खेळातलं राजकारण आणि राजकारणातला खेळ

मुंबई क्रिकेट संघटनेपाठोपाठ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या कारभारीपदी राजकारणी माणसाची वर्णी लागली. इतकी वर्षं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत पदाधिकारी म्हणून खऱ्‍याखुऱ्‍या राजकारणी माणसाचा प्रवेश झाला नव्हता.
Cricket
CricketSakal
Summary

मुंबई क्रिकेट संघटनेपाठोपाठ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या कारभारीपदी राजकारणी माणसाची वर्णी लागली. इतकी वर्षं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत पदाधिकारी म्हणून खऱ्‍याखुऱ्‍या राजकारणी माणसाचा प्रवेश झाला नव्हता.

मुंबई क्रिकेट संघटनेपाठोपाठ महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या कारभारीपदी राजकारणी माणसाची वर्णी लागली. इतकी वर्षं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत पदाधिकारी म्हणून खऱ्‍याखुऱ्‍या राजकारणी माणसाचा प्रवेश झाला नव्हता. अचानक यंदाच्या निवडणुकीनंतर रोहित पवार यांच्यासोबत अजूनही काही राजकारणाशी थेट संबंध असलेल्या व्यक्ती निवडणूक जिंकून महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या कारभारात येऊन दाखल झाल्या आहेत. इथं मी पहिल्यांदाच स्पष्ट करतो की, राजकारणी व्यक्तीने क्रिकेट कारभारात येऊ नये असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. अगदी सत्य बोलायचं झालं तर फार कमी माजी खेळाडूंनी क्रिकेट कारभार प्रभावीपणे सांभाळण्याची हातोटी दाखवली. मैदानावर प्रभावी कामगिरी करणाऱ्या भल्याभल्या खेळाडूंना संघटनकौशल्य असतंच असं नाही याची मला कल्पना आहे.

उलटपक्षी राजकारणी आणि मोठमोठे व्यवसाय सांभाळणाऱ्‍या अनुभवी लोकांना काम करणं, काम करून घेण्याची जात्याच जाण असते. तरीही प्रत्यक्ष अपेक्स कौन्सिलच्या निवडून आलेल्या उमेदवारांच्या यादीत एकही रणजी खेळलेला माणूस निवडून न यावा याचं आश्चर्य नक्कीच वाटतं आणि नेमकं असं का झालं याचा विचार राजकारणी लोक तसंच खेळाडू दोघांनीही गांभीर्याने करायला हवा. अर्थात, खेळाडूंच्या संघटनेतून एक महिला, एक पुरुष खेळाडू अपेक्स कौन्सिलमध्ये नेमला जाईल आणि कागदावर तरी समतोल आणण्याचा प्रयत्न केला जाईल.

बऱ्‍याच वर्षांनंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत खरी निवडणूक झाली. निवडणुकीत जिंकण्याची शक्यता नाही हे अगोदरच माहीत असूनही शंतनू सुगवेकरसारख्या माजी रणजी खेळाडूने निदान लढण्याची तयारी दाखवली, त्याला माजी खेळाडू अनिल वाल्हेकरने जोरदार पाठिंबा दिला होता. जळगाव क्रिकेट संघटनेचे अतुल जैन यांनी संघटनेत सुरू असलेल्या मनमानी कारभाराविरुद्ध आवाज उठवायचा प्रामाणिक प्रयत्न केला.

परदेशात वास्तव्य असूनही अजय शिर्के यांची महाराष्ट्र क्रिकेट संघटनेवरची पकड किती मजबूत आहे याचा प्रत्यय परत एकदा निवडणुकीच्या एकतर्फी निकालातून आला. मतदारांची एकजूट बांधून ठेवण्याचं अजय शिर्केंचं कौशल्य वाखाणण्याजोगंच आहे. अर्थातच, अजय शिर्केंच्या विचाराशिवाय रोहित पवारांचं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या राजकारणात येणं अशक्य वाटतं. तरीही हेसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की, इतकी वर्षं अजय शिर्के यांनी एकछत्री अंमल संघटनेवर चालवला आणि आता रोहित पवार आल्यावर तो अंमल राहायची शक्यता नाही. रोहित पवारांचा प्रवेश अजय शिर्केंमुळे सुकर झालेला असला तरी ते आपल्या विचारांनी संघटनेचा कारभार चालवायचा प्रयत्न करतील असं वाटतं.

अगोदरच्या समितीने काही मोठी कामं केली, ज्यांत संघटनेचं आंतरराष्ट्रीय भव्य मैदान उभारण्याबरोबर त्याच वास्तूत इनडोअर क्रीडा सुविधा निर्माण केल्या. स्टेडियमच्या परिसरात असलेल्या मुबलक जागेचा वापर करून दुसरं चांगलं मैदानही तयार केलं आहे. तरीही महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचा कारभार अजून प्रभावीपणे चालविण्याकरिता भरपूर वाव नव्याने निवडून आलेल्या समितीला आहे. मनोमन पक्कं माहीत असून क्रिकेटच्या खेळाचा महाराष्ट्रभर प्रचार-प्रसार होण्यासाठी योग्य प्रयत्न केले गेले असं नाही म्हणता येणार. हेच कारण आहे की, सुधारणेसाठी काही मुद्दे नव्याने निवडून आलेल्या समितीला सुचवायचा मोह होतो आहे.

