नकळत सारे घडते (सुनंदन लेले)

sunandan lele
sunandan lele

चुकीचं कृत्य कुणाच्याही हातून घडू शकतं. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड द्यावे लागले. लान्स आर्मस्ट्रॉंगनं जिंकण्याकरता वाट्टेल ते करायच्या नादात कमावलेलं नाव गैरकृत्यानं मातीत मिसळून टाकलं. "माझ्या हातून चूक घडणारच नाही,' असा फाजील आत्मविश्‍वास बाळगण्याचे दिवस आता मागं सरले आहेत. चुकीच्या कृतींपासून सगळ्यांनीच जाणीवपूर्वक मागं फिरायला हवं. "मी चुकीच्या मार्गावर जाणार नाही. मी गैरकारभार, दुष्कृत्य करणार नाही,' असं रोज बजावण्याची वेळ आली आहे.

"सुनंदन, तुम्ही आमचा "कॉफी विथ करण' बघितलात की नाही?''... भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान एकदिवसीय सामन्यांकरता आलेला हार्दिक पंड्या सिडनीला भेटला होता, तेव्हा त्यानं मला विचारलं होतं. ""नाही रे...तो शो मी फार आवडीनं नाही बघत,'' मी हार्दिकला म्हणालो.
""अरे, असं कसं? खूप मजा केलीय मी- नक्की बघा...फू ल टू धमाल...'' हार्दिक म्हणाला.
""बरं, तू म्हणतो आहेस तर नक्की बघीन,'' मी उथळ आश्‍वासन दिलं.
कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ आली. दुसऱ्या दिवशी त्याच शोवरून गदारोळ झाला. हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुलला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं नुसतं खडसावलं नाही, तर मायदेशात परत बोलावून घेतलं.
हार्दिक पंड्या जरा जास्तच बिनधास्त बोलणारा आहे. गेल्या वर्षी विक्रम साठ्येसोबत "व्हॉट द डक' नावाची वेब सिरीज करताना शोदरम्यान हार्दिक तसंच काहीतरी आचरटपणे बोलला होता. आम्ही सगळे हसलोही होतो; पण एडिटिंगदरम्यान आम्ही ते बोलणं कापलं होतं. शो प्रसिद्ध झाल्यावर हार्दिकनं मला ""तो शॉट का कापलात? मला काही चुकीचं वाटलं नाही तसं बोलताना...जे सत्य होतं तेच बोललो होतो मी,'' असं हार्दिक म्हणाला होता.
""सोड रे...आम्हालाच बरोबर वाटलं नाही ते नंतर ऐकताना. उगाच चांगल्या शोचा विचका एक-दोन वाक्‍यांवरून व्हायला नको, म्हणून आम्ही कापलं ते बोलणं...'' हार्दिकला समजावून सांगताना आम्ही म्हणालो होतो.

ज्यांनी कोणी हार्दिक आणि लोकेश राहुलचा "कॉफी विथ करण'चा नेमका तो भाग बघितला असेल, त्यांना मी काय म्हणतो आहे हे समजेल. माझं कुटुंब कसं सगळ्या गोष्टींवर मोकळेपणानं बोलतं हे सांगताना हार्दिकनं काही बॉंब फोडले होते. हार्दिकचं बोलणं सभ्यतेला धरून नव्हतं. "सुक्‍याबरोबर ओलं जळतं' या म्हणीप्रमाणं जास्त बकबक न करताही लोकेश राहुलला मायदेशात परतण्याचा फटका बसला होता. भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करत असलेल्या एका तरुण खेळाडूनं अशा वल्गना टीव्ही कार्यक्रमात करणं उचित नव्हतं. बोलताना ज्या गोष्टी हार्दिक पंड्याला बेधडक वाटल्या, त्यांनी त्याचा घात केला. दौरा चालू असताना मायदेशात परत फिरण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली. हा किस्सा सांगताना विचारांती माझ्या इतकंच लक्षात आलं, की बेधडक विचार मांडणं कितीही चांगलं असलं, तरी प्रकाशझोतात असलेल्या व्यक्तीनं आणि खासकरून खेळाच्या क्षेत्रात आणि भारतीय संघातून खेळत असलेल्या खेळाडूनं बोलताना- वागताना तारतम्य बाळगणं गरजेचं असतं, हे नाकारून चालणार नाही.

