खेळाडू आणि "खिलाडू' (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 3 फेब्रुवारी 2019

रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकून तिघांचंही वर्तन आदर्शवत राहिलेलं आहे. मैदानावरची आणि मैदानाबाहेरची वर्तणूक कमालीची सभ्य राहिली आहे.

रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविच या तिघांनी 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांचं विजेतेपद मिळवलं आहे. फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. या तिघांनी इतक्‍या ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकून तिघांचंही वर्तन आदर्शवत राहिलेलं आहे. मैदानावरची आणि मैदानाबाहेरची वर्तणूक कमालीची सभ्य राहिली आहे.

ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहरावर माझा जरा जास्त जीव आहे. शहर छान आहेच; पण त्यापेक्षा मेलबर्न शहरातली खेळाची संस्कृती मला जास्त भुरळ पाडते. प्रत्येक वर्षी मेलबर्न शहराला तीन भले मोठे खेळाचे कार्यक्रम आयोजित करायचा मान मिळतो. फॉर्म्युला वनची ऑस्ट्रेलियात होणारी शर्यत मेलबर्न शहरात भरते. 26 डिसेंबरला बॉक्‍सिंग डे कसोटी सामना भरवायचा मानही मेलबर्न क्रिकेट मैदानाला मिळतो आणि सर्वांत मोठा मान म्हणजे वर्षातली पहिली ग्रॅंड स्लॅम स्पर्धा म्हणजेच ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा मेलबर्न पार्कवर भरवली जाते. मला बॉक्‍सिंग डे, कसोटी सामना आणि त्याबरोबर नवीन वर्षात सुरू होणारी ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा थेट मैदानावर जाऊन बघायचा अनुभव घेता आला आहे.

जितका मोह मला मांडवात बैठक मारून चांगलं शास्त्रीय संगीत ऐकण्याचा आहे, तितकाच मोह मला प्रत्यक्ष मैदानावर जाऊन सर्वोच्च पातळीवरचा खेळ बघण्याचा आहे. दोन्ही प्रकारांना मी "मैफील' म्हणीन. एक खेळाची आणि दुसरी संगीताची. एकदा तर कमाल झाली होती. मला न्यूझीलंडला जायचं होतं आणि विमान पाच तास मेलबर्न विमानतळावर थांबणार होतं. माझ्या पासपोर्टमध्ये ऑस्ट्रेलियाचा व्हिसा होता म्हणून मग वेडा प्रकार करायचा मोह आवरला नाही. बॅगा ऑकलंडपर्यंत चेक इन झाल्या होत्या, त्यामुळे सामानाची काळजी नव्हती. मी बाहेर पडण्याकरता इमिग्रेशनच्या रांगेत उभा राहिलो. नंबर आल्यावर इमिग्रेशन ऑफिसरनं मला प्रश्‍न विचारला ः ""किती दिवस ऑस्ट्रेलियात राहण्याचा तुझा विचार आहे?'' मी म्हणालो ः ""दिवस नाही- चार तास.'' तो चक्रावला. म्हणाला ः ""चार तासांकरता तू बाहेर जाणार...आणि करणार काय?'' मी म्हणालो ः ""बाबा रे, मेलबर्न पार्कवर ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा चालू आहे. विमानतळावर कंटाळा येत बसून राहण्यापेक्षा हुलझपट करून मी मेलबर्न पार्क गाठणार आणि सर्वोत्तम टेनिस बघायचा आनंद लुटणार.'' इमिग्रेशन ऑफिसरनं हसतहसत मला बाहेर सोडलं.

माझी जवळची मैत्रीण कृष्णा ब्रॅनिगन मला घ्यायला थेट विमानतळावर आली होती. कृष्णा मेलबर्न पार्कची सदस्य आहे म्हणून तिनं डोकं चालवून माझं त्या दिवशीचं ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेचं तिकीट काढून ठेवलं होतं. कारमधून तिनं मला थेट मेलबर्न पार्कला सोडलं. कारमधून खाली उतरताना कृष्णानं मला पाण्याची बाटली, एनर्जी बार, सनस्क्रीन लोशन आणि डे पास असं सगळं बरोबर दिलं. मी मेलबर्न पार्कला गेलो आणि दोन तास मस्तपैकी ग्रॅंड स्लॅम टेनिसचा आनंद लुटला. दोन तासांनी बाहेर पडलो. टॅक्‍सी पकडली आणि ठरल्या हॉटेलात गेलो- जिथं कृष्णा आणि माझा मित्र हर्षा शेवडे माझी वाट बघत होते. एकत्र जेवण केल्यावर कृष्णानं मला परत मेलबर्न विमानतळावर सोडलं. शांतपणे परत इमिग्रेशनचा सोपस्कार पूर्ण करून मी न्यूझीलंडच्या विमानात बसलो. कृष्णा- हर्षासारखे खेळरसिक मित्र-मैत्रिणी असल्यानं माझे चार तास एकदम सार्थकी लागले होते.

मोठा फरक जाणवला
यंदाची ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा सुरू झाली असताना मोठ्या दौऱ्यातल्या शेवटचा एकदिवसीय सामना नेमका मेलबर्न शहरात होणार होता. परत एकदा कृष्णानं माझं 18 जानेवारी रोजीचं सकाळच्या सत्राचं ऑस्ट्रेलियन ओपनचं तिकीट काढून ठेवलं होतं. वीसवर्षीय ग्रीक खेळाडू सिसिपासचा सामना मला मार्गारेट कोर्टवर जाऊन बघता आला. सिसिपासनं 2019च्या ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत चांगल्या खेळानं सगळ्यांना भुरळ पाडली होती. उपउपांत्यपूर्व फेरीत चक्क रॉजर फेडररला पराभूत करून खळबळ माजवली होती. खेळात सातत्य राखत सिसिपासनं उपांत्यपूर्व फेरीत बटीस्टा ऍगटला हरवलं. उपांत्य फेरीत त्याचा सामना नदालबरोबर होणार असल्यानं साहजिकच अपेक्षा वाढल्या होत्या. दुसऱ्या बाजूला नोवाक जोकोविच उपांत्य सामन्यात त्याचाच सरावाचा साथीदार पॉलीबरोबर भिडणार होता.

नदालनं सिसिपासची हवा काढून घेताना सामना 62, 6-4 आणि 6-0 असा जिंकला. जोकोविचनं सराव साथीदार ल्युकास पॉलीला दयामाया न दाखवता 6-0, 6-2 आणि 6-2 चोप दिला. हे दोन्ही सामने अभ्यासताना जाणवलं, की फेडरर, जोकोविच, नदालमध्ये आणि बाकीच्या खेळाडूंच्यात किती दरी आहे.
स्वत: स्टिफानो सिसिपासनं नदालविरुद्धच्या सामन्यानंतर बोलताना कबुली दिली, की "नदालसमोर मोठा सामना खेळताना मला अचानक टेनिस कोर्टची लांबी-रुंदी वेगळी भासू लागली. तो वेगळा खेळ खेळतो. मोठ्या सामन्यात खेळाचा दर्जा उंचावतो. समोरच्या खेळाडूला श्‍वास घ्यायची संधी न देताना नदाल त्याला खराब खेळायला भाग पाडतो.'
दुसऱ्या उपांत्य सामन्यात जोकोविचनं सरळ तीन सेट ल्युकास पॉलीला पराभूत करताना फक्त पाच अनफोर्स्ड चुका केल्या. होय, फक्त पाच चुका. मुद्दा इतकाच मांडावासा वाटतो, की स्पर्धा पुढं सरकत जाते आणि सामना महत्त्वाचा होत जातो तसा हे महान खेळाडू काय पातळीवर आपला खेळ घेऊन जातात.

कमालीचं सातत्य
गेल्या 15 वर्षांत रॉजर फेडरर, रफाएल नदाल आणि नोवाक जोकोविचनं काय कमाल केली आहे याचे आकडे मांडायचा प्रयत्न करतो, म्हणजे आपल्याला सातत्य शब्दाचा अर्थ कळेल. एक आकडेवारी देतो, जिमी कॉनर्स- बोर्ग- मॅकेन्‍रोच्या जमान्यात त्या तिघांनी मिळून 26 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या. त्यानंतरच्या पिढीत मॅटस्‌ विलॅंडर, इव्हान लेंडल, बोरिस बेकर आणि स्टीफन एडबर्गनं मिळून 27 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आणि जिम कुरीयर, पीट सॅंम्प्रस आणि आंद्रे अगासीनं मिळून 26 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत.

हे आकडे तुम्हाला कमाल वाटत असले, तर आता फेडरर- नदाल आणि जोकोविचचे आकडे सांगतो. सन 2003 मध्ये रॉजर फेडररनं पहिल्यांदा विंबल्डन विजेतेपद पटकावलं. नदालनं 2005 मध्ये पहिल्यांदा फ्रेंच ओपनच्या विजेतेपदावर हक्क सांगितला आणि 2008 मध्ये जोकोविचनं पहिली ग्रॅंड स्लॅम स्पर्धा ऑस्ट्रेलियन ओपन जिंकली. कळतंय का तुम्हाला, की थोडक्‍यात 2003 ते 2019 पर्यंत झालेल्या 63 ग्रॅंड स्लॅम स्पर्धांपैकी 52 स्पर्धांवर विजेतेपदाचा हक्क या तिघांचा आहे. होय! फेडररनं 20, नदालनं 17 आणि 2019 ऑस्ट्रेलियन ओपनचं विजेतेपद पटकावून जोकोविचनं 15 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या आहेत. आता लक्षात येतं, की फेडरर- नदाल आणि जोकोविचनं काय सातत्यपूर्ण कमाल कामगिरी करून दाखवली आहे.

