खरा चाहता कसा असतो? (सुनंदन लेले)

sunandan lele write article in saptarang
sunandan lele write article in saptarang

क्रिकेटवर टीका करताना अनेकांचा तोल ढळतो. सकारात्मक टीका करायला हरकत नाही; पण ती चुकीच्या दिशेनं जाणं योग्य नाही. बीबीसीला पाठवलेल्या एका ई-मेलमध्ये पॅट्रिक टेलर यानं त्याच्या वडिलांची कहाणी सांगितली. खरा चाहता कसा असतो, हे त्या सकारात्मक कहाणीतून समजलं. भारतात एकीकडं क्रीडासंस्कृती वेगवेगळ्या प्रकारे फुलत असताना चाहत्यांनीही तिला खतपाणी घालायला हवं, मुलांना खेळाचा आनंद घेण्याविषयी समजावून सांगायला हवं...

प्रसंग होता नॉटिंगहॅमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावरचा. तिसऱ्या कसोटीच्या वार्तांकनाकरता मी मैदानावर पोचलो असताना भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजीचे प्रशिक्षक भारत अरुण आणि कर्णधार विराट कोहली वेगवान गोलंदाजांना एकत्र घेऊन काहीतरी गंभीर चर्चा करताना दिसले. न राहवून मी त्यांचा फोटो काढला आणि फेसबुकवर पोस्ट केला. संध्याकाळपर्यंत काही वाचकांनी तो फोटो बघून प्रतिक्रिया नोंदवल्या होत्या. बहुतांशी पराकोटीच्या नकारात्मक प्रतिक्रिया आणि काही मोजक्‍या आशा व्यक्त करणाऱ्या सकारात्मक पोस्ट वाचून मनात विचार आला की, खरा चाहता असतो तरी कसा?

सगळ्यांचे डोळे पाणावले
ब्रिटनमध्ये बरेच लोक अजूनही खूप आवडीने क्रिकेट सामन्याचं समालोचन रेडिओवर ऐकणं पसंत करतात. बीबीसी दर्जेदार कॉमेंटेटर्सना संघात घेऊन गेली असंख्य वर्षं मोठ्या आवडीनं क्रिकेट सामन्यांचं वार्तांकन करत आली आहे. कसोटी सामन्याच्या बीबीसीवरच्या कॉमेंटरीला "टीएमएस' म्हणतात- म्हणजे "टेस्ट मॅच स्पेशल.' "टीएमएस'ची एक फार सुंदर पद्धत आहे, की ते ऐकणाऱ्यांना सामावून घेतात. रेडिओवर कॉमेंटरी ऐकणारे चाहते बीबीसीच्या लोकांना ई-मेल लिहून आपापली मतं नोंदवत असतात.

नॉटिंगहॅम कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीचा खेळ चालू असताना पॅट्रिक टेलर नावाच्या श्रोत्यानं एक ई-मेल पाठवला- ज्यामुळं सगळे हळवे झाले. पॅट्रिकच्या ई-मेलमधला मजकूर मोलाचा आहे. तो ई-मेलमध्ये म्हणतो ः "माझे वडील जॉन टेलर जीवनाशी झुंज देत 83 वयाला पोचले. दोन मुलांचा पिता असलेले जॉन वयाच्या पन्नाशीपर्यंत औषधांच्या क्षेत्रात काम करत खेळावर प्रेम करत जगले. निवृत्तीनंतर त्यांचा विचार मैदानावरचे काळे ढग जाऊन फलंदाज मनमोकळी फटकेबाजी करतो तसं बेधुंद जगण्याचा होता. अचानक दैवानं त्यांच्या अंगावर "ल्युकेमिया' म्हणजेच कर्करोगाचा "बीमर' टाकला. पाठोपाठ स्नायूंमधली ताकद जाण्याचा "यॉर्कर', हालचालींवरचं नियंत्रण जाणारा पार्किन्सन आजाराचा "गुगली', मधुमेहाचा "रिव्हर्स स्विंग' आणि शेवटी स्मृतिभ्रंशाचा "बाउन्सर' टाकला. जातिवंत खेळाडूप्रमाणं जॉनने कधी तक्रार केली नाही, की कुरबुर. समोर आलेल्या परिस्थितीला तो धीरानं सामोरा गेला... जीवनाच्या रसाचा प्रत्येक थेंब त्यानं चांगलं जगून आनंद घेत चाखला. पट्टीचा फलंदाज एक एक धाव काढत धावफलक पुढं सरकावत राहतो तसा तो खेळत राहिला.
"वयाच्या 83व्या वर्षी आयुष्यानं जॉनला अगदी न खेळता येणारा चेंडू टाकला. मी हे सगळं "टीएमएस'ला ई-मेल करून लिहितो आहे- कारण बीबीसीवर रेडिओ कॉमेंटरी ऐकत क्रिकेटचा आनंद घेणं हे आमच्या घराण्याकरता श्वास घेण्याइतकंच सहजी आहे. एकदम लहान असताना झोपल्याचं नाटक करून चादरीच्या आत ऑस्ट्रेलियात चालू असलेल्या ऍशेस मालिकेची कॉमेंटरी मी ऐकायचो. जॉन येऊन मला झापडायचा आणि रेडिओ काढून घेताना, "अरे उद्या शाळा आहे ना सकाळी,' असं दटावायचा.

