तुमसे बढकर दुनिया में (गीतगंध)

सुहास किर्लोस्कर
रविवार, 4 जून 2017

‘मधुबन मे राधिका नाचे रे’ या गाण्यात नायक (दिलीपकुमार) सतार वाजवत आहे. मागं दोनजण तानपुरा घेऊन बसले आहेत. शेजारी तबलावादक साथ करत आहे. समोर नृत्य सुरू आहे. तीनतालात घुंगरं वाजत आहेत. ‘मृदंग बाजे तिरकिट धुम’ या बोलावर मृदंग वाजताना दिसतो. यानंतर तराणा सुरू होतो. नायक सतार वाजवतो. हे सतारवादन उस्ताद हलीम जाफर खाँ यांचं आहे. तेच स्वर जलतरंगवरही वाजवले जातात. दुसरा कलाकार सरोद वाजवतो. ही वाद्यवादनाची मैफल बघून ‘ऐकण्याचा आनंद’ संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या या सदाबहार गाण्यातून मिळतो. या गाण्यातलं जलतरंगवादन स्वतः नौशाद यांनी केलं आहे, हे विशेष.

‘मधुबन मे राधिका नाचे रे’ या गाण्यात नायक (दिलीपकुमार) सतार वाजवत आहे. मागं दोनजण तानपुरा घेऊन बसले आहेत. शेजारी तबलावादक साथ करत आहे. समोर नृत्य सुरू आहे. तीनतालात घुंगरं वाजत आहेत. ‘मृदंग बाजे तिरकिट धुम’ या बोलावर मृदंग वाजताना दिसतो. यानंतर तराणा सुरू होतो. नायक सतार वाजवतो. हे सतारवादन उस्ताद हलीम जाफर खाँ यांचं आहे. तेच स्वर जलतरंगवरही वाजवले जातात. दुसरा कलाकार सरोद वाजवतो. ही वाद्यवादनाची मैफल बघून ‘ऐकण्याचा आनंद’ संगीतकार नौशाद यांनी संगीतबद्ध केलेल्या या सदाबहार गाण्यातून मिळतो. या गाण्यातलं जलतरंगवादन स्वतः नौशाद यांनी केलं आहे, हे विशेष. जलतरंग इतक्‍या प्रामुख्यानं सिनेमामध्ये प्रथमच दिसलं. 
***
जलतरंग अनेक गाण्यांत ऐकायला मिळतं. ‘कामचोर’ सिनेमामधलं ‘तुम से बढकर दुनिया मे...’ हे गाणं नायक रेकॉर्ड प्लेअरवर लावतो.  चंद्रू आत्माच्या आवाजात गाणं सुरू होतं; पण ती एलपी अडकते आणि किशोरकुमारच्या आवाजात ते गाणं (सहगायिका  ः अलका याज्ञिक) राकेश रोशन म्हणतो, ‘आज दिल की बात आ गयी.’ संगीतकार राजेश रोशन यांनी स्वरबद्ध केलेल्या या गाण्यात जलतरंग वाजवण्यात आलेलं आहे. नौशाद यांच्या ‘बैजू बावरा’ सिनेमातल्या ‘झूले में पवन के आयी बहार’ या महंमद रफी आणि लता मंगेशकर यांनी गायलेल्या गाण्यातही जलतरंग बहार आणतं.   
***
यमन रागावर आधारित ‘जा रे बदरा बैरी जा’ हे संगीतकार मदनमोहन यांनी संगीतबद्ध केलेलं गाणं सतारवादनानं सुरू होतं. अंतऱ्यापूर्वी जलतरंग वाजतं. त्याचा परिणाम विलक्षण आहे. यमन रागावर आधारित आणखी एका गाण्यात जलतरंग प्रामुख्यानं वाजतं. ‘पापा कहते है’ या सिनेमातल्या ‘घर से निकलते ही...’ या गाण्यात जलतरंगमुळं वेगळीच खुमारी आली आहे. राजेश रोशन यांनी संगीत दिलेलं हे गाणे उदित नारायण यांनी गायलं आहे. एकाच रागावर आधारित असल्यामुळं असेल कदाचित; पण हे गाणं ऐकलं की मला नेहमीच पंडित भीमसेन जोशी यांनी गाऊन अजरामर झालेला ‘अधिक देखणे तरी’ हा अभंग आठवतो. संत ज्ञानेश्वर यांची ही रचना स्वरबद्ध केली आहे संगीतकार राम फाटक यांनी. 
***
संत ज्ञानेश्वर यांनी एका रचनेतून मनाला भ्रमराची उपमा दिली आहे आणि ‘अवगुण सोडून द्यावेत’ असा संदेश दिला आहे. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेलं आणि लता मंगेशकर यांनी गायलेलं हे गाणं आहे ‘रुणुझुणु रुणुझुणु रे भ्रमरा.’ हे गाणं बासरीनं सुरू होतं. भ्रमराचं गुंजन बासरीमधून ऐकू येतं. अंतऱ्यापूर्वीचं संगीत (Interlude) जलतरंगनं सजलेलं आहे. 
