शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही... | Learning | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pankaj adwani
शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही...

शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही...

sakal_logo
By
सुनंदन लेले sdlele3@gmail.com

जागतिक बिलियर्ड्स स्पर्धा १५ वेळा आणि जगज्जेतेपद तब्बल २३ वेळा मिळवणाऱ्या पंकज अडवानीने स्नूकर खेळातही जगज्जेतेपद पटकावले आहे. २०१८ मध्ये केंद्र सरकारनं त्याचा पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव केला होता. खरी मजा ही आहे की बिलियर्ड्स आणि स्नूकरचे राज्य तो गाजवत नाहीये तर त्याच्याशी झालेल्या मनमोकळ्या गप्पांमधून तो खेळाडू आणि माणूस म्हणून किती मस्त विचारांचा आहे हे समजले. पंकज अडवानीचे विचार मुलाखतीच्या रूपाने मांडत आहे.

स्नूकर- बिलियर्ड्स खेळामध्ये २००३ पासून तू राज्य गाजवले आहेस पंकज, हे कसे शक्य झाले आहे?

पंकज : खेळाबद्दल ठेवलेला आदर यात मुख्य भूमिका बजावतो. मी कधीच स्वत:ला अजिंक्य समजलेलो नाहीये. मला कोणी हरवूच शकत नाही अशा भ्रामक समजुतीत मी राहिलो नाही. दरवेळी सराव असो वा स्पर्धा त्याच उत्साहाने तयारीला लागलो आहे. मी मागे वळून बघितले नाही. सतत पुढच्या तयारीचा विचार करत गेलो. हेच कारण असावे की मी माझी सतत प्रगती होत राहिली.

गुणवत्ता म्हणजेच टॅलेंट या शब्दाचा वापर खूप केला जातो. पण तुझ्या लेखी गुणवत्ता, जी नैसर्गिक असू शकते, त्याला तू किती महत्त्व देतोस आणि सातत्यपूर्ण मेहनतीला किती महत्त्व देशील? इंग्रजीत ज्याला ‘पोटेन्शीयल टू परफॉर्मन्स’ म्हटले जाते तो हा भाग आहे.

पंकज : गुणवत्ता असते तशीच स्वत:वर विश्वास असणे या दोन गोष्टी माझ्याकरता महत्त्वाच्या आहेत. गुणवत्ता म्हणजे तुम्ही काय करू शकता ती क्षमता आणि स्वत:वर विश्वास म्हणजे तुमचे तुम्हांला कळणे- उमगणे की तुम्ही हे नक्की करू शकता. एक ठामपणे सांगतो की जोपर्यंत तुमचा स्वत:च्या कार्यक्षमतेवर विश्वास नाही तोपर्यंत नुसती गुणवत्ता असून काहीही होत नाही.

कोणत्याही क्रमवारीत मग ती स्थानक असो वा जागतिक. अव्वल स्थान मिळवणे किती कठीण आहे आणि ते राखणे त्याहून किती कठीण आहे ?

पंकज : २००२ -०३ मध्ये जेव्हा माझा खेळ लोक बघू लागले तेव्हा या पोराच्यात खूप गुणवत्ता आहे आणि एक दिवस हा कमाल कामगिरी करून दाखवेल असे जाणकार बोलू लागले. म्हणजेच त्याजागी पोहोचणे या करता मेहनत आहेच आणि अपेक्षांचे दडपण आहेच. पण एकदा का तुम्ही तिथे पोहोचलात की तुमचे स्वत:कडूनच्या अपेक्षांचे ओझे सुरू होते. ते बाळगून सातत्याने चांगली कामगिरी करणे याला वेगळ्या विचारांनी मेहनत करावी लागते आणि त्याच्या ध्येयासक्तीत ध्यास असावा लागतो. पहिल्या काही मोठ्या स्पर्धा जिंकल्या तेव्हा कष्ट होते पण सगळे सुरळीत झाले. त्यानंतर २००५ -०६ नंतर लोकांच्या माझ्याकडूनच्या अपेक्षा खूप वाढल्या. प्रत्येक वेळी माझा खेळ एका ठरावीक पातळीचाच झाला पाहिजे असे अपेक्षांचे दडपण मला जाणवू लागले. मला कबूल करावे लागेल की माझा भाऊ डॉ. अडवानी (जे नामांकित स्पोर्ट्स सायकॉलॉजिस्ट आहेत) यांनी मला खूप मदत केली. मला आठवते २००६ मध्ये दोहात झालेल्या आशियाई स्पर्धांच्या अगोदर मी खूप कठीण कालखंडातून जात होतो. त्यांनी मला वेगवेगळे प्रयोग आणि विचार करायला लावले. मी त्यावेळी सुवर्णपदक जिंकलो ते त्यांच्याच मार्गदर्शनामुळे. मला वाटते की जागतिक स्तरावरील खेळात मानसोपचार प्रणाली येऊन प्रचंड प्रगती झाली आहे. अजूनही भारतात क्रीडा क्षेत्रात मानसोपचार तज्ज्ञाची मदत घेण्यासाठी खेळाडू कचरतात असा माझा अनुभव आहे.

एका अर्थी तू स्वत:ला नशीबवान समजतोस का की तुला खेळाचे तंत्र शिकवणारे प्रशिक्षक मिळाले आणि असा भाऊदेखील लाभला ज्यानं तुला योग्यवेळी मार्गदर्शन केले?

