फलंदाजीच्या कलेचा अस्त?

alan-wilkinson
alan-wilkinson

टिच्चून फलंदाजी करणं आणि एकाग्र खेळ करून प्रतिस्पर्धी संघाला दमवणं हे कसोटी सामन्यात शक्य होतं. फलंदाजाच्या कौशल्याचा कस तर लागत असे, पण त्याच्यातली कला अर्थातच त्याची शैली आणि बहारदार फटके याचा समन्वय असे. झटपट क्रिकेटच्या जमान्यात हे लुप्त होतंय की काय, असं वाटावं अशी वेळ आहे.

महिना जानेवारीचाच होता पण वर्षं होतं १९५८. पाकिस्तानचा संघ तेव्हा वेस्ट इंडीजच्या दौऱ्यावर होता. बार्बाडोसच्या मैदानावर कसोटी सामना रंगला होता. अत्यंत मजबूत अशा वेस्ट इंडीज संघानं पहिल्यांदा फलंदाजी करताना धावांचा डोंगर उभारला होता. त्यावेळच्या संघात कॉनरॅड हंट, एव्हर्टन विक्स, रोहन कन्हाय, गॅरी सोबर्स यांच्यासारखे दिग्गज फलंदाज होते. दोन दिवसापेक्षा जास्त काळ वेस्ट इंडीजच्या कडक उन्हात क्षेत्ररक्षण केल्यावर पाकिस्तानला फलंदाजी देण्यात आली. थकलेल्या पाकिस्तानी संघाला रॉय गिलख्रिस्टचा सामना करणं अशक्य झालं आणि त्यांचा पहिला डाव अवघ्या १०६ धावांमध्ये गुंडाळला गेला. अर्थातच पाकिस्तान संघाला फॉलोऑन दिला गेला.  

दुसऱ्या डावात पाकिस्तानी फलंदाजांनी जिद्द दाखवली. सलामीला आलेल्या हनीफ मोहम्मद आणि इम्तियाझ अहमद यांनी चांगली सुरवात केली. वेस्ट इंडीजचा एक चाहता झाडावर बसून सामना बघत होता. दोन दिवस हनीफ मोहम्मद यांची संयमी फलंदाजी, कॅरेबियन ऊन आणि पोटात जाणारी रम या सगळ्यांचा त्रिवेणी संगम होऊन त्या चाहत्याला चक्कर आली आणि झाडावरून तो खाली पडला. त्याला रुग्णालयात नेण्यात आलं, काही तासांनी त्याला शुद्ध आल्यावर त्यानं पहिला प्रश्न डॉक्टरांना विचारला की, ‘इज हनीफ िस्टल बॅटिंग’, त्यावर डॉक्टरांनी होकारार्थी मान हलवल्यावर तो चाहता पुन्हा बेशुद्ध झाला. त्या सामन्यात हनीफ मोहम्मद यांनी थेट ९७० मिनिटं फलंदाजी करून सामना अनिर्णित ठेवण्याची कमाल करून दाखवली. 

आज हे सगळं आठवायचं कारण असं आहे की आधुनिक क्रिकेटच्या जमान्यात कसोटी सामन्यातल्या फलंदाजीची कला संपुष्टात तर येत नाहीये ना ? अशी भीती आता वाटू लागली आहे. सध्या मी इंग्लंडमध्ये मँचेस्टर या गावी असल्यानं या विषयावर प्रसिद्ध समालोचक अॅलन विल्किन्सन बरोबर चर्चा करायचा मोह आवरला नाही. अॅलन विल्किन्सन नुसता थोर समालोचकच नाही तर तो स्वतः उच्च स्तरावरचं क्रिकेट खेळलेला आहे 

महान फलंदाजांचं दर्शन
ॲलन यानं सांगितलं ‘‘गेल्या ३० वर्षात आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं समालोचन करताना एकाहून एक महान फलंदाजांची कला बघण्याचं भाग्य मला लाभलं, मी स्वतः खेळत असताना जेफ बॉयकॉटची संयमी फलंदाजी बघायचो. मायकेल वॉन आणि नंतरच्या काळात ॲलिस्टर कुकची शैलीदार फलंदाजी मी अनुभवली. त्याच बरोबर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड , इंझमाम उल हक, माहेला जयवर्धने, कुमार संगकारा, रिकी पॉन्टिंग, ग्रॅमी स्मिथ, जॅक कॅलिस यांना बघून तृप्त झालो. अगदी खरं सांगायचं तर आत्ताच्या क्रिकेटमध्येही विराट कोहली, स्टिव्ह स्मिथ, जो रूट आणि केन विल्यमसनची फलंदाजी कसोटी सामन्यात बघताना मन भरत नाही. पण या चार फलंदाजांसारखे सन्माननीय अपवाद वगळले तर कुणी फलंदाज सातत्यानं तशी चिवट, शैलीदार फलंदाजी कसोटी सामन्यात करताना दिसत नाही ’’ 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

