esakal | थकलेल्या क्रिकेटची कहाणी | Cricket
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli
थकलेल्या क्रिकेटची कहाणी

थकलेल्या क्रिकेटची कहाणी

sakal_logo
By
सुनंदन लेले sdlele3@gmail.com

विक्रमादित्याने आपला हट्ट सोडला नाही. वेताळाचा शोध घेत तो देशोदेशी भटकत राहिला. विक्रमादित्याला कल्पना होती की वेताळाला क्रिकेटचा खेळ खूप आवडतो आणि तो प्रत्यक्ष बघण्याचा आनंद घेताना तो मैदानाजवळ लटकलेला बघायला मिळाला होता. वेताळ नुकताच इंग्रजांच्या देशात जाऊन कसोटी सामन्याचा आनंद घेताना दिसला होता. त्यानंतर मात्र वेताळ क्रिकेट सामन्यांच्या जवळपास दिसला नव्हता म्हणून विक्रमादित्याचे कुतूहल जागे झाले होते. वेताळाचा शोध घ्यायला विक्रमादित्याने हेर आखातात पाठवले होते कारण आयपीएल स्पर्धा तिथे चालू असल्याने क्रिकेटवेडा वेताळ दुबई, शारजा किंवा अबु धाबीच्या मैदानांजवळ सापडेल असा अंदाज होता जो फोल ठरला होता. पुढील सामने काय आहेत हे समजून घेण्याकरता वेश बदलून विक्रमादित्य भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या म्हणजेच बीसीसीआय मुख्य कार्यालयात जाऊन आला. बघतो तर काय बीसीसीआयचे मुख्यालय असलेल्या वानखेडे स्टेडियमच्या मैदानावरील हिरवळीवर वेताळ पहुडलेला विक्रमादित्याला दिसला. दबक्या पावलांनी विक्रमादित्य जवळ गेला आणि झडप घालून त्याने वेताळाला पकडले.

नेहमी सुटकेकरता बरेच प्रयत्न करणार्‍या वेताळाने यावेळी पकडले गेल्यावर काहीच प्रतिकार केला नाही. लहान मूल शाळा संपल्यावर बाबांच्या कडेवरून आनंदाने घरी जाते तसा वेताळ विक्रमादित्याच्या पाठीवर बसून गप गुमान जायला लागला. विक्रमादित्याने झपझप पावले उचलली. मुंबईच्या गर्दीतून मार्ग काढत राजा वेताळाला घेऊन येऊरच्या जंगलाकडे जायला लागला. नेहमी बडबड करून डोके खाणारा वेताळ एकदम गप्प होता. ते सुद्धा विक्रमादित्याला बरोबर वाटत नव्हते म्हणून त्याने वेताळाला बोलते करायला संवाद चालू केला.

विक्रमादित्य : काय रे वेताळा चांगल्या खेळपट्टीवर खराब फलंदाजी करून लवकर ऑलआऊट झाल्यावर फॉलोऑन मिळाल्यासारखी तुझी अवस्था का झाली आहे? (वेताळाला खूश करायला मुद्दाम क्रिकेटची परिभाषा विक्रमादित्याने वापरली) आखातातील देशात तुझी लाडकी स्पर्धा चालू आहे आणि त्या सामन्याचा आनंद न घेता तू वानखेडे स्टेडियमवर कसा पडला होतास?

वेताळ : खरं सांगू राजा मला क्रिकेटचे अजीर्ण झाले आहे.

विक्रमादित्य : तुला आणि क्रिकेटचे अजीर्ण...मला नाही पटत... मला आठवते की दिवसभर सामना बघून परत त्याच खेळाचे हायलाईटस् तू चवीने बघायचास...मग आता असे काय झाले की तुझे क्रिकेट बघण्याचे प्रेम कमी झाले?

वेताळ : हापूसचा आंबा बारामाही मिळू लागला तर कसे वाटेल तशी माझी अवस्था झाली आहे.

विक्रमादित्य : नाही समजले मला जरा समजावून सांग ना.

वेताळ : अरे राजा हापूसच्या आंब्याची ८-९ महिने आतुरतेने वाट बघायची आणि मग एप्रिल महिना आला की हापूस आंब्यावर तुटून पडायचे यातच मजा आहे ना? जर तोच आंबा केळी जशी बारा महिने मिळतात तसा मिळू लागला तर त्याची मजा कशी राहील मला सांग. अगदी तशीच अवस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेटची झाली आहे. एक काळ असा होता की आम्ही क्रिकेटप्रेमी लोक कसोटी सामन्याची आतुरतेने वाट बघायचो. दोन आंतरराष्ट्रीय संघ एकमेकांना भिडताना बघायला मिळणार या विचारांनी रोमांच फुलायचे. आता काय झाले आहे बघ ना. सतत क्रिकेटचे सामने होत असल्याने त्याची लज्जत कमी झाली आहे रे.

विक्रमादित्य : असे खरच झाले आहे का? इतके क्रिकेट झाले आहे का?

