दबावाचा खेळ (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 3 मार्च 2019

अतिरेक्‍यांना मोकळं रान करून देण्याची समस्या इतकी उघड असताना पाकिस्तानचं सरकार आणि लष्कर सातत्यानं "तो मी नव्हेच' म्हणण्याची दिशाभूल करण्यात धन्यता मानत आली आहे. त्याचा परिणाम असा, की मोठ्या जागतिक स्पर्धांचा अपवाद वगळता भारत-पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेटला पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. पाकिस्तान सरकार काहीही म्हणो- स्थानिक परिस्थिती काय आहे हे जग जाणून आहे. परिणामी भारताचाच काय, कोणत्याही देशाचा क्रिकेट संघ पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळायला एकही पाऊल पुढं टाकताना दिसत नाही.

अतिरेक्‍यांना मोकळं रान करून देण्याची समस्या इतकी उघड असताना पाकिस्तानचं सरकार आणि लष्कर सातत्यानं "तो मी नव्हेच' म्हणण्याची दिशाभूल करण्यात धन्यता मानत आली आहे. त्याचा परिणाम असा, की मोठ्या जागतिक स्पर्धांचा अपवाद वगळता भारत-पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेटला पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. पाकिस्तान सरकार काहीही म्हणो- स्थानिक परिस्थिती काय आहे हे जग जाणून आहे. परिणामी भारताचाच काय, कोणत्याही देशाचा क्रिकेट संघ पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळायला एकही पाऊल पुढं टाकताना दिसत नाही.

ही गोष्ट आहे सन 2008 मधली. तेव्हा आशिया करंडक स्पर्धेचं वार्तांकन करायला मी पाकिस्तानला गेलो होतो. सर्व सामने कराची शहरात असल्यानं एकाच जागी तीन आठवडे मुक्काम होता. सन 2004 आणि 2006 मध्येही मी पाकिस्तानचा प्रदीर्घ दौरा केला होता. गेल्या दोन भेटींच्या तुलनेत कराची शहरात मला जास्त सुरक्षा कर्मचारी दिसत होते. ""सुरक्षा कर्मचारी कसले म्हणतोस... लष्कराचे सैनिक आहेत हे तैनात केलेले,'' असं मला माझा स्थानिक पत्रकार मित्र म्हणाला. दर पन्नास मीटरनंतर एक मोठी अत्याधुनिक बंदूक हाती असलेला जवान बघून मला विचित्र वाटलं. ""घाबरू नकोस रे. ते आपल्याच "सुरक्षे'करता आहेत,'' पत्रकार मित्रानं मला भरवसा दिला. ""इतके सैनिक साध्या रस्त्यावर बघताना मला बरोबर वाटत नाहीये... इतके सैनिक नेमले आहेत ते सुरक्षेची काही काळजी आहे म्हणूनच ना,'' मी अजाणतेपणी बोलून गेलो. माझा पत्रकार मित्र निरुत्तर होता. पाकिस्तानमधली सुरक्षेची ढासळती परिस्थिती तीन दौऱ्यांत मला दिसत होती. एकीकडं श्रीलंकेतल्या समस्या दूर झाल्यानं नांदत असलेली शांतता मी बघून आलो असताना पाकिस्तानमध्ये समस्या गंभीर रूप धारण करताना बघायला मिळाली होती. आज या घटनेला दहा वर्षं लोटून गेली.
सन 2008च्या दौऱ्यानंतर भारत-पाकिस्तानमधले राजनैतिक संबंध रसातळाला जाताना दिसले. अतिरेक्‍यांना मोकळं रान करून देण्याची समस्या इतकी उघड असताना पाकिस्तानचं सरकार आणि लष्कर सातत्यानं "तो मी नव्हेच' म्हणण्याची दिशाभूल करण्यात धन्यता मानत आली आहे. त्याचा परिणाम असा, की मोठ्या जागतिक स्पर्धांचा अपवाद वगळता भारत-पाकिस्तान दरम्यानच्या क्रिकेटला पूर्णविराम मिळाल्यात जमा आहे. पाकिस्तान सरकार काहीही म्हणो- स्थानिक परिस्थिती काय आहे हे जग जाणून आहे. परिणामी भारताचाच काय, कोणत्याही देशाचा क्रिकेट संघ पाकिस्तानात जाऊन क्रिकेट खेळायला एकही पाऊल पुढं टाकताना दिसत नाही.