***
काही वाद्यं हवेचा वापर करून वाजवली जातात. त्यांत बासरी, सनई, माउथऑर्गन अशी वाद्यं येतात. हवेचा भात्यासारखा वापर केलेलं वाद्य म्हणजे हार्मोनिअम. हाताचा किंवा काठीचा आघात करून वाजवली जाणारी चर्मवाद्यं, उदाहरणार्थ ः तबला, पखवाज, ड्रम.  तंतुवाद्यांमध्ये तारांवर घर्षण करून वाजवली जाणारं वाद्य म्हणजे व्हायोलिन. तारा छेडून वाजवली जाणारी वाद्यं बरीच आहेत. त्यात  सतार, सरोद, गिटार, वीणा या वाद्यांचा समावेश होतो. 
***
पाणी भांड्यांमध्ये भरून त्या भांड्यांवर छोट्या काठीनं (स्टिक) आघात करून वाजवलं जाणारं वाद्य एकच व ते म्हणजे जलतरंग. ही भांडी वेगवेगळ्या आकाराची असतात. त्यांच्यामध्ये पाणी अशा तऱ्हेनं भरलं जातं, की त्यातून निर्माण होणारा ध्वनी हा एका एका स्वरात ऐकू येतो. १५ ते २४ भांडी वेगवेगळ्या स्वरांत लावल्यानंतर तो पूर्ण समूह हे एक वाद्य बनतं. मिलिंद तुळाणकर हे त्यांचे आजोबा पंडित शंकरराव कान्हेरे यांच्याकडून जलतरंग शिकले आणि गेली २५ वर्षं जलतरंगवादनाची परंपरा त्यांनी जपली आहे. शिवाय या वाद्यामध्ये आणि वादनशैलीमध्ये बदल करून जलतरंगवादन लोकांपर्यंत पोचवण्याचं कार्य तुळाणकर करत आहेत. त्या वाद्याचा सन्मान राखत आहेत.
***
जलतरंगविषयी जाणून घेण्यासाठी मी मिलिंद तुळाणकर यांना भेटलो. त्यांच्याकडून समजलं की पूर्वी तांब्याच्या व ब्राँझच्या भांड्यांमध्ये पाणी घालून जलतरंग वाजवलं जायचं; पण धातूच्या भांड्यांचा आवाज आपण जास्त वेळ ऐकू शकत नाही. नंतर चिनी मातीच्या भांड्यांत जलतरंग वाजवलं जाऊ लागलं. त्याचा परिणाम असा झाला, की ते वाद्य जास्त कर्णमधुर झालं. अधिक वेळाच्या मैफलीसाठी ते वाजवलं जाऊ लागलं. पंडित कान्हेरे यांनी प्रत्येक भांडं ठेवण्यासाठी लाकडी प्लेटची व्यवस्था केली होती, तरीही वादन सुरू असताना ते भांडं पुढं पुढं सरकायचं. तुळाणकर यांनी कोरोगेटेड प्लेट म्हणजे प्लास्टिकपासून बनवलेल्या पन्हाळीसारख्या प्लेट तयार केल्या. त्यामुळं भांडी एका जागी स्थिर राहू लागली आणि प्लेटमधला पोकळीचाही ध्वनिसंवर्धनासाठी उपयोग होऊ लागला. प्लेट एकमेकींमध्ये कशाही अडकवण्याची पद्धत तुळाणकर यांनी शोधून काढल्यामुळं भांड्यांचा क्रम कार्यक्रम सुरू असताना बदलता येऊ शकायला लागला. कार्यक्रम अधिक कालावधीसाठी होऊ लागला. या भांड्यांवर आघात करायची छोटी काठी (स्टिक) पूर्वी वेताची किंवा लाकडाची असायची. तुळाणकर यांनी यात बदल केला व ती काठी नायलॉनची तयार करून ते ती काठी आता वापरतात.  ‘कोणत्याही वाद्याला मर्यादा नसतात, मर्यादा असतात त्या वादकाला,’  हे तुळाणकर यांचं म्हणणं पटतं. याचं कारण, वाद्य आणि वादनपद्धतीमध्ये बदल केल्यामुळं तुळाणकर जलतरंगवादनामध्ये मिंडकामसुद्धा करतात हे विशेष!    
***
कोणतंही वाद्य सुरात लावावा लागतं, हे गानरसिकांना माहीत असतं; त्यामुळं मलाही असं वाटलं, की पाणी कमी-जास्त केलं, की जलतरंगवादन करता येत असेल. मात्र, तुळाणकर यांनी सांगितल्यावर समजलं, की पाणी कोणतं वापरायचं हेसुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. पाण्याचं तापमान, पाण्याचं प्रमाण, याशिवाय कोणतं पाणी वापरायचं यावरही स्वर आणि सुरेलपणा अवलंबून असतो. क्षारयुक्त पाणी असेल तर दबका आवाज येतो; त्यामुळं जलतरंगवादन होऊ शकत नाही. जुळवलेल्या स्वरात तापमानबदलामुळं फरक पडतो; पण तुळाणकर जलतरंगवादनाचा कार्यक्रम सुरू असतानाच कमीत कमी वेळात लीलया पाणी कमी-जास्त करून जलतरंग स्वरात लावतात...तेव्हा म्हणावंसं वाटतं, क्‍या बात है! तुम से बढकर दुनिया में...

Web Title: suhas kirloskar writes about milind tulankar jaltaranga