संधी गमावल्याचं शल्य (सुनंदन लेले)

संधी गमावल्याचं शल्य (सुनंदन लेले)

ऐंशीपेक्षा जास्त दिवसांच्या दौऱ्यात तीन टी-20 सामने, तीन एकदिवसीय सामने आणि पाच कसोटी सामने खेळूनसुद्धा लंडनहून दिल्लीच्या विमानात बसताना विराट कोहलीची बॅग रिकामी राहिली आहे. प्रचंड उत्साहानं चालू झालेल्या दौऱ्याची सांगता खूप निराशाजनक झाली आहे. भारतीय संघानं टी-20 मालिका जिंकल्यानं वाटलं होतं, की भारतीय संघ योग्य तयारीनं मैदानात उतरल्याचा फायदा झालाय. त्यानंतर मात्र भारतीय संघाला चढती कमान नाही, तर उतरती कळा लागली. कसोटी मालिकेत 4-1 सपाटून मार खाऊन टीकेचा धनी होऊन भारतीय संघ मायदेशी परतला आहे. 

या वर्षाच्या सुरवातीला भारतीय संघ दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. निसर्गसुंदर केपटाऊन कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाजांनी कष्ट करून विजयाची संधी निर्माण करून दिली होती. विजयाकरता 208 धावांचा पाठलाग करायचा होता. भारताचा डाव 135 धावांमध्येच आटोपला. दुसऱ्या कसोटी सामन्यात सेंच्युरीयन मैदानाच्या त्या मानानं संथ खेळपट्टीवर विजयाकरता 287 धावा करायचं आव्हान फलंदाजांना पेललं नाही. अवघ्या 151 धावांवर भारताचा दुसरा डाव आटोपला. फलंदाज अपेक्षित कामगिरी करत नाहीत, हेच पराभवाचं कारण समोर येत असताना तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघानं खरंच चांगला खेळ करून जोहान्सबर्गच्या वॉंडरर्स मैदानावर विजय संपादला. 

मालिका गमावूनही मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यानं भारतीय संघाची जोरदार पाठराखण करताना स्तुतीसुमनं उधळली. संघातल्या उणिवांकडं जास्त जोर न देता शास्त्रीनं फक्त सकारात्मक मुद्दयांवर रोख ठेवला. खरं तर त्या मालिकेत भारतीय संघ व्यवस्थापनानं संघनिवडीबाबत केलेल्या चुका आणि फलंदाजांनी केलेल्या सुमार कामगिरीवर मनमोकळेपणानं बोलायला हवं होतं. झालेल्या चुका मान्य करायला हव्या होत्या. शेवटच्या पत्रकार परिषदेत 'चुका मान्य केल्याच नाही तर सुधारणा होणार तरी कशी,' नेमका हाच प्रश्न विचारला होता. 

भारतीय गोलंदाज दक्षिण आफ्रिकेतल्या आणि आत्ता संपलेल्या इंग्लंड दौऱ्यातल्या कसोटी सामन्यात सातत्यानं चांगली कामगिरी करत होते- ज्यामुळं सामन्यावर पकड मिळवायची संधी निर्माण होत होती. 'दक्षिण आफ्रिकेतील मालिका आम्ही जिंकली असती,' हे म्हणणाऱ्या भारतीय संघ व्यवस्थापनानं फलंदाजांनी संघाला धोका दिला हे उघडपणे मान्य केलं नसलं, तरी ते उघड सत्य आहे. इंग्लंड दौऱ्यात सलामीची जोडी सातत्यानं अपयशी ठरली. अजिंक्‍य रहाणे आणि चेतेश्वर पुजारानं थोडी धुगधुगी दाखवली; पण त्यात सातत्याचा मोठा अभाव होता. पुजाराची साउदमप्टनची शतकी खेळी अफलातून होती; तसंच अजिंक्‍य रहाणेची ट्रेंट ब्रिज कसोटीतल्या पहिल्या डावातल्या 80 धावांची खेळी मस्त होती. हे कौतुक करताना 'उत्तम' खेळीनंतरच्या डावात जो फलंदाज किमान 'चांगली' खेळी उभारतो, त्यालाच क्रिकेटमध्ये मान दिला जातो. पुजारा-रहाणेला मान मिळाला नाही- कारण त्यांनी दोन सलग डावात चांगला खेळ केलाच नाही. मधल्या फळीत तर दाणादाण उडाली. विकेटकीपर म्हणून खेळलेला दिनेश कार्तिक फलंदाजी करताना साफ अपयशी ठरला. तसंच नंतर रिषभ पंतला इंग्लिश गोलंदाजांनी निष्प्रभ ठरवलं. चार कसोटी सामन्यांत हार्दिक पंड्याही फलंदाज म्हणून प्रचंड अपयशी ठरला. 

