दिवस सळसळत्या उत्साहाचे... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Competition

अगदी मजेने सांगायचं म्हटलं, तर एका महिन्यात सचिन, सिंधू, मायकेल फेल्प्स् तयार करायचे, म्हणजेच विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण वर्ग संपले.

दिवस सळसळत्या उत्साहाचे...

अगदी मजेने सांगायचं म्हटलं, तर एका महिन्यात सचिन, सिंधू, मायकेल फेल्प्स् तयार करायचे, म्हणजेच विविध खेळांचे उन्हाळी प्रशिक्षण वर्ग संपले. मे महिन्याच्या शिबिराकरिता होती त्याच्या २५ टक्के गर्दी आता वर्षाच्या प्रशिक्षणाकरिता दिसू लागली आहे. दुसऱ्‍या बाजूला पुण्यातील खेळाच्या वातावरणात सळसळता उत्साह जाणवत होता. तुम्ही म्हणाल, अशी काय कमाल घडली की, तुम्हाला अगदी सळसळता उत्साह जाणवला. चार घटना सांगतो म्हणजे तोच उत्साह तुम्हालाही जाणवू लागेल.

अबब ‘आयर्न मॅन’ शर्यंत

ज्यांना खेळाची, पळायची आवड आहे, त्यांना आयर्न मॅन शर्यत काय असते याची कल्पना असेल. पोहण्याच्या तलावात नव्हे, तर खुल्या वाहत्या पाण्यात ३.८६ किलोमीटर पोहणं + १८० किलोमीटर सायकलिंग करणं + पूर्ण मॅरेथॉनचं अंतर म्हणजेच ४२.२० किलोमीटर पळणं अशा तीन शर्यती आखून दिलेल्या वेळेत पूर्ण करणं, यालाच आयर्न मॅन शर्यत म्हटलं जातं. तंदुरुस्तीच्या बाबतीत वेगळीच पातळी गाठलेले खेळाडूच या शर्यतीत टिकाव धरू शकतात. पुण्याच्या कौस्तुभ राडकरने एक ना दोन, तब्बल तिसावी आयर्न मॅन शर्यत नुकतीच पूर्ण केली. ३० आयर्न मॅन शर्यती आणखी कोण्या भारतीय खेळाडूने पूर्ण केल्याचं माझ्या तरी वाचनात आलेलं नाही. जगातील जेमतेम २० खेळाडू असे असतील, ज्यांनी ३० पेक्षा जास्त आयर्न मॅन शर्यती पूर्ण केल्या आहेत; आणि जगातील ५ लोकांनी ५० पेक्षा जास्त केल्या आहेत.

‘आयर्न मॅन शर्यत ही शरीर आणि मनाच्या कणखरतेची सत्त्वपरीक्षा असते. मी पूर्ण केलेली ३० वी आयर्न मॅन शर्यत जरा जास्तच कठीण होती. अमेरिकेतील उटाह शहरात ही झाली. पोहण्याची शर्यत चालू केली ते पाणी १५ डिग्रीचं, एकदम थंडगार होतं. पाण्यातून बाहेर आलो तर उटाहच्या ३२ डिग्री वाळवंटी गरम हवेने आमचं स्वागत केलं आणि मग सायकलिंग होतं, त्यात भयानक चढ होता. शेवटचा काही किलोमीटरचा चढ अगदी थकवणारा होता. आणि अजून एका मोठ्या चढावर ७०० मीटर धावून शर्यत पूर्ण करावी लागली, त्यामुळे प्रचंड कसोटी लागली. हेच कारण असेल की, संयोजक आम्हाला ही सर्वांत आव्हानात्मक आयर्न मॅन शर्यत असल्याचं अगोदरपासून सांगत होते,’’ एका झटक्यात कौस्तुभ राडकरने शर्यतीचं वर्णन केलं.

अद्ययावत सुविधा

२८ तारखेला आपले राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय क्रीडामंत्री अनुरागसिंह ठाकूर, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि क्रीडा राज्यमंत्री उदय सामंत आणि पुणे विद्यापीठाचे नवे कुलगुरू डॉ. कारभारी काळे एका व्यासपीठावर जमा झाले. कारण होतं, पुणे विद्यापीठाच्या क्रीडा विभागाने तयार केलेली नवीकोरी सुविधा. विद्यापीठाच्या आवारात एकदम अद्ययावत असा पळण्याचा ट्रॅक आणि त्याला जोडून विविध मैदानी खेळांची सुविधा. सोबतीला अत्यंत सुंदर शूटिंग रेंज आणि असा वातानुकूलित हॉल, जिथं सहा बॅडमिंटन सामने एका वेळी होऊ शकतात; वेट लिफ्टिंग, टेबल टेनिस, कुस्ती, ज्युडो या सर्व खेळांकरिता सुसज्ज करण्यात आला आहे. हे सोडून पुणे विद्यापीठाने स्पोर्टस् सायन्स अभ्यासक्रमाला प्राधान्य देऊन मोठी उडी मारली आहे. क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दीपक माने आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून गेल्या दोन वर्षांत नियोजन आणि अचाट मेहनत करून ही सुविधा निर्माण केली आहे.

