‘गोर्बाचेव्ह’ यांच्यामुळे मी ‘माजी कम्युनिस्ट’ झालो!

खरंतर गेल्या रविवारी प्रकाशित झालेल्या श्रीराम पवार यांच्या ‘जग बदलणारा ‘पराभूत’ नेता’ या लेखनानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याबद्दल परत मी कशाला लिहावं, हा प्रश्न मला पडला.
mikhail gorbachev
mikhail gorbachevsakal
Summary

खरंतर गेल्या रविवारी प्रकाशित झालेल्या श्रीराम पवार यांच्या ‘जग बदलणारा ‘पराभूत’ नेता’ या लेखनानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याबद्दल परत मी कशाला लिहावं, हा प्रश्न मला पडला.

खरंतर गेल्या रविवारी प्रकाशित झालेल्या श्रीराम पवार यांच्या ‘जग बदलणारा ‘पराभूत’ नेता’ या लेखनानंतर मिखाईल गोर्बाचेव्ह यांच्याबद्दल परत मी कशाला लिहावं, हा प्रश्न मला पडला. परंतु, माझ्या राजकीय जीवनामध्ये एक अतिमहत्त्वाचा बदल, सोव्हिएत युनियनच्या या नुकतेच मृत पावलेल्या शेवटच्या अध्यक्षांमुळे झाल्याने मी हा स्तंभ त्यांच्या स्मृतींस अर्पण करीत आहे.

सत्तरच्या दशकात मुंबईतल्या आयआयटीमध्ये शिकत असताना मी कम्युनिस्ट चळवळीकडे आकर्षित झालो होतो. मार्क्स आणि लेनिन यांच्या विचारांचा माझ्या मनावर पगडा होता. भारतात सर्वत्र पसरलेल्या दारिद्य्रावर आणि सामाजिक-आर्थिक असमानतेवर सोव्हिएत महासंघासह इतर समाजवादी देशांनी अंगीकारलेली कम्युनिस्ट पद्धत, हेच एकमेव उत्तर आहे, असं माझं ठाम मत बनलं होतं. त्या काळात प्रसिद्ध होणारं सोव्हिएत साहित्य मी आवर्जून वाचत असे. भारतातल्या दोन कम्युनिस्ट पक्षांनी सोव्हिएत महासंघाबाबत केलेलं लिखाणही मी वाचत होतो. अमेरिका आणि पश्‍चिम युरोपने तंत्रज्ञानासह सर्व क्षेत्रांमध्ये जितका विकास केला आहे, तितकाच विकास सोव्हिएत महासंघाने अत्यंत कमी कालावधीत करून दाखविला आहे, हे मला त्या प्रचारकी थाटाच्या साहित्य वाचनामुळे खरं वाटू लागलं होतं.

गोर्बाचेव्ह सत्तेत आल्यानंतर एप्रिल १९८५ मध्ये, प्रचार आणि वास्तव यांच्यात मोठा फरक असल्याचं मला हळूहळू लक्षात येऊ लागलं. वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी महासत्तेचं नेतृत्व हाती आलेले गोर्बाचेव्ह बोलत असलेली भाषा भारतातल्या किंवा इतर कोणत्याही देशातल्या पोथीनिष्ठ कम्युनिस्ट नेत्यांपेक्षा वेगळी होती. त्यांच्या भाषणांमधून सोव्हिएत महासंघाच्या इतिहासातील आतापर्यंत दडवून ठेवलेले काळे अध्याय लोकांसमोर येऊ लागले. विशेषत:, १९२४ ते १९५३ या स्टॅलिनच्या कालावधीत झालेले गुन्हेही त्यांनी उघड केले.

