साज-ए-दिल छेडो जहाँ में... (सुहास किर्लोस्कर)

सुहास किर्लोस्कर suhass.kirloskar@gmail.com
रविवार, 19 नोव्हेंबर 2017

रबाबचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला. सातव्या शतकापासून वाजवल्या जाणाऱ्या या वाद्याचा उल्लेख पर्शियन ग्रंथांत, सूफी काव्यात आढळतो. त्या वेळी रबाब हे सारंगीप्रमाणे घर्षण करून वाजवलं जायचं. तेराव्या शतकात अमीर खुश्रो यांनी रबाबमध्ये बदल घडवून आणले. अफगाणिस्तानात आणि उत्तर पाकिस्तानात पश्‍तुनी वादक रबाब वाजवत असत. भारतात त्याला ‘अफगाणी रबाब’ किंवा ‘काबुली रबाब’ म्हणतात.

रबाबचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला. सातव्या शतकापासून वाजवल्या जाणाऱ्या या वाद्याचा उल्लेख पर्शियन ग्रंथांत, सूफी काव्यात आढळतो. त्या वेळी रबाब हे सारंगीप्रमाणे घर्षण करून वाजवलं जायचं. तेराव्या शतकात अमीर खुश्रो यांनी रबाबमध्ये बदल घडवून आणले. अफगाणिस्तानात आणि उत्तर पाकिस्तानात पश्‍तुनी वादक रबाब वाजवत असत. भारतात त्याला ‘अफगाणी रबाब’ किंवा ‘काबुली रबाब’ म्हणतात.

‘या  री है इमान मेरा, यार मेरी जिंदगी’ हे ‘जंजीर’ सिनेमातलं गाजलेलं गीत लिहिलं आहे गुलशन बावरा यांनी आणि गायलं आहे मन्ना डे यांनी. प्राण यांनी या सिनेमात सुरेख अभिनय केला आहे व या गाण्याचा पठाणी लहजाही उत्तम सांभाळला आहे. गाण्याच्या सुरवातीला प्राण यांच्या हातात जे वाद्य आहे, ते अफगाणिस्तानातून आलेलं रबाब. ते वाद्य छेडून मन्ना डे यांच्या आवाजात प्राण गातो...

गर खुदा मुझ से कहे, कुछ माँग ऐ बंदे मेरे
मैं ये माँगू, महफिलों के दौर यूँ चलते रहें
हमपियाला, हमनिवाला, हमसफर, हमराज हो
ताकयामत जो चिरागों की तरह जलते रहें

