esakal | भारतीय चित्रपट उद्योगाची आधारशिला
sakal

बोलून बातमी शोधा

Dadasaheb Falake with Wife

भारतीय चित्रपट उद्योगाची आधारशिला

sakal_logo
By
सुलभा तेरणीकर saptrang@esakal.com

भारतीय चित्रपटाचे जनक दादासाहेब फाळके यांची येत्या ३० एप्रिलला १५१ वी जयंती आहे. त्यानंतर ३ मे रोजी भारतीय चित्रपट सृष्टीला संपूर्ण स्वदेशी ‘राजा हरिश्‍चंद्र’ या चित्रपटाच्या रूपाने त्यांनी बहाल केलेले सिनेमा पर्व व त्याची उणीपुरी ११२ वर्षे. दादासाहेबांच्या जीवनाची, त्यांच्या कार्याची कथा एखाद्या चित्रपटांसारखीच आहे. त्याचा वेध...

चाळिशी उलटलेला एक ग्रहस्थाश्रमी मराठी प्रौढ युवक भारतीयांसाठी स्वदेशी चित्रपट तयार करण्याचं एक अत्यंत महागडं स्वप्न पाहत होता. तो काळ परकीय सत्तेचा होता आणि विदेशात जन्मलेलं चलच्चित्रांचं नवल इथं हातपाय पसरू लागलं होतं. हे नवं खेळणं भारतात लोकप्रिय होऊ घातलं होतं. सावेदादा, पाटणकर, दादा तोरणे, बंगालमध्ये हिरालाल सेन हे हलत्या चालत्या चित्रीकरणात आपली कला आजमावत होते. पण १९१० च्या ईस्टरच्या सुट्टीत ‘लाइफ ऑफ जीजस ख्राइस्ट’ हा चल् चित्रपट मुंबईत पाहिल्यावर दादासाहेब फाळके यांनी आपण स्वतःचा भारतीय चित्रपट का निर्माण करू नये, असा विचार केला आणि त्या विचारानं त्यांना पुरतं पछाडलं. मात्र हे स्वप्न बघायच्या आधी धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब या त्र्यंबकेश्‍वरी जन्मलेल्या व्यक्तीचं जीवन पाहिलं तर या महान, पण अशक्य कामाचे ओझे नियतीनं त्यांच्या शिरावर का दिलं याची अंधुकशी कल्‍पना आपण करू शकतो. नियतीनं लिहिलेली अदृश्य पटकथा याचं थोडं रहस्य उलगडेल.

भिक्षुक पण वेदशास्त्रसंपन्न अशा दाजीशास्त्री फाळके यांच्या घरात १८७० मध्ये ३० एप्रिलला जन्मलेल्या दादासाहेबांवर वेद, उपनिषदं, पुराण कथा यांचे लहानपणी संस्कार झाले. भारतीय बांधवांना आपल्या वैभवशाली पौराणिक कथा रूपेरी पडद्यावर दाखवायचं स्वप्न हे कदाचित या संस्कारात रुजलं असावं.

दाजीशास्त्रींची विल्सन कॉलेजात संस्कृतचे प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाल्यानं फाळके कुटुंब मुंबईत आलं. कलेची ओढ असलेल्या मुलाला त्यांनी मुंबईच्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमध्ये दाखल केलं. १८८५ ते १८९० पर्यंत जलरंग, तैलरंगाची पदविका मिळेपर्यंत दादासाहेबांनी देखावे चितारण्याचा ध्यासच घेतला. वास्तुरचना शास्त्र, मॉडेलिंग याचं तंत्र अभ्यासताना मोठ्या बंधूंमुळे लेखन, वाचन याची गोडी लागली. त्यांचं हे वेड पाहून थोरल्या भावानं त्यांना बडोद्याच्या ‘कलाभवन’च्या प्रो. त्रिभुवनदास गज्जर यांच्या हाती सोपवले. कलेच्या माध्यमातून प्रतिसृष्टी निर्माण करणाऱ्या प्रो. गज्जरांनी दादासाहेबांच्या कलागुणांकडे पाहून त्यांना आपली सुसज्ज प्रयोगशाळा, रसायनशाळा, फोटो स्टुडिओ याची दारं खुली केली. १८९३ च्या सुमारास दादसाहेबांना स्थिरचित्रणाने झपाटलं होतं. सतत प्रयोग, प्रक्रिया यात ते बुडून गेले होते.

