इथं ठामपणाच हवा !

भारतीय क्रिकेटचं गेली तीन दशकं वार्तांकन करत असताना संघबांधणी करताना कर्णधार काय युक्त्या करतात आणि निवड समिती काय भूमिका घेते हे जवळून बघायला मिळाले आहे.
Cricketer
CricketerSakal

भारतीय क्रिकेटचं गेली तीन दशकं वार्तांकन करत असताना संघबांधणी करताना कर्णधार काय युक्त्या करतात आणि निवड समिती काय भूमिका घेते हे जवळून बघायला मिळाले आहे. तसं बघायला गेलं तर १५ जणांच्या किंवा आत्ताच्या जमान्यात २० पेक्षा जास्त खेळाडूंचा संघ निवडण्याचे काम निवड समितीने करायचे असते. अंतिम ११ जणांच्या यादीत कोणाला निवडायचे याचे अधिकार कर्णधाराला असतात. जेव्हा याच प्रक्रियेत कोणीही ढवळाढवळ केली तर मग गडबड व्हायला वेळ लागत नाही. असेही ऐकले आहे की मुंबई रणजी संघाचे कर्णधार असताना सुनील गावसकर खूप मोठे खेळाडू बनले होते. ते खूप गडबडीत असले तर निवड समिती बैठकीत येऊन खिशातून ११ जणांची यादी निवड समितीला द्यायचे आणि म्हणायचे की हे माझे ११ पक्के आहेत. १२-१३-१४-१५ तुम्ही कोणाचीही नावे टाका मला फरक पडत नाही. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार ही कर्तृत्वाने मोठी व्यक्ती असल्याने बऱ्याच वेळा निवड समिती त्याचं म्हणणे रास्त मानून त्याला भरवसा वाटत असलेल्या खेळाडूला प्राधान्य देते ज्यात काहीच गैर नाही. पण जेव्हा कर्णधार किंवा मुख्य प्रशिक्षक आपलेच म्हणणे रेटू लागतात तेव्हा निवड समितीला म्हणजे खास करून निवड समिती अध्यक्षाला स्पष्ट भूमिका घ्यावी लागते. तसे जमले नाही तर होणारे परिणाम अटळ असतात.

हा मुद्दा इथं मांडायचं कारण असं की एकीकडे भुवनेश्वर कुमारला इंग्लंड दौर्‍यापासून बाजूला ठेवताना हळूच एक फुसकुली माध्यमांचा वापर करून सोडण्यात आली की भुवनेश्वर कुमारला आता कसोटी क्रिकेटमध्ये रस उरलेला नसून त्याला टी-२० क्रिकेट किंवा जास्तीत जास्त एक दिवसीय क्रिकेट खेळण्यातच रस आहे. भुवनेश्वर कुमारने त्याच्या विरोधात मांडल्या गेलेल्या विचारांचे स्पष्ट शब्दात खंडन केले. आता शुबमन गिलला दुखापत झाल्यावर उरलेल्या संघात के एल राहुल, मयांक आगरवाल आणि इस्वरन असे तीन सलामीचे फलंदाज असूनही संघ व्यवस्थापनाने त्यांच्या मर्जीतल्या खेळाडूची हळूच मागणी केली. निवड समितीने मागणी फेटाळत निवडलेल्या खेळाडूंमधून सलामीचा फलंदाज निवडा अशी स्पष्ट भूमिका घेतल्याने तूर्तास तरी हा वाद शमला आहे. या प्रसंगाच्या निमित्ताने अगोदर झालेले असेच काही प्रसंग मला आठवले.

मान्य नाही...नोंद करा

२००३-०४ च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या संघात वेगवान गोलंदाज निवडण्याकरता निवड समिती कर्णधार सौरव गांगुलीबरोबर चर्चा करत असताना किरण मोरेने तरुण वेगवान गोलंदाज इरफान पठाणचे नांव सुचवले तर सौरवला त्याचा राग आला. ‘बडोद्याचा खेळाडू म्हणून तुम्हांला इरफानमध्ये दम वाटत असेल...दौरा ऑस्ट्रेलियाचा आहे...खडतर आहे... उगाच कोणालातरी घुसवायला नको’, सौरवने आक्रमक होत भूमिका मांडली. किरण मोरेने इरफानने भारतीय ‘अ’ संघासोबत दौरे केले असून त्यात चेंडू सुंदर प्रकारे स्विंग करायची गुणवत्ता असल्याचे सांगत अशा तरुण खेळाडूला अनुभव मिळून पुढील काळात तो तयार व्हायला मदत होण्याचा मुद्दा मांडला तेव्हा सौरवने, तुम्ही आग्रह धरत असलात तर मिनिटस् मध्ये तशी नोंद करा की मला मान्य नाही म्हणून. त्याच दौर्‍यात इरफानने कसोटी पदार्पण करून चांगली गोलंदाजी करायचे कसब दाखवले. दौरा संपल्यावर सौरव गांगुलीने किरण मोरेला फोन करून आपण घेतलेली भूमिका चुकीची असल्याचे मान्य केले होते.