वेताळ : नाही तर काय. भारतीय संघाचे वेळापत्रक बघ म्हणजे कळेल तुला. अर्धवट संपलेली आयपीएल स्पर्धा सोडून भारतीय संघ इंग्लंडला गेला जिथे त्यांनी वर्ल्ड टेस्ट चँम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भाग घेतला. त्यानंतर ५ कसोटी सामन्यांची मालिका भारत विरुद्ध इंग्लंड दरम्यान आयोजित केली गेली होती ज्यातील शेवटचा सामना कोरोनाच्या शिरकावामुळं रद्दं केला गेला. दुसर्‍या दिवशी खेळाडू आखाताकडे रवाना झाले आणि उरलेली आयपीएल स्पर्धा खेळू लागले. आता आयपीएल स्पर्धा संपल्यावर दहाव्या दिवशी, म्हणजेच २४ ऑक्टोबरला, भारतीय संघ पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानसमोर टी-ट्वेन्टी विश्‍व करंडक स्पर्धेतला सामना खेळणार आहे. टी-ट्वेन्टी विश्‍व करंडकाचा अंतिम सामना १४ नोव्हेंबरला तारखेला असेल आणि १७ नोव्हेंबरला भारत विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानचा सामना जयपूरला आयोजित केला गेला आहे. काय अर्थ आहे या वेळापत्रकाला मला सांग. किती ते क्रिकेट... कशी मजा येणार सामन्याला जेव्हा भारतीय खेळाडू इतके मनाने आणि शरीराने थकलेले असणार?

विक्रमादित्य : बाप रे खरंच कठीण आहे हे वेळापत्रक. थोडक्यात सामन्यांचे वेळापत्रक ठरवणारी बीसीसीआयची समिती कॅलेंडरमधील मोकळ्या तारखा बघून सामने कोंबत आहे असा भास होतोय मला. तरीच मला समजले नाही की यंदाच्या आयपीएल स्पर्धेतील सामन्यांबद्दल आणि कोणत्या संघाने काय प्रगती केली आहे याबद्दल जास्त चर्चा का होत नाहीये.

वेताळ : संघ मालकांनी कितीही बडदास्त ठेवली आणि चांगली कामगिरी करायला प्रोत्साहित केले तरी खेळाडू कुठून आणणार ती ऊर्जा मला सांग. हेच कारण आहे की भल्या भल्या संघांना क्षमतेला न्याय देणारी कामगिरी करणे यंदा जमलेले नाहीये. ना गोलंदाजांच्या लयीत अपेक्षित चमक आहे ना फलंदाजांच्या फटक्यात पूर्वीचा धमाका आहे. आत्ताचा खेळ म्हणजे मला ‘थकलेल्या क्रिकेटची कहाणी’ वाटत आहे. खेळाडू आणि प्रेक्षक चाहते सगळेच अति क्रिकेटने थकलेले आहेत.

विक्रमादित्य : तुझ्या म्हणण्यात तथ्य आहे वेताळा. कारण जेव्हा जेव्हा मी कोणता सामना चालू असताना डोकावून बघितले तेव्हा ती नशा नाही आली. याचा परिणाम प्रत्यक्ष खेळावर नक्कीच झाला असणार.

वेताळ : झाला ना...आणि वाईट म्हणजे खराब झालाय. क्रिकेटच्या खेळातील कौशल्याची आराधना करण्यापेक्षा खेळाडू व्यायामावर आणि चित्रं विचित्र फटके मारण्याच्या सरावावर जास्त लक्षं केंद्रित करत आहेत. जरा खेळपट्टी गोलंदाजांना मदत करणारी असली की फलंदाजांची तारांबळ उडताना दिसत आहेत. शास्त्रशुद्ध फलंदाजी करून गोलंदाजांना चोख उत्तर देणारे ऋतुराज गायकवाड सारखे मोजकेच फलंदाज आढळतात. बाकी खेळाडू आणि त्यांचा खेळ म्हणजे अळवावरचे पाणी वाटते मला. कधी ओघळून जाईल सांगता येत नाही.

विक्रमादित्य : मग उपाय काय आहे यावर वेताळा? कारण असेच होत राहिले तर सामन्यांची संख्या वाढेल पण मूळ क्रिकेटच्या खेळाच्या दर्जाला धक्का लागेल.

वेताळ : अगदी कळीचा मुद्दा मांडलास तू राजा. मला वाटते संयोजक वेळापत्रक वाढवतच राहणार आणि जागा मिळेल त्या तारखांना सामने कोंबत राहणार. खेळाडूंनी विचार करायला हवा की आपल्या खेळात अमूलाग्र्र सुधारणा करायला क्रिकेटची साधना करायला वेळ मिळतो आहे का? पट्टीचा गवई जसा वर्षभर रियाज करतो आणि मग तानसेन किंवा सवाई गंधर्व उत्सवात येऊन ताकदीने गाणे सादर करतो. तसे खेळाडूंना करावे लागेल. काही सामना इतकेच काय एखादी मालिका सोडून देऊन मनाला शरीराला विश्रांती देऊन सराव करून मग ताज्या मनाने नव्या सामन्याला सामोरे जाता यायला पाहिजे. मनातील अनिश्चितता किंवा मागे पडण्याची भिती दूर करायची हिंमत दाखवावी लागेल.

विक्रमादित्य : वा वेताळा वा...काय मुद्दे मांडले आहेस तू...वा वा... मी त्याचे टाळ्या वाजवून कौतुक करतो.

असे म्हणत विक्रमादित्याने दोनही हात सोडून टाळ्या वाजवल्या. तीच संधी साधून वेताळाने पळ काढला आणि तो समोरच्या नारळाच्या झाडावर जाऊन लटकू लागला.

वेताळ : विक्रमादित्या माझ्यावरची पकड सोडून तू मोठी चूक केली आहेस. कारण बाकी सामने मी सोडू शकतो पण टी-ट्वेन्टी विश्‍व करंडक बघायचा कसा सोडेन. मी आता दुबईकडे प्रयाण करणार आहे. बाय बाय...

असे म्हणत वेताळ विमानाच्या पंखाला लटकण्याकरता विमानतळाकडे जाऊ लागला आणि विक्रमादित्य हात चोळत जंगलाच्या रस्त्यावर चालू लागला.

loading image
go to top