पाया कशानं बळकट झाला याचा विसर नको!

ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका याच देशांना तिन्ही स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवता आली आहे.
Cricket
Cricketsakal

‘आशिया करंडक’ स्पर्धेचं वार्तांकन करायला मी श्रीलंकेत आलो आहे. सन २००२ मध्ये मी पहिल्यांदा श्रीलंकेत आलो होतो.

‘आयसीसी चम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धेचं वार्तांकन करायला. श्रीलंकेच्या क्षेत्रफळाचा विचार करता लहानग्या देशानं आयसीसीच्या एकदिवसीय ‘विश्वकरंडक’, ‘चॅम्पियन्स करंडक’ आणि ‘टी२० विश्वकरंडक’ अशा तिन्ही स्पर्धा जिंकल्याचं आश्चर्य व कौतुक वाटतं.

ऑस्ट्रेलिया, भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडीज आणि श्रीलंका याच देशांना तिन्ही स्पर्धा जिंकण्याची करामत करून दाखवता आली आहे. या यशाचं गमक कशात आहे हे कुमार संगकाराशी बोलताना समजलं. संगकारानं मांडलेल्या विचारांचा संदर्भ काही प्रमाणात आपल्याकडे लागतो.

रंग माझा वेगळा

श्रीलंका हा देश आशिया खंडात येत असला तरी इथल्या चाली-रीती वेगळ्या आहेत. बाकी, आशियाई देशांत कमालीची बेशिस्त नागरिकांमध्ये आढळून येत असताना श्रीलंकेतलं चित्र नक्कीच वेगळं आहे. इथले बहुतेक नागरिक वाहतुकीचे नियम पाळतात. अगदी मध्यरात्री दोनची वेळ असली तरी आणि रस्त्यावर चिटपाखरू नसलं तरी ते, लाल सिग्नल लागला असेल तर, थांबतात.

श्रीलंकन लोक वाहन चालवताना, आवश्यकता असेल तरच, हॉर्न वाजवतात. कुणीही प्रथितयश व्यक्ती दिसली तर हसून, लांबून हात करून निघून जातात. इतकंच नव्हे तर, लग्नाला जाताना आपली भेटवस्तू लग्नमंडपाच्या बाहेर जमा करून तिची रीतसर नोंद केली जात असलेलं मला पाहायला मिळालं.

श्रीलंकन क्रिकेटचा पाया त्यांच्या शालेय क्रिकेटच्या ढाच्यानं भक्कम केल्याचं दिसतं. बाकी, इतर देशांप्रमाणेच ब्रिटिशांनी राज्य करताना स्थानिक लोकांना क्रिकेटच्या खेळाची ओळख इथंही करून दिली. मटाले इथलं सेंट थॉमस कॉलेज आणि रॉयल कॉलेज यांच्यादरम्यान मोठा सामना रंगला होता अशी श्रीलंकेतील जुनी नोंद थेट १८८० मधली असलेली आढळते.

‘बॅटल ऑफ द ब्लूज्’ असं संबोधलं जाण्याइतकं महत्त्व या सामन्याला पहिल्यापासून प्राप्त झालं होतं. मटारा, कँडी, गॉल आणि कोलंबो इथल्या मोठ्या प्रथितयश शाळा आपल्या संस्थेचा क्रिकेटसंघ उभारायला कसून सराव करू लागल्या. शालेय आणि महाविद्यालयीन क्रिकेटस्पर्धांचा अंतिम सामना लोकांसाठी सोहळा ठरू लागला इतकी या स्पर्धांची लोकप्रियता आणि महत्त्व वाढलं.

श्रीलंकन क्रिकेट वाढलं-फुललं ते याच शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धांमुळे. यासंदर्भात संगकारा म्हणतो : ‘‘आम्ही सगळेच या स्पर्धांमध्ये खेळून वर आलो. गुणवान खेळाडू हेरून मग प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडू त्या खेळाडूकडे लक्ष देऊ लागायचे. जाळ्यातील सरावात गुणवान, लहान खेळाडूंना सामावून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं जायचं. मला वाटतं, अगदी २०१० पर्यंत हा प्रवास सुरळीतपणे सुरू होता.

आता अडचण अशी झाली आहे की माध्यमं, प्रशिक्षक आणि बोर्ड मिळून शालेय आणि महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी करणारा खेळाडू हा ‘चमत्कार’ असल्याचं भासवू लागले आहेत. त्या खेळाडूचं वारेमाप कौतुक करून त्याची वाट लावायला लागले आहेत. परिणामी, गुणवान खेळाडू लहान वयात चमकतात; पण त्यातले अगदीच मोजके खेळाडू वरिष्ठ पातळीवर कामगिरी करताना दिसतात.’’

मुंबई-क्रिकेटचा पाया

मुंबई-क्रिकेटचा पायासुद्धा शालेय आणि महाविद्यालयीन क्रिकेटमध्ये होता असं जुन्या-जाणत्या लोकांशी बोललं की समजतं. ‘हॅरिस शील्ड’,‘गाईल्स शील्ड’ या सामन्यांत क्रिकेटचे धडे गिरवून खेळाडू तयार व्हायचे. सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी हे शालेय स्पर्धा गाजवून प्रकाशझोतात आले होते. सन १९७० पर्यंत ‘कम्बाईन्ड् व्हर्सिटीज्’ - म्हणजे भारतभरात महाविद्यालयीन क्रिकेट खेळून चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा संघ - दौऱ्यावर आलेल्या संघाशी खेळायचा.

