उदंड जाहल्या लीग (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 21 ऑक्टोबर 2018

क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत असताना हे सगळं लोण कुठपर्यंत जाणार, खऱ्या क्रिकेटचं काय होणार, सट्टेबाजीचं ग्रहण कशाचा घात करणार आदी गोष्टींचा परामर्श.

क्रिकेटच्या विश्‍वात सध्या लीग या प्रकारानं खळबळ उडवून दिली आहे. टी-20पाठोपाठ आता टी-10 लीगही येऊ घातल्या आहेत. पाकिस्तानपासून अफगाणिस्तानपर्यंत अनेक देशांत "झटपट क्रिकेट'चं लोण वाढत चाललं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (आयसीसी) या सगळ्याची गंभीर दखल घेतली आहे. "झटपट क्रिकेट' लोकप्रिय होत असताना हे सगळं लोण कुठपर्यंत जाणार, खऱ्या क्रिकेटचं काय होणार, सट्टेबाजीचं ग्रहण कशाचा घात करणार आदी गोष्टींचा परामर्श.

"सुनंदन, तू अजमान क्रिकेट लीगचा व्हिडिओ बघितलास का,'' माझा पत्रकार मित्र अमोल कऱ्हाडकरनं मला विचारलं. आम्ही आशियाई करंडक स्पर्धेचं वार्तांकन करायला दुबईला गेलो होतो, तेव्हाचा हा प्रश्‍न.
""नाही रे! काय इतकं खास त्याच्यात,'' मी विचारलं.
""अरे कमाल आहे... इतकं विनोदी क्रिकेट तुला बघायला मिळणार नाही,'' असं म्हणत अमोलनं त्याच्या लॅपटॉपवर मला त्या क्रिकेट लीगची क्‍लिप दाखवली.
खरं सांगतो तुम्हाला, इतकं क्रिकेट बघितलं; पण असं क्रिकेट नाही बघितलं. क्‍लिप बघून सुरवातीला मी हसलो; पण नंतर जाम राग आला- कारण ती क्‍लिप म्हणजे क्रिकेटच्या संस्कृतीचा धडधडीत अपमान होता. क्रिकेट खेळताना चाललेली उघड चोरी बघून माझा संताप झाला होता.

गेल्या महिन्यात दुबईत पार पडलेल्या आशियाई करंडक स्पर्धेदरम्यान सुटीच्या दिवशी पत्रकारांना अफगाणिस्तान प्रीमिअर लीग स्पर्धेनिमित्तानं माहिती द्यायला पत्रकार परिषद भरवण्यात आली होती. तसंच दुबईत नवीन टी-10 लीग सुरू होणार, त्याचीही पत्रकार परिषद भरवली गेली होती. त्याच दरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीला भेट देण्याचा योगही जमून आला. एकीकडं संयोजक नवीन लीग कशी धमाल उडवणार आहे आणि नव्या खेळाडूंना संधी उपलब्ध करून देणार आहे, हे छातीठोकपणे सांगत होते. दुसरीकडं आयसीसीच्या लाचलुचपत विभागाचे मुख्य अधिकारी अधिकारी नव्यानं सुरू होणाऱ्या लीग स्पर्धांपासून क्रिकेटच्या पावित्र्याला मोठा धोका कसा आहे, हे पुराव्यासह सांगत होते.

