देशातल्या दुःखावर क्रिकेटची फुंकर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Srilanka Cricket Team

सगळेच खेळ चांगले आहेत, जे आपल्याला खूप आनंद देऊन जातात. फुटबॉल असा खेळ आहे की, जो खऱ्या अर्थाने जगभर पसरलेला आहे. फुटबॉलला कोणत्याच भिंती नाहीत.

देशातल्या दुःखावर क्रिकेटची फुंकर

सगळेच खेळ चांगले आहेत, जे आपल्याला खूप आनंद देऊन जातात. फुटबॉल असा खेळ आहे की, जो खऱ्या अर्थाने जगभर पसरलेला आहे. फुटबॉलला कोणत्याच भिंती नाहीत. गरिबातले गरीब देशही अगदी जोमाने फुटबॉल खेळतात. त्याच्या तुलनेत क्रिकेट खूपच कमी देशांत खेळला जातो. कागदावर इंटरनॅशनल क्रिकेट कौन्सिलचे सदस्य शेकड्याने दिसत असले, तरी खरे ८-१० देशच क्रिकेट कौशल्याने खेळताना आढळतात. तरीही ज्या देशांत क्रिकेट खेळलं जातं, तिथे तो नुसता खेळ नाहीये, हे अगदी स्पष्ट आहे. भारतात लोक क्रिकेटला धर्म मानतात, जे थोडं जास्त आहे; पण क्रिकेट संघ जिंकण्या-हरण्याचे थेट पडसाद लोकांच्यात उमटत असतात, हे नाकारून चालणार नाही. पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकल्यावर भारतीय लोकांनी रस्त्यावर उतरून आनंद साजरा केला. म्हणूनच क्रिकेट हा मनं जोडणारा खेळ आहे, असं वारंवार दिसून येतं. नुकत्याच झालेल्या आशिया कप स्पर्धेतील श्रीलंकन संघाच्या अभूतपूर्व यशानंतर ते परत एकदा दिसून आलं आहे.

भारतात बाकी खेळांचे संयोजक किंवा काही खेळाडूही कधीकधी क्रिकेटचा राग राग करतात. भारतात क्रिकेटला अनावश्यक लोकप्रियता मिळते, ज्यामुळे प्रेक्षकांपासून ते अर्थकारणापर्यंत क्रिकेटला नेहमी झुकतं माप मिळतं, अशी नाराजी व्यक्त केली जाते. ज्यात थोडं तथ्य आहे; पण आपण हे लक्षात घेतो का, की क्रिकेट या खेळाशी भारतात नाळ कधी जुळते, हे आपल्याला कळतही नाही.

माझ्या दाव्याला पटेल असे एक उदाहरण देतो, घरात लहान बाळ जन्माला येतं, त्याला पहिल्या वाढदिवसाला आपण प्लास्टिकची बॅट आणि बॉल देतो. हे कुठेही लिहून ठेवलेलं नाहीये, की रूढी-परंपरा म्हणून आपण करत नाही. ही कृती आपल्या सगळ्यांच्या हातून नकळत घडते. बाळाला छोटी हॉकी स्टिक किंवा फुटबॉल, बास्केटबॉल द्यायला कोणीही मनाई केली नाहीये, तरीही बहुतांश वेळेला पहिलं क्रीडासाहित्य म्हणून एक फुटी प्लास्टिकची बॅट-बॉल आपण देतो, त्या क्षणापासून क्रिकेटच्या खेळाशी त्या लेकराची नाळ जुळते. आपल्यावर क्रिकेटचे संस्कार इतक्या लहानपणापासून होतात की, क्रिकेट समजायला काहीच कष्ट पडत नाहीत. तसं बघायला गेलं तर समजायला क्रिकेट सोपा खेळ नाही. पटत नाही ना, हे वाक्य तुम्हाला? मग क्रिकेटचा कणभरही गंध नसलेल्या एखाद्या परदेशी व्यक्तीला क्रिकेट सामन्याला नेऊन खेळ समजावून द्यायचा प्रयत्न करा, म्हणजे मी काय म्हणतोय याचा अंदाज तुम्हाला येईल.

मनं जोडणारा खेळ

ज्या देशात क्रिकेट मनापासून खेळलं जातं, तिथे क्रिकेट फक्त खेळण्याचा नव्हे, तर बोलण्याचाही विषय आपसूक होतो. बिहार आणि उत्तर प्रदेशमधले लोक सहजतेने राजकारणाची खोलात जाऊन चर्चा करतात, तसंच मुंबईकर सामान्य माणसाला खात्री असते की, सचिन तेंडुलकरपेक्षा आपल्याला क्रिकेट जास्त कळतं. त्याच आत्मविश्वासाने लोक संघाच्या निवडीपासून ते सामन्यातील परिस्थितीवर भाष्य करताना आढळतात. एक गोष्ट ह्यातून दिसते ती म्हणजे, क्रिकेट ह्या खेळाबद्दल जनसामान्यांना असलेली आत्मीयता.

