चॉकलेट हीरोच्या आयुष्यातलं पुणं...

पूर्व पंजाबच्या गुरुदासपूरमधून देव आनंद यांचा जीवनप्रवास १९२३ मध्ये २६ सप्टेंबरला सुरू झाला आणि लंडनमधल्या ‘द वॉशिंग्टन मेफेअर हॉटेल'', इथं दहा वर्षापूर्वी म्हणजे २०११ च्या तीन डिसेंबरला थांबला.
Dev Anand
Dev AnandSakal

मुंबईच्या सेंट्रल सिनेमात १९४६ या वर्षात ८ जून या दिवशी पुण्याच्या प्रभात फिल्म कंपनीचा ‘हम एक है’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. देव आनंद हे नाव पहिल्यांदा रजतपटावर झळकलं, त्या घटनेला ७५ वर्षे होत आहेत. येत्या दोन वर्षांत देव आनंद यांची जन्मशताब्दी साजरी होईल. त्यांना जाऊनही एक दशकाचा काळ लोटेल; पण प्रणय, संगीत, तारुण्य, उत्साह यांचं इंद्रधनुष्य मात्र त्यांच्या चाहत्यांच्या हृदयात कायम आहे, असेल. त्याचा हा आठवण.

पूर्व पंजाबच्या गुरुदासपूरमधून देव आनंद यांचा जीवनप्रवास १९२३ मध्ये २६ सप्टेंबरला सुरू झाला आणि लंडनमधल्या ‘द वॉशिंग्टन मेफेअर हॉटेल'', इथं दहा वर्षापूर्वी म्हणजे २०११ च्या तीन डिसेंबरला थांबला; पण देव आनंद या नावाभोवतीचं वलय ओसरलं नाही, की त्यांच्या कहाणीतील उत्कंठाही ! चिरतरुण, सदाबहार, एव्हरग्रीन ही विशेषणं जुनी झाली, शिळी वाटू लागली पण देव आनंद आणि तारुण्य, प्रणय, संगीत, उत्साह असं समीकरण तसंच ताजं टवटवीत राहिलं आणि हा क्रम गेले पंच्याहत्तर वर्षे अविरत आहे.

१९४४ च्या १९ जुलैला मुंबई सेंट्रलवर त्यांनी पाय ठेवला तो दिवस अतिवृष्टीचा होता. बंधू चेतन आनंद मुंबईत चित्रपटक्षेत्रात धडपड करीत होते. इथंच बलराज साहनी, ख्वाजा अहमद अब्बास, जोहरा सैगल यांचा परिचय झाला. युद्धाचा काळ होता. तेव्हा सैनिकांची पत्रं वाचूनच पुढे रवाना होत. त्या ‘मिलिटरी सेन्सॉर’च्या ऑफिसात काही काळ काम केलं. ख्वाजा अहमद अब्बास यांच्या ‘झुबैदा’ या नाटकातही भूमिका केली; पण अजून निश्‍चित दिशा सापडली नव्हती. अशोक कुमार, मोतीलाल यांचा अभिनय पाहून कुठं तरी वाटलं होतं, की ‘आपणही असे करू शकतो’. लवकरच ‘फेमस’च्या बाबूराव पै यांनी पंजाबहून आलेल्या इंग्रजीतून पदवीधर झालेल्या या देखण्या आणि नम्र युवकाची चित्रपटातल्या कामासाठी नेमणूक केली. एस. फत्तेलाल आणि दिग्दर्शक प्यारेलाल संतोषी यांनी त्यावर पसंतीची मोहोर लावली. ‘फेमस’ त्याकाळी प्रभातचं मुंबईतलं काम पाहात असे. देवआनंद यांचा आणि प्रभातचा संबंध जुळून आला तो याच काळात.

पुण्यात पहिल्या दिवशी मेकअपमनने त्याचा चेहरा हाती घेऊन म्हटलं, ‘‘ मुला, तुझं भविष्य उज्ज्वल आहे, तुझा चेहराच सांगतोय...’’ पुण्यात नवा प्रवास सुरू झाला. निसर्गसुंदर डलहौसी, धरमशाला, अमृतसर, लाहोर मागे पडलं. तसंच धरमदेव हे नावही !

गुरुदासपूर येथे सहा महिने, तर डलहौसीला सहा महिने अशी शाळा असे. लहानपणी संस्कृत श्‍लोक आणि बायबलमधले इंग्रजी उतारे यांचं पाठांतर करणाऱ्या काहीशा लाजाळू आणि नाजूक मुलाचं नेव्हीत जायचं स्वप्न मात्र अधुरं राहिलं. पण पुण्याच्या हिरव्या टेकड्या, शांत लोक, वृक्षराजी त्याला आवडलं आणि गुरुदत्त, रहमानसारखे मित्र मिळाले. ‘हम एक है’ जातीय सलोखा, धार्मिक ऐक्‍य यावर आधारित होता. त्यानंतरचा १९४७ मध्ये आलेला ‘आगे बढो’ हा सानेगुरुजींच्या ‘रामाचा शेला’ या कादंबरीवर आधारित होता. चित्रपट चालले नाहीत. पण ‘प्रभात’चं नाव, पुण्याच्या सुंदर आठवणी, सायकलची रपेट, एन.डी.ए.च्या टेकडीवर गुरुदत्तबरोबर पाहिलेली भविष्याची स्वप्नं बरोबर घेऊन देव आनंद हे नाव अल्पावधीत ‘जिद्दी'' (१९४८) मध्ये चमकलं.