अतिरेक्‍यांनी भारतीय सेनेच्या ताफ्यावर योजनाबद्ध हल्ला पुलवामा गावात केला ज्यात 40पेक्षा जास्त भारतीय जवानांना हकनाक शहीद व्हावे लागले. दोन महिन्यांवर विश्‍वकरंडक स्पर्धा आणि अडीच महिन्यांवर भारत- पाकिस्तान लढत येऊन ठेपली असल्यानं प्रसारमाध्यमांनी रोख क्रिकेटवर ठेवला. भारतानं पाकिस्तानविरुद्ध विश्‍वकरंडक स्पर्धेत खेळावं का नाही, यावर चर्चा घडवल्या गेल्या. भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं पाकिस्तानी संघालाच या स्पर्धेतून काढून टाकण्याकरता इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलकडं दबाव टाकायला हवा, अशी मागणी होत आहे. सुजाण वाचकांना मला इतकंच नम्रपणे सांगायचं आहे, की भारत-पाकिस्तान संबंधात "खेळ' एक अत्यंत छोटं प्यादं आहे. समस्या इतकी गंभीर आहे, की ती अनेक आघाड्यांवर लढली पाहिजे.

सन 2004 मध्ये मी पाकिस्तान दौऱ्यावर पहिल्यांदा गेलो होतो, तेव्हा अगदी खरं सांगायचं, तर पेशावर शहरात माझी थोडी घबराट झाली होती. पेशावर शहरातल्या रस्त्यांवर नेहमीच्या कामाकरता फिरत जाणाऱ्या बऱ्याच पठाणांच्या हाती मला कोणतं ना कोणतं शस्त्र दिसलं होतं. थोड्या डोंगराळ भागात फिरायला गेलो असताना अचानक गोळीबाराचे आवाज ऐकू आले होते. मला घाबरायला झालं. स्थानिक पत्रकार म्हणाले ः ""काळजीचं कारण नाही रे...पेशावरला पठाण लोक पाहुण्यांचं स्वागत बंदुकीच्या फैरी हवेत झाडून करतात... आपल्याला त्रास नसतो त्याचा.'' इतकंच काय, मला स्थानिक पत्रकार मित्रानंच आम्ही राहत असलेल्या गेस्ट हाऊसच्या कोपऱ्यावर तालिबानचं स्थानिक कार्यालय असल्याची पाटीही दाखवली, तेव्हा मी वेडा झालो.
पुढं 2006 मध्ये पेशावरच्या गन मार्केटला मी गेलो, तेव्हा खलास झालो. एक दुकान कलिंगडाचं आणि त्यानंतर एक दुकान शस्त्रास्त्रांचं असं ते मोकळं मार्केट होतं. लोक जितक्‍या सहजपणानं कलिंगड विकत घेत होते, तितक्‍याच सहजपणानं रिव्हॉल्वर किंवा बंदुका घेत होते. आपण पंपावर जाऊन गाडीत पेट्रोल भरावं, तसे स्थानिक लोक दुकानात गेल्यावर सहजपणे बंदुकीत गोळ्या भरून घेताना बघून मी थक्क झालो होतो. देश-विदेशातली अत्याधुनिक शस्त्रं मोकळ्या बाजारात विकली जातात याचा अर्थ मागणी आणि पुरवठा याचं पक्कं जाळं पाकिस्तानात खूप खोलवर विणलं गेलं आहे, हे स्पष्ट बघायला मिळत होतं.

