लिक्विड योजना म्हणजे काय? (सुहास राजदेरकर)

सुहास राजदेरकर suhas.rajderkar@gmail.com
रविवार, 15 एप्रिल 2018

म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजना हा बऱ्यापैकी सुरक्षित असा पर्याय आहे. या योजनांमध्ये कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. अतिशय कमी दिवसासाठीसुद्धा रक्कम गुंतवण्याची सोय असलेल्या या योजनांबाबत माहिती...

म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजना हा बऱ्यापैकी सुरक्षित असा पर्याय आहे. या योजनांमध्ये कोणतंही अतिरिक्त शुल्क आकारलं जात नाही. अतिशय कमी दिवसासाठीसुद्धा रक्कम गुंतवण्याची सोय असलेल्या या योजनांबाबत माहिती...

लिक्विड योजनांचं प्रमाण म्युच्युअल फंडांच्या एकूण मालमत्तेमध्ये साधारण तेरा टक्के इतकं असतं. म्युच्युअल फंडांच्या या योजना उपयुक्त असूनही सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडून आजही तशा दुर्लक्षितच आहेत. काय आहेत या लिक्विड योजना आणि त्याचा फायदा कोणाला होऊ शकतो, थोडक्‍यात समजून घेऊया.
नावाप्रमाणंच या योजनांमध्ये संपूर्ण तरलता आणि सुलभता आहे. लिक्विड या शब्दाचा अर्थ तरलता. म्हणजेच तुम्ही पैसे अगदी एका दिवसातसुद्धा काढून घेऊ शकता. या प्रकारच्या योजनांमध्ये कोणताही "लॉक इन' काळ नसतो, एंट्री लोड- एक्‍झिट लोड नसतो. समजा बुधवारी पैसे गुंतवले, तर गुरुवारी काढून घेऊ शकता तेही थेट तुमच्या बॅंक खात्यामध्ये. फक्त पैसे दुपारी तीनच्या आत म्युच्युअल फंडाच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजेत; तसंच काढण्यासाठी एक दिवस आधी दुपारी तीनच्या आत नोटीस द्यायला पाहिजे. म्हणजेच बुधवारी दुपारी दोनच्या आत गुंतवलेले पैसे काढण्यासाठी नोटीस बुधवारीच तीनच्या आत देणं गरजेचं. असं केलं, की गुरुवारी सकाळी दहा वाजता तुमच्या बॅंक खात्यामध्ये एक दिवसाच्या परताव्यासकट पैसे जमा होतात. या योजनांमधला एकही पैसा शेअर बाजारामध्ये गुंतवला जात नाही. तो फक्त कमी कालावधीच्या डेट अर्थात रोखे विभागांमध्ये गुंतवला जातो- जो तुलनात्मकरीत्या अतिशय सुरक्षित असतो. किमान दहा हजार रुपये गुंतवता येतात आणि कमाल मर्यादा नाही. योजनांचं निव्वळ मालमत्तामूल्य दररोज मोजलं जातं, अगदी शनिवार-रविवार आणि सुटीच्या दिवशीसुद्धा. त्यामुळं बहुतेक मोठ्या कंपन्या शुक्रवारी या योजनांमध्ये पैसे ठेवतात आणि सोमवारी काढून घेतात. कारण शनिवार व रविवार आर्थिक व्यवहार बंद असतात आणि तेव्हासुद्धा या योजनांद्वारे त्यांचा परतावा मिळवता येतो.

सेबीच्या नियमांनुसार, या योजनांमध्ये परतावा; तसंच मूळ रक्कम याची खात्री नसली, तरीसुद्धा बॅंक खातं आणि लिक्विड योजना यां आपण तुलना करू शकतो. बॅंका सहसा फक्त सहा दिवसांपर्यंच्या मुदत ठेवी स्वीकारत नाहीत; परंतु लिक्विड योजनांमध्ये तुम्ही पैसे एक दिवसासाठीसुद्धा ठेवू शकता. बॅंकांमध्ये जेव्हा "एनईएफटी'; तसंच "आरटीजीएस' या सुविधा सुरू झाल्या, तेव्हापासून लिक्विड योजनांचं खरं यश आणि महत्त्व वाढलं- कारण पैसे काही मिनिटांतच भरता किंवा काढता येऊ लागले. तुम्हाला घराबाहेर किंवा ऑफिसच्या बाहेर जावं लागत नाही- कारण तुम्ही दोन मिनिटांतच पैसे ऑनलाइन भरू किंवा काढू शकता. सध्या या योजनांवर साधारणपणे सात टक्के परतावा मिळतो- जो स्थिर नसून बदलता असतो.

फायदा कोणाला?
सर्वसामान्य गुंतवणूकदार, लघु आणि मध्यम उद्योजक; तसंच मोठ्या कंपन्यांपर्यंत सर्वांनाच या योजनांचा फायदा होतो. काही कारणानं एकदम जास्त पैसे बॅंकेमध्ये जमा होतात. उदाहरणार्थ, बॅंक मुदत ठेव संपुष्टात आल्यावर किंवा विम्याची मिळणारी रक्कम, निवृत्त झाल्यावर मिळणारी "पीएफ' आणि "ग्रॅच्युइटी'ची रक्कम, जमीन अथवा घर विकून आलेली रक्कम. या पैशांच्या गुंतवणुकीच्या पुढच्या योजना करेपर्यंत दोन ते सहा महिने हे पैसे बॅंकेत पडून असतात. छोटा-मोठा व्यवसाय करणाऱ्यांना, कामगारांचे पगार, कच्चा माल आणण्यासाठी एक ते दोन दिवस आधीच तजवीज करावी लागते. त्या काळामध्ये ही रक्कम बॅंकेच्या करंट खात्यामध्ये शून्य व्याजावर पडून असते. अशा वेळी ही रक्कम तत्काळ लिक्विड योजनांमध्ये ठेवली, तर त्यावर जास्त व्याज मिळतं. एक कोटी रुपये जर फक्त प्रत्येक "शनिवार व रविवार' अशा दोन दिवसांसाठी जरी गुंतवले, तरी वर्षाला साधारणपणे एक लाख रुपये मिळतात- जे बॅंकेमध्ये मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त आहेत. एसटीपीद्वारा रक्कम गुंतवण्यासाठी सुरवातीला लिक्विड योजनांमध्ये गुंतवणूक करावी लागते.
दोन योजनांच्या परताव्याची तुलना करताना ती नेहमी करपश्‍चात परताव्याची करावी. लिक्विड योजनांमधली रक्कम वर्षाच्या आत काढली, तर त्यावरचा परतावा तुमच्या एकूण उत्पन्नामध्ये मिळवून तुम्ही प्राप्तिकराच्या ज्या स्लॅबमध्ये येता- उदाहरणार्थ पाच टक्के, वीस टक्के किंवा तीस टक्के- त्यानुसार कर द्यावा लागेल.
विषय समजून घेण्यासाठी तूर्त कराचा भाग बाजूला ठेवू. मात्र, तात्पर्य इतकंच, की ज्यांना म्युच्युअल फंडांची भीती वाटते अशा गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंडांमधल्या गुंतवणुकीची सुरवात लिक्विड योजनांपासून करायला हरकत नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे अतिशय थोड्या दिवसांकरीता- म्हणजे तीन महिने वगैरे काळासाठी- तुमची रक्कम बॅंकेच्या सेव्हिंग्ज खात्यामध्ये ठेवण्यापेक्षा ती रक्कम म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजनांमध्ये ठेवणं योग्य ठरेल.

Web Title: suhas rajderkar write article in saptarang