देशाच्या सर्वोच्च पदावरील नेत्यानेच ‘ग्लास्नोस्त’च्या (मुक्तपणाच्या) प्रेरणेला प्रोत्साहन दिल्याने सोव्हिएत महासंघामधलं वातावरण पूर्णपणे बदलून गेलं. वृत्तपत्रं, नियतकालिकं, दूरचित्रवाणींवरील चर्चा, विद्यापीठांमधील वर्ग, चित्रपट, रंगभूमी, गाणी या सर्व माध्यमांनी आतापर्यंत देशाच्या कडक सेन्सॉरशिपमुळे जखडून ठेवल्या गेलेल्या कल्पनांची मुक्तपणे उधळण करण्यास सुरुवात केली; आणि त्या, इंटरनेट नसलेल्या काळातही, मी खुद्द सोव्हिएत महासंघाद्वारे प्रसिद्ध होणाऱ्या आणि पाश्‍चिमात्य माध्यमांनीही सांगितलेल्या माहितीचे कण गोळा करण्यासाठी धडपडत असे.

‘ग्लास्नोस्त’बरोबरच गोर्बाचेव्ह यांनी आणखी एक रशियन शब्द जगभरात लोकप्रिय केला- पेरेस्त्रोएका (पुनर्रचना)! भाषणांमागून भाषणं देत गोर्बाचेव्ह यांनी प्रशासन, न्यायपालिका, शिक्षण आणि अर्थव्यवस्थेच्या कम्युनिस्ट यंत्रणेत तातडीने आणि आमूलाग्र बदल करण्याचा आग्रह धरला. आयुष्यभर लेनिनचे चाहते राहिलेल्या गोर्बाचेव्ह यांनी समाजवादाची कास न सोडताही, ‘सोव्हिएत महासंघाने कम्युनिस्ट कट्टरतेची पाळंमुळं उखडून टाकत ‘नवीन विचारां’चा अंगीकार करावा, असा हिरिरीने प्रचार केला. भांडवलवादी पाश्‍चिमात्यांच्या ज्ञानाची फळं चाखण्यासही त्यांची ना नव्हती. भारतातल्या भाकप आणि माकप नेत्यांसाठी हे सर्व निषिद्ध होतं. त्यांनी गोर्बाचेव्ह यांनी सुचवलेल्या सुधारणांना विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्यामुळे माझ्या मनाची दोलायमान अवस्था झाली. माझ्या स्वप्नातल्या देशाला भेट देऊन सर्व गोष्टी स्वतःच्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहण्याची माझी तीव्र इच्छा होती. त्या कालावधीत मला दोन वेळेस तशी संधी मिळाली. १९८५ च्या जुलै महिन्यात मी मॉस्कोमध्ये आयोजित केलेल्या जागतिक युवा आणि विद्यार्थी महोत्सवात सहभागी झालो होतो. गोर्बाचेव्ह यांनीच या महोत्सवाचं उद्‌घाटन केलं होतं. त्यांना प्रत्यक्ष पाहणं आणि त्यांचं भाषण ऐकणं, हे मला झपाटून टाकण्यासारखं होतं. मी मॉस्कोच्या सौंदर्यावर लुब्ध झालो. क्रेमलिन, मोस्कव्हा नदी, शांतता स्मारकं, मोठाली उद्यानं आणि याहून विशेष म्हणजे भुयारी रेल्वे स्थानकं, हे सर्व काही एखाद्या संग्रहालयाप्रमाणे मला भासत होतं.

मॉस्कोमधला महोत्सव संपल्यानंतर भारतीय शिष्टमंडळाला उझबेकिस्तानची (तेव्हा सोव्हिएतच्या १५ गणराज्यांमध्ये समाविष्ट असलेला आणि नंतर स्वतंत्र झालेला देश) राजधानी ताश्‍कंदला नेण्यात आलं. या शहरात लालबहादूर शास्त्रींचा पुतळा आहे. पाकिस्तानचे जनरल अयुब खान यांच्याबरोबर जानेवारी १९६६ मध्ये करार केल्यानंतर याच शहरात त्यांचं निधन झालं. आमच्या शिष्टमंडळाला ताश्‍कंदमधल्याच एका ट्रकच्या कारखान्यात नेण्यात आलं. इथंच सर्वांत पहिल्यांदा सोव्हिएत महासंघाच्या दाव्यांबाबत माझ्या मनात शंका निर्माण झाली. हा कारखाना फारच जुनाट वाटत होता. आयआयटीमध्ये शिकत असताना मी पुण्यातल्या ‘टेल्को’ला (आताची टाटा मोटर्स) भेट दिली होती, त्याच्याशी मी नकळत तुलना केली. या कारखान्यापेक्षा ‘टेल्को’ ही निःसंशय हरप्रकारे सरस होती. माझ्या मनात प्रश्‍न निर्माण झाला : ‘काही बाबतीत भारत हा सोव्हिएत महासंघापेक्षा अधिक विकसित कसा?’