१८९२ मध्ये अहमदाबादमध्ये भरलेल्या औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी उभी केलेली नाट्यगृहाची रेखीव देखणी प्रतिकृती पाहून एका धनिक रसिक उदार व्यक्तीनं त्यांना भारी स्थिरचित्रण कॅमेरा बक्षीस दिला होता. प्रो. गज्जर यांच्या गुणी शिष्यानं हाफ टोन ब्लॉक्स, फोटोलियो, थ्री कलर प्रोसेस सिरॅमिकही शिकून घेतलं.

युरोप अमेरिकेत प्रयोग चालले होते, पण चित्रपटाचा उदय पृथ्वीवर झाला नव्हता. पण तोवर जणू दादासाहेबांची कलाविश्‍वात उमेदवारी चालली होती ती त्या अद्‍भुत सिनेमाच्या निर्मितीसाठी कलेच्या आधारावर चरितार्थ चालविण्याचे आर्थिक स्थैर्य मात्र त्यांना लाभलं नव्हतं. पण शास्त्रोक्त संगीताचे शिक्षणही घेतले होते. उत्तम कीर्तन करणे, खुलवून कथा सांगणे, नाटक, रंगभूषा, नेपथ्य, पात्रयोजना, संवाद यांचं चांगलं ज्ञान होतं. पण जीवनाला स्थैर्य नव्हतं. त्यातच १९०० मध्ये प्रथम पत्नीचं प्लेगच्या साथीत निधन झालं.

दादासाहेबांना छाया पुरातत्व वस्तू संशोधन खात्यात चित्रकार आणि ड्राफ्ट्‍समन म्हणून केलेल्या नोकरीने भारतातील कला वारसा, मंदिरं, शिल्पं अभ्यासता आले. पण थोडी स्थिरता आल्यावर सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन त्यांना पुन्हा अस्थिर जीवनाकडे झेप घेतली. सर डॉ. भांडारकर यांचा बुद्धिमान हरहुन्नरी फाळके यावर लोभ होता. त्यांच्या मदतीनं ‘फाळके एन्ग्रेव्हिंग ॲण्ड प्रिंटिंग वर्क्स’ उभं राहिलं. छापखान्याच्या सामग्रीसाठी व तंत्रज्ञानासाठी १९०९ मध्ये ते जर्मनीसही जाऊन आले आणि आपल्या कामात विदेशी वृत्तपत्रांची प्रशंसाही मिळवली. आकर्षक रंगीत छपाईची टाइम्स ऑफ इंडियाची मक्तेदारीही मोडून काढली. पण डोळ्यावरच्या ताणामुळे त्यांना अंधत्व आले. डॉ. प्रभाकर या निष्णात नेत्रवैद्याचे उपचार त्यांना वरदान ठरले आणि दृष्टी परत आली.

‘सुवर्णमाला’सारखे कलात्मक मराठी- गुजराती मासिक, सुंदर बगीचा निर्माण करण्याचा छंद जोपासता ‘लक्ष्मी प्रिंटिंग वर्क्स’चे भागीदारीतले काम व्यावसायिक हस्तक्षेपानं त्यांनी सोडून दिलं आणि पुन्हा अस्थिरतेच्या भोवऱ्यात पाऊल टाकलं. भारतीय चित्रपट निर्मितीच्या अग्निपरीक्षेची ती नांदी होती. १९०२ मध्ये त्यांच्या जीवनात आलेल्या द्वितीय पत्नी सरस्वतीबाईंची त्यांना साथ होतीच. पण स्वदेशी चित्रपटनिर्मितीचा ध्यास होता. दुर्दम्य साहस होतं. त्यासाठी त्यांनी सर्वस्व पणाला लावलं असं सरस्वतीबाईंनी सांगितलं.