आशिया कप स्पर्धेचं वार्तांकन करत असताना विविध रंग मला दिसून आले. अफगाणिस्तान संघाचे चाहते किती उत्साहाने मैदानावर यायचे आणि आपल्या संघाला प्रोत्साहन द्यायचे. संघ यशस्वी झाला की हसायचे आणि अपयशी झाला की आसवं ढाळायचे. दुबईसारख्या देशात काम करताना त्यांना मिळणारे निखळ आनंदाचे क्षण खूप कमी आणि कष्ट जास्त, असं स्पष्ट कळायचं. मग आपल्या संघाच्या यशात ते सगळे आपला आनंद बघायचे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश संघाच्या चाहत्यांची कहाणी वेगळी नसायची. खरी मजा होती श्रीलंकन चाहत्यांची. आत्ताच्या घडीला श्रीलंका देश खूप अस्थिरतेतून जातो आहे. निसर्गाने नटलेल्या श्रीलंकेत जीवनावश्यक वस्तूंचा प्रचंड तुटवडा नागरिक सहन करत कसंतरी जगत आहेत. सामान्य श्रीलंकन नागरिकांना खरा आनंद काय असतो हे विसरायला व्हावं इतकी परिस्थिती वाईट आहे. अशावेळी त्या वेदनांवर, समस्यांवर आणि दुःखावर हलकेच फुंकर घालण्याचं काम श्रीलंकन क्रिकेट संघाने केलं आहे.

आशिया कप स्पर्धेसाठी सगळे संघ दुबईला येऊन दाखल झाले तेव्हा संयोजकांनी फूल फिल्डिंग लावली होती. स्पर्धेचा फॉरमॅट असा केला गेला होता की, तीन रविवार भारत-पाकिस्तानचे तीन सामने अशी योजना कागदावर आणि मनात पक्की केली गेली होती. सगळ्या पत्रकारांचं लक्ष मुख्य करून भारत आणि पाकिस्तान संघावर होतं. श्रीलंकन संघ नवा होता आणि त्यांचे प्रशिक्षकही अगदी ताजे नवे होते. कोणाची श्रीलंकन संघाकडून मोठी अपेक्षा नव्हती. त्यातून पहिल्याच सामन्यात अफगाणिस्तान संघाने श्रीलंकन संघाला भल्यामोठ्या पराभवाचा झटका दिला. दुसऱ्या बाजूला पहिले दोन सामने झकास खेळ करून जिंकणाऱ्या भारतीय संघाला निर्णायक दोन सामने जिंकता आले नाहीत.

पहिल्या सामन्यानंतर श्रीलंकन संघाने मागे वळून बघितलं नाही. भारतीय संघ मायदेशाला नेणाऱ्या विमानात बसला असताना श्रीलंका आणि पाकिस्तान संघ अंतिम सामन्याची तयारी करत होते. अंतिम सामन्याअगोदरही चाहत्यांचं झुकतं माप पाकिस्तानला होतं. अंतिम सामन्यात नाणेफेक हरूनही श्रीलंकन संघाने चांगला धावफलक उभारून दाखवला आणि नंतर टिच्चून गोलंदाजी आणि त्याला जबरदस्त फिल्डिंगची साथ देत पाकिस्तानला पराभवाचा धक्का दिला. त्या विजयानंतर श्रीलंकन चाहत्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. धिंगाणा नाही घातला. त्या विजयाने ते मनोमन सुखावले होते. विजयात महत्त्वाची भूमिका अदा करणारा भानुका राजपक्षे म्हणाला की, क्रिकेट सामने जिंकून जर आम्ही देशवासीयांच्या चेहऱ्यावर हास्य आणू शकलो तर ती साधी गोष्ट नाही.

मायदेशातील प्रतिक्रिया

श्रीलंकेतील माझे पत्रकार मित्र सांगत होते की, आशिया कप जिंकून श्रीलंकन संघ मायदेशात पोहोचला तेव्हा हजारो, लाखो लोक रस्त्यावर उतरून संघाचं स्वागत करत होते. माजी कप्तान संगकारा पायी जाऊन खेळाडूंच्या स्वागताला हजर राहिला. विजयी संघाचं स्वागत करायला आलेल्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान आणि आनंद खूप काही कहाणी सांगत होता. श्रीलंकन नागरिकांना जगण्याची नवी उमेद देणारा हा आशिया कपमधील विजय आम्हा सगळ्यांच्या दीर्घकाळ स्मरणात राहणार आहे.

आशिया कपमधील सामन्यानंतर भारतीय संघ साखरझोपेतून खडबडून जागा झाला आहे, पाकिस्तानी संघाला आपण चांगला संघ आहोत; पण विजेते नाही हे कळून चुकलं आहे. अफगाणिस्तानला आपण कोणत्याही संघाला टक्कर देऊ शकतो असा आत्मविश्वास लाभला आहे, तर श्रीलंकन संघाला देशवासीयांच्या चेहऱ्यावर हास्य परत आणण्याचा राजमार्ग सापडला आहे.