शेवटच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात लोकेश राहुल आणि रिषभ पंतनं अफलातून शतकं केली- ज्याला मराठी भाषेत 'वरातीमागून घोडं' म्हटलं जातं. 

विराटनं दर्जा दाखवला 
भारतीय फलंदाजी कोलमडून पडताना खंबीर उभा राहिला तो विराट कोहली. गेल्या दौऱ्यातल्या अपयशाची आठवण स्थानिक माध्यमांनी पहिल्या कसोटी सामन्याअगोदर बऱ्याच वेळा मुद्दाम काढली. विराट कोहली दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून इंग्लंडमध्ये कसोटी सामना खेळायला टपून बसला होता. विराटनं बोलण्यावर नाही, तर खेळण्यावर लक्ष केंद्रित केलं. पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात मोठं शतक झळकावून कोहलीनं खिशातून रुमाल काढला. नंतर शेवटच्या डावातला अपवाद वगळता प्रत्येक डावात विराटनं सुंदर फलंदाजी करून स्थानिक माध्यमांच्या तोंडात जणू तो रुमाल कोंबला. 

विराटला मोठ्या धावा करण्यात यश मिळालं- कारण त्यानं इंग्लंडमध्ये फलंदाजी करताना लागणारं तंत्र आत्मसात केलं. अहंकार मागं ठेवून बरेच चेंडू सोडले. बऱ्याच चांगल्या चेंडूंना मान देत नुसतेच खेळून काढले. पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत कोहली-अँडरसन द्वंद्व चांगलंच रंगलं. प्रेक्षकांनी आणि माजी खेळाडूंनी दर्जेदार स्विंग गोलंदाजाला दर्जेदार फलंदाजांनं कसं धीरानं तोंड दिलं हे बघताना मनापासून दाद दिली. कोहलीच्या पराक्रमाला बाकी फलंदाजांनी अजिबात साथ दिली नाही, हेच पराभवाचं मुख्य कारण ठरलं. 

सगळेच संघ 'गली में शेर' 
गेल्या काही वर्षांत क्रिकेटला भेडसावणारी मुख्य समस्या आहे, की कोणताच संघ दौऱ्यावर जाऊन वरचढ खेळ करून यजमान संघाला नेस्तनाबूत करत नाहीये. सगळेच संघ 'अपनी गली में शेर' झाले आहेत. नजीकच्या भूतकाळात दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियात जाऊन कसोटी मालिका जिंकून दाखवली तो अपवाद वगळता बाकी कोणत्याही संघाला परदेश दौऱ्यातल्या कसोटी मालिकेत भन्नाट कामगिरी करता आलेली नाही. 

इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, भारत सोडा हो- त्या मानानं कमजोर भासणाऱ्या श्रीलंका किंवा बांगलादेश संघाला मायदेशात खेळताना हरवणं दौऱ्यावर आलेल्या संघांना जमलेलं नाही. ज्या दक्षिण आफ्रिकेच्या संघानं ऑस्ट्रेलियाला दौऱ्यावर जाऊन हरवलं त्याच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला श्रीलंकेनं घरच्या मैदानांवर चारी मुंड्या चीत केलं. 

भारतीय संघाला भारतात हरवणं जवळपास अशक्‍य झालं आहे. स्टीव्ह स्मिथच्या ऑस्ट्रेलियन संघानं जरा चमक दाखवली तरीही भारतीय संघानं शेवटी त्यांना यशापासून चार नाही दहा हात लांब ठेवलंच. भारतीय संघाला मायदेशात मिळणारं मोठं यश परदेश दौऱ्यातल्या अपयशाचं एक कारण ठरत आहे. भारतात मोठ्या धावा काढणारे फलंदाज परदेश दौऱ्यात फारच निराशाजनक खेळ करताना दिसले आहेत. एकटा विराट कोहली सातत्यानं कोणत्याही संघासमोर आणि कोणत्याही मैदानावर मोठ्या धावा करताना बघायला मिळाला आहे. 

'जीटीयू' रोगाचे बळी 
भारतीय क्रिकेटला सध्या 'जीटीयू' रोगानं पछाडलेलं आहे. तुम्ही म्हणाल, की हा कुठला नवा रोग? क्रिकेटमध्ये 'गिरे तो भी टांग उपर' या प्रकाराला 'जीटीयू' म्हणतात. या रोगाच्या लक्षणात रोगी चुकांकडं किंवा नकारात्मक गोष्टींकडं वळतच नाही. चुकांवर पांघरूण घालताना फक्त सकारात्मक गोष्टी बोलत राहतो. उदाहणार्थ, सांघिक अपयशाबद्दल 'जीटीयू' करताना 'भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यात अपयशी ठरला, तरी आम्ही निदान टक्कर दिली...भारतीय संघाला मायदेशात कोणी आव्हानपण देऊ शकत नाही,' असं बोललं जातं. फलंदाजांच्या अपयशाबद्दल बोललं जात नाही- उलट सांगितलं जातं, की 'फक्त आपल्याच फलंदाजांना नाही, तर समोरच्या संघातल्या फलंदाजांना तरी कुठं यश मिळाले आहे?' हरण्याबद्दल जास्त वाच्यता होत नाही- 'आव्हान कसं निर्माण केलं', 'टक्कर कशी दिली' याबद्दल बोललं जातं. 

