महिला क्रिकेटसाठी इच्छाशक्तीची गरज!

भारतीय महिला क्रिकेटची अवस्था आज अगदी अशीच झाली असल्याची समजूत अधिक पक्की होत आहे. २००६ मध्ये भारतीय महिला क्रिकेटला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आपल्यात सामावून घेतलं.
Womens Cricket
Womens CricketSakal

हिंदी साहित्यातले थोर लेखक मुन्शी प्रेमचंद यांची एक कथा मला आठवते. कथेची जी नायिका असते तिचे एकच स्वप्न असते, ते म्हणजे जमीनदाराच्या घरची सून व्हायचं आणि नाकात मोठी नथ घालून मिरवायचं. कर्मधर्म संयोगानं खरंच त्या नायिकेचं लग्न गावातील सर्वात श्रीमंत जमीनदाराच्या मुलाबरोबर होतं. लग्नात नाकात चांगली नथ घालून, नटून थटून ती स्वतःला खूप मिरवून घेते. तिला मनोमन वाटतं की आपलं स्वप्न साकारलं गेलं. घरात सुबत्ता असल्यानं नटण्यामुरडण्याला भरपूर वाव असतो. नायिकेच्या पतीची कामात प्रगती झाली की जमीनदार सुनेची अगोदरची नथ मोडून नवीन थोडी नथ आणून द्यायचा. नायिकेला मजा वाटायची कारण तिच्या मैत्रिणी खूप कौतुकानं नथीकडे बघत रहायच्या. जसजसे दिवस पुढं सरकू लागतात तसं तिला समजतं की घरात महिलांना काहीच स्वातंत्र्य किंवा त्यांच्या शब्दाला किंमत नाही. घरातील महिलांचा उपयोग समाजात मिरवण्याकरता आणि आपली श्रीमंती कशी वाढत आहे हे दाखवण्याकरता केला जातोय.

घरातील श्रीमंती वाढत जाते तसं नायिकेचा नवरा कामात अधिकाधिक गुरफटत जातो. घरात पैसा येऊ लागतो तसा नथीचा आकार बदलत जातो. दोन वर्षात परिस्थिती अशी येते की नथ इतकी मोठी होते आणि ती तिच्याच पदरात अडकू लागते. नथीच्या वाढत्या वजनाने नाकाची पाळी फाटायची वेळ येते. परिणामी धक्का लागला की डोळ्यातून पाणी येऊ लागते. जमीनदार ‘भरल्या घरात डोळ्यात पाणी यायला काय झाले’, असे म्हणून सुनेवर डाफरतो. मग सुनेला कळून चुकतं की नाकात मोठी नथ घालून मिरवणे म्हणजेच सुख नाही. पती पत्नीच्या नात्यातील ओलावा - आपुलकी जास्त मोलाची असते. श्रीमंत घरात नांदत असून तिला आपण सुख समाधानाच्या पातळीवर गरीब असल्याची भावना छळू लागते.

भारतीय महिला क्रिकेटची अवस्था आज अगदी अशीच झाली असल्याची समजूत अधिक पक्की होत आहे. २००६ मध्ये भारतीय महिला क्रिकेटला भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आपल्यात सामावून घेतलं. आज १५ वर्षांचा काळ उलटून गेला पण बीसीसीआय अजूनही महिला क्रिकेटला योग्य मान किंवा संधी देत नाही. पुरुषांचं क्रिकेट ही दुभती गाय असल्यानं सर्व लक्ष तिच्याकडे देण्यात बीसीसीआय धन्यता मानत आहे. थोडक्यात १५ वर्ष संसार करूनही भारतीय महिला क्रिकेटची अवस्था श्रीमंताघरची सून इतकीच सुधारली आहे

नुकतंच बीसीसीआयने खेळाडूंच्या कराराच्या श्रेणी जाहीर केल्या. यात पुरुषांच्या क्रिकेटपटूंच्या सर्वांत वरच्या श्रेणीला वर्षाला प्रत्येकी ७ कोटी रुपये करारानुसार देण्यात येणार आहेत तर दुसर्‍या बाजूला महिला क्रिकेटपटूंच्या सर्वोत्तम श्रेणीला वर्षाला करारापोटी फक्त पन्नास लाख रुपये देऊ करण्यात आले आहेत. एकीकडे पुरुष खेळाडूंच्या एकूण करार रकमेचा आकडा ९६ कोटींचा आहे आणि महिलांच्या कराराचा एकूण आकडा अवघा ५ कोटी १० लाखांचा आहे. पुरुषांच्या क्रिकेटमधून मिळणारी प्राप्ती खूप मोठी असल्याने बीसीसीआय त्यांना कराराची घसघशीत रक्कम द्यायला कधीच हुज्जत घालत नाही. याचा विचार करता महिला क्रिकेटचा योग्य प्रसार किंवा प्रचार करायचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे असे अजूनतरी वाटत नाहीये.