ठाकूर यांनी नव्याने तयार केलेल्या सुविधा बघून समाधान नव्हे, तर कौतुकाने आश्चर्य व्यक्त केलं. बाकीच्या विद्यापीठांनी पुणे विद्यापीठापासून बोध घेऊन अशीच सुविधा निर्माण करायचं आवाहन केलं. पुणे विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या तमाम खेळाडूंना या सुविधेचा लाभ घेऊन आपापल्या खेळात मोठी पातळी गाठणं आता शक्य होणार आहे.

लेह-लडाख भागात एक शर्यत आयोजित केली जाते, ज्याला ‘ला अल्ट्रा’ म्हटलं जातं. आता त्याची पुढची पायरी आयोजित केली गेली, ज्याला ‘एक्सट्रीम अल्ट्रा’ म्हटलं गेलं, कारण ही शर्यत चक्क एव्हरेस्ट बेस कॅम्पपासून चालू केली गेली. पूर्ण मॅरेथॉन म्हणजेच ४२.२० किलोमीटर आणि ६० किलोमीटरची ही शर्यत होती. या शर्यतीत महाराष्ट्राच्या राजेश भारतीय, प्रशांत दहिभाते आणि उत्क्रांत कुर्लेकरने ४२ किलोमीटर शर्यत पूर्ण केली आणि आशिष कसोदेकरने ६० किलोमीटरची शर्यत चक्क १५ तासांत पूर्ण करून संयोजकांना चकित केलं. यातील उत्क्रांत कुर्लेकर हे पुण्यातील प्रतिथयश डॉक्टर असून, केवळ फिटनेसची आवड आणि छंद म्हणून ते पळतात.

‘१७ हजार ६०० फूट उंचीवरून ही शर्यत सुरू होते. यात २७०० मीटरची चढण आणि जीवघेणी ४६०० मीटरची उतरण खेळाडूंना सहन करत पळावं लागतं. ऑक्सिजनची कमतरता असलेल्या या भागात खेळाडूंच्या तंदुरुस्तीची टोकाची परीक्षा बघितली जाते. हेच कारण असेल की, लेह-लडाख भागातील शर्यतीपेक्षा जास्त तयारी करूनच या शर्यतीत भाग घ्यायचा प्रयत्न करावा लागतो.’’ आशिष कसोदेकर शर्यत पूर्ण करून परतीच्या प्रवासाला लागताना काठमांडू विमानतळावरून ‘सकाळ’शी बोलताना म्हणाला.

वयाचं बंधन झुगारलं

५ जून म्हणजेच आज रविवारी जागतिक पर्यावरण दिनाला एकीकडे पुणे महानगरपालिका ‘प्लॉगेथॉन’चं आयोजन करत आहे. हा एक आगळावेगळा उपक्रम आहे, ज्यात पळत पळत प्लास्टिकचा कचरा उचलायचा घाट घातला गेला आहे. पुण्याचं वैभव असलेल्या टेकड्या, सार्वजनिक उद्यानं या उपक्रमात प्लास्टिकमुक्त करायची योजना आहे. दुसऱ्‍या बाजूला व्यवसायाने चार्टर्ड अकाउटंट असलेले जुगल राठी आपला वाढदिवस वेगळ्याप्रकारे साजरा करणार आहेत. तुम्ही म्हणाल त्यात काय विशेष? सांगतो. जुगल राठी आपला ७५ वा वाढदिवस डेक्कन जिमखाना क्लब मैदानावर एक ना दोन ७५ फेऱ्‍या पळत मारून वाढदिवस साजरा करायचा बेत आखून तयार आहेत.

खरं सांगायचं तर, पुणेकरांना मस्त पर्याय आहेत सहभागी होण्याचे. ज्यांना पर्यावरणसंवर्धनाचा पर्याय पसंत आहे, त्यांनी ‘प्लॉगेथॉन’मध्ये सहभागी होऊन पळत पळत प्लास्टिक उचलायचा उपक्रम करावा. किंवा, ज्यांना फिटनेसची आवड आहे, त्यांनी डेक्कन जिमखाना मैदानावर पळून जुगल राठी या ७५ वर्षांच्या तरुणाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात.

चार घटना मुद्दाम एका जागी मांडल्या, म्हणजे मला जाणवतो आहे तोच उत्साह तुम्हालाही जाणवू लागेल.

Web Title: Sunandan Lele Writes Competition

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :CompetitionSunandan Lele
go to top