जीवनशैलीचा परिणाम
याच विषयावर बोलताना तो आपला मुद्दा स्पष्ट करताना म्हणाला, ‘‘ मानवी जीवनात बदल होत गेले त्याचा थेट परिणाम फलंदाजीच्या कलेवर झालाय असं मला वाटतं. 

हनीफ मोहम्मद यांनी कसोटी सामान्यांच्या एकाच डावात सामना वाचवायला केलेली ९७० मिनिटांची फलंदाजी दंतकथा वाटेल इतके बदल क्रिकेटमध्ये झाले आहेत. अगोदर फक्त कसोटी क्रिकेट होते आणि मग एक दिवसीय सामने सुरू झाले. आता गेली काही वर्ष ‘ट्वेन्टी-२०’ क्रिकेटची धूम आहे. ‘आयपीएल’ची लोकप्रियता कुठल्या टप्प्यावर जाऊन पोहोचली आहे हे कोणाला वेगळं सांगण्याची गरज नाहीये.

क्रिकेट बदललं तसं आपलं जीवन बदललं. हनीफ मोहम्मद यांच्या काळात दूरचित्रवाणी संच सुद्धा नव्हता. साहजिकच लोकांमध्ये खूप संयम होता.अगोदर एकदम साधे फोन होते आपल्या हातात. आता स्मार्ट फोन शिवाय आपलं पान हालत नाही. या सगळ्यांचा काही ना काही परिणाम, कसोटी क्रिकेट मधील फलंदाजीच्या कलेवर झालाय हे नक्की.’’

कसोटी सामन्यात जम बसवायला फलंदाज योग्य वेळ घ्यायचे. चेंडू नुसता खेळून काढणं किंवा सोडून देणं ही सुद्धा कला मानली जायची. प्रदीर्घ काळ एकाग्रता राखणं, हा गुण अंगी बाणवण्याकरता फलंदाज घोर मेहनत करायचे. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात संयम ह्या गुणाला मोठा धक्का लागला आहे का अशी शंका यायला लागली आहे. मान्य आहे की ट्वेन्टी -२० मुळं कसोटी सामने आता रटाळ व अनिर्णित राहत नाहीत. पण आता खूप कमी कसोटी सामने ५ दिवस चालतात हे सुद्धा विसरून चालणार नाही. थोडा काळ धाव मिळाली नाही किंवा चौकार मारता आला नाही कि सध्याचे बरेचसे फलंदाज अस्वस्थ झालेले दिसतात असंही त्यांनं सांगितलं.

अशा वेळी सचिन तेंडूलकर यांनं ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध  २००३ मध्ये केलेली खेळी आठवते. या सामन्यापूर्वी काही डावात उजव्या स्टंप बाहेरचा चेंडू मारताना सचिन बाद झाला होता. मात्र त्या सामन्यात सचिननं एकही फटका उजव्या बाजूला न मारण्याचं ‘आव्हान’ स्वतःला दिलं. 

दहा तास फलंदाजी करूनही ४३६ चेंडूंना तोंड देत सचिननं एकही फटका उजव्या बाजूला न मारता २४१ धावांची नाबाद खेळी केली. मनावर केवढा मोठा ताबा असल्याचं त्यानं सिद्ध केलं. त्याचा निर्धार बघूनच हैराण व्हायला झालं. आत्ताच्या काळातले फलंदाज असा ताबा मनावर ठेवू शकतील का ? दुर्दैवानं या प्रश्नाचं मनातलं उत्तर नकारार्थी येते. 

कसोटी क्रिकेट मधील फलंदाजीची कला कमी होतेय असं वाटायला हीच कारणे आहेत. काय वाटतं तुम्हांला, जरूर सांगा आणि तुमचे विचार मांडा, विल्किन्सन यांनं चर्चेच्या शेवटी आवर्जून मला हे सांगितलं.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com