मुलाखतींतून उलगडलेले बाबासाहेब | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलाखतींतून उलगडलेले बाबासाहेब
मुलाखतींतून उलगडलेले बाबासाहेब

मुलाखतींतून उलगडलेले बाबासाहेब

-: सुधीर गाडगीळ

जख्खड म्हातारी अन् कथ्थक...

तुम्ही आणि पुलं दोघही बोलण्यातील माहीर. दोघांमध्ये कधी शब्दांची जुगलबंदी झाली का?

‘‘हो अनेकदा, खूप गमती घडल्या, पुण्यात सकाळी ते नेहमी फिरायला जात, माझ्याकडे येत. माझं अवघड पायऱ्यांचं घर बघून पुलं म्हणाले, ‘‘जख्खड म्हातारीनं कथ्थकची पोज घ्यावी तसं दिसतं तुमचं घर.’’

शब्दफेक, आवाजाचा नाद, आशयसंपन्न अन् नेमके मुद्दे आणि चेहऱ्यावर प्रसन्न आत्मविश्‍वास यामुळे बाबासाहेबांची भाषणं ऐकत वक्तृत्वाच्या छटा समजत गेलो. बहुतेक भाषणात शिवरायांचा विषय असल्याने त्यांना ऐकता ऐकता इतिहासाची गोडीही लागली. शंभरीतील पदार्पणानिमित्त त्यांना वंदन करण्यासाठी अलीकडे जुलैमध्ये त्यांचे चिरंजीव अमृतरावांच्या घरी गेलो होतो. शंभरीचे वाटणार नाहीत आशा उत्साहात भरभर पावलं टाकत बाबासाहेब उत्साहाने आतल्या खोलीतून बाहेर आले. माझ्यासारख्या माणसालाही ‘या या सुधीरराव’ असं आदरयुक्त अगत्याने स्वागत केले. अवघे तीन साडेतीन महिन्यांपूर्वी, शंभरीच्या उंबरठ्यावर असूनही चेहऱ्यावर सुरकुतीही नव्हती. बोलण्यात आनंद होता. गेल्या ४५ वर्षांत मी त्यांची अधिकृत नऊ वेळा मुलाखत घेतली आणि पर्वती पायथ्याच्या घरात अनौपचारिक गप्पा तर अनेकदा झाल्या. २०१८मध्ये ‘सकाळ’साठी प्रदीर्घ गप्पाही मारल्या. इतरांच्या विसंगतींवर विचारही न करण्याने आपण पॉझिटिव्ह राहतो आणि तब्येत उत्तम टिकते, असे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांनी माझ्या त्या शेवटच्या भेटीत असंही सांगितलं,‘‘मी मोदींना भेटायला गेलो होतो, तेव्हा त्यांच्या गळ्यात कवड्याची माळ घालूनच त्यांना शुभेच्छा दिल्या होत्या. ते त्यावेळी माझ्याशी स्वच्छ मराठीत बोलले.’’ बाबासाहेबांच्या निधनाची बातमी कळली आणि सगळ्या मुलाखती डोळ्यासमोर आल्या. त्यातील निवडक मुद्‍द्यांची ही धावती झलक.

बाबासाहेब म्हणजे इतिहासाचे डोळस उपासक, तपशीलावर कडक पकड, विलक्षण स्मरणशक्ती. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीची बीजं त्यांच्या बालपणात रुजलेली पाहायला मिळतात. याविषयी त्यांना विचारलं, तेव्हा ते म्हणाले, ‘‘आमच्या वडिलांच्या भाषणांनी मी प्रभावित होत असे. ते जो इतिहास कथन करायचे, त्याचा माझ्या मनावर झालेला परिणाम टिकून आहे. मला नकला करायचाही फार छंद होता.’’ प्रत्यक्ष बालगंधर्व, नानासाहेब फाटक, केशवराव दाते, चिंतामणराव कोल्हटकर हे दिग्गज पहायला मिळाले. हे सारे वडिलांमुळे घरी येत. यांच्यामुळे संगीत, चित्रकला, नृत्यकला, कीर्तन, तमाशासुद्धा सगळंच अनुभवण्याचा छंद मलाही लागला. लहानपणी स्वातंत्र्यवीर सावरकरांना मी त्यांची नक्कल करून दाखवली होती. त्यावर ते मला म्हणाले, ‘फारच छान, उत्तम; पण एक लक्षात ठेव आयुष्यभर केवळ लोकांच्या नकलाच करू नकोस, स्वतःचेही काही असू दे आणि खरोखर त्या दिवसापासून मी नकला करणं बंद केलं.’’

