वादी मे गूँजती हुई खामोशियाँ सुने... (सुहास किर्लोस्कर)

सुहास किर्लोस्कर suhass.kirloskar@gmail.com
रविवार, 13 ऑगस्ट 2017

गाण्याचे बोल, गाणं सुरू व्हायच्या आधीचं संगीत, दोन कडव्यांमधलं संगीत हे ऐकत असतानाच संगीतकारांनी गाण्यात जी हेतुतः राखलेली शांतता असते, तीही श्रवणीय असते. मात्र, इतर घटकांच्या नादात आपण ही शांतता ऐकायचं विसरून जातो. काही गाण्यांमधल्या याच श्रवणीय शांततेविषयी...

गाण्याचे बोल, गाणं सुरू व्हायच्या आधीचं संगीत, दोन कडव्यांमधलं संगीत हे ऐकत असतानाच संगीतकारांनी गाण्यात जी हेतुतः राखलेली शांतता असते, तीही श्रवणीय असते. मात्र, इतर घटकांच्या नादात आपण ही शांतता ऐकायचं विसरून जातो. काही गाण्यांमधल्या याच श्रवणीय शांततेविषयी...

शाळा-कॉलेजात असताना रेडिओवर गाणी ऐकायचो तेव्हा एक गाणं परत केव्हा लागतंय याची वाट पाहायचो. ते गाणं म्हणजे ‘हम और तुम, तुम और हम.’ (सिनेमा ः दाग, गायक ः लता मंगेशकर-किशोरकुमार, संगीतकार ः लक्ष्मीकांत-प्यारेलाल, गीतकार ः साहिर लुधियानवी). गाण्याची चाल, संगीतामधून तयार केला गेलेला माहौल...याशिवाय एका वेगळ्याच कारणासाठी हे गाणं आवडायचं आणि आवडतंही. ते कारण म्हणजे गाण्यातले पॉझेस. बर्फाळ प्रदेशाच्या पर्वतरांगांवर चित्रित झालेल्या या गाण्याची सुरवात गिटारनं होते. ‘हम और तुम, तुम और हम, खुश है यूँ आज मिल के, जैसे किसी संगम पर मिल जाए दो नदियाँ तनहा बहते बहते...’ कुणीही दोघं ओळखीचे भेटल्यावर एका क्षणासाठी तरी थांबतात. कदाचित याच कल्पनेतून लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांनी या गाण्यामध्ये बरेच पॉझेस वापरले असावेत, असं मला वाटतं.  किशोरकुमार ‘...तनहा बहते बहते’ म्हणतो, नंतर लता मंगेशकर गायला सुरवात करतात तेव्हाची शांतताही श्रवणीय आहे! पहिल्या कडव्याची सुरवात होते त्यापूर्वी सगळं संगीत थांबतं, क्षणभर काहीच वाजत नाही.  क्षणभर शांततेनंतर किशोरकुमार गातो...‘मुड के क्‍यूँ देखे.’ दुसऱ्या कडव्यापूर्वीचं संगीत लक्षपूर्वक ऐकल्यावर व्हायोलिनचं वादन अचानक थांबतं, पुन्हा सुरू होतं. हा शांततेचा खेळ संगीतमय होतो.  