परिस्थिती खालावली
भारतीय संसदेवर सन 2001 मध्ये पाकपुरस्कृत अतिरेक्‍यांनी हल्ला केला. त्यानंतर आग्रा परिषदेतली चर्चा जास्त चांगली झाली नसतानाही तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी 2004 मध्ये भारतीय संघाला पाकिस्तानाचा दौरा करायला परवानगी दिली. सन 2006 मध्ये पाकिस्तानचा संघ भारतात आला आणि भारतीय संघानं पाकिस्तानचा दुसरा दौराही केला. मात्र, 2008 मध्ये कराचीतली अवस्था बघून माझ्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. आशिया करंडक स्पर्धा झाली ऑगस्ट महिन्यात आणि नोव्हेंबर महिन्यात अतिरेक्‍यांनी मुंबईवर हल्ला चढवला. पाकिस्तानचे लष्करी अधिकारी आणि गुप्तचर खातं अतिरेकी तयार करणाऱ्या संस्थांना पाठिंबा देतात, हे एव्हाना उघड झाले होते. मार्च महिन्यात पाकिस्तानी सैन्यानं पाळलेल्या अतिरेकीरूपी सापानं घात केला. पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या श्रीलंकन संघाच्या बसवर अतिरेक्‍यांनी अत्याधुनिक बंदुकांनी हल्ला चढवला. अतिरेक्‍यांनी रॉकेट लॉंचर बसच्या दिशेनं डागलं असताना नेम धरणाऱ्या अतिरेक्‍यांच्या कोपराला धक्का लागला आणि ते भलतीकडं गेलं, असं म्हणतात. मात्र, त्या प्रसंगानंतरही पाकिस्तान सरकारनं चूक कबूल केली नाही आणि त्यानंतर एकाही संघानं पाकिस्तानला जाऊन खेळायचा साधा विचारही केला नाही.

भारतीय खेळाडूंच्या मनात राग
एव्हाना भारतीय खेळाडूंच्या मनात प्रचंड राग धुमसायला लागला होता. पूर्वीच्या भारत- पाकिस्तान खेळाडूंच्यात मैत्रीचे संबंध होते. सन 2008 नंतर त्या संबंधांना ग्रहण लागलं. त्या त्या वेळच्या धोरणामुळं मोठ्या जागतिक स्पर्धांत खेळणं क्रमप्राप्त होते- ते भारतीय खेळाडू करत होते. सन 2017 मध्ये झालेल्या चॅंपिअन्स करंडक स्पर्धेतला एकमेव अपवाद वगळता भारतीय संघानं पाकिस्तानी संघाला सपशेल पराभूत केलं होतं; पण खरं सांगतो मनातली मूळ नाराजी इतकी उत्कट होती, की पाकिस्तानच्या संघाला पराभूत केल्यावर भारतीय संघ एका मर्यादेतच आनंद साजरा करायचा. मनातून कोणाला पाकिस्तानी संघाशी उत्साहानं खेळायचं नसायचं, की खेळाडूंशी दोस्ती करण्यात रस असायचा.