दीनानाथ मंगेशकरांची थेट भेट झाली आहे ना?

ः ‘‘हो, दीनानाथांना मी साडी वगैरे घालून स्त्री भूमिका करताना पाहिले आहे. बालगंधर्वांना वन्स मोअर मिळत, ते अनुभवले आहे. पण त्यावेळी त्यांचे शरीर गलितगात्र झालेलं होत. दोन माणसं त्यांना स्टेजवर अक्षरशः ढकलत आणत. पण स्टेजवर गेल्यावर ते उत्तम गाऊन वन्स मोअर घेत.’’

चिं. वि. जोशीं सारख्या विनोदी लेखकाचीही भेट झाली आहे ना ?

‘‘आहो चिं. वि. जोशींचा तर मी साहित्य परिषद निवडणुकीत पराभव केलाय.’’

ललिता पवार, चंद्रकांत, शांताराम बापू अशा अनेकांच्या आठवणी आहेत. या साऱ्यांच्या आठवणींनी मी गुदमरून जातो. त्यांचा सहवास घडलाय. काहींचे उखाणेही ऐकलेत. ’’

‘जाणता राजा’ या गाजलेल्या कलाकृतीची संकल्पना तुम्हाला कशातून सुचली?

ः ‘‘मला दामू केंकरे भेटले १९७४ मध्ये. राज्याभिषेकाला बरोबर ३०० वर्ष पूर्ण होत होती. त्यानिमित्ताने एक प्रदर्शन भरविण्यात येत होते. मोजक्या मिनिटांमध्ये राज्याभिषेकाचा प्रसंग दामू केंकऱ्यांना दाखवावासा वाटला. त्यांनी माझ्याकडून संहिता लिहून घेतली व प्रसंग दाखवला. इटलीमध्ये ५०० कलावंत आणि ३०० घोड्यांसह एक मोठं नाटक मी पाहिलं, ते पाहून माझ्या डोक्यात कल्पना असं नाटक आपण शिवाजी महाराज यांच्यावर करू. मी लिहून काढलं. संजय पुरंदरे सरांनी ते बसवलं आणि प्रयोग सुरू झाले. गंमत म्हणजे ललिताबाई, सूर्यकांत अशा अनेक नामवंतांना त्यात काम करायचं होतं. पण मी मात्र सर्वसामान्यांना घेऊन अगदी रिक्षावाला, भाजी विकणाऱ्यांना घेऊन मी ते नाटक सादर केलं.’’

तुमच्या वक्तृत्वाला मिळालेली सर्वोत्तम दाद कोणाची ?

ः ‘‘आत्मस्तुतीमुळे मला थोडा संकोच वाटतो; पण सर्वाधिक दाद गद्यामध्ये आद्य असलेले नानासाहेब फाटक यांची. आणि याही पलिकडे एक विशेष दाद म्हणजे लता मंगेशकरांची. शिवाजी गणेशन यांना घेऊन माझ्याकडे आल्या आणि गणेशन यांचा माझा परिचय करून देताना त्या म्हणाल्या ‘ हे जे माझ्या शेजारी उभे आहेत ते इतिहासातले, गद्यातले लता मंगेशकरच आहेत. या वाक्यावर मी सर्वाधिक संकोचलो. ’’

तर इतिहासाचे भान राखणारे, आचार्य अत्र्यांपासून सावरकरांपर्यंत मातब्बर वक्त्यांना ऐकलेले, लता मंगेशकरांपासून शांताबाई हुबळीकरांपर्यंत अनेक कलावंतांची दाद मिळवलेले असे होते बाबासाहेब पुरंदरे.

loading image
go to top