पंकज : होय, होय शंकाच नाही. मला खेळाचे तंत्र शिकवणारे माझे प्रशिक्षक अरविंद साहू ज्यांना मी गुरू मानतो त्यांनी माझ्याकडून खेळाचे योग्य तंत्र घोटवून घेतले. खेळाच्या तंत्रात सुरक्षा, आक्रमण, बचाव सगळं काही त्यांनी मला शिकवले. त्यांचं मोठं योगदान आहे माझ्या यशात. त्याच्या सोबतीने मोठ्या सामन्याचे दडपण कसे हाताळायचे. मनातील हुरहुर कशी काबूत ठेवायची. वर्तमानकाळावर लक्ष केंद्रित कसे करायचे हे सगळे माझ्या भावानं श्रीनं मला समजावलं. म्हणून मी म्हणेन की या दोन माणसांमुळेच आज मी या स्थानावर आहे. मला परत हे सांगावेसे वाटते की ही दोन वेगळी क्षेत्र आहेत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकायचे असेल तर खेळाडूंना त्यात विभागणी करून योग्यवेळी योग्य तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला घ्यायलाच हवा. मग ते क्षेत्र खेळाच्या तंत्राचे असो, मानसोपचारांचे किंवा आहार व्यायामाचे असो. तज्ज्ञ माणसे सोबत असणे मार्गदर्शनाकरता हे खूप मोलाचे असते.

तुझ्या कारकिर्दीकडे नजर टाकली की दिसते की तू कधी यश अपयशात अडकलेला नाहीस. कसे साध्य केलेस हे?

पंकज : महत्त्वाचा मुद्दा आहे हा. मला यश अपयश एका नाण्याच्या दोन बाजू वाटतात. मला माहीत आहे की अपयश आले की लोक स्वत:ला खूप दोष देतात. निराशेच्या गर्तेत स्वत:ला ओढून नेतात. ज्यानं आत्मविश्वासाला धक्का लागतो. मी रॉजर फेडररचा आदर्श घेतो. तो कधी यश अपयशात अडकला नाही. सुरुवातीला तो तंत्राने खेळून सामना जिंकायचा. मग जेव्हा नदाल जोकोविच आले तेव्हा त्याला समजले की तंत्रासोबत ताकद हवी आहे. त्याने बदल केला आणि यश मिळवत राहिला. अपयश यायला लागले की स्वत:च्या तंत्रात किंवा कार्यप्रणालीत बदल करत नाहीत. खूप यश मिळते तेव्हा परत सराव करून नवीन गोष्टी आपण शिकत नाही. बऱ्याच खेळाडूंना अपयशाने धक्का दिला आहे, त्याचबरोबर मी बघितले आहे की खेळाडूंना चांगले यश त्याबरोबर मिळणारी प्रसिद्धी, मान - मरातब, पैसा पचवता आलेला नाही आणि त्यांच्या कामगिरीत घसरण झाली आहे. हे सगळे हाताळायला मन स्थिर असणे आणि विनम्र राहून खेळाची आराधना चालू ठेवणे गरजेचे असते. माझ्या कुटुंबाचा या सर्व प्रवासात मोठा हात आहे. खेळाची आराधना करताना सुरुवातीच्या काळात मी अभ्यासाकडे दुर्लक्ष केले नाही, ज्याचा मला मोठा फायदा झाला.

स्नूकर व बिलियर्ड्सचा खेळ माणसाला काय शिकवतो?

पंकज : मला पालकांना इतकेच सांगायचे आहे की क्रीडा क्षेत्राची देशात चांगली वाढ झाली आहे. विविध क्रीडा प्रकारांना मान्यता वाढली आहे, तसेच संधी मिळण्याचे प्रमाण वाढले आहे. बेसिक स्तरावर तुम्ही चांगला खेळ करू लागलात की नोकरी मिळते तसेच मार्गदर्शनही लाभते आहे. त्यापेक्षा महत्त्वाचे म्हणजे खेळ माणसाला प्रगल्भ बनवतो. यश अपयश पचवायला शिकवतो. खेळाडू हे शिकतो की खेळात भले तुम्ही पराभूत होता पण जीवनात हरू शकत नाही. दडपणाखाली सर्वोत्तम कामगिरी करायचे आव्हान पेलायला खेळ शिकवतो. म्हणूनच एक चांगला माणूस घडायला खेळ मोठी भूमिका अदा करतो. माझ्या खेळाची खासियत अशी आहे की टेबलवर तुम्ही खेळायला चालू करता तेव्हा अचानक मनातील सगळे विचार नाहीसे होतात आणि तुम्ही काय करायचे याचा विचार करू लागता. तणाव नाहीसा करायला हा खेळ कामी येतो असे हौशी खेळाडू म्हणतात ते उगाच नाही.

सर्वोत्तमतेचा प्रवास कधी संपत नाही का रे?

पंकज : सर्वोत्तमता तर सोड सुनंदन, कोणताही खेळ मनापासून खेळू लागलो की समजते की शिकण्याची प्रक्रिया कधीच संपत नाही. कोणीच खेळाडू असे म्हणू शकत नाही की मी आता सगळे शिकलो आहे आणि मला सगळे येत आहे. इतकी सुंदर गोष्ट आहे की सतत शिकणे चालू राहते, स्वत:च्या खऱ्या क्षमतेचा शोध घेणे संपत नाही. एका अर्थाने मला ही ध्यानधारणाच वाटते ज्याने शांती मिळते.

loading image
go to top