हे गाणं ऐकल्यावर लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्या गाण्यातले ‘स्वल्पविराम’ हुडकू लागलो. किशोरकुमार यांनी गायलेली एक कव्वाली आहे, ‘हाल क्‍या है दिलों का न पूछो सनम...’ (सिनेमा ः अनोखी अदा, गीतकार ः मजरूह सुलतानपुरी).  सिनेमातलं वाजणारं संगीत थांबून हे गाणं सुरू होतं. ढोलक आणि चिमटा यांच्या साथीत ही कव्वाली पडद्यावर अभिनेता जितेंद्र याच्या तोंडी आहे. तो सगळं संगीत थांबवण्याचा इशारासुद्धा करतो. दुसरं कडवं सुरू होण्यापूर्वी सगळं संगीत थांबतं आणि किशोरकुमार गातो, ‘अब तो लहराया मस्तीभरी छावों मे. अशाच पुढच्या ओळी म्हणतो...‘आँख उठाना तुम्हारा तो फिर ठीक था’ यानंतर तो काय म्हणतो याकडं लक्ष जातंच. कारण, सगळी वाद्यं वाजायची थांबतात आणि किशोरकुमारच्या आवाजात पुढच्या ओळी येतात...‘आँख उठाकर झुकाना गजब ढा गया’.  जितेंद्रचा रिदम चांगला आहे ते अशा गाण्यांमध्ये लक्षात येतं; पण तो सनई नाचत नाचत वाजवतो, तेव्हा सनईवर त्याची बोटं फिरत नाहीत तिकडं दुर्लक्ष करावं लागतं. तर अशा गाण्यांमध्ये संगीताबरोबरच शांततेच्या क्षणांचं महत्त्वही तितकंच अधोरेखित होतं. आधी वाटायचं की फक्त लक्ष्मीकांत-प्यारेलाल हेच अशा पॉझेसचा वापर करतात; पण नंतर लक्षात आलं, की राहुलदेव बर्मन यांनीसुद्धा अशा पॉझेसनी गाणी खुलवलेली आहेत, गाण्याच्या शब्दांनुसार आणि प्रसंगानुसार.
***
‘बुढ्ढा मिल गया’ सिनेमातलं ‘जिया ना लागे मोरा जिया’ हे खमाज रागावर आधारित गाणं लता मंगेशकर यांनी गायलेलं आहे. तबला, बासरी, सतार अशा मोजक्‍याच वाद्यांचा वापर त्यात आहे. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या या गाण्याचा अंतरा बासरीनंतर सुरू होतो...‘काहे पट खोला तूने मेरे द्वार का, आया बरसो में कोई झोंका प्यार का, दो पल तो ठहर जा’ यानंतर क्षणभर काहीच वाजत नाही आणि पुन्हा गाणं सुरू होतं; त्यामुळं वेगळाच परिणाम साधला गेला आहे. पडद्यावर अभिनेते देवेन वर्मा आणि नवीन निश्‍चल यांची बोटं तबला आणि पेटीवर चुकीची पडतात. याच खमाज रागावर आधारित ‘अमरप्रेम’ मधलं गाणं ‘बडा नटखट है री.’  राहुलदेव बर्मन-लता मंगेशकर यांच्याच या गाण्याच्या दुसऱ्या कडव्यापूर्वी एका पॉझनंतर पुन्हा लपाछपीचा खेळ सुरू होतो आणि पडद्यावर शर्मिला टागोर छोट्या कन्हैयाला शोधताना म्हणते...‘जीवन का तू एकही सपना...’