होय! अंतिम सामन्याअगोदर सुटीच्या दिवशी पत्रकारांना आयसीसीनं निमंत्रित करून पालक संस्था क्रिकेटच्या प्रसाराकरता काय काम करते, याची माहिती दिली. दोन-तीन सादरीकरणं करण्यात आली- ज्यातलं अँटी-करप्शन म्हणजेच लाचलुचपत विभागाचं सादरीकरण फारच परिणामकारक होतं. अँटी-करप्शन विभागाचे अधिकारी इयान मार्शल यांनी त्या सादरीकरणादरम्यान स्पष्ट सांगितलं ः ""नव्यानं सुरू झालेल्या मर्यादित षटकांच्या काही लीग स्पर्धांतून क्रिकेटमधली उघड सट्टेबाजी दिसून येते. सट्टेबाजांनीच काही लीग सुरू केल्याचं जाणवतं आहे. नव्यानं सुरू होणाऱ्या लीग स्पर्धांवर कडक निर्बंध घालण्यावाचून आयसीसीला पर्याय राहिलेला नाही. योग्य वेळी ही कडक पावलं उचलली नाहीत, तर क्रिकेटच्या संस्कृतीला मोठा धक्का बसू शकतो.''
इयान यांच्या म्हणण्यात किती तथ्य आहे, हे तपासण्यासाठी तुम्ही एकदा फक्त https://www.youtube.com/watch?v=9xTEf5TJrMc
या लिंक वर जाऊन अजमान क्रिकेट लीगची क्‍लिप बघा- म्हणजे सट्टेबाज किती उघडपणे काम करत आहेत, याची कल्पना येईल. आयसीसीला कडक पावलं उचलावी लागणार आहेत- कारण काही अधिकृत, तर बऱ्याच अनधिकृत क्रिकेट लीगचं पेव जगभर फुटलं आहे.

इतिहास जुना आहे
लीग क्रिकेट हा नवीन प्रकार आहे आणि क्रिकेटमधली सट्टेबाजीही नवीन आहे, असं कुणाला वाटत असेल, तर मोठी चूक आहे. 1664 मध्ये तत्कालीन इंग्लंड सरकारनं क्रिकेट लीग खेळणं आणि त्यावर सट्टेबाजी करायला अधिकृत परवानगी देण्याचा कायदा अस्तित्वात आणल्याची नोंद आहे. एका सामन्यावर सट्टेबाज जास्तीत जास्त शंभर पौंडाची पैज लावू शकतो, असा कायदा होता.

इंग्लंडचा संघ 1859 मध्ये परदेश दौऱ्यावर गेला आणि 1862 मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या परदेश दौऱ्यावर इंग्लंडला आला असल्याची नोंद सापडते. पुढं शंभर वर्षांपेक्षा जास्त काळ क्रिकेटविश्‍व कसोटी क्रिकेटची जोपासना करण्यात गुंग होतं. 1971 मध्ये मेलबर्न क्रिकेट मैदानावर चालू असलेल्या कसोटी सामन्यात पावसानं धुमाकूळ घातला. उरलेल्या वेळेत कसोटी सामना पूर्ण होणार नाही म्हणून संयोजकांनी खेळाडूंना थोडं क्रिकेट खेळायला मिळावं आणि वैतागलेल्या प्रेक्षकांची थोडी करमणूक व्हावी, म्हणून मर्यादित षटकांचा सामना खेळवला. लोकांना हा बदल जाम आवडला. आयसीसीनं काळाची पावलं बरोबर ओळखून लगेच 1975 मध्ये मर्यादित षटकांच्या पहिल्या विश्‍वकरंडकाचं आयोजन केलं.

कॅरी पॅकरचा धमाका
पहिल्या विश्‍वकरंडकानंतर एकदिवसीय क्रिकेटची लोकप्रियता झपाट्यानं वाढली. टीव्हीवरून एकदिवसीय सामन्यांचं प्रक्षेपण करायला नामांकित टीव्ही चॅनेल्स मोठ्या बोली लावू लागली. साहजिकच टीव्ही प्रक्षेपण हक्कांच्या रकमा आकाशाला जाऊन भिडल्या. त्या गदारोळात "चॅनेल 9'चा मालक कॅरी पॅकरला ऑस्ट्रेलियातल्या टीव्ही प्रक्षेपणाचे हक्कं मिळाले नाहीत. कॅरी पॅकरनं मग अशक्‍यप्राय महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला हात घातला. माजी खेळाडू टोनी ग्रेगला हाताशी धरून कॅरी पॅकरनं 1977 मध्ये "वर्ल्ड सिरीज'ची घोषणा केली. जगातल्या तमाम महान खेळाडूंना मोठ्या रकमांचे करार देऊ करून कॅरी पॅकरनं "वर्ल्ड सिरीज'मध्ये खेळायला राजी केलं. इतकंच नाही, तर वर्णद्वेषी सरकारमुळं आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून लांब फेकल्या गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंनाही "वर्ल्ड सिरीज'मध्ये खेळायला बोलावलं.
दिव्याच्या प्रकाशातलं, रंगीत कपड्यांतलं क्रिकेट लोकांना वेड लावू लागलं. लीग क्रिकेट खेळून इतके पैसे मिळू शकतात, याचं खेळाडूंना आश्‍चर्य वाटलं. दोनच वर्षं वर्ल्ड सिरीज क्रिकेट रंगलं; पण त्यानं क्रिकेट जगताचा चेहरा बदलला. कॅरी पॅकरमुळं पहिल्या व्यावसायिक लीगचे पडसाद जगभर उमटले.