खेळाडू विचारवंत नाहीत
विश्‍वकरंडक स्पर्धेत भारतीय संघानं पाकिस्तानला पराभूत केलं, की लढाई जिंकल्याच्या भावना संपूर्ण भारतात व्यक्त केल्या जातात. मग विचार येतो, की खेळातल्या यश-अपयशावर आपल्या भावना नको तितक्‍या गुंतलेल्या असतात, हे आपण लक्षात घेतो का? मोठ्या स्तरावर भारताचं प्रतिनिधित्व करणारे खेळाडू आपापल्या खेळात प्रावीण्य मिळवण्याकरता इतके झटतात, की अनेकदा त्यांचं शिक्षण अपेक्षेइतकं पूर्ण झालेलं नसतं. मोठ्या स्तरावर चमकण्यासाठी ते बाकीचं सगळं विसरून सरावावर आणि मेहनतीवर इतकं लक्ष केंद्रित करतात, की वाचन, चिंतन, मनन वगैरे गोष्टी करायची त्यांची कुवतच नसते. अर्थातच अनेक खेळाडू किंवा कलाकार आपापल्या विद्येत प्रवीण असले, तरी त्यांचं सामान्यज्ञान आणि वैचारिक पातळी तुमच्या-माझ्यासारखीच साधी असते. अनेकदा आपण उगाचच मोठे खेळाडू किंवा कलाकारांकडून काही विषयांवर उच्च वैचारिक पातळीची अनाठायी अपेक्षा करतो. गल्लत तिथंच होते. गंभीर समस्यांवर खेळाडू किंवा कलाकार मतप्रदर्शन करतात, ते जास्तकरून वैचारिक पातळीपेक्षा भावनिक असतं. त्यामुळं त्या विचारांत खोली नसते. यात त्यांची चूक किती हा मला प्रश्‍न पडतो. प्रसारमाध्यमं आणि नव्यानं बोकाळलेले सोशल मीडिया त्यांना जटिल समस्यांवर विचार मांडायला लावतात. ठीक आहे, ते त्यांचं काम आहे; पण खेळाडू आणि मोठे कलाकार हे विचारवंत किंवा सगळ्या विषयांतले प्रकांड पंडित नाहीत, हे आपण लक्षात घ्यायला हवं.

निर्णय खेळाडूंचा नव्हे, सरकारचा
कोणत्याही खेळाडूनं किंवा संघानं कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत खेळायचे का नाही याचा राजनैतिक पातळीवर विचार हे त्या त्या खेळाच्या संघटना नव्हे, तर त्या त्या देशाचं सरकार करत असतं. तसंच भारतीय क्रिकेट संघानं पाकिस्तानविरुद्ध खेळायचे का नाही हा निर्णय खेळाडूंचा नाही, तर सरकारचा असेल. खेळाडू हे अत्यंत सामान्य छोटे सैनिक आहेत, जे आज्ञा मिळाल्याशिवाय काहीही करत नसतात.
मला वाटतं, की अतिरेक्‍यांनी मांडलेला उच्छाद ही अत्यंत जटिल समस्या आहे. जणू काही कॅन्सरचा रोग आहे तो. कॅन्सरच्या रोगावर उपाययोजना करायला केमोथेरपी किंवा रेडिएशन करावं लागतं. अशा रोगाकरता खेळाचा राजनैतिक वापर म्हणजे ऍनासिनची गोळी आहे. त्यानं फार मोठा परिणाम साधला जाणार नाही, हे आपण सगळे जाणतो. केवळ आपल्या सगळ्यांचं खेळावर प्रेम असल्यानं भावना गुंतलेल्या असतात इतकंच.

विश्‍वकरंडक स्पर्धेला दोन महिने बाकी आहेत. त्याअगोदर खूप काही घडामोडी भारत-पाकिस्तानदरम्यान घडत आहेत. भारत सरकारनं घेतलेलं आक्रमक धोरण आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरून पाकिस्तानवर वाढत जाणार दबाव बरंच काही काम करून जाणार आहे. म्हणून मुद्दा इतकाच मांडावासा वाटतो, की खेळाडूंच्या प्रतिक्रियांकडं जास्त लक्ष द्यायची गरज नाही. पाकिस्तान सरकार आणि सैन्य अतिरेक्‍यांना आसरा देऊन ज्या कुरापती करत आहे त्याला राजनैतिक पातळीवर निर्णय घेऊन थेट कारवाईनं ठेचायची गरज आहे. खेळ हा छोटा भाग आहे. गरज आहे ती सर्व बाजूंनी दबाव आणण्याची.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunandan lele write india pakistan cricket article in saptarang