"मी चूक केली'
गेल्या वर्षी मार्च महिन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका कसोटी सामना चालू असताना ऑसी खेळाडू बॅनक्रॉफ्ट चेंडू कुरतडताना पकडला गेला. मैदानावर बॅनक्रॉफ्टला पंचांनी त्या कारणावरून विचारणा केली असताना कर्णधार स्टिव्ह स्मिथनं काणाडोळा केल्यासारखं दाखवलं; पण नंतर दिवसाचा खेळ संपल्यावर स्मिथनं चुकीची प्रांजळ कबुली देताना ""संघातल्या एका गटानं ठरवून चेंडू कुरतडण्याचा घाट घातला. आम्ही लज्जास्पद कृत्य केलं आहे,'' असं पत्रकार परिषदेत सांगितलं.
मायदेशात झाल्या कृत्याची अशी काही तिखट प्रतिक्रिया उमटली, की बोलायची सोय नाही. अखेर क्रिकेट ऑस्ट्रेलियाला स्टिव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नरवर एका वर्षाच्या निलंबनाची कारवाई करावी लागली.
एक वर्ष क्रिकेटपासून लांब राहण्याची शिक्षा भोगून स्टिव्ह स्मिथ आयपीएल स्पर्धेद्वारे मोठ्या क्रिकेटमध्ये परतला आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान निलंबनाची शिक्षा भोगत असलेल्या स्टिव्ह स्मिथशी गाठ पडली. सिडनी क्रिकेट मैदानावर सरावाकरता तो आला असताना त्यानं मला भेटायला बोलावलं- कारण झाल्या प्रसंगाआधी, दरम्यान आणि नंतरही सतत संपर्क ठेवण्याचा प्रयत्न मी केला होता.
""ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा कर्णधार या नात्यानं माझ्यावर चांगल्या खेळाबरोबर चांगल्या वर्तणुकीची जबाबदारी होती. सपशेल नापास झालो मी चांगल्या वर्तणुकीच्या बाबतीत. प्रत्यक्ष मी चेंडू कुरतडला नाही, की चेंडू कुरतड असं सांगितलं नाही; पण संघातला एक ज्येष्ठ खेळाडू संघातल्या एका नवख्या खेळाडूला हाताशी धरून चेंडू कुरतडण्याचा घाट घालत होता, याची मला कल्पना होती. ही गोष्ट चुकीची होती. कर्णधार म्हणून मी तिथल्या तिथं असा प्रकार करायचा नाही, असं खडसवायला पाहिजे होतं. मी तसं केलं नाही. तिथंच माझ्या हातून मोठी चूक झाली. मागं वळून बघताना मी असं का केलं, असा प्रश्‍न मला बरेच महिने सतावत होता. मती गुंग होते जणू आपली! कळत असून चूक करायचा मूर्खपणा आपण करतो. मला वाटतं, मी चूक करणारच नाही हा खोटा आत्मविश्‍वास नडतो. आता मी गृहीत धरत नाही...परत अशी चूक करायची नाही असं मी रोज स्वत:ला बजावतो,'' स्मिथनं मला झाल्या गोष्टीची कबुली देताना सांगितलं होतं.

जिंकण्याकरता काही पण
माजी अमेरिकन सायकलपटू लान्स आर्मस्ट्रॉंगनं प्रथम जगातली सर्वांत मानाची आणि कठीण टूर द फ्रान्स सायकल शर्यत जिंकली. नंतर त्याला कॅन्सर रोगानं पछाडले. लान्स आर्मस्ट्रॉंगनं प्रथम कॅन्सर रोगाची लढाई धैर्यानं जिंकली. नंतर सायकलिंगच्या क्षेत्रात अविश्‍वसनीय पुनरागमन करताना परत बऱ्याच वेळा टूर द फ्रान्स जिंकण्याचा पराक्रम करून दाखवला. तो जगातल्या खेळाडूंचा लाडका झाला; परंतु त्याच लान्स आर्मस्ट्रॉंगनं कामगिरी सुधारण्याकरता उत्तेजक द्रव्य घेतल्याचं निदर्शनास आलं. बराच काळ तो आरोपांचं खंडन करत राहिला; पण अखेर त्याला केलेल्या दुष्कृत्याची कबुली द्यावी लागली. ज्येष्ठ टीव्ही मुलाखतकार ओप्रा विनफ्रेच्या कार्यक्रमात लान्स आर्मस्ट्रॉंग बोलला, तेव्हा स्वत: ओप्रा ऐकून खलास झाली होती. ""का केलंस तू असं?'' असा प्रश्‍न तिनं विचारला होता. ""जिंकण्याकरता...'' अत्यंत शांतपणे लान्स म्हणाला. जिंकण्याकरता खेळाडू काहीही करू शकतात इतकं ते कटू सत्य आर्मस्ट्रॉंगनं मांडलं.