तीन दशकांनंतर क्रांती
क्रिकेटविश्‍वात 2003 मध्ये पहिल्यांदा दोन संघांदरम्यान 20-20 षटकांचा सामना खेळवला गेला. तीन तासांत एक संपूर्ण सामना बघायचा प्रकार लोकांना भावला. इंग्लंडमध्ये प्रेक्षक एकदिवसीय सामन्यांना अपेक्षित गर्दी करत नव्हते, म्हणून मंडळानं 20-20 षटकांचे सामने सुरू केले. झटपट क्रिकेट क्षणार्धात लोकप्रिय झालं. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं टी-20 क्रिकेटला नाकारलं होतं. इतकंच काय 2007 मध्ये आयसीसीनं भरवलेल्या पहिल्या जागतिक टी-20 स्पर्धेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं नवखा संघ पाठवला होता. धोनीच्या संघानं पहिल्याच स्पर्धेत विजेतेपद पटकावल्यावर भारतीय क्रिकेट नियम मंडळाला आपण करत असलेली चूक उमगली. एक गोष्ट मान्य करावी लागेल, की त्याची दुरुस्ती करताना बीसीसीआयनं आयपीएलची निर्मिती केली.

चूक कुठे झाली?
आयपीएलआधी भारतात आयसीएल आणि वेस्ट इंडीजमध्ये स्टॅनफर्ड टी-20 स्पर्धेचे बिगूल वाजले, होते हे विसरून चालणार नाही. मग चूक कुठं झाली? आयसीएलनं बीसीसीआयची परवानगी न घेता एका अर्थानं बंडखोर लीगची स्थापना केली. आयपीएलची सुरवात झाल्यावर आयसीएल स्पर्धेला ग्रहण लागणं अपेक्षित होतं.
वेस्ट इंडीज क्रिकेटला गतवैभव देण्याची वल्गना करत ऍलन स्टॅनफर्ड यांनी कॅरेबियन बेटांवर स्टॅनफर्ड टी-20 लीग सुरू केली. ऍलन स्टॅनफर्ड अमेरिकन होता आणि त्याला प्रत्येक गोष्ट पैशांत मोजायची सवय होती. त्यानं जागतिक संघांना कॅरेबियन बेटांवर आकर्षित करायला देऊ केलेल्या रकमा डोळे विस्फारायला लावणाऱ्या होत्या. 2008 मध्ये स्टॅनफर्डनं टी-20 विजेत्या भारतीय संघाला एक सामना खेळायला एक कोटी डॉलर्स देण्याची तयारी दाखवली होती. भारतीय संघानं नकार दिल्यावर स्टॅनफर्डनं इंग्लिश क्रिकेट मंडळाबरोबर मोठा करार केला होता.

फार मोठी स्वप्नं दाखवलेल्या स्टॅनफर्ड लीगच्या पहिल्या स्पर्धेचे उपांत्य आणि अंतिम सामने बघायला मला स्टॅनफर्ड आणि सर विव्हियन रिचर्डस्‌ यांनी खास पाहुणा म्हणून अँन्टीग्वाला बोलावलं होतं, ते मी कधीच विसरू शकत नाही. दुसऱ्याच वर्षी या लीगचे तीन तेरा वाजले- कारण अमेरिकन सरकारनं ऍलन स्टॅनफर्ड यांच्याविरुद्ध आर्थिक अफरातफरीचे गुन्हे दाखल केले आणि त्यांना तब्बल 110 वर्षांची शिक्षा झाली. समाधानाची गोष्ट इतकीच मानता येईल, की स्टॅनफर्ड यांनी गाशा गुंडाळला, तरी कॅरेबियन प्रीमिअर लीग अजूनही जोरात सुरू आहे.