"माझे आजोबा अंध होते. त्यांच्याकरता तर "बीबीसी टीएमएस'वर क्रिकेट कॉमेंटरी ऐकणं हेच जीवन होतं. गुरुवारी जॉनला म्हणजेच माझ्या वडिलांना हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं, इतकी त्यांची प्रकृती खालावली. जॉन बेशुद्धावस्थेत असल्यानं शुक्रवारी डॉक्‍टरांनी सांगितलं, की जॉनकडं शेवटचे 24 ते 48 तास आहेत. जॉन परत शुद्धीत येणारच नाही, असंही डॉक्‍टरांनी शक्‍यता म्हणून सांगून ठेवलं. शनिवारी मी माझ्या पत्नीसह हॉस्पिटलमधे गेलो असताना पत्नीनं माझ्या मोबाईल फोनवर बीबीसी रेडिओ कॉमेंटरीचं ऍप लोड करायची कल्पना मांडली. आम्ही तसं करून मोबाईलवर रेडिओ कॉमेंटरी चालू केली. आश्‍चर्याचा धक्का म्हणजे जॉनला पाच मिनिटात शुद्ध आली. जॉननं डोळे उघडून नजरेनं आमच्याशी संवाद साधला. जॉननं आपण शांत समाधानी असल्याचं आम्हाला सांगितलं. मी त्यांना "तुम्ही मस्त वडील कसे आहात,' हे सांगितलं. नंतर जॉननं "बोलणं बंद करून आपण रेडिओवर क्रिकेट सामन्याची कॉमेंटरी ऐकूयात का,' अशी विचारणा केली.

"आम्ही 15 मिनिटं शांतपणे कॉमेंटरी ऐकत ख्रिस वोकसनं लॉर्डस मैदानावर सादर केलेल्या भन्नाट शतकाचा आनंद घेतला. दुसऱ्या दिवशी इंग्लंडनं लॉर्डस कसोटी सामना जिंकल्याचा आनंद कॉमेंटरी ऐकत घेतल्यावर जॉनची प्राणज्योत मालवली, हा मला अजिबात योगायोग वाटत नाही...'

रेडिओ कॉमेंटरी चालू असताना जोनाथन ऍगन्यूनं पॅट्रिकचा ई-मेल सविस्तर वाचून दाखवला आणि कॉमेंटरी बॉक्‍समध्ये हजर असलेल्या सगळ्यांचे आणि ऐकणाऱ्यांचे डोळे पाणावले. मला पॅट्रिक आणि जॉनसारख्या पिता-पुत्रांच्या खेळ प्रेमाची कहाणी ऐकून भारावून जायला होतं. खरे चाहते आपल्या छंदावर कसं प्रेम करतात हे बघायला मिळतं.

टीका आणि निंदा यातला फरक
आपण भारतीय खेळ आणि खेळाडूंवर प्रेम करतो, हे मान्य आहे. त्याच प्रेमापायी साहजिकच अपेक्षा वाढत जातात. भारतीय संघ किंवा खेळाडूंनी यश संपादन केलं, की आनंदाला उधाण येतं. कौतुकाचे पाट वाहतात; पण अपयश येतं, तेव्हा काही जण टीका करतात आणि काही जण चक्क निंदानालस्ती करतात. माध्यमं असोत, वा खेळप्रेमी चाहते असोत, टीका करायचा हक्क प्रत्येकाला आहे, असं मला वाटतं. टीका धोरणात्मक किंवा मुद्देसूद, सकारात्मक असेल, तर तिच्यावर चर्चा होते. मग तिला कितीही धार असली, तरी कोणी त्यावर आक्षेप घेत नाही. मात्र, टिकेची जागा निंदानालस्तीनं घेतली, तर मात्र मनाला पटत नाही.

"लायकीच नाहीये आपल्या खेळाडूंची', "नुसते पैशाच्या मागे लागलेत...यांना खेळाशी काही घेणंदेणं नाही', "देशाकरता खेळायचा अभिमानच नाहीये आजच्या पिढीतल्या खेळाडूंना', "लाडावून ठेवलेत नुसते...विमानानं नाही बैलगाडीने आणा यांना परदेशातून', ""इतके दिवस खेळत आले आहेत... सर्व सोयी आहेत तरी "स्विंग बोलिंग' का नाही खेळता येत यांना...' आणि सर्वात घातक प्रतिक्रिया म्हणजे... "मला माहीत आहे...सर्व मॅचेस फिक्‍स्ड असतात!'
मला बऱ्याच वेळा वर नमूद केलेल्या वाक्‍यांना सामोरं जायला लागतं. क्रिकेट संघ खराब कामगिरी करून पराभूत झाला, तर हे निंदा करणारे लोक म्हणतात ः "लायकी नाही आपल्या संघाची...' आणि जर चांगला विजय मिळवला तर म्हणतात ः "सर्व फिक्‍स्ड आहे ना?' मला समजतच नाही- उत्तर काय द्यायचं?
"आडात असतं, तेच पोहऱ्यात येतं,' ही म्हण आपल्या सगळ्यांना माहीत आहे. इथं ती मांडायचा उद्देश इतकाच आहे, की आपण सगळ्यांनी आपापल्या परीनं खेळसंस्कृती भारतात वाढवायला, रुजवायला योगदान द्यायला हवं. लहान मुलं पालकांचं अनुकरण करतात, असं म्हटलं जातं. आपण जर सामने बघताना किंवा त्याच्याविषयी बोलताना सतत नकारात्मक बोलत राहिलो, तर सोबत बसणाऱ्या मुलांवर त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. त्याचबरोबर आपण खेळसंस्कृती लक्षात ठेवून "खिलाडू वृत्ती म्हणजे काय असतं', "खेळात हार-जीत म्हणजे काय असतं', "कित्येक वेळा जीवापाड प्रयत्न करूनही खेळात अपयश येतं- ते पचवायला काय विचार करायला पाहिजेत' हे शिकवण्याची जबाबदारी पालक म्हणून आपली आहे.

सुंदर पहाट येते आहे
मला वाटतं, की भारतीय खेळजगतात एक सुंदर पहाट नव्यानं येत आहे. एशियन गेम्समध्ये सोळा वर्षांचा शेतकऱ्याचा मुलगा सौरभ चौधरी नेमबाजी खेळात सुवर्णपदक पटकावतो आहे. हीमा दाससारखी साध्या कुटुंबातून आलेली मुलगी जागतिक स्तरावरच्या स्पर्धेत पळण्याची शर्यत जिंकते आहे. सुनील गावसकर 1987 मध्ये निवृत्त झाले आणि 1989 मध्ये सचिन तेंडुलकरचा उदय झाला. सचिन निवृत्त झाला आणि आता आपण विराट कोहलीचा उदय अनुभवतो आहोत. हीच वेळ आहे आपल्या खेळाडूंना पाठिंबा देण्याची. खेळाची संस्कृती भारतात रुजवण्याची.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com