esakal | जिभेला लगाम हवा...
sakal

बोलून बातमी शोधा

Saptarang

जिभेला लगाम हवा...

sakal_logo
By
सुनंदन लेले saptrang@esakal.com

शब्द हे शस्त्र असतात ते जपून वापरा असे जाणते लोक सतत सांगत असतात. त्याचप्रमाणे शब्द हवेत विरून जातात पण त्याचा अर्थ ऐकणाऱ्यांच्या मनात राहिलेला राहतो. चांगले शब्द मनाच्या कुपीत अत्तरासारखे दरवळत राहतात. आणि वाईट शब्द चिघळणाऱ्या जखमेसारखे त्रास देत राहतात. बोलून गेलेले शब्द तुमचा पिच्छा पुरवतात आणि तुम्हांला जेरीस आणतात असेही आता दिसून येत आहे. हे सर्व मुद्दे परत आठवण्याचे कारण आहे दक्षिण आफ्रिकेत नुकतीच झालेली सुनावणी.

दक्षिण आफ्रिकेत नुकतीच सामाजिक न्याय आणि राष्ट्र उभारणी आयोगासमोर एक सुनावणी पूर्ण झाली ज्यात क्रिकेटच्या खेळात वर्णद्वेष कसा झाला? या बद्दल बोलले गेले. ज्या काळात ग्रॅमी स्मिथच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेच्या संघाने जगभर चांगला खेळ करून दाखवला त्या सुवर्ण काळाला वर्णद्वेषी टिप्पणीची काळी किनार होती हे आता समोर आले आहे.

अत्यंत तरुण वयात ग्रॅमी स्मिथला दक्षिण आफ्रिकन संघाच्या नेतृत्वाची धुरा सोपवली गेली होती. वर्णद्वेषाच्या काळात झालेल्या अन्यायाला दाद मिळावी म्हणून सरकारने दक्षिण आफ्रिकन संघात किमान दोन खेळाडू कृष्णवर्णी किंवा गहूवर्णी असावेत असा आदेश काढला होता. मखाया एन्टीनी, निकी बोये, पॉल अ‍ॅडम्स, अ‍ॅशवेल प्रिन्स हे खेळाडू त्या आदेशानुसार संघात आले होते. मार्क बाऊचर या खेळाडूंना उद्देशून चुकीची टिप्पणी करायचे. हे स्वतः बाऊचरने मान्य केले आहे.

पॉल अ‍ॅडम्सला आपण ‘ब्राऊन शीट’ म्हणजेच गहूवर्णी घाण म्हणायचो असे मान्य करताना बाऊचरला त्याने बोललेले शब्द गिळायची वेळ आली आहे. सामना जिंकल्यावर आनंदाच्या भरात गाणी गाताना बर्‍याच वेळा संघातील अशा खेळाडूंना उद्देशून चुकीचे बोलले गेले असल्याची कबुली बाऊचरने दिली आहे आणि आपल्याला त्याचा खूप पश्चात्ताप होत असल्याचे त्याने म्हणले आहे. ज्या खेळाडूंना आपण असे चुकीचे वागून दुखावले आहे त्यांची त्यांच्या घरी जाऊन माफी मागण्याची तयारी बाऊचरने दाखवली आहे. नेल्सन मंडेला जिवंत असताना दक्षिण आफ्रिकन संघात अशा गोष्टी होत होत्या याचे दुख: जास्त होते.

रंगलेल्या युरो कप फुटबॉल स्पर्धेचा अंतिम सामना लंडनच्या वेम्ब्ली स्टेडियमवर झाला होता. अंतिम सामन्यात धडक मारलेल्या इंग्लंड संघावर कौतुकाचा वर्षाव होत होता. अंतिम सामन्यात निर्धारीत वेळेत १-१ बरोबरी झाली. अतिरिक्त वेळेत नवीन गोल झाला नाही आणि स्पष्ट निकाल लागला नाही म्हणून सामना पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला. पेनल्टी शूटआऊटमध्ये प्रत्येकी दोन किक्स घेतल्या गेल्या असताना इंग्लंड संघ पुढे होता. मोठ्या प्रतीक्षेनंतर इंग्लंड फुटबॉल संघाला मोठे विजेतेपद मिळणार असे वाटू लागल्याने इंग्लिश फॅन्स आनंदाने बेभान झाले होते. पण झाले भलतेच पुढच्या तीनही किक्स इटलीच्या गोलकिपरने वाचवल्या आणि इटली संघाने युरो कप हाती घेतला. तीन पेनल्टी किक घेताना चुकलेले जेडन सँचो, मार्कस् रॅशफोर्ड आणि बुकायो साका हे खेळाडू श्वेतवर्णी नव्हते याचा चाहत्यांना राग आला आणि त्यानंतर इंग्लंडमध्ये त्या खेळाडूंवर कमालीची घाणेरडी वर्णद्वेषी टिका केली गेली.