आयपीएलचा उदय
2008 मध्ये सुरू झालेल्या इंडियन प्रीमिअर लीगनं क्रिकेट जगतात क्रांती घडवून आणली. जागतिक दर्जाची क्रिकेट लीग म्हणजे काय असते, हे बघायला मिळालं. नामांकित कंपन्यांनी किंवा महान व्यक्तींनी संघमालक व्हायला उत्सुकता दाखवली- ज्यामुळं आयपीएलला नुसतंच ग्लॅमर नव्हे, तर मान्यता मिळाली. पहिल्या वर्षीपासून जगातले तमाम सर्वोत्तम खेळाडू आयपीएलमध्ये भाग घ्यायला लागले. सामने रंगायला लागले. आयपीएलमुळं क्रिकेटवेड्या प्रेक्षकांसोबत त्या मानानं क्रिकेटकडं लक्ष नसलेले प्रेक्षक या खेळाकडं वळाले. टीव्ही प्रेक्षकांच्या संख्येत अचाट वाढ झाली. जाहिरातदारांनी आयपीएलला उचलून धरलं. टीव्ही प्रक्षेपण हक्कांचे आकडे गगनाला जाऊन भिडले. दणदणीत मोबदला मिळू लागल्यानं जगातले नामांकित खेळाडू प्राणपणानं लढू लागले.

यश आम्हालाही हवं
आयपीएलच्या यशानं बाकी क्रिकेट मंडळांचे डोळे चकाकले. प्रत्येकाला तशीच लीग चालू करायची स्वप्न पडू लागली. ऑस्ट्रेलियानं "बिग बॅश' लीग सुरू करून चांगल्या स्तरावर नेली. कॅरेबियन प्रीमिअर लीग बऱ्यापैकी स्थिरावली आहे. दक्षिण आफ्रिकन क्रिकेट बोर्ड लीग सुरू करायची धडपड करत आहे. श्रीलंकन लीग सपशेल आपटली. पाकिस्तान प्रीमिअर लीग धक्के खातखात प्रवास करत आहे.
या घडामोडीत अफगाणिस्तान प्रीमिअर लीग सुरू झाली, तशीच लीग कॅनडातही सुरू झाली. प्रत्येक क्रिकेट नियामक मंडळाला स्वत:ची लीग सुरू करून ती यशस्वी करून दाखवायची खुमखुमी आहे. प्रत्येकाला वेगळी चूल मांडायची हौस आहे. अडचण इतकीच आहे, की सगळ्यांनी टी-20 लीग चालू केली, तर दोन देशातील कसोटी किंवा एकदिवसीय सामने खेळायला वेळ मिळणार कधी?

प्रसार आणि तोटा
टी-20 लीग सुरू होण्याचा सर्वांत मोठा फायदा आहे क्रिकेटचा प्रसार होण्याचा. कोणत्याही देशात क्रिकेट सुरू व्हायला किंवा आहे ते सुरू राहायला टी-20 क्रिकेटवाचून पर्याय राहिलेला नाही. अफगाणिस्तानचा संघ कसोटी क्रिकेटपर्यंत पोचला ते केवळ झटपट क्रिकेट वाढत राहिलं म्हणून. अजूनही 50 षटकांचे सामने खेळताना बिचकणारा आणि कसोटी क्रिकेट खेळताना गोंधळणारा अफगाणिस्तानचा संघ टी-20 क्रिकेट जोमानं खांद्याला खांदा लावून विश्वासानं खेळतो.