रवी शास्त्रीनं संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी हाती घेतल्यापासून संघातल्या खेळाडूंना सतत सकारात्मक वातावरणात ठेवलं जातं, हे मान्य करावंच लागेल. त्याचा चांगला परिणाम होतो. विराट कोहली आणि रवी शास्त्री दोघंही खूप सकारात्मक विचारांचे आणि आत्मविश्वासानं भारलेले असतात. खेळाडूंना पाठिंबा देताना ते कोणतीही कसर सोडत नाहीत. मात्र, दोघंही क्रिकेटच्या डावपेचांचा खूप जास्त विचार करून निर्णय घेण्यापेक्षा अंतर्मनातल्या संकेतांवर भरवसा जास्त ठेवतात, ही अडचण किंवा चूक होते. संघनिवडीबाबत दोघं मोठ्या चुका करतात- ज्याचा थेट परिणाम सामन्यावर होतो. एकदिवसीय सामन्यातल्या संघनिवडीला जरा झाकता तरी येतं. कसोटी सामन्यात संघनिवड चुकली, तर त्याचा फटका पाच दिवस सहन करावा लागतो. 

तेव्हाच सुधारणा शक्‍य आहे 
बीसीसीआय आणि भारतीय संघ व्यवस्थापनाला चूक मान्य करायला शिकणं गरजेचं आहे. एकामागोमाग एक स्पर्धा खेळवून बीसीसीआय खेळाडूंना जणू घाण्याला जुंपलेले बैल बनवत आहे. मालिकांचं आयोजन करताना कॅलेंडरमध्ये जागा कधी आहे, इतकंच बीबीसीआय बघत आहे. खेळाडूंना विश्रांती मिळण्याचा विचार केला जात नाहीये. ऐंशीपेक्षा जास्त दिवसांचा खडतर इंग्लंड दौरा करून भारतीय संघ तीन दिवसांत आखातात एशिया कप स्पर्धेत खेळायला जातो आहे. ती स्पर्धा संपली, की लगेच एका आठवड्यात वेस्ट इंडीजसमोरची मालिका सुरू होत आहे. ती मालिका संपली, की एका आठवड्यात संघ ऑस्ट्रेलियाच्या दोन महिन्यांच्या दौऱ्यावर जात आहे. हे कॅलेंडर मी एवढ्याचसाठी सांगतो आहे- कारण एकामागोमाग एक सामने, स्पर्धा आणि दौरे आयोजित करून बीसीसीआयची तिजोरी खच्चून भरत आहे आणि दुसरीकडं खेळाडूंमधली ताकद झपाट्यानं कमी होत आहे. बीसीसीआयला ही चूक मान्य होत नाही, हा मोठा विनोद आहे. 

विराट कोहली शेवटच्या कसोटी सामन्यानंतर भेटला, तेव्हा त्यानं काही गोष्टी मान्य केल्या. ''शेवटी दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघ पराभूत झाला आहे, ते मोक्‍याच्या क्षणी सर्वोत्तम कामगिरी करता आली नाही म्हणून. बऱ्याच वेळा दोनशे धावांचा पाठलाग करणं भारतीय संघाला झेपलेलं नाही. फलंदाजीची फळी सातत्यानं बदलल्यानं काही खेळाडू मनातून अस्थिर झाले असण्याची शक्‍यता आहे; पण हे लक्षात ठेवलं पाहिजे, की फलंदाजांनी सातत्याचा अभाव दाखवून संघव्यवस्थापनाला तशी संधी दिली आहे. आम्ही खेळाडूंशी बोललो आहोत. निर्णायक क्षणी अपेक्षित कामगिरी करायला आणि सातत्य राखायला काय करता येईल, याचा विचार एकत्र बसून केला आहे. एक नक्की आहे, की ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर यश मिळवायला पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावात दणकट कामगिरी बॅट आणि बॉलनं कशी करता येईल हे आम्ही ठरवणार आहोत,'' निग्रही विराट म्हणाला. 

चुका मान्य करायची मानसिकता बीसीसीआय आणि संघव्यवस्थापनाकडं आली, तरच सुधारणेची योजना बनवता येईल. हातून घडलेल्या चुकांची पाठराखण केली, तर भारतीय संघावरचा 'गली में शेर' शिक्का पुसायची संधी निर्माण होणार नाही. विराट कोहली भारतात परतताना रिकाम्या बॅगेत हेच काही प्रश्न फक्त भरून आणतो आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com