मी १९८९ मध्ये दुसऱ्यांदा सोव्हिएत महासंघाला भेट दिली, त्या वेळी हा संशय आणखीनच बळावला. या वेळी मी सेंट पीटर्सबर्गजवळच्या (तेव्हाचं लेनिनग्राड) त्वेर या महान व्होल्गा नदीच्या उगमस्थानापासून ते ही नदी कॅस्पियन समुद्राला मिळते त्या कझान शहरापर्यंत १५ दिवस बोटीने प्रवास केला. रशियन प्रवासी अफानासी निकितिन हा १४६९ मध्ये (वास्को द गामापेक्षा तीस वर्षं आधी) ज्या मार्गाने भारतात आला होता, त्याच मार्गावरून मला जायचं होतं. या प्रवासात रशियाची भव्यता मला मोहून गेली. नदीच्या किनाऱ्यावरच्या विविध गावं आणि शहारांमधली, दुसऱ्या महायुद्धात हिटलरच्या आक्रमक सेनेवर मिळवलेल्या विजयाची स्मृती वागवणारी स्मारकं पाहून मी स्तब्ध झालो होतो. तरीही, मला जाणवत होतं की, सोव्हिएतमध्ये राहणारे नागरिक, विशेषतः युवक हे कम्युनिस्ट राजवटीतल्या अनेक गोष्टींवर नाराज होते. त्यांच्या अर्थव्यवस्थेत अनेक त्रुटी होत्या. पश्‍चिमेकडील देशांतून आयात केलेल्या वस्तूंबद्दल लोकांमध्ये तीव्र आकर्षण होतं.

उदाहरणार्थ - माझ्याकडे असलेला ‘मेड इन जपान’ कॅमेरा प्रत्येकाला हाताळून पहावासा वाटत होता. या कालावधीपर्यंत गोर्बाचेव्ह यांच्या ग्लास्नोस्त आणि पेरेस्रोएका यांचाही जोर वाढला होता. पण का कोणास ठाऊक; मला मात्र सोव्हिएत महासंघ एका मोठ्या बदलाच्या दिशेने वाटचाल करत असल्याचं वाटत नव्हतं. दोन वर्षांनंतरच कम्युनिस्ट राजवट कोसळली, सोव्हिएत महासंघाचंही विघटन झालं आणि त्याबरोबरच गोर्बाचेव्ह यांचं अल्पजीवी, पण इतिहास बदलवून टाकणारं नेतृत्व लयाला गेलं. भारतातल्या कम्युनिस्ट चळवळीबरोबर असलेला संबंध मी याचवेळी तोडून टाकला.

