क्रीडारसिकांची कदर कधी?

भारतीय क्रिकेट संघ नुकताच इंग्लंडच्या दौऱ्यावर असतानाचा एक प्रसंग मला आठवतो. एका खेळाडूला भेटायला म्हणून मी संघ राहत असलेल्या हॉटेलावर गेलो होतो.
Cricket
Cricketesakal

भारतीय क्रिकेट संघ नुकताच इंग्लंडच्या दौऱ्यावर असतानाचा एक प्रसंग मला आठवतो. एका खेळाडूला भेटायला म्हणून मी संघ राहत असलेल्या हॉटेलावर गेलो होतो. त्यावेळी भेटीची वेळ ठरलेल्या खेळाडूची वाट बघत असताना दुसरा एक खेळाडू भेटला. त्याने मला सहज विचारले की, लेले साब आप इसी हॉटेल में रुके हो क्या? मला चटकन हसायलाच आलं आणि मी म्हणालो, भाई मुझे पॉसिबल नहीं है.

तो म्हणाला क्यूँ... मी त्याला म्हणालो, ‘भाई एक बार अपने पैसे से ये हॉटेल में रुकने के लिये सोचो. क्यूँ क्या रेट है. मग मी त्याला रिसेप्शनडेस्क जवळ घेऊन गेलो आणि हळूच एका रात्री साठी त्या हॉटेलचा खोलीचा फक्त राहण्याचा दर विचारला. रिसेप्शन काउंटरवरच्या सुंदरीने हसून सांगितले की ५५० पाउंड. तो खेळाडू, आश्‍चर्याने चटकन म्हणाला, ‘क्या बात कर रहे हो, इतना मेहंगा. बापरे बाप’.

मग आमच्या परत काहीवेळ गप्पा झाल्या यात मी त्या खेळाडूला हळूच समजावले की, बाबा रे तुम्ही भारतीय संघासोबत येता तेव्हा सगळी व्यवस्था ‘बीसीसीआय’ करते. म्हणजेच खर्चाचा काहीच विचार तुम्हांला करावा लागत नाही. पण जेव्हा कोणी वैयक्तिक कारणासाठी येतो किंवा आमच्या सारखे पत्रकार कामाला येतात तेव्हा महागड्या हॉटेलात महागड्या एअरलाईन्सने येणे अशक्य होते.

कारण गेल्या दोन वर्षात खर्च अवाच्या सवा वाढला आहे. सांगायचा मुद्दा असा की खर्च किती होतो हे तपासून बघायचे बीसीसीआयला कोणतेच कारण नाही, इतक्या त्यांच्या तिजोर्‍या पैशाने भरल्या आहेत. प्रश्न आहे सामान्य पत्रकारांचा आणि सामान्य क्रिकेट फॅन्सचा.

क्रिकेटचे सामने मैदानावर जाऊन कव्हर करता यावेत म्हणून आम्ही पत्रकार प्रयत्न करत असतो त्या पेक्षा जास्त तळतळ क्रिकेट फॅन करत असतो. पत्रकारांची संख्या अल्प आहे त्यांना बाजूला ठेवा.

पण जेव्हा आयसीसी किंवा एशियन क्रिकेट कौन्सिल किंवा बीसीसीआय या संस्था क्रिकेटवर प्रेम करणार्‍या आणि कसेही करून क्रिकेट सामना मैदानावर जाऊन बघायची इच्छा मनात बाळगणाऱ्या फॅन्सचा अजिबात विचारच करत नाहीत तेव्हा खूप राग येतो.

सध्याच्या काळात कोणताही खेळ प्रायोजकांच्या पाठिंब्यावर चालतो मोठा होतो, बहरतो हे सत्य नाकारून चालणार नाही. प्रायोजकांबरोबर टीव्ही प्रक्षेपणाचे हक्क विकत घेणार्‍या कंपन्यांचे योगदान आणि महत्त्व खूप मोठे आहे.

ज्या कंपन्या प्रायोजकतेसाठी किंवा टीव्ही प्रक्षेपण हक्क विकत घ्यायला प्रचंड मोठ्या प्रमाणात पैसा ओततात त्यांना खेळाचे संयोजक मान देतात आणि तो द्यायलाच हवा. फक्त यात होते काय की प्रायोजकांना जाहिरातींबरोबर सामन्याच्या तिकिटांवर हक्क दिला जातो.

परिणामी बऱ्याच वेळा खूप मोठ्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान मैदानाची प्रेक्षक क्षमता कितीही मोठी असली तरी प्रत्यक्ष क्रिकेट फॅन्सना विकायला संयोजकांच्या हाती मोजकी तिकिटे असतात.

त्यातून मागणी इतकी जास्त असते की साहजिकच त्या तिकिटांवर तुटून पडणार्‍यांची संख्या खूप जास्त असते. संयोजकांना मनोमन ही गोष्ट पक्की माहीत असल्याने फॅन्स म्हणजेच खर्‍या चाहत्यांना जास्त भाव दिला जात नाही.

काहीही अडचणी गैरसोय त्रास असला तरी क्रिकेट फॅन्स चूपचाप ते सहन करतात आणि सामन्याच्या वेळी मैदाने भरून टाकतