वेध टोकियो ऑलिंपिक्‍सचे (सुनंदन लेले)

सुनंदन लेले sdlele3@gmail.com
रविवार, 28 एप्रिल 2019

अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले प्रयत्न, भाषेचा अडसर दूर करण्यापासून प्रत्यक्ष मैदानावर प्रावीण्य मिळवण्यासाठीचे प्रयत्न आदी सर्व गोष्टींबाबत जपानमधल्या प्रत्यक्ष भेट भेटीवर आधारित वृत्तांत.

अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या जपानमध्ये सन 2020च्या टोकियो ऑलिंपिक स्पर्धा भरणार आहेत. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळांच्या ठिकाणांपासून ते नागरी सुविधांपर्यंत लागणारा सर्व गोष्टींचा स्तर टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुरू असलेले प्रयत्न, भाषेचा अडसर दूर करण्यापासून प्रत्यक्ष मैदानावर प्रावीण्य मिळवण्यासाठीचे प्रयत्न आदी सर्व गोष्टींबाबत जपानमधल्या प्रत्यक्ष भेट भेटीवर आधारित वृत्तांत.

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातल्या शेवटच्या टप्प्यात सिडनीला असताना मला ई-मेल आली. "टोकियो मराठी मंडळाच्या गुढीपाडव्याच्या समारंभात तुझा क्रिकेटेन्मेंट कार्यक्रम "बारा गावचे पाणी' सादर करायला जपानला येशील का,' असं माझा मित्र निरंजन गाडगीळ विचारत होता. मनात म्हटलं ः "जपानची सहल...नेकी और पुछ पुछ?' मी क्षणार्धात होकार कळवला. कधी ना कधी उगवत्या सूर्यदेवाच्या देशाला मला भेट द्यायची होतीच. मस्त संधी समोरून आली- मग काय मनात अनेक विचार घोळू लागले.

जपान म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर रोजच्या जीवनात करणारा देश. जपान म्हणजे बौद्ध धर्माचं आचरण करणारा देश. जपान म्हणजे पानं-फुलं, निसर्गावर प्रेम करणारा देश. इतकंच नाही, तर कोदोकान संस्था म्हणजेच ज्युदोचं माहेरघरसुद्धा जपानच. जगात दोनदाच अणुबॉंम्ब टाकले गेले ती दोन्ही शहरं हिरोशिमा आणि नागासाकी जपानमध्येच आहेत. दुसऱ्या महायुद्धात बेचिराख झाल्या अवस्थेतून प्रगतीची भरारी मारणारा देश म्हणजे जपान. शेवटचं कमाल आकर्षण म्हणजे एका वर्षानं 24 जुलै 2020ला याच जपानच्या टोकियो शहरात ऑलिंपिक्‍स स्पर्धा रंगणार आहेत. एका खेळ आणि भटकंती वेड्या पत्रकाराच्या उत्साहाला उधाण यायला अजून काय पाहिजे मला सांगा.

टोकियो ऑलिंपिक्‍सची तयारी
खेळाच्या जगतातला सर्वांत मोठा आनंदसोहळा म्हणजे ऑलिंपिक गेम्स. त्यापेक्षा मोठं काहीच नसतं. रियो ऑलिंपिकमधे 27 खेळ प्रकारांचा समावेश होता. त्यात आता 6 नवीन खेळ जोडले जाणार आहेत. बेसबॉल, कराटे, सॉफ्टबॉल, स्पोर्टस क्‍लायंबिंग, स्केटबोर्डिंग आणि सर्फिंग हे सहा नवीन खेळ टोकियो ऑलिंपिक गेम्समध्ये दाखल होत आहेत. 18 नवीन खेळाचे कार्यक्रम 474 नव्या खेळाडूंना ऑलिंपिक गेम्समध्ये सहभागी होण्याची संधी देणार आहे.

टोकियो ऑलिंपिक गेम्स यशस्वी व्हावेत म्हणून तगडी समिती काम करत आहे- ज्याचे मुख्य तोशिरो मुतो आहेत. जापनीज फुटबॉल संघटनेचे जुने जाणते अधिकारी साबुरो कावाबुची मोठी जबाबदारी पेलत आहेत. जपानमध्ये अत्यंत मानले जाणारे माजी मंत्री आणि टोयोटा फौडेंशनचे सर्वेसर्वा अत्सुको तोयामा समितीत जोमानं काम करत आहेत.

नाव टोकियो ऑलिंपिक गेम्स असले, तरी जपानच्या आठ भागांतल्या 42 जागांवर हा खेळ महोत्सव रंगणार आहे. त्यापैकी दोन मुख्य भाग अर्थातच टोकियो शहरात आहेत. इंग्लिश आठ आकड्याच्या वळणात टोकियो शहरातल्या दोन भागांत बऱ्याच स्पर्धा भरवल्या जाणार आहेत. आकर्षणाचा केंद्रबिंदू अर्थातच नॅशनल स्टेडियम असेल- जिथं उद्‌घाटन सोहळा आणि सांगता समारंभ साजरा होईल.
सन 1964 च्या ऑलिंपिक गेम्सकरता वापरलं गेलेलं नॅशनल स्टेडियम थोडेसे बदल करून नव्यानं सज्ज होत आहे. मुंबईतलं दादर स्टेशन जसं मध्यवर्ती समजलं जातं, तसंच टोकियो शहरात "शिंजुकू' नावाचं स्टेशन आहे. तिथं पोचून मग "ओईडो' मेट्रो लाइन पकडून स्टेडियमवर जायला कोकुरित्सु-क्‍योजिओ स्टेशनवर उतरलं, की अगदी पाच मिनिटं चालत गेल्यावर नॅशनल स्टेडियम लागतं. ए-4 प्रवेशद्वारातून स्टेशनबाहेर आलं, की अगदी समोरच भव्य स्टेडियम बघायला मिळालं. स्टेडियमचं सुशोभीकरण आणि त्यामध्ये अगदी थोडे बदल करण्यात कामगार आणि इंजिनीयर व्यग्र दिसले. प्राथमिक बदल करताना प्रेक्षकांच्या सुविधा अजून सुलभ चांगल्या कशा होतील याकडे काटेकोरपणे लक्ष दिलं जात होतं.

लक्षणीय बाब
कोणत्याही शहरात राष्ट्रीय खेळांची स्पर्धा होणार असली, तरी त्या शहराला जाग येते. विकासकामांना गती येते. केंद्र सरकार चांगला निधी उपलब्ध करून देतं आणि मग शहरात सुधारणा होते. राष्ट्रीय स्पर्धा यशस्वीरित्या आयोजित करून दाखवल्या जातात, तेव्हा मग पदार्पणाच्या स्तरावरच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरवण्याची जबाबदारी त्या शहरावर सोपवली जाते. त्यात यश मिळवून दाखवलं, की मग आशियाई स्पर्धा किंवा राष्ट्रकुल स्पर्धांचं संयोजन करायची अजून मोठी जबाबदारी सोपवली जाते. या सगळ्या परीक्षांमधून ते शहर आणि स्थानिक प्रशासन चांगल्या गुणांनी पास होतं, तेव्हाच सर्वोच्च म्हणजे ऑलिंपिक गेम्सच्या यजमानपदाची धुरा सोपवली जाते. जगातली तमाम नामांकित शहरं ऑलिंपिक गेम्स भरवायला उत्सुक असतात. मग प्रत्येक जण आपलं शहर ऑलिंपिक गेम्स भरवायला सर्वांत लायक कसं असेल याचं सादरीकरण करतो. मग मतदारांना आपल्याकडे खेचायला जोरदार मोर्चेबांधणी होते. मग अखेर मतदान होतं आणि पुढील ऑलिंपिक गेम्सच्या यजमानपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडली हे मोठा समारंभ करून जाहीर केलं जातं.

एकदा का नाव जाहीर झालं, की यजमान देशाचं सरकार मोठी समिती नेमून कामाला लागतं. यजमानपद भूषवलं जाणाऱ्या शहरात आमूलाग्र बदल करायच्या योजना आखल्या जातात. कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून बदल केले जातात आणि मग अखेर स्पर्धा भरवल्या जातात. पटकन समजावं म्हणून उदाहरण द्यायचं झालं, तर दिल्ली शहराला कॉमनवेल्थ यूथ गेम्सचं यजमानपद मिळाल्यावर दिल्ली शहरातल्या मेट्रो प्रकल्पाला एकदम गती मिळाली. स्पर्धा चालू होण्याअगोदर मेट्रोचं जाळं उभारण्याचं काम पूर्ण करायला सगळ्यांनी उचल खाल्ली. आज दिल्ली शहरात मेट्रो चालू झाल्यानं काय बदल घडला हे आपण सगळे जाणतो. लंडन ऑलिंपिक गेम्सच्या वेळी मुख्य स्टेडियमची उभारणी आणि त्या जागेला जाणाऱ्या मेट्रो लाइनचं काम झपाट्यानं पूर्ण केलं गेलं होतं.

टोकियो शहराची बाब वेगळी आहे. टोकियो ऑलिंपिक गेम्सबद्दल बोलायचं झालं, तर लक्षणीय बाब म्हणजे खेळ सुविधांमध्ये किंवा शहरात कोणताही बदल प्रशासनाला करावा लागणार नाहीये. टोकियो शहरात ऑलिंपिक गेम्स होणार म्हणून कोणतीही मूलभूत नवीन सुविधा तयार केली जात नाहीये. असं का याचं कारण मला समजलं, तेव्हा मी अवाक्‌ झालो. ऑलिंपिक गेम्स भरवायला खेळ केंद्रापासून ते नागरी सुविधांपर्यंत सर्व गोष्टींचा जो स्तर लागतो तो टोकियो शहरात गेली कित्येक वर्षं नांदतो आहे. ऑलिंपिक गेम्स होणार म्हणून काहीही नव्यानं उभारायची टोकियो शहराला किंवा संयोजन समितीला गरजच नाही. इतक्‍या उत्तम सोयी सुविधा टोकियो शहरात आहेत. मला सन 2020 च्या ऑलिंपिक गेम्सचं हेच वैशिष्ट्य वाटलं. खेळाडूंपासून ते प्रेक्षकांपर्यंत सगळ्यांच्या गरजांचा विचार केला, तर पायाभूत सुविधा टोकियो शहरात आत्ताच आहेत, याची मला कमाल वाटली.

भाषेची अडचण
टोकियो ऑलिंपिक गेम्सच्या तयारीला अंतिम स्वरूप देताना स्थानिक प्रशासनला पर्यटकांकरता आणि खेळाडूंकरता येऊ शकणारा भाषेचा अडसर दूर करावा लागणार आहे. जपान देशात जपानी भाषाच बोलली जाते. अगदी मोजक्‍या लोकांनाच इंग्लिश भाषा येते. परिणामी जपानमध्ये फिरताना जरा गडबड होते. टोकियो शहरातल्या सगळ्या पाट्या आणि दिशादर्शक स्थानिक भाषेबरोबर इंग्लिश भाषेत करायची तयारी चालू आहे. मेट्रोनं फिरताना जीभ वाकडी होणाऱ्या स्टेशनची नावं लक्षात ठेवताना गोंधळ होऊ नये म्हणून प्रशासन प्रत्येक स्टेशनला नावाबरोबर नंबर देत आहे, तसंच प्रत्येक मेट्रोलाईनला वेगळा रंग देत आहे- जेणेकरून परदेशी लोकांना समजायला सोपं जावं.

मोठी मजल
गेल्या म्हणजे रियो ऑलिंपिक गेम्समध्ये जपानी खेळाडूंनी 41 पदकं जिंकली होती- ज्यात 12 सुवर्णपदकं होती. ज्युदो आणि जिम्नॅस्टिक्‍स खेळात जपानी खेळाडू प्रवीण आहेत हे माहीत होतं. त्या सोबतीला पोहण्यात पदकं जिंकून जपाननं गुणवत्तेची चुणूक दाखवली. सर्वांत धक्कादायक पदक जपाननं ऍथलेटिक्‍समध्ये मिळवलं. 4 बाय 10 मीटर धावण्याच्या शर्यतीत जपानी धावपटूंनी उसेन बोल्टच्या जमेकन संघाला टक्कर देत दुसरा क्रमांक पटकावून सगळ्यांना थक्क करून सोडलं. जपानला नुसतं टोकियो ऑलिंपिक गेम्सचं यशस्वी संयोजन करायची कमाल करून दाखवायची नाहीये, तर मैदानावरही मर्दुमकी गाजवून पदकांची लूट करत स्पर्धेवर ठसा उमटवायचा आहे.

