suhas rajderkar
suhas rajderkar

'आर्बिट्राज'ची लाभदायी योजना (सुहास राजदेरकर)

म्युच्युअल फंडांच्या इक्विटी विभागातली जोखीम नगण्य असलेली योजना म्हणजे "इक्विटी आर्बिट्राज' योजना. ती नक्की कशा प्रकारे काम करते, ते न समजल्यानं बहुतेक गुंतवणूकदारांकडून ती तशी दुर्लक्षित आहे. जास्त जोखीम नको असणाऱ्या आणि करपश्‍चात जास्त परतावा हवा असणाऱ्यांसाठी उपयुक्त असणाऱ्या या योजनेबाबत तांत्रिक माहिती.

म्युच्युअल फंडांच्या सतत खुल्या असणाऱ्या इक्विटी विभागातली जोखीम नगण्य असलेली कोणती योजना असेल, तर ती "इक्विटी आर्बिट्राज' योजना. मात्र, ही योजना नक्की काम कशी करते ते न समजल्यानं बहुतेक गुंतवणूकदारांकडून तशी दुर्लक्षित आहे. आज खरं तर 19 म्युच्युअल फंडांतर्फे ही योजना खुली असून, एकूण मालमत्ता फक्त साधारण 54 हजार कोटी रुपये म्हणजे म्युच्युअल फंडांच्या इतर सर्व योजना मिळून एकूण 23 लाख कोटी रुपये मालमत्तेच्या साधारण 2.35 टक्के इतकीच आहे. ही योजना काय आहे आणि कोणाला त्याचा फायदा होऊ शकतो, हे थोडक्‍यात पाहू या.
शेअर बाजारामध्ये दोन विभाग असतात, एक "कॅश' आणि दुसरा "डेरिव्हेटीव्ह्‌ज' म्हणजे "फ्युचर्स आणि ऑप्शन्स.' डेरिव्हेटीव्ह्‌ज विभागामध्ये तुमच्याकडे शेअर्स नसतानासुद्धा तुम्ही ते विकू शकता. बऱ्याच वेळा असं होतं, की कंपनीच्या शेअरची किंमत या दोन्ही विभागामध्ये वेगळी (कमी-जास्त) असते. या संधीचा फायदा घेऊन फंड व्यवस्थापक असा शेअर कॅश विभागामध्ये विकत घेतो आणि त्याच वेळी तो डेरीव्हेटीव्ह्‌ज विभागामध्ये जास्त किमतीला विकतो. एक उदाहरण घेऊ. टाटा मोटर्स हा शेअर कॅश विभागामध्ये 310 रुपयांना मिळतो आहे. त्याच वेळी या शेअरची किंमत डेरीव्हेटीव्ह्‌ज (फ्युचर्स) विभागामध्ये मात्र 315 रुपये आहे. अशा वेळी, आर्बिट्राज योजना हा शेअर कॅशमध्ये 310 रुपयांना विकत घेते आणि त्याच वेळी तो फ्युचर्स विभागामध्ये 315 रुपयांना विकते. एका शेअरमागे पाच रुपये नफा. एकाच वेळी शेअर खरेदी आणि विक्री केल्यामुळे त्यानंतर शेअर बाजार कितीही वर किंवा खाली गेला आणि टाटा मोटर्स शेअरसुद्धा कितीही वर किंवा खाली गेला, तरीसुद्धा योजनेला कोणताही फरक पडत नाही किंवा तोटा होत नाही. कारण योजनेमध्ये कोणताही सौदा खुला नसतो.

काही ऑपरेशनल बाबींवर नजर टाकू या. योजनेमध्ये प्रवेशभार नाही, लॉक इन काळ नाही आणि बहिर्गमनभार विविध म्युच्युअल फंडांचा वेगळा म्हणजेच 7 दिवस ते 31 दिवस इतकाच असतो. गुंतवणुकीसाठी कमीत कमी रक्कम पाच हजार रुपये आहे व कमाल गुंतवणुकीवर निर्बंध नाही. योजनेमध्ये वैयक्तिक; तसंच संस्थात्मक गुंतवणूकदार गुंतवणूक करू शकतात. सध्या मिळत असलेला परतावा वार्षिक साधारण साडेसहा टक्के आहे जो बदलता असतो. योजनेचा सर्वांत महत्त्वाचा फायदा म्हणजे टॅक्‍समध्ये असलेल्या सवलती. ही एक इक्विटी योजना असल्यानं, लाभांश पर्यायावर फक्त दहा टक्के इतकाच "लाभांश वितरण कर' लागतो. वृद्धी पर्याय घेतला आणि एका वर्षाच्या आत पैसे काढले, तर झालेल्या नफ्यावर 15 टक्के "शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स' लागतो. एका वर्षानंतर युनिट्‌स विकली, तर एक लाख रुपयांच्या वरील नफ्यावर फक्त दहा टक्के "लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्‍स' लागतो. त्यामुळे, जे गुंतवणूकदार वीस किंवा तीस टक्के टॅक्‍स स्लॅबमध्ये येतात, त्यांना ही योजना फायदेशीर आहे. ही योजना तुम्ही तुमच्या बॅंक मुदतठेवी, पोस्ट ऑफिस योजना; तसंच म्युच्युअल फंडांच्या लिक्विड योजनांना पर्याय म्हणून बघू शकता. कारण आर्बिट्राज योजनेमधला करपश्‍चात परतावा हा वरील सर्व योजनांवरच्या करपश्‍चात परताव्यापेक्षा काकणभर सरसच ठरेल. त्याचप्रमाणं सिस्टिमॅटिक ट्रान्सफर प्लॅनमध्ये (एसटीपी) सुरवातीची रक्कम, लिक्विड योजनेपेक्षा आर्बिट्राज योजनेमध्ये गुंतवू शकता व बहिर्गमनभार काळ संपल्यावर रक्कम इतर योजनांमध्ये आपोआप ट्रान्सफर करू शकता.

तात्पर्य, म्युच्युअल फंडांमध्ये प्रथमच गुंतवणूक करणारे, जास्त जोखीम नको असणारे; तसंच संस्थात्मक गुंतवणूकदार- उदाहरणार्थ, कंपन्या, सोसायट्या यांनी या योजनेचा फायदा घेणं योग्य वाटतं. थोडक्‍यात, ज्यांना थोड्या कालावधीकरीता (दहा ते पंधरा महिने) गुंतवणूक करून, "करपश्‍चात' जास्त परतावा हवा आहे, अशा सर्व गुंतवणूकदारांनी या योजनेचा विचार करायला हरकत नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com