांतता निर्माण होईल.’

उच्च शिक्षणाबाबतचं कन्फ्युशिअन तत्त्वज्ञान हे फक्त सर्वसामान्य नागरिकांसाठी सांगितलं गेलेलं नाही. पुस्तकात म्हटल्यानुसार, ते सत्ताधाऱ्यांना अधिक लागू आहे. ‘जेव्हा सत्ताधीश व्यक्ती जनतेची मनं जिंकून घेईल, तेव्हा त्याला साम्राज्याचा लाभ होईल; तो जेव्हा जनतेच्या मनातून उतरेल, तेव्हा साम्राज्यही त्याच्या हातून निसटेल...’ ‘संपत्ती आणि भौतिक समृद्धीमुळं नव्हे तर, अभिमान आणि कर्तव्य यांमुळे देश समृद्ध होतो...’ हे स्पष्ट केल्यानंतर उच्च शिक्षण सांगतं की : ‘अधिकारपदांवर असणाऱ्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी संपत्ती जमा करू नये, तर कर्तव्यभावनेनं समाजाच्या आणि लोकांच्या भल्यासाठी काम करावं.’ भ्रष्ट सत्ताधाऱ्यांसाठी असलेला हा संदेश पुढच्या वाक्यातून अधिक निःसंदिग्धपणे सांगितला आहे...‘सत्ताधाऱ्याची तुलना बोटीबरोबर, तर जनतेची तुलना पाण्याबरोबर करता येईल. बोट पाण्यावर तरंगू शकते; पण पाण्याच्या लाटा बोट उलटवूनही टाकू शकतात.’ म्हणजेच, कन्फ्युशिअनवाद म्हणजे परिस्थितीशी जुळवून घेणारं तत्त्वज्ञान नव्हे. सत्ताधारी अनियंत्रित झाले तर त्यांची हकालपट्टी करण्यासाठी ‘जनतेची ताकद’ एकत्र करायला हवी.

कन्फ्युशिअस यांची आणखी एक कालातीत शिकवण आहे व ती म्हणजे, : ‘वाद असले तरी सौहार्द कायम ठेवा.’ मतभिन्नता कायमस्वरूपी असणारच आहे - ती कुटुंबात असेल, मित्रांमध्ये आणि सहकाऱ्यांमध्ये असेल, समाजातल्या दोन समुदायांमध्ये असेल आणि देशांमध्येही असेल; पण कन्फ्युशिअस यांनी, वाद असतानाही एकसमान ध्येयासाठी समान समजूत, एकवाक्यता आणि सहकार्य निर्माण करण्यावर मोठा भर दिला आहे. ते सांगतात, ‘ज्ञान, सहशिक्षण, परस्परांचा आदर आणि चर्चा हे परस्परांबद्दल विश्वास निर्माण करण्याचे, वाद कमी करण्याचे आणि सौहार्द निर्माण करण्याचे मार्ग आहेत.’

आज भारत आणि चीन यांच्यादरम्यान काही गंभीर स्वरूपाचे मतभेद आहेत, वादही आहेत. युद्धानं किंवा महागड्या शस्त्रस्पर्धेनं हे वाद मिटणार आहेत का? कधीही नाही. अधिक समस्या आणि वाद मात्र निर्माण होतील. शेजारीदेश म्हणून आपण विश्वासनिर्मिती करणाऱ्या चर्चांचा आणि सहकार्याचाच मार्ग अनुसरायला हवा; जेणेकरून मतभेद निवळतील आणि वाद मिटतील. दोन्ही देशांचे नेते, राजनैतिक अधिकारी आणि लष्करी अधिकारी यांना आपल्या महान गुरूंनी सिद्ध केलेलं उच्च शिक्षण देण्याची आवश्यकता आहे.

त्यामुळेच, मला मनापासून वाटतं की, भारतीयांनी कन्फ्युशिअस, लाओ त्सू, मेन्शिअस आणि चीनमधल्या इतर विचारवंतांबद्दल अधिक जाणून घेणं आवश्यक आहे. याबरोबरच चीनमधल्या लोकांनीही आमच्या प्राचीन, मध्ययुगीन आणि अर्वाचीन काळातल्या महान गुरूंबाबत माहिती करून घेणं ही काळाची गरज आहे. या गुरूंमध्ये गौतम बुद्धांव्यतिरिक्त (अर्थातच चीनमध्ये सर्वत्र यांच्याबद्दल पूज्यभाव आहे), वाल्मीकी, व्यास, महावीर, ज्ञानेश्वरमहाराज, तुकाराममहाराज, कबीर, गुरू नानक, स्वामी विवेकानंद, अरविंद आणि इतर अनेकांचा समावेश होतो. भारतीय आणि चिनी (जगभरातल्या इतर देश, संस्कृती आणि धर्मांमधल्याही) गुरूंमध्ये आणि समाजसुधारकांमध्ये एक समान गोष्ट आहे व ती ही की : त्यांनी दाखवून दिलं, उच्च शिक्षण म्हणजे केवळ सर्टिफिकेटसाठी आणि नोकरीसाठी शिक्षण नव्हे, तर जीवन कसं जगावं आणि जग कसं बदलावं- स्वामी विवेकानंद यांच्या शब्दांत ‘आत्मनो मोक्षाय जगद् हिताय च’- यासाठी शिक्षण.

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार-विचारवंत असून, ‘फोरम फॉर न्यू साऊथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

loading image
go to top