नाना जोशी, पॉली उम्रीगर, पंकज रॉय, सुनील गावसकर, बुधी कुंदरन, दिलीप दोशी यांच्यासारखे खेळाडू ‘कम्बाईन्ड् व्हर्सिटीज्’ संघातून खेळून नावारूपाला आले. इतकंच नव्हे तर, संजय मांजरेकरनं १९८४-८५ मध्ये बडोद्याला झालेल्या इंटरयुनिव्हर्सिटी स्पर्धेत सलग पाच सामन्यांत पाच शतकं झळकावून मुंबई रणजी संघाचा दरवाजा ढकलून उघडला होता!

मुंबई-क्रिकेटचा अजून एक पाया ‘टाइम्स शील्ड’ स्पर्धेतही दडला होता. ‘महिंद्र’, ‘मफतलाल’, ‘टाटा’, ‘एसीसी सिमेंट’, ‘एअर इंडिया’ यांसारख्या नामांकित कंपन्या क्रिकेटपटूंना नोकऱ्या देऊन आपल्या संघाकडून खेळवायला पुढं सरसावायच्या. ‘टाइम्स शील्ड-‘अ’ ’ गटाच्या सामन्यात दोन संघांकडून पाच पाच कसोटीपटू खेळताना दिसायचे, हे वास्तव होतं.

शालेय, महाविद्यालयीन आणि म्हणायला गेलं तर ‘टाइम्स शील्ड’ही...असं सगळं काही सुरू आहे...पण प्रश्न हा आहे की, पूर्वीसारखी जान त्या स्पर्धांमध्ये राहिली आहे का? तशी जान राहिली असल्याचं सकृद्दर्शनी तरी आढळून येत नाही. याचा प्रतिकूल परिणाम मुंबई-क्रिकेटवर झाला आहे अशी शंका येते.

महाराष्ट्रात ‘क्लब-क्रिकेट’ला रामराम

महाराष्ट्र-क्रिकेटच्या भरभराटीची पायाभरणी पुण्यातील ‘क्लब-क्रिकेट’मध्ये दडली होती, हे महाराष्ट्रासाठी भरपूर क्रिकेट खेळलो असल्यानं मला पक्कं माहीत आहे. निमंत्रितांच्या साखळी-स्पर्धेपासून ते अफलातून नियमांची ‘मांडके करंडक स्पर्धा’ भरवली जायची तेव्हा पुण्यातील क्लबचे संघ एकमेकांवर कुरघोडी करायला क्रिकेटच्या मैदानात उतरायचे.

‘पीवायसी’,‘पूना क्लब’, ‘डेक्कन जिमखाना’ या मोठ्या क्लबना धक्का द्यायला ‘स्टार्स’, ‘विलास क्लब’ यांसारखे वरकरणी दिसायला साधे दिसणारे संघ टपून बसलेले असायचे. एक प्रकारची ‘सकारात्मक खुन्नस’ या क्लबमधील सामन्यांत अनुभवायला मिळायची. परिणामी, चांगला खेळ प्रेक्षकांना बघायला मिळायचा. ‘रणजी’पासून १९ आणि २२ वर्षांखालच्या संघांना दर्जेदार खेळाडूंची रसद याच क्लब ‘क्रिकेटच्या शिकवणी’तून पुरवली जायची.

गेल्या २० वर्षांत हे चित्रं बदललं आहे. महाराष्ट्राच्या संघांकडे एमसीए बरोबर लक्ष देते; पण स्थानिक क्रिकेटकडे होत असलेलं दुर्लक्ष जीवघेणं आहे. खेळाडूंना फक्त सराव करायला मिळतोय. मात्र, आपल्यातील कस तपासून बघण्यासाठी त्यांना भरपूर सामने खेळायला मिळतच नाहीत.

श्रीलंकन क्रिकेट असो, मुंबईतील क्रिकेट असो वा महाराष्ट्राच्या क्रिकेटच्या आधुनिक काळातील जडणघडणीची बात असो; सगळीकडचा पाया भक्कम कशानं झाला याचा विसर पदाधिकाऱ्यांना पडलेला दिसतो. देशाकडून किंवा राज्याकडून खेळणारे रणजी खेळाडू स्थानिक सामन्यात अभावानंच खेळताना दिसतात.

अनुभवी खेळाडूंचं मार्गदर्शन ताज्या दमाच्या खेळाडूंना मिळणं दुरापास्त झालं आहे. या सगळ्याचा परिणाम क्रिकेटवर होत आहे हे न कळण्याइतपत पदाधिकारी खुळे नसावेत. काय चूक होत आहे हे त्यांनाही चांगलं कळतं आहे. फक्त येऊ बघणाऱ्या समस्येकडे ते काणाडोळा करत आहेत. पदाधिकाऱ्यांना जाग येवो एवढीच प्रार्थना!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com