गोर्बाचेव्ह यांच्यात त्रुटी नव्हत्या असं नाही; पण ते माझे हिरो बनले - आणि त्यांच्या मृत्यूपर्यंत ते हिरोच राहिले. यामागे अनेक कारणं आहेत. एक म्हणजे, युद्धाला विरोध आणि शांततेचा स्वीकार या मतावर ते ठाम होते. अण्वस्त्रांवर वैश्‍विक आणि संपूर्ण बंदी असावी, यासाठी ते जितक्या आग्रहीपणाने बोलले, तितकं क्वचितच इतर कोणी जागतिक नेता बोलला असेल. ‘‘अणुयुद्ध विजय मिळवून देऊ शकत नाही, त्यामुळे ते कधीही लढलं जाऊ नये,’’ असं ते नेहमी म्हणत. अमेरिका आणि सोव्हिएत महासंघातलं शीतयुद्ध शांततेत संपलं असेल, तर त्याचं मोठं श्रेय गोर्बाचेव्ह यांना जातं. सोव्हिएत गणराज्यांना रक्ताचा एकही थेंब सांडावा न लागता स्वातंत्र्य मिळालं, यासाठीही इतिहास गोर्बाचेव्ह यांना लक्षात ठेवेल. गोर्बाचेव्ह यांनी प्रचंड तोट्यात गेलेली अफगाणिस्तानमधली त्यांची मोहीमही आवरती घेतली. युद्धग्रस्त अफगाणिस्तानमधून सोव्हिएतचा अखेरचा सैनिक काबूलमधून १९८९ ला बाहेर पडला, त्या वेळी मी तिथंच होतो. हिंसाचार आणि गोंधळाच्या वातावरणात अमेरिकेचं सैन्य २०२१ मध्ये अफगाणिस्तानबाहेर पडलं, त्याहून तो प्रकार कितीतरी सहज आणि नाट्यपूर्ण होता.

गोर्बाचेव्ह हे भारताचे चांगले मित्र होते. हिंदू अध्यात्मवादाचं त्यांना कौतुक होतं. १९९६ मध्ये मॉस्को इथं स्वामी लोकेश्‍वरानंद यांनी त्यांची भेट घेतली होती, त्या वेळी हे दिसून आलं होतं. रशियातल्या रामकृष्ण मिशनशी संबंध असलेले आणि या भेटीवेळी उपस्थित असलेले माझे मित्र मिखाईल चिरियातेव्ह मला म्हणाले, ‘‘गोर्बाचेव्ह हे महात्मा गांधींबद्दल आणि लिओ टॉलस्टॉयशी असलेल्या त्यांच्या साम्याबद्दल अत्यंत आदराने बोलले. त्यांनी स्वामी विवेकानंद आणि रवींद्रनाथ टागोरांच्या विचारांचंही कौतुक केलं. १९८६ च्या त्यांच्या भारतभेटीची आणि पंतप्रधान राजीव गांधींसह भारतीय जनतेने केलेल्या स्वागताचीही त्यांनी आठवण सांगितली. विविध देशांच्या जनतेमध्ये धार्मिक सौहार्द आणि बंधुतेचा प्रसार करण्यासाठी संतांची आणि सांस्कृतिक क्षेत्रातील लोकांची मोठी भूमिका असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं.’’

गोर्बाचेव्ह हे आता फारसे लोकप्रिय नाहीत, हे त्यांचं युग संपल्यानंतर मी रशियाला दिलेल्या अनेक भेटींदरम्यान मला दिसून आलं आणि याचं मला दुःख झालं. रशियाने महासत्तेचं स्थान आणि प्रतिष्ठा गमावल्याबद्दल बहुतेक रशियन लोक त्यांनाच जबाबदार ठरवत होते. पण, मी रशियाचा इतिहास जसा वाचत गेलो आणि रशियन विचारवंतांबरोबर चर्चा करत गेलो, तसं माझ्या लक्षात येत गेलं की, गोर्बाचेव्ह यांनी आणलेल्या लोकशाहीवादी सुधारणा आवश्‍यकच होत्या. भारतातल्या कम्युनिस्टांसाठी यातून एक मुख्य धडा मिळतो, तो म्हणजे, त्यांनी सोव्हिएत मॉडेलचं (किंवा इतर कोणत्याही देशाचं) आंधळेपणाने अवलंबन करू नये. त्यांनी त्यांचं स्वतःचं भारतीय मॉडेल तयार करावं. ते आताही यासाठी प्रयत्न करू शकतात.

(सदराचे लेखक ज्येष्ठ पत्रकार - विचारवंत असून, ‘फोरम फॉर न्यू साउथ एशिया’ या संस्थेचे संस्थापक आहेत.)

(अनुवाद : सारंग खानापूरकर)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com