

Sully Hudson River Landing
esakal
सुहास किर्लोस्कर - suhass.kirloskar@gmail.com
वर्ष २००९ मधली ही घटना. १५ जानेवारीला वैमानिक सली चालवत असलेल्या विमानाने आकाशात झेप घेतली आणि ‘कॅनेडियन गीज’ पक्ष्यांचा थवा विमानाच्या समोरच्या बाजूने आला आणि विमानाला, विमानाच्या पंखाला थडकला. ज्यामुळे विमानाची दोन्ही इंजिन खराब झाली. वैमानिक सली यांनी समयोचित निर्णय घेऊन विमान हडसन नदीच्या भव्य पात्रामध्ये उतरवले. ज्या १५५ प्रवाशांचे प्राण वाचले, त्यांनी वैमानिक सली (चेस्ली सलेनबर्गर) यांचे मनापासून आभार मानले. आश्चर्याची घटना पुढेच घडली. नॅशनल ट्रान्स्पोर्ट सेफ्टी बोर्डाने वैमानिक सली यांची चौकशी सुरू केली, विमान याप्रकारे नदीत का उतरवले, विमानतळावर परत का आणले नाही, अशा प्रकारचे प्रश्न विचारले.
या घटनेनंतर वैमानिक सली आणि सह-लेखक जेफ्री झेस्लो यांनी ‘Highest Duty: My Search for What Really Matters’ हे आत्मचरित्र लिहिले. टॉड कोमार्निकी यांनी त्या पुस्तकावर आधारित पटकथा लिहिली आणि क्लिंट इस्टवूड यांनी हा अनोखा चित्रपट दिग्दर्शित केला. सली म्हणजे कलंक, एखाद्याने उत्तम कार्य केल्यानंतर त्याच्यावर खोटे आरोप करून त्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणे. हा चित्रपट व्यवस्थेविरुद्ध एका वैमानिकच्या झगड्याची कथा आहे. कथा काय आहे यापेक्षा ती क्लिंट इस्टवूडने कशी दाखवली आहे, हे बघण्यासारखे आहे. सिनेमाचा स्कोप कथेच्या पलीकडे बराच मोठा असतो, तो समजून घेणे म्हणजेच चित्रपटाचा रसास्वाद. विमान अचानकपणे नदीत उतरवावे लागले, या चित्तथरारक सत्यघटनेवर चित्रपट तयार करायचा असल्यास सुरुवात कशी करणार? दिग्दर्शक आणि पटकथा लेखक यांनी इथेच बाजी मारली आहे.