कोणताही विद्यार्थी परीक्षेला बसून चांगले गुण मिळवण्यासाठीच अभ्यास करत असतो, तसंच कोणताही क्रिकेटर भरपूर सराव हा सामना खेळून त्यात चांगली कामगिरी करायला करत असतो. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या कारभारात कनिष्ठ वयोगटातील खेळाडूंना संघटनेने आयोजित केलेले सामने खूप कमी प्रमाणात खेळायला मिळतात. कमी सामने खेळायला मिळाल्याने हाती आलेल्या तुटपुंज्या संधीत परिणामकारक कामगिरी करता आली नाही, तर तो किंवा ती व्यक्ती खेळात मागे पडते, त्यांना खेळात प्रगतीचा मार्ग अंधूक दिसू लागतो आणि मग पालक पाल्याला खेळापासून लांब नेण्याचा विचार करू लागतात. नव्या समितीला कसंही करून सामन्यांची संख्या कशी वाढेल आणि त्यासाठी जास्त स्पर्धा कशा भरवता येतील याचा विचार करावा लागेल. संघटनेच्या राजकारणात आणि मोठ्या सामन्यांच्या वेळी मिरवण्यात धन्यता मानणाऱ्‍या जिल्हा संघटना पदाधिकाऱ्यांना धारेवर धरून स्थानिक पातळीवर स्पर्धा कशा भरवता येतील याचं नियोजन करणं गरजेचं आहे.

क्लब क्रिकेटचं पुनरुज्जीवन

मी क्रिकेट खेळत असताना महाराष्ट्राच्या क्रिकेटची जान ही पुण्यातील क्लब क्रिकेटमध्ये होती. अजय शिर्के यांनी संघटनेचा कारभार चालवल्यापासून त्यांनी जिल्हा संघटनांना योग्य मान देऊन चांगलं काम केलं यात शंका नाही. फक्त असं करत असताना त्यांनी पुण्यातील क्लब क्रिकेटला धक्का लावला. जिल्ह्यातील क्रिकेट वाढवायचा प्रयत्न चांगला होता; पण त्याकरिता पुण्यातील क्लब क्रिकेटचा बळी दिला गेला हे बरोबर वाटत नाही. नव्या समितीला पुण्यातील क्लब क्रिकेट पूर्वपदावर आणायला वेगळ्या उपाययोजना कराव्या लागतील. जसं- भारतीय संघात खेळणारे प्रमुख खेळाडू रणजी सामने अभावाने खेळताना दिसतात, तसंच मोठ्या पातळीवर खेळणारे केदार जाधव, ऋतुराज गायकवाड, राहुल त्रिपाठी, अंकित बावणेसारखे महाराष्ट्राचे खेळाडू खूप कमी वेळा गांभीर्याने स्थानिक सामन्यात सहभागी होताना दिसतात. हे चित्रं बदलणं गरजेचं आहे.

महिला क्रिकेट सुधारा

महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या गत समित्यांनी राज्यातील महिला क्रिकेट वाढण्यासाठी खास प्रयत्न केले नाहीत हे उघड सत्य आहे. इतकंच नाही, तर गतवर्षी महाराष्ट्राच्या महिला क्रिकेट संघाला अनेक धक्के लागले. शिस्तपालनाच्या नावाखाली चांगल्या खेळाडूंवर कारवाई करून घोर अन्याय केला गेला. काही गुणवान खेळाडूंकडे संघटनेने दुर्लक्ष केल्याने त्यांना महाराष्ट्राबाहेर जाऊन खेळायचा मार्ग पत्करावा लागला. त्याचबरोबर शुभांगी कुलकर्णीसारख्या अत्यंत अनुभवी माजी खेळाडूच्या बुद्धीचा, क्षमतेचा वापर करण्याऐवजी तिला संघटनेच्या कारभारापासून लांब कसं ठेवता येईल याचाच विचार केला गेला. नवे अध्यक्ष रोहित पवार यांना लक्षात ठेवावं लागेल की, शरद पवार यांनी महिला क्रिकेटसाठी मोठं योगदान दिलं आहे, तोच वारसा पुढे चालवणं हे रोहित पवारांसाठी कर्तव्य ठरणार आहे.

नको तिथं हात आखडतात

एक संवाद कानावर आला. महाराष्ट्राचा मुख्य संघ विजय हजारे स्पर्धेत चांगली कामगिरी करून पुढे सरकत होता. संघातील एका खेळाडूने संघटनेत फोन केला आणि विनंती केली की, सर महत्त्वाचे सामने समोर येत आहेत, तेव्हा सरावासाठी १२ चेंडू लागतील. समोरून उत्तर आलं, १२ कशाला लागतील, सहा घ्या... नाहीतरी आपण उपांत्य सामन्यात हरणारच आहोत. मला एक गोष्ट समजत नाही ती म्हणजे, संघटनेचा संपूर्ण कारभार बीसीसीआय देत असलेल्या प्रचंड मोठ्या रकमेच्या अनुदानावर चालत असताना खेळाडूंना प्रवासापासून निवासापर्यंत आणि खेळायच्या सामग्रीपासून ते प्रशिक्षकांच्या मानधनापर्यंत पैसे देताना संघटनेचा हात आखडता का असतो? रोहित पवारांच्या अध्यक्षतेखालच्या समितीला संघटनेचा कारभार चालवताना यातील काही मुद्द्यांचा विचार करून बदल करावे लागतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com