‘बहारों के सपने’ या सिनेमातल्या प्रत्येक गाण्यात राहुलदेव बर्मन यांनी वेगवेगळे प्रयोग केले आहेत. ‘आजा पिया, तोहे प्यार दूँ, गोरी बैंया, तोपे वार दूँ, किस लिये तू, इतना उदास...’ या गाण्यात बरेच स्वल्पविराम आहेत. बासरी, संतूर, सॅक्‍सोफोन यापेक्षा अधूनमधून ऐकायला येणाऱ्या शांततेमुळं हे गाणं फार अनोखं झालं आहे.    
प्रसंगानुसार, राहुलदेव बर्मन यांनी घेतलेले पॉझ ऐकण्यासारखे आहेत. गुलजार यांच्या ‘परिचय’ सिनेमात यमनकल्याण रागावर आधारित असलेलं गाणं ‘बीती ना बिताई रैना’ हे त्यांपैकी एक. सतार, बासरी यांच्या साथीनं लता मंगेशकर गातात...‘बीती हुई बतियाँ, कोई दोहराए, भूले हुए नामों से कोई तो बुलाए’ या ओळीनंतर पडद्यावर जया भादुरी ‘चाँद’नंतर येणारे शब्द आठवते आणि अद्धा तीनतालात वाजणारा तबला थांबतो आणि पॉझनंतर भूपेंद्र गायला सुरवात करतो...‘हो s s  चाँद की बिंदीवाली, बिंदीवाली रतिया...’ राहुलदेव बर्मन यांनी नंतर होणाऱ्या शूटिंगचा विचार करून केलेलं संगीतदिग्दर्शन उल्लेखनीय आहे. त्याबरोबरच ‘जागी हुई अखियों में, रात न आई रैना...’ असे गुलजार यांनी लिहिलेले शब्द अप्रतिम आहेत. किशोरकुमारनं ‘सत्ते पे सत्ता’ या सिनेमात गायलेलं, संथ लयीमधलं. ‘प्यार हमे किस मोड पे ले आया’ या गाण्यात प्रसंगानुसार आणि गाण्याच्या शब्दांनुसार बरेच पॉझ आहेत.
मालगुंजी रागावर आधारित राहुलदेव बर्मन यांनी स्वरबद्ध केलेलं  ‘घर आजा घिर आए बदरा सावरिया, मोरे जिया धक धक रे चमके बिजुरिया’ हे गाणं सुरू होतं सतारीनं आणि तबल्यानं. रूपक तालातल्या या गाण्यात घुंगरं ऐकण्यासारखी आहेत. नृत्य करणारी अभिनेत्री कधी बसलेली आहे, तर कधी नृत्य करते आहे, या बाबीचा विचार करून आवश्‍यक तेव्हाच घुंगरं वाजवलेली आहेत.  घरी नवऱ्याची वाट पाहणाऱ्या नायिकेचं रितेपण शैलेंद्र यांनी लिहिलेल्या या गीतातून फार सुरेख पद्धतीनं शब्दबद्ध झालं आहे. सूना सूना घर मोहे डसने को आए रे, खिडकी पे बैठे बैठे सारी रैन जाए रे.’ यानंतर पावसाच्या थेंबांचा आवाज ऐकत आहे, असं वर्णन असलेल्या ओळी येतात, तेव्हाचा ‘स्वल्पविराम’ ऐकण्यासारखा आहे. ‘टप टिप सुनत मै तो भई रे बावरिया.’ याच वेळी पडद्यावर अभिनेत्री अमिताच्या डोळ्यातले अश्रूही प्रेक्षक-श्रोत्याला दिसतात. दिग्दर्शक-संगीतकार-गीतकार-गायक- कलाकार यांना एकमेकांची भाषा समजली की असं गाणं तयार होतं.
***

एखाद्या गाण्यात प्रेक्षक-श्रोत्याला डोलायला लावायचं असेल, तर संगीतकार एका वाद्यानं सुरवात करतो. त्या गाण्याचा ठेका आपल्या लक्षात राहतो. त्या गाण्याची लय आपल्यात भिनते आणि हळूहळू एकेक वाद्य वाढवत नेलं जातं. संगीतकार याप्रकारे आपल्याला त्यांच्याबरोबर घेऊन जातात...आपण अजाणतेपणी संगीतात रममाण होऊन जातो...डोलायला लागतो. शंकर-एहसान-लॉय यांनी स्वरबद्ध केलेलं ‘झूम बराबर झूम’ सिनेमातलं गाणं ‘धागे तोड लाऊं‘ या अंतऱ्यानं सुरू होतं आणि मुखडा नंतर येतो.

‘बोल ना हलके हलके’ गाणं सुरू होतं, तेव्हा घटम्‌ वाजतो, संतूर वाजतं आणि प्रेक्षक-श्रोता हळूहळू ताल धरतो. भीमपलास रागावर आधारित असलेलं हे गाणं राहत फ़तेह अली खाँ आणि महालक्ष्मी अय्यर यांनी सुरेल गायलं आहे. या गाण्यातले पॉझ, नंतर सुरू होणारी बासरी, शेवटच्या कडव्यानंतर येणारा पॉझ आणि सारंगी हे सगळं श्रवणीय होतं ते स्वल्पविरामामुळं.  मी हे गाणं एकदा बासरीसाठी, एकदा फक्त गिटारसाठी, एकदा सारंगीसाठी, एकदा गुलजार यांचे शब्द ऐकण्यासाठी आणि एकदा पॉझसाठी ऐकतो. दरवेळी त्याची खुमारी वाढते आणि संगीताच्या सागरात नवीन काहीतरी हाती लागते. ...तर अशी ही क्षणभर शांतता असलेली गाणी वाद्यांची गंमत वाढवतात. शांततेच्या पार्श्वसंगीतावर वाजलेलं वाद्य वेगळा परिणाम करतं; पण आपण शांततेला विसरतो.  गुलजार म्हणूनच लिहितात ः वादी मे गूँजती हुई खामोशियाँ सुने...

Web Title: suhas kirloskar write article in saptarang