या प्रत्येक ओळीनंतर रबाब वाजतं. हे गाणं पंजाबी ढोलक, टाळ्या आणि रबाब या मोजक्‍याच वाद्यांनी सजलेलं आहे. पहिल्या ओळीनंतर प्राण हे वाद्य आपल्या सहकाऱ्याकडं सुपूर्द करतो आणि तो सहकारी नंतर पूर्ण गाण्यात रबाबची साथ करताना दिसतो. १४ मात्रांच्या दीपचंदी तालात हे गाणं सुरू होतं आणि द्रुत लयीत सात मात्रांमध्ये आठची लग्गी सुरू झाली की प्रेक्षक-श्रोता प्राणबरोबरच टाळी धरून गाणं ऐकू लागतो. पुढच्या कडव्यात प्राण नायकाला, म्हणजे अमिताभ बच्चनला, त्याची खंत काय आहे, हे विचारतो, तेव्हा टाळी वाजवण्याची जागा बदलते. कारण, गाण्यातल्या भावना बदललेल्या असतात. या गाण्यात प्राण ‘साज-ए-दिल’ छेडायला सांगतो आणि जे वाद्य आपल्याला कायम दिसत राहतं ते म्हणजे रबाब. कसं आहे हे वाद्य? कुठून आलं?
***
रबाबचा जन्म अफगाणिस्तानमध्ये झाला. सातव्या शतकापासून वाजवल्या जाणाऱ्या या वाद्याचा उल्लेख पर्शियन ग्रंथांत, सूफी काव्यात आढळतो. त्या वेळी रबाब हे सारंगीप्रमाणे घर्षण करून वाजवलं जायचं. तेराव्या शतकात अमिर खुश्रो यांनी रबाबमध्ये बदल घडवून आणले. अफगाणिस्तानात आणि उत्तर पाकिस्तानात पश्‍तुनी वादक रबाब वाजवत असत. भारतात त्याला ‘अफगाणी रबाब’ किंवा ‘काबुली रबाब’ म्हणतात. हे वाद्य अजूनही काश्‍मिरी लोकसंगीतात वाजवलं जातं. रबाबचे ‘पूर्वज’ अलेक्‍झांडरच्या ग्रीसमध्ये होते, असाही उल्लेख आढळतो. प्लकिंग करून वाजवल्या जाणाऱ्या ल्युट वाद्यकुटुंबातलं हे आणखी एक वाद्य.
***
बऱ्याच वर्षांपूर्वीचं म्हणजे अठराव्या शतकातलं एक चित्र डोळ्यासमोर आणू या...अफगाणिस्तानहून व्यापारीमंडळी घोड्यावरून येत आहेत...एके ठिकाणी तंबू ठोकून त्यांनी मुक्काम केला आहे...रात्री विरंगुळा म्हणून काही पठाण वाद्यवादन करत आहेत...अशा प्रसंगी जे वाद्य वाजवलं जायचं ते रबाब. त्यामुळं रबाब वाजलं की आपण भावनिकदृष्ट्या त्या वातावरणात जातो. काश्‍मीरमधल्या लोकसंगीतात रबाब अजूनही वाजवलं जातं. ‘धर्मात्मा’ हा सिनेमा म्हणजे Godfather या उत्कृष्ट सिनेमाची फारच ‘देशी’ आवृत्ती. या सिनेमाचं चित्रीकरण अफगाणिस्तानमध्ये झालं आणि संगीतकार कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतामधून वातावरणनिर्मिती फार सुरेखरीत्या केली. लता मंगेशकर आणि महेंद्र कपूर यांनी गायलेलं ‘मेरी गलियों से लोगों की यारी बढ गयी’ हे गीत रबाबनं सुरू होतं आणि वादकाच्या हातात दिसतंसुद्धा.
***
रबाब हे एका अखंड लाकडापासून बनवलं जातं. खोलगट भोपळ्यासारख्या भागावर बोकडाची कातडी लावून त्यावर तारा लावल्यामुळं ड्रमचा आवाज येतो. रबाबच्या तारा छेडल्यावर येणारा आवाज मला पठाणीच वाटतो; त्यामुळं अशा बाजाच्या आणि वातावरणाच्या गाण्यात रबाबचा आवाज योग्य वाटतो. रबाबला १२ ते १८ तारापैंकी मुख्य चार किंवा सहा तारा असतात. त्यापैकी एक पितळेची असते. याच्या चार तारा सा प म सा अशा स्वरांत लावतात आणि सहा तारांचं रबाब सा सा प प म सा अशा लावतात. इतर सात ते अकरा तारांना तरफ म्हणतात. या तारा पूर्वी तांबं किंवा पितळ या धातूच्या असायच्या. आता स्टीलच्या तारा वापरल्या जातात. तारा छेडण्यासाठी नारळाच्या करवंटीपासून तयार केलेला किंवा हाडापासून तयारा केलेला प्लकर असतो. त्यानं रबाब वाजवलं जातं. अफगाणिस्तानपासून आसामपर्यंत या वाद्याचा आकार बदलत गेलेला आहे. ‘शोले’ सिनेमातलं ‘महबूबा महबूबा’ हे गाणं संगीतकार राहुलदेव बर्मन यांनी गायलेलं असून, ते जलाल आगा याच्यावर चित्रित आहे. हे गाणं गाताना जलाल आगा याच्या हातात रबाब असतं आणि नाचत नाचत तो हे गाणं गात असल्याचं पडद्यावर दाखवण्यात आलेलं आहे. मात्र, जलाल आगा याच्या हातात रबाब दिसत असलं, तरी वाजतं असतं ते पंडित शिवकुमार शर्मा यांचं इराणी संतूर! शिवाय, हे गाणं बघताना प्रश्‍न पडतो, की रबाब हे वाद्य असं नाचत नाचत सुरात वाजवता येऊ शकतं का?