मोठं ध्येय
जपानी लोकांचा विचार किती पुढचा आणि प्रगल्भ असतो, याचं उदाहरण त्यांच्या मिशन स्टेटमेंटमधून कळालं. टोकियो ऑलिंपिक गेम्स यशस्वी करताना तीन मुद्दे केंद्रस्थानी ठेवले गेले आहेत ः
1) सहभागी खेळाडूंना सर्वोत्तमतेचा ध्यास पूर्ण करता यावा म्हणून सर्वतोपरी सोयी उपलब्ध करून देण्याचा संयोजन समितीचा निग्रह आहे.
2) ऑलिंपिक गेम्स म्हणजे खऱ्या अर्थानं "अनेकतेत एकते'चं प्रतीक असतं, हे ध्यानात ठेवून त्या अनुभवाला कोणतीही बाधा येऊ नये याकरता खास लक्ष दिलं जाणार आहे.
3) पुढच्या पिढीला अभिमान वाटेल असे बदल करून नियोजन करताना टोकियो ऑलिंपिक गेम्सची ओळख "सर्वांत हरित ऑलिंपिक गेम्स' अशी व्हावी याकरता नियोजन समिती झटणार आहे.
टोकियो ऑलिंपिक गेम्स भरवले जाताना कार्बन वायूची निर्मिती व्हायलाच नको म्हणून उपाययोजना केल्या गेल्या आहेत. निसर्गाला धक्का लागणार नाही अशाच ऊर्जास्रोतांचा विचार आणि वापर केला जाणार आहे. अर्थातच जास्तीत जास्त खेळ केंद्रांवर लागणारी वीज सौरऊर्जेतून निर्माण केली जाईल. प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करताना बाकी कचरा पद्धतशीरपणे "रिसायकल' केला जाईल. मोठ्या स्पर्धेच्या यजमानपदाची थोडी आर्थिक झळ स्थानिक नागरिकांना सहन करावी लागणार आहे- कारण दोन टक्‍क्‍यांनी कर वाढवला गेला आहे.

येत्या काही दिवसांत जपानमधे मोठं हस्तांतर होत आहे. गेली अनेक वर्षं राज्य करणारे जपानचे राजे अकिहितो वयोमानापरत्वे थकल्यानं सिंहासनावरून आपणहून खाली उतरणार आहेत आणि राजपुत्र नारुहितोच्या माथ्यावर राजेपदाचा मुकुट चढवणार आहेत. नव्या राजाच्या पदग्रहणानंतर एका वर्षातच टोकियो ऑलिंपिक गेम्स भरवल्या जाणार आहे. साहजिकच जपानमध्ये उत्साह सळसळतो आहे.
दहा दिवस जपानमध्ये फिरून आल्यावर आणि टोकियो ऑलिंपिक गेम्सची चालू असलेली तयारी बघून सरतेशेवटी मी इतकंच म्हणीन, की जगात तीनच प्रकारचे देश असतात, असं मला माहीत होतं. मागासलेले, प्रगतिशील आणि प्रगत. या सगळ्याला मागं सारून मला चौथा प्रकार लक्षात आलाय तो आहे "जपान!' गेल्या साठ वर्षांत जपाननं केलेली प्रगती आणि मारलेली मजल केवळ विस्मयकारक आहे. म्हणूनच सन 2020 च्या टोकियो ऑलिंपिक गेम्स नुसत्या यशस्वी नव्हे, तर संपूर्णपणे वेगळ्या ठरतील, याची खात्री वाटते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sunandan lele write tokyo olympics 2020 article in saptarang