१९४९ मध्ये १४ ऑक्‍टोबरला देव आनंद आणि चेतन आनंद यांनी स्वतःची चित्रनिर्मिती संस्था ‘नवकेतन’ची स्थापना केली. नवकेतन म्हणजे नवे निशाण, नवा ध्वज! पाठोपाठ ‘अफसर’ आणि ‘हमसफर’ हे नवकेतनचे चित्रपट झळकले. व्यावसायिक यश मिळालं नाही, तरी आगेकूच सुरू राहिली.

१९५२ मधल्या चित्रपटविषयक एका नियतकालिकात देव आनंद यांच्याबद्दलचा हा मजकूर खूप काही सांगतो. ‘‘ देव आनंद हा सध्याचा सर्वांत तरुण आणि देखणा कलाकार आहे. त्याच्याजवळ दोन घरं, तीन गाड्या आणि सहा चित्रपटांचे करार आहेत. नामवंत संगीतकार, लेखक, विचारवंतांची वर्दळ त्याच्या घरी असते. जुहूमधील आयरिश पार्क येथील त्याच्या निवासस्थानात उत्तमोत्तम पुस्तकं आहेत. त्याला चित्रपट दिग्दर्शित करण्याची इच्छा आहे. अविवाहित देव आनंदच्या भावी वधूसाठी सुरैय्याच्या नावाची जोरदार चर्चा आहे...’’

देव आनंद - सुरैय्याची जोडी जमली नाही; पण १९५४ मधल्या ३ जानेवारीला ‘मिस सिमला’ मोना सिंग मात्र त्यांच्या जीवनात आली. कल्पना कार्तिक म्हणून तिने पडद्यावरही जोडी जमवली होतीच. दरम्यान, ‘बाजी’मध्ये गुरुदत्तबरोबरचा दोस्तीचा वादाही पुरा झाला. पुढचा इतिहास सर्वश्रुत आहे.

‘नवकेतन’चा झेंडा लहरत ठेवण्याबरोबर अन्य चित्रपटांतून देव आनंद आपली प्रतिमा जपत राहिले. दिलीप कुमार शोकनायक, राज कपूर बेघर, बेकार, भोळसट नायक, तर देव आनंद चॉकलेट हिरो झाले.

भरभर बोलण्याची शैली, देखणेपण, रंगसंगतीचा ऐटबाज पेहराव याला जन्मजात सुसंस्कृतता, सभ्यपणा, बहुश्रुतता याची जोड मिळालेली आणि प्रणयी नायक... पण कुठेही बेरंग न होऊ देता खेळकर प्रणयाची शैली, पडद्यावर आणि त्याबाहेरही !

त्यांच्या सहनायिका वहिदा रहमान म्हणतात, ‘‘देव आनंद आपल्या स्त्री सहकाऱ्यांबरोबर ज्या खेळीमेळीनं, हलकासा खेळकर प्रणय, निसटता स्पर्श किंवा शब्द यातून व्यक्त करतात, ते हवेहवेसे वाटत असे.’’

बदलत्या काळाशी सहज जुळवून घेताना, भूतकाळात न रेंगाळता सतत कार्यमग्न राहणाऱ्या देव आनंदनी आपली जीवनशैली तरुणाईला लाजवेल अशी ठेवली. खुर्शीद, नर्गिस, सुरैय्या, मीनाकुमारी, गीता बाली, नलिनी जयवंत, कामिनी कौशल, वहिदा, बीना राय, साधना, नूतन, आशा पारेख, टीना मुनीम, हेमा मालिनी, झीनत अमानबरोबर ते सारखेच शोभले.

परीकथेतील राजकुमारासाठी रसिकांनी मनाची कवाडं उघडी ठेवली. ‘हरे राम हरे कृष्ण’नंतर निर्माता, दिग्दर्शक, स्क्रिप्ट रायटर सबकुछ देवसाब बनले. चित्रनिर्मितीनं झपाटलेल्या देव आनंद यांचे जीवन पुस्तकं वाचणं, लोकेशन शोधणं, नवे चेहरे शोधणं, शूटिंग, रेकॉर्डिंग यात व्यग्र झालं. नियमित आहार, झोप, झोकून देऊन काम आणि निर्व्यसनी जीवन हेच आयुष्य झालं.

त्यांचे भलेबुरे सिनेमे आठवत लोक पुढचेही चित्रपट पाहत राहिले. ‘देवसाब आप फिल्में बनाओ हम आते रहेंगे’ असं म्हणत राहिले. खंत नाही, खेद नाही, हारजितीची पर्वा नाही असं तत्त्वज्ञान बाणवून घेतलेल्या देव आनंदनी पुण्याच्या सोनेरी दिवसाचं कौतुक केलं, की चाहते सुखावतात. पूना गेस्ट हाऊसमध्ये मटार उसळ-पाव खायला शिकलो असं ऐकलं की त्यांना मूठभर मांस चढतं... भूतकाळाकडं त्यांनी भलेही पाठ फिरवली होती; पण चाहत्यांना मात्र ते भूतकाळात ओढून न्यायचे. म्हणूनच आमच्या जीवनाचे रंग पुरते विटत नाहीत. ‘अभी न जाओ’च्या एका हाकेनं उजळतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com