***
नासिर हुसेन यांच्या ‘कारवाँ’ या सिनेमाच्या प्रत्येक गाण्यात संगीतदिग्दर्शक राहुलदेव बर्मन यांनी अनोखे प्रयोग केले आहेत. ‘दिलबर दिल से प्यारे’ हे गाणं थाळ्या वाजवून सुरू होतं. व्हायोलिनच्या आवाजानंतर रबाब वाजतं. मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेल्या आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या या गाण्यातल्या अंतऱ्यामध्ये या वाद्याचा वेगळा परिणाम ऐकता येतो. ‘ए मेरे प्यारे वतन’ हे मन्ना डे यांनी गायलेलं ‘काबुलीवाला’ सिनेमातलं गाणं संगीतकार सलील चौधरी यांनी संगीतबद्ध केलेलं आहे. अफगाणिस्तानातून आलेल्या अब्दुल रहमत खाँ या पठाणाची कथा बलराज सहानी यांच्या अभिनयानं या सिनेमातून अजरामर झाली आहे. प्रेम धवन यांनी लिहिलेलं हे गाणं म्हणजे जणू काही रबाब आणि मन्ना डे यांची जुगलबंदीच आहे. ‘हमें तो लूट लिया मिल के हुस्नवालों ने...काले काले बालों ने, ने गोरे गोरे गालों ने,’ ही रबाबनं नटलेली कव्वाली इस्माईल आझाद कव्वाल यांनी गायली आहे आणि संगीतकार बुलो सी रानी यांनी संगीतबद्ध केली आहे. शमशाद बेगम आणि आशा भोसले यांनी गायलेलं ‘कजरा मुहब्बतवाला’ हे सदाबहार गाणं हार्मोनिअमनं सुरू होतं. सिनेमाच्या प्रसंगानुसार, विश्‍वजित स्त्रीवेशात आणि बबिता पठाणी वेशात आहे. त्यामुळंच संगीतकार ओ. पी. नय्यर यांनी गाण्यात रबाबचा वापर केला आहे, म्हणजेच संगीतकाराला गाण्यातले प्रसंग, पात्रं, गाण्याचे शब्द आणि श्रोत्यांची मानसिकता यांचा विचार करून वाद्यांची निवड करावी लागते. ओ. पी. नय्यर यांच्याच ‘सीआयडी ९०९’ या सिनेमातलं ‘यार बादशाह, यार दिलरुबा’ हे रबाबचा चपखल वापर असलेलं आणखी एक गाणं. या गाण्यात आशा भोसले यांनी ‘आँखोवाले’, ‘मतवाले’, ‘हवाले’ असे शब्द त्या गाण्याच्या लहजाप्रमाणे वेगळ्या पद्धतीनं गायले आहेत, हे विशेष. अंतऱ्यामध्ये रबाबचा ट्रिमेलो इफेक्‍ट श्रवणीय आहे. प्रत्येक संगीतकार तेच वाद्य वापरताना वेगळा विचार करतो आणि गाण्याचं अनोखेपण जपलं जातं. ‘बॉबी’ सिनेमातल्या ‘बेशक मंदिर मस्जिद तोडो’ या गाण्यात सगळीकडं तंबू लावलेले आहेत, मध्ये शेकोटी पेटलेली आहे. बाजूला नरेंद्र चंचल डफ वाजवत गातो आहे आणि त्याच्याच बाजूला एक कलाकार चिमटा आणि एक कलाकार रबाब वाजवताना दिसतो. अंतऱ्यामध्ये रबाब ऐकू येतो. अशा या रबाबचे प्रकार कोणते? पर्शियन रबाब/अरेबिक रबाब हे भारतीय सारंगीप्रमाणे असतं. ‘बो’ने तारांवर घर्षण करून ते वाजवलं जातं. अफगाणी रबाब किंवा काबुली रबाब हे छोटं असतं. पंजाबी, पश्‍तुनी, सेनिया हे रबाबचे आणखी काही प्रकार आहेत. सेनिया रबाब म्हणजेच सेन-ए-रबाब अर्थात तानसेन घराण्यातल्या लोकांनी लोकप्रिय केलेलं रबाब. तानसेन हे वाद्य वाजवत असे.
***
भारतीय शास्त्रीय संगीताची परंपरा उच्च आहे हे निर्विवाद; पण ज्ञान सढळ हातानं देण्यात आणि लिखित स्वरूपात ते ज्ञान पुढच्या पिढीला सुपूर्द करण्यासंदर्भात आपल्याकडं सुधारणेला वाव होता. ‘आपल्याकडं असलेलं ज्ञान दुसऱ्याला दिल्यानं वाढतं,’ हे वचन म्हणून वाचायला ठीक असलं, तरी सगळ्यांनी त्याची अंमलबजावणी केली, असं म्हणता येत नाही. रबाब आपल्याच घराण्यांतल्या म्हणजे रक्ताच्या नात्यातल्या लोकांनाच शिकवण्याच्या वृत्तीमुळं कलेचं नुकसान तर झालंच; शिवाय अशी काही वाद्यं मागंही पडली. रबाब वाजवायची जबरदस्त इच्छा तर आहे; पण शिकायला मिळत नाही, या तगमगीतून एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला ‘सूरबहार’, ‘सूरसिंगार’ अशा वाद्यांची निर्मिती झाली आणि रबाब, रुद्रवीणा अशी वाद्यं मागं पडली.
***
शीख समाजात ‘धृपद रबाब’ अभ्यासपूर्वक वाजवलं जातं. जणू काही आलाप-जोडसाठीच बनलेलं असावं असं हे वाद्य आकारानं मोठं असतं आणि ‘गुरुबानी’मध्ये अजूनही वाजवलं जातं. रबाबमध्ये यथावकाश बदल होत गेले. धृपद रबाबचा जन्म झाला आणि त्यातही बदल होत होत सरोदची निर्मिती झाली. सरोद हे वाद्य म्हणजे पुरातन काळातली चित्रवीणा, रबाब आणि त्यानंतर आलेलं सूरसिंगार या तीन वाद्यांचं मिश्रण होय. अनेक वाद्यं लीलया वाजवणारे महान कलाकार उस्ताद अल्लाउद्दीन खाँ यांनी सरोदला विसाव्या शतकात वेगळं स्वरूप दिलं, जे आपण आज बघतो. अशा या सरोदबद्दल पुढच्या लेखात.

Web Title: suhas kirloskar write article in saptarang