अगदी सिनेमातंत्राची मुळाक्षरं गिरवणं, त्यासंबंधीचे साहित्य अभ्यासणं, कॅटलॉग, पुस्तक वाचणं हा परिपाठ सुरू झाला. ‘बायोस्कोप’ या लंडनच्या सिने वीकलीचे ते वर्गणीदार झाले. आणि स्वतःची पॉलिसी गहाण टाकून, थोडी रक्कम कर्जाऊ घेऊन १९१२ मध्ये १ फेब्रुवारीला दादासाहेब लंडनला रवाना झाले. नातेवाइकांना वाटलं हा माणूस मृगजळामागं धावतोय. खुद्द लंडनचे ‘बायोस्कोप’चे संपादक मि. केपबर्न त्यांना चित्रनिर्मितीत जाऊ नये असं म्हणाले. पण युरोपियन व्यक्तीसारखे दिसणारे, फर्ड इंग्रजी बोलणारे पण विलक्षण नम्र, पण दृढनिश्‍चयी दादासाहेब पाहून केपबर्न साहेबांनी ब्रिटिश माणसांनाही दुर्लभ अशी चित्रनिर्मिती प्रत्यक्ष पाहण्याची त्यांना संधी दिली. आवश्यक साधनसामग्री खरेदी करून दादासाहेब स्वदेशी परतले.

एका मंगळसूत्राखेरीज सर्व अलंकार सरस्वतीबाईंनी दादासाहेबांसमोर ठेवले. किचकट तांत्रिक कामं आंगीकारली. फाळके कुटुंबच नव्या साहसासाठी सज्ज झालं, सतत पैशाची मागणी करणारी सिनेमाची कला ज्या अन्य कलागुणांवर उभी आहे. ते सर्व गुणसंपन्न दादासाहेब या दुःसाहसाचे धनी झाले. १९१९ मध्ये ३ मे रोजी ‘राजा हरिश्‍चंद्र’ या ३ हजार ७०० फूट लांबीच्या पहिल्या भारतीय चित्रपटाचे प्रदर्शन झाले मुंबईत आणि नव्या ऐतिहासिक भावनिक पर्वाचा प्रारंभ झाला.

बावन्न मूकपट, एक बोलपट आणि तीस लघुपटाची निर्मिती दादासाहेबांनी प्रचंड शारीरिक कष्ट, आर्थिक नुकसान यश आणि उपेक्षा आणि गृहसौख्य याच्या बदल्यात केली. स्वदेशीचा ध्यास घेतला आणि पुरा केला. १९३८ मध्ये मुंबईत भारतीय चित्रपटाचा रौप्यमहोत्सव थाटानं साजरा झाला. तेव्हा मान्यवर रंगमंचावर विराजमान होते. पृथ्वीराज कपूर यांना दादासाहेब फाळके गर्दीत अंग चोरून बसले होते ते दिसले. त्यांना रंगमंचावर बोलावले गेले. समाज तोपर्यंत त्यांना विसरला होता. विस्मृती, मधुमेह आणि निष्कांचन अवस्था यांनी त्यांना घेरले होते. नाशिकच्या हिंदसिनेजनकाश्रमात १६ फेब्रुवारी १९४४ या दिवशी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. राजा रवि वर्मा, धुरंदर चित्रकला आणि रजतपटावरची त्यांची सृष्टी, भारतीय संस्कृतीचा अभिमान, स्वदेशीची आस, नाशिकचे सुंदर घाट मंदिरे यांचे फक्त शाब्दिक वर्णन मागे राहिले. पण सिनेमा उद्योगाची आधारशिला इतकी विशाल रचली गेली, की त्यावर आज राजमहाल उभे आहेत.

(लेखिका भारतीय चित्रपटांच्या अभ्यासक आहेत.)

loading image