अडचणीतून मार्ग काढला
फेडरर- नदाल आणि जोकोविचनं 63 पैकी 52 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकल्या म्हणजे त्यांना अडचणी नाही का आल्या? भरपूर आल्या; पण त्यांनी जिद्दीनं अडचणीतून मार्ग काढला. नदालचा खेळच असा आहे, की त्याला अंगमेहनत फार होते. तीन वेळा नदालच्या पायावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. जोकोविचला अशी दुखापत झाली होती, की जणू त्याची कारकीर्द संपल्यात जमा होती. शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करू लागल्यावर जोकोविचचा प्रवास खूप अडखळता होता.
फेडररच्या खेळात अंगमेहनत कमी असते, इतकी त्याच्या शैलीत लय आहे. तरीही पाठीच्या दुखापतीनं त्याला सतावलं. इतकंच काय, 2012 मध्ये विंबल्डन स्पर्धा जिंकल्यावर जवळपास पाच वर्षं फेडररला ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकता आली नव्हती. तोपर्यंत फेडररनं तुफान उंची गाठली होती. त्याचे समर्थक चिंता करू लागले होते आणि टीकाकार म्हणत होते, की फेडरर खेळण्याचा अट्टहास का करतो आहे. फेडररनं फक्त "मला टेनिस खेळायला आवडतं म्हणून मी खेळतो आहे,' असं सांगितलं. सन 2017 मध्ये फेडररनं पहिल्यांदा ऑस्ट्रेलियन ओपन आणि नंतर चक्क परत विंबल्डन जिंकून टेनिस जगताला त्याच्यातली जिद्द दाखवून दिली.

सभ्यतेची परिसीमा
इतर कोणत्याही खेळापेक्षा मला टेनिस वेगळ्या कारणाकरता भावतं. फेडरर- नदाल- जोकोविचनं मिळून 52 ग्रॅंड स्लॅम स्पर्धा जिंकून तिघांचंही वर्तन आदर्शवत राहिलेलं आहे. मैदानावरची आणि मैदानाबाहेरची वर्तणूक कमालीची सभ्य राहिली आहे. मैदानावर हे तिघे एकमेकांना भिडतात तेव्हा तुटून पडतात आणि सर्वोत्तम टेनिसचं दर्शन आपल्याला घडतं; पण जिंकला म्हणून कोणी माज करत नाही, की हरला म्हणून राग राग करत नाही. सामना संपल्याक्षणी हस्तांदोलन करून ते एकमेकांच्या खेळाचे गोडवे गातात. एकमेकांना कमालीचा मान देतात. नदाल त्याच्या अकादमीच्या उद्‌घाटनाकरता रॉजर फेडररलाच बोलावतो हा खिलाडूपणा लक्षणीय वाटतो मला.
ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा चालू असताना फेडररच्या गळ्यात पास नव्हता, म्हणून सुरक्षा कर्मचाऱ्यानं त्याला अडवलं होतं. प्रशिक्षक फेडररला बॅगेतून पास काढून सुरक्षा कर्मचाऱ्याला दाखवेपर्यंत रॉजर फेडरर काहीही न बोलता शांतपणे उभा होता. सुरक्षा कर्मचारी आपलं काम प्रामाणिकपणे करत असल्याचं लक्षात घेऊन फेडरर त्याला मान देत होता. कमाल नाही वाटत या साधेपणाची तुम्हाला? किती शिकण्यासारखं आहे या एका साध्या प्रसंगातून. नाहीतर आपल्याकडे "तुला माहीत नाही मी कोण आहे?' किंवा "तुला माहीत नाही मी कोणाचा मुलगा आहे,' असं गुरकावणंच आपल्याला बघायला ऐकायला मिळतं.

सगळ्याच खेळाडूंनी फेडरर- नदाल- जोकोविचकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. मैदानावरची आणि मैदानाबाहेरची सभ्यता काय असते आणि प्रत्येकानं आपापल्या खेळाची संस्कृती जपण्याबरोबरच तिच्यात चांगली भर कशी टाकता येईल, याचा विचार करायला पाहिजे हेच फेडरर- नदाल- जोकोविचकडून शिकणं गरजेचं आहे. खेळाडूंचं सोडा हो, आपण सगळ्यांनीही या खेळाडूंच्या ध्येयासक्तीपासून आणि सभ्य वर्तणुकीतून बरंच काही शिकलं पाहिजे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunandan lele write roger federer rafael nadal and novak djokovic article in saptarang