जगभर त्या कृतीचे पडसाद उमटले कारण इंग्लिश फुटबॉल फॅन्सनी तीन खेळाडूंना शेलक्या शब्दात टोमणे मारत छळ केला. शेवटी पंतप्रधान बोरीस जॉन्सन यांना जाहीर विधान करून खेळाडूंना दिलासा द्यावा लागला आणि त्यानंतर पोलिसांनी नतद्रष्ट फुटबॉल कंटकांना अटकही केली.

रॉबिन्सनने केलेल्या चुका

सुंदर स्विंग गोलंदाजी करून भारतीय फलंदाजांना हैराण करून सोडलेल्या ओली रॉबिन्सनला कसोटी पदार्पणात यश मिळाल्यानंतर संघातून बाहेर ठेवले गेले होते. रॉबिन्सनने चांगली कामगिरी करून दाखवूनही त्याला बाहेरचा रस्ता दाखवला गेला कारण तरुण वयात ओली रॉबिन्सनने आपल्या मित्रं मैत्रिणींना उद्देशून आणि महिलांसंदर्भात खराब भाषेत ट्विट करून चेष्टा उडवली होती. ८-९ वर्षांनी केलेल्या चुकीच्या वर्तनाचे तेच भूत रॉबिन्सनच्या मानगुटीवर येऊन बसले. इंग्लंड क्रिकेट बोर्डाला रॉबिन्सनला वगळण्यावाचून पर्याय उरला नाही. रॉबिन्सनने बिनशर्त माफी मागितली तरी वादळ शमले नाही. इंग्लंडच्या संघाने भारताविरुद्धच्या कसोटी सामन्यादरम्यान सामना चालू होण्याअगोदर राष्ट्रगीत गायले जात असताना काळे टी-शर्ट घालून वर्णद्वेषी टिप्पणीला जागा नसल्याचा स्पष्ट संदेश जगाला दिला. इंग्लंडमध्ये वर्णद्वेषाची झाक वारंवार दिसून येते. कितीही कायदे नियम केले तरी अशा प्रसंगांनंतर इंग्लंडमधील काही लोकांच्या मनातील चुकीचे विचार दूर झालेले नाहीत हे नक्की कळते आहे.

वर नमूद केलेल्या चुका फक्त परदेशात होत आहेत असे अजिबात नाही. ऑलिंपिक मधल्या यशानंतर भारतात आपल्याच खेळाडूंची जात बघितली जात होती ही गोष्ट लांच्छनास्पद नाहीये का? खेळ हे मोजक्या काही क्षेत्रांपैकी असे एक क्षेत्र आहे की जिथे फक्त गुणवत्तेला, मेहनतीला, कामगिरीला महत्त्व दिले जाते. जात-पात, धर्माला नाही. खेळ किंवा संघ याचा विचार करताना, सगळे गुण्यागोविंदाने एकत्र येऊन खेळतात, सर्वोत्तम खेळ करून जिंकण्याकरता सर्वस्व पणाला लावतात असेच समजले जाते. तिथेही काही नाठाळ लोकांनी भारतीय महिला हॉकी संघातील खेळाडूची जात बघितली. ऑलिंपिक सुवर्ण पदक कामगिरीचा आनंद घेताना तो ‘भारतीय’ आहे इतकेच अभिमानाने सांगणे पुरेसे नाही का वाटत?

खेळाडू आणि प्रेक्षक किंवा चाहते यांच्या विचारात खूप फरक आहे असे नाही का वाटत तुम्हांला? खेळाडू नेहमी सकारात्मक विचार करतात. कुठलीही तक्रार न करता अडचणीतून मार्ग काढतात.

त्याउलट आपण काही चाहते असे आहोत की छोट्या अडचणींना ‘संकट’ म्हणत लगेच गळाठून जातो. सतत नशिबाला दोष देऊन स्वत:चीच प्रगती रोखतो. नकारात्मक विचारांच्या अधीन जाऊन वर्तमानकाळाला धक्का लावतो. कधी या जोखडातून आपण बाहेर पडणार? कधी खेळाडूंकडून आपले नशीब आपणच घडवायला शिकणार? सांगा तुम्हांला काय वाटते सांगा.

loading image
go to top