तोट्याची बाजू मांडायची झाली, तर वेस्ट इंडीजचं उदाहरण द्यावं लागेल. एकीकडं ख्रिस गेल, केरॉन पोलार्ड, आंद्रे रसेल, सुनील नरीन यांच्यासारखे खेळाडू जगभरातले टी-20 लीगचे मुख्य खेळाडू असतात, तर दुसरीकडं त्याच वेस्ट इंडीज संघाला सलग दोन कसोटी सामन्यांत तीन दिवसांपेक्षा जास्त काळ तग धरता येत नाही. वेस्ट इंडीजमधल्या क्रिकेट प्रेमाला ओहोटी लागली आहेच, वर ज्यांना क्रिकेट खेळायचं आहे त्यांना फक्त टी-20 खेळण्यात रस राहिला आहे. वेस हॉल, अँडी रॉबर्टस्‌, ज्योएल गार्नर, मायकेल होल्डिंग आणि माल्कम मार्शलसारख्या कर्दनकाळ भासणाऱ्या वेगवान गोलंदाजांचा वारसा असलेल्या वेस्ट इंडीज क्रिकेटमधल्या तरुण गोलंदाजांना चार षटकांपेक्षा जास्त गोलंदाजी करण्यात अजिबात रस नाहीये. कष्टाची परिसीमा गाठण्यात बऱ्याच तरुण खेळाडूंना रस आहे का नाही याची शंका यायला लागली आहे. खेळाडूंच्या अर्थकारणाची बाजू मजबूत करण्यात टी-20क्रिकेटचा मोठा हातभार आहे, हे मात्र नाकारून चालणार नाही.

नव्या क्रिकेट प्रकारात आता प्रत्येक संघाकरता 100 चेंडूंचा सामना खेळवायचा इंग्लंड बोर्डाचा पक्का विचार आहे. हे कमी झालं म्हणून काय, दुबईत टी-10 सामन्यांची लीग सुरू झाली आहे. म्हणजे फक्त 10 षटकांचे सामने. ""टी-10 लीगमध्ये गोलंदाजांना मार खायचे पैसे मिळतात. प्रत्येक सामना म्हणजे टीव्हीवरचे हायलाइट्‌स बघत असल्याचा भास होतो,'' टी-10 लीगमध्ये प्रशिक्षकाची भूमिका पार पाडणारा वसीम अक्रम याची दुबईत भेट झाली, तेव्हा त्यानं हे मत व्यक्त केलं. खेळाडूंबरोबरीनं प्रशिक्षक या नात्यानं सहभागी होणाऱ्या माजी खेळाडूंना संयोजक चांगला मोबदला देतात म्हणून माजी खेळाडू तोंड फाटेपर्यंत स्तुती करायला मागंपुढं बघत नाहीत. क्रिकेटला या सगळ्याचा धक्का लागणार आहे, हे दिसत असलं तरी घसरण थांबवणं कोणाला शक्‍य होईल, असं वाटत नाही.

खरा धोका सट्टेबाजांचा
आयपीएलचे नियम कठोर असूनही सट्टेबाजांनी शिरकाव केलाच. निर्बंध आणि जाचक नजर असूनही काही खेळाडूंना चुकीची पावलं उचलण्याची अवदसा आठवली. सट्टेबाजांनी कच्चे दुवे हेरून त्याचा वापर करत गैरकृत्यं करायचा मार्ग शोधला. ही जर आयपीएलची अवस्था असेल, तर बाकीच्या लीगचं काय होणार याचा विचार केलेला बरा.

आयसीसीला नव्यानं सुरू होणाऱ्या अनधिकृत लीगचा धोका जाणवू लागला आहे. गैरकारभारांना मोकळं रान मिळायची दाट शक्‍यता आयसीसी अँटी-करप्शन विंगचे अधिकारी इयान मार्शल यांनी व्यक्त केली. ""टी-20 आणि आता येऊ बघणारं टी-10 क्रिकेटचं वादळ सट्टेबाजांकरता पर्वणी ठरणार आहे. एकीकडं खेळाचा प्रसार होण्याकरता टी-20 क्रिकेटचा मोठा हातभार आहे. दुसऱ्या बाजूला याच लीग स्पर्धांमधून सट्टेबाजांना मोठी संधी मिळणार आहे,'' असं ते सांगत होते.
या बाबतची काळजी व्यक्त करताना मार्शल म्हणाले ः ""सट्टेबाजांकरता आणि गैरकृत्यं करायला धजावणाऱ्या लोकांकरता टी-20 क्रिकेट योग्य पाया ठरतो. पैसा गुंतवून ते संघ मालकीकरता बोली लावू शकतात. एकदा का आत शिरायची संधी मिळाली, की त्याचा गैरवापर करायची हिंमत त्यांच्यात असतेच. इतकंच काय, काही टी-20 लीग त्याकरताच चालू केल्या आहेत, असं स्पष्ट दिसतं.''