विराट कोहलीच्या संघाला विश्रांती न देता सतत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या रिंगणात फिरते ठेवण्याकरता बीसीसीआय धडपडत असते. सामन्यांचे वेळापत्रक आखणारी समिती सामन्यांची आखणी करताना फक्त तारखांच्या मोकळ्या जागा बघते की काय असे वाटते. २०२० च्या न्युझीलंड दौर्‍यावर भारतीय संघ ऑकलंडला उतरला त्याच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. बीसीसीआय हेलिकॉप्टरने संघ थेट मैदानात उतरवून सामना खेळायला लावून दौर्‍याची सुरुवात करेल की काय अशी भिती वाटू लागली होती. दुसर्‍या बाजूला महिला क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय क्रिकेट कधी खेळायला मिळेल याची चातकासारखी वाट बघत बसतो. ‘आयपीएल’ पूर्ण करण्याकरता सर्वतोपरी प्रयत्न करणाऱ्या ‘बीसीसीआय’ला महिलांकरता तशी स्पर्धा दरवर्षी भरवण्याकरता उत्साह दिसत नाही. ७ वर्षांच्या कालखंडानंतर भारतीय महिला संघ कसोटी सामना खेळणार आहे हे सत्य जाणून घेतले पाहिजे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्याकरता थोडी पावले उचलत आहे ज्याला अध्यक्ष सौरव गांगुली पाठिंबा देत आहेत. ‘नजर हटी दुर्घटना घटी’, असा काहीसा प्रकार दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेकरता संघ निवड करताना घडला. सौरव गांगुली आणि जय शहा यांनी जरा कानाडोळा केला म्हणल्यावर महिला क्रिकेटमध्ये जोरदार राजकारण करणार्‍या फळीने उचल खाल्ली आणि चांगल्या खेळाडूंना विश्रांतीच्या देण्याच्या नावाखाली संघातून बाहेर ठेवले गेले आणि कामगिरी आणि क्षमता दोन्ही नसणाऱ्या खेळाडूंना भारतीय संघात घुसवण्यात आले. असे समजते की इंग्लंड दौर्‍याअगोदर निवड समितीने चर्चा करण्याअगोदर सौरव गांगुलीने सर्व खेळाडूंच्या कामगिरीचा शहानिशा करून निवड समिती सदस्यांना जाणीव करून दिली म्हणून शेफाली वर्मा, शिखा पांडे आणि तानिया भाटीया सारख्या चांगल्या खेळाडू परत भारतीय संघात दाखल केल्या गेल्या.

भारतीय महिलांना सात वर्षांनी का होईना कसोटी सामना खेळायला मिळणार आहे तसेच वर्षाच्या अखेरीला भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरुद्ध दिवस रात्रीचा म्हणजेच पिंक बॉल कसोटी सामनाही खेळणार असल्याची घोषणा करून आपण भारतीय महिला क्रिकेटच्या प्रगतीकरता कटिबद्ध असल्याचे बीसीसीआयने दाखवले आहे, जी गोष्ट थोडी आशादायक आहे.

सामन्यांचे प्रमाण वाढवा

२०२०-२१ मध्ये झालेल्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍यात असंख्य अडचणी येऊनही घवघवीत यश संपादन करता आले कारण बीसीसीआयने अत्यंत शिस्तबद्धप्रकारे भारतीय ‘अ’ संघाच्या जडणघडणीवर लक्ष दिले आहे. भारतीय क्रिकेटची दुसरी फळी तयार असल्याने कित्येक ज्येष्ठ खेळाडूंना दुखापत होऊनही नवोदित खेळाडूंनी ऑस्ट्रेलियाला टक्कर देत त्यांना पराभूत करण्याची किमया साधली. बीसीसीआयला भारतीय महिला क्रिकेटमध्ये लक्षणीय सुधारणा करायची प्रामाणिक इच्छा असेल तर स्थानिक पातळीवर महिला खेळाडूंना जास्त सामने खेळायला मिळायला हवेत आणि त्याकरता स्थानिक स्पर्धा भरवण्यावर भर दिला गेला पाहिजे. भारतीय महिला ‘अ’ संघाचे दौरे आयोजित केले गेले पाहिजेत. बीसीसीआयच्या पदाधिकार्‍यांनी महिला क्रिकेटला योग्य प्रसिद्धी देण्याकरता वेगळी यंत्रणा बसवायला हवी. आणि सरतेशेवटी पुरुष खेळाडूंच्या आणि महिला खेळाडूंच्या करार रकमेतली दरी थोड्या प्रमाणात तरी कमी व्हायला हवी. भारतीय महिला क्रिकेटला फक्त श्रीमंताघरची सून असा दर्जा देता कामा नये तर योग्य मान, योग्य संधी दिली गेली पाहिजे. मनात आणले तर बीसीसीआयला काहीच अशक्य नाही. प्रश्न फक्त इच्छाशक्तीचा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com