धोनीनेही चूक केली होती

इंग्लंड दौर्‍यावर भारतीय संघ गेला असताना पहिल्याच कसोटी सामन्यात झहीर खानच्या मांडीचा स्नायू दुखावला होता. भारतीय संघाने तीन कसोटी सामने सलग गमावल्यावर चौथ्या कसोटी सामन्याकरता वेगवान गोलंदाजाची जरुरी होती. निवड समिती रणजी स्पर्धेत चमकदार कामगिरी करणार्‍या गोलंदाजांचा विचार करत असताना कर्णधार धोनीने त्याचा विश्वास असलेल्या रुद्र प्रताप सिंगला संघात घेण्याचा आग्रह धरला. निवड समितीने धोनीला समजावण्याचा प्रयत्न केला जो व्यर्थ ठरला. भयानक गोष्ट म्हणजे निवड समितीने संपर्क साधला असता आर पी सिंग त्यावेळी अमेरिकेत सुट्टीवर गेला होता. धोनीच्या आग्रहास्तव आर पी सिंगला संघात पाचारण केले गेले.

मला स्पष्ट आठवतो तो लंडनच्या ओव्हल मैदानावर झालेला कसोटी सामना. आर पी सिंगला धोनीने नवीन चेंडूवर गोलंदाजी करायला पहिली ओव्हर दिली. त्या पहिल्या षटकात आर पी सिंगने इतकी हळुवार गोलंदाजी केली की कॉमेंटरी करणार्‍या इयान बोथमने कसोटी सामन्याची सुरुवात करणारे सर्वात कमी वेगाचे दर्जाहीन षटक अशी त्याची उघड शब्दात निर्भत्सना केली. त्या सामन्यात तब्बल ३४ षटके टाकूनही आर पी सिंगला एकही फलंदाजाला बाद करता आले नव्हते. त्या प्रसंगानंतर धोनीला आपली चूक कळून आली आणि नंतरच्या कारकिर्दीत त्याने अमुकच खेळाडू हवा अशी मागणी निवड समितीला कधीच केली नाही.

विश्‍वकरंडक स्पर्धेतला निवडीचा घोळ

विश्‍वकरंडक स्पर्धेच्या २०१९ च्या संघाच्या निवडीतही घोळ झाला होता. चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला कोण असेल यावरून बरीच चर्चा झाली. समजले असे की संघ व्यवस्थापन म्हणजे विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्रीने विजय शंकरच्या नावाचा आग्रह धरला. बघायला गेले तर विश्‍वकरंडकसारख्या सर्वात मोठ्या स्पर्धेकरता आणि चौथ्या क्रमांकाची मोलाची जागा मनिष पांडे किंवा श्रेयस पांडेचा कणभर विचार झाला नाही किंवा अगोदरच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात चांगली फलंदाजी करणार्‍या धोनीला आणि केदार जाधवला संधी दिली गेली नाही. तसेच भरपूर गुणवत्ता दाखवलेल्या रिषभ पंतचा विचार झाला नाही आणि जागा विजय शंकरला बहाल करणे मोठी चूक होती. नंतर विजय शंकरच्या पायाला झालेली दुखापत लपवली गेली जी एका निवड समिती सदस्याने उघड केल्यावर मग रिषभ पंतला बोलावले गेले आणि त्याला थेट चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवले गेले. हे सगळे होताना स्पष्ट जाणवत होते की निवड समितीपेक्षा संघ व्यवस्थापनाचा पगडा जास्त होता. मग काय, व्हायचे तेच झाले महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघाला चांगल्या मधल्या फळीतील फलंदाजाची उणीव जाणवली.

शेवटी एकच मुद्दा मांडावासा वाटतो की निवड समिती भारतीय संघाच्या कर्णधारापेक्षा अधिक सामने बघत असते आणि त्यातून गुणवान खेळाडू शोधून काढत असते हे कर्णधार आणि प्रशिक्षकाने विसरता कामा नये. दुसर्‍या बाजूला निवड समिती अध्यक्षाने कणखर भूमिका घेतलीच पाहिजे. दिलीप वेंगसरकरांनी तशी भूमिका वारंवार घेतलेली मी अनुभवली आहे. चेतन शर्माला आणि निवड समिती सदस्यांना वेळप्रसंगी संघ व्यवस्थापनाला स्पष्टपणे सांगायची हिंमत दाखवावी लागेल. संघ व्यवस्थापनाने माध्यमांकडून गुप्त संदेश वर्तमानपत्रात छापून आणून निवड समितीवर दडपण आणायचा केलेला प्रयत्न चुकीचा वाटला. आत्ताच्या घडीला बीसीसीआय म्हणा किंवा निवड समिती अध्यक्ष म्हणा, दुखापतग्रस्त शुबमन गिलच्या जागी अजून कोणी बदली खेळाडू पाठवणार नसल्याचे संकेत संघ व्यवस्थापनाला दिले आहेत. म्हणजेच संघ व्यवस्थापनाने टाकलेल्या दडपणाने निवड समिती गांगरली नाही. एका अर्थाने निवड समितीने दाखवलेला खमकेपणा भविष्याच्या निर्णयांचा विचार करता सकारात्मक वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com