""गैरकृत्यं करू बघणारे लोक थेट कर्णधाराला पकडणार आणि आपल्या बाजूला करायचा प्रयत्न करणार. गेल्या वर्षात पाच कर्णधारांना सट्टेबाज जाऊन भेटले आहेत, ही धोक्‍याची बाब आहे. कर्णधार गोलंदाजीतले बदल करतो, तसंच फलंदाजीचा क्रम ठरवतो. हे लक्षात घेता सट्टेबाजांकरता कर्णदार महत्त्वाचा माणूस ठरला नाही, तरच नवल मानावं लागेल,'' मार्शल यांनी धोका व्यक्त करताना सांगितलं.

आयसीसीची अत्यंत महत्त्वाची बैठक याच आठवड्यात झाली. नव्यानं सुरू होणाऱ्या लीग स्पर्धांची छाननी करून मगच त्यांना अधिकृत परवानगी देण्याकरता काही नियम आयसीसी करणार आहे. मुख्य संयोजक कोण आहेत आणि त्यांची पार्श्वभूमी काय आहे, संघांची बांधणी कशी केली जाणार आहे, संघांची मालकी घेऊ बघणाऱ्या लोकांचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे आदींची तपासणी आयसीसी करणार आहे.
क्रिकेटचा प्रसार तर व्हायलाच हवा आणि त्याकरता टी-20 लीगचा आधार घ्यावा लागणार. फक्त असं करत असताना सट्टेबाजांकरता मोकळं रान मिळणार नाही ना, याची खातरजमा करून घेणं मोलाचं ठरणार आहे. त्याचबरोबर वेस्ट इंडीजसारख्या संघांना कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेट खेळायला उत्सुक असणारे खेळाडू सातत्यानं कसे मिळत राहतील, ही समस्या सोडवणंही गरजेचं आहे. समस्येवर योग्य वेळी उपाय शोधले नाहीत, तर गणपती मिरवणुकीत काही मंडळांकरता बाहेरची पथकं सुपारी घेऊन ढोल बडवून निघून जातात, तसा प्रकार क्रिकेटमध्ये दिसायला लागेल. खेळत असलेल्या संघांशी काहीही भावनिक नातं नसणारे खेळाडू फक्त पैसा कमावण्याचा सोपा आणि त्या मानानं कमी कष्टाचा उपाय म्हणून टी-20 आणि टी-10 लीगमध्ये सहभागी होतील.

अनधिकृत टी-20 आणि टी-10 लीग स्पर्धांमधून क्रिकेटला लागू बघणारी सट्टेबाजीची कीड मुळातून काढायला आयसीसीला कठोर उपाययोजना आणि त्याची अंमलबजावणी करायला लागणार आहे. फक्त पैसा कमावण्याचं साधन म्हणून माजी खेळाडू प्रशिक्षक किंवा समालोचकाच्या भूमिकेत किंवा आजी खेळाडू प्रत्यक्ष खेळण्याच्या उद्देशानं, चुकीच्या लोकांनी चालू केलेल्या लीग स्पर्धांत सहभागी होणार असतील, तर आयसीसीला त्यांना वेळेवर जागं करायचं कडू काम करावं लागणार आहे.

परत एकदा सांगतो, की हा लेख लिहिण्यामागची तळमळ समजून घ्यायची असेल, तर https://www.youtube.com/watch?v=9xTEf5TJrMc ही लिंक जरूर बघा!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunandan lele write article in saptarang