भुवनेश्‍वरची खनिज-संशोधन संस्था

सुधीर फाकटकर sudhirphakatkar@gmail.com
रविवार, 2 जुलै 2017

विज्ञानयुगात खनिजांचं महत्त्व अधोरेखित करण्याची गरज नसावी. खनिज व संबंधित पदार्थांबाबत सर्वंकष संशोधन करण्यासाठी सीएसआयआरनं १९६४ मध्ये प्रादेशिक संशोधन संस्थेच्या रूपानं ओरिसा राज्यात खनिज व पदार्थसंशोधन संस्थेची स्थापना केली. अलीकडं २००७ मध्ये या संस्थेची पुनर्रचना होऊन विस्तार झालेला आहे. खनिजांसंदर्भात खाणींमधून अशुद्ध स्वरूपातले धातू काढण्यापासून त्यांची गुणवत्ता तपासणं, खनिज शुद्ध स्वरूपात आणण्यासाठी अभियांत्रिकी प्रक्रियांचा विकास करणं, टाकाऊ पदार्थांचं व्यवस्थापन करणं, प्रदूषणमुक्त यंत्रणा विकसित करणं, तसंच संबंधित रासायनिक पदार्थांवरही संशोधन करणं ही संस्थेची उद्दिष्टं आहेत.

इथं खनिजप्रक्रिया, आराखडा व प्रकल्प अभियांत्रिकी, अद्ययावत पदार्थ-तंत्रज्ञान, मध्यवर्ती गुणवत्ता तपासणी केंद्र, प्रारूप विकास व उपकरण, जल व विद्युतशास्त्र, पर्यावरण व शाश्‍वत विकास असे विभाग-प्रयोगशाळा असून प्रत्येक विभागानं उद्दिष्टं आखून घेतलेली आहेत. या विभागांमध्ये अशुद्ध धातूंचं मूल्यांकन, या धातूंसाठी नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा विकास, तसंच मूलभूत संशोधन, खनिज काढल्यानंतर जमिनीचा शेतीकरिता वापर करण्यासाठी अभ्यास-संशोधन, लघुस्तरावरच्या उद्योगांचा विकास; धातू व मिश्र धातू, उच्च शुद्धतेचे पदार्थ, भुकटीस्वरूपातल्या व सूक्ष्मातिसूक्ष्म पातळीवरच्या धातूंची निर्मिती; अतिसूक्ष्म पातळीवरची तपासणी; खाण व खनिजांशी निगडित पाण्याच्या उपचारप्रक्रिया पद्धती, तसंच खाणीतल्या मातीचा अभ्यास-संशोधन; खनिज व माती-पाण्याचा रेण्वीय पातळीवरचा रासायनिक अभ्यास आणि खनिजांच्या अनुषंगानं पर्यावरणाचा सर्वंकष अभ्यास अशी सुमारे ५० पेक्षाही जास्त विषयक्षेत्रं या संस्थेत आहेत.

विभाग व प्रयोगशाळांमध्ये असलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची साधनं, उपकरणसुविधा आणि भारतातल्या सरकारी, खासगी आणि परदेशातल्या शेकडो संस्थांशी संशोधनासंदर्भात प्रस्थापित झालेलं सहकार्य हे इथलं वैशिष्ट्य ठरावं. १४ हजार पुस्तकं आणि १७ हजार नियतकालिकं, अद्ययावत माध्यमांतले संशोधनाचे अहवाल इथल्या ग्रंथालयांमध्ये जतन केलेले आहेत.

या संस्थेत मुख्यत्वे धातुशास्त्र, यांत्रिकी, रासायनिक, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, उपकरण, पर्यावरण या अभियांत्रिकी शाखा, तसंच भौतिकी, जैवविज्ञान, जैवतंत्रज्ञान, खनिजशास्त्र, भूगर्भविज्ञान इत्यादी विज्ञानशाखांच्या पदवीपर्यंत व त्यापुढच्या विद्यार्थ्यांसाठी खास प्रशिक्षण देण्यात येतं. याखेरीज इथल्या विषयक्षेत्रात पीएच.डी. आणि पुढच्या संशोधनाच्या संधीही उपलब्ध असतात. सीएसआयआरच्या अकादमीतून इथली निवड करण्यात येते. आधुनिक युगात कुशल मनुष्यबळ निर्माण करणारं हे विज्ञानक्षेत्र देशासाठी अतिशय महत्त्वाचं आहे.

संस्थेचं नाव : खनिज व पदार्थ संशोधन संस्था,
आचार्यविहार, भुवनेश्‍वर ७५१०१३,
दूरध्वनी : (०६७४) २५६७१२६.
संकेतस्थळ : www.immt.res.in

Web Title: sudhir phakatkar write artilce in saptarang