अवदसा आठवली
शेवटचा किस्सा माझ्या एका मित्राचा आहे. तो मोठ्या वर्तमानपत्रात उत्तम काम करत होता. भारतभरात मिळून त्याच्या हाताखाली साठ-सत्तर लोक काम करत होते. त्याला अजाणता उचलेगिरीचा रोग होता. एकदा तो एका विमानतळावर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या नेहमीच्या तपासणीतून जात होता. विमानतळावर तपासणी करताना खिशातल्या सर्व वस्तू काढून ठेवायला सांगतात. तशा त्यानं आणि त्याच्या पुढं उभ्या असलेल्या माणसानं काढून ठेवल्या होत्या. सुरक्षा तपासणी झाल्यावर रांगेतला पुढचा माणूस खिशातून ट्रेमध्ये काढून ठेवलेलं पाकीट घेऊन जायला विसरला. यानं नेमकं ते पाकीट उचललेलं नाही बघून स्वत: घेतलं. थोड्या वेळाने त्या माणसाच्या ती गोष्ट लक्षात आली आणि तो सुरक्षा कर्मचाऱ्यांकडं विचारणा करायला आला. नेमकं कोणी त्या माणसाचं पाकीट उचललं हे कळावं म्हणून सीसीटीव्ही कॅमेऱ्यातलं चित्रीकरण तपासलं असता नेमकं या व्यक्तीनं उचलून नेल्याचं लक्षात आलं. त्याला विमानतळावर शोधून पकडण्यात आले. त्यानं लगेच ते पाकीट देऊनही टाकलं. ना पोलिस केस झाली ना बाकी काही; पण झाला प्रकार विमानतळावरच्या माणसांनी बघितला. त्यात काही नेमके त्याच वर्तमानपत्राचे कर्मचारी होते. झालं! ती बातमी कानोकानी पसरली आणि छोट्याशा चुकीनं त्या मित्राला मोठ्या हुद्‌द्‌याची आणि लठ्ठ पगाराची नोकरी सोडावी लागली.

नेमकी काय आजच्या लेखातून मला इतकाच मुद्दा मांडायचा आहे, की जुनी जाणती माणसं म्हणायची बघा ः "शनीचा फेरा चालू असतो, तेव्हा हातातून नकळत भयानक चुकीच्या गोष्टी घडून जातात ज्याचा नंतर पश्‍चात्ताप होतो.' माझा राशिभविष्यावर विश्‍वास नाही; पण "अवदसा आठवते' म्हणतात तसा हा प्रकार. खेळाडू काय, सेलिब्रिटी काय आणि आपल्यासारखी साधी माणसं काय सगळ्यांच्या जीवनात असे प्रसंग घडतात. जागरूक राहून त्या चुकीच्या कृत्यापासून लांब राहायला प्रयत्न करावे लागतात. हार्दिक पंड्यानं उत्साहाच्या भरात आणि जरा चमकोगिरी करायच्या नादात वाट्टेल ते भाष्य टीव्ही शोदरम्यान केले. त्याचा मोठा भुर्दंड त्याला भरावा लागणार आहे. स्टीव्ह स्मिथनं गुन्ह्यात सहभागी न होता नुसती मूक संमती दिली आणि त्याला निंदा नालस्तीला तोंड द्यावे लागले. लान्स आर्मस्ट्रॉंगनं जिंकण्याकरता वाट्टेल ते करायच्या नादात कमावलेलं नाव गैरकृत्यानं मातीत मिसळून टाकलं.
विचार करा, तुम्हाला नाही वाटत का, की "माझ्या हातून चूक घडणारच नाही,' असा फाजील आत्मविश्‍वास बाळगण्याचे दिवस मागं सरले आहेत. कबुतराला दाणे टाकतात, तसं कलियुगात प्रत्येक पावलावर आपल्याला गैरकृत्याची भूल पडायची शक्‍यता निर्माण झाली आहे. "मी चुकीच्या मार्गावर जाणार नाही. मी गैरकारभार, दुष्कृत्य करणार नाही,' असं रोज स्वत:ला बजावण्याची वेळ आली आहे. वाममार्गापासून लांब राहण्यासाठी खबरदार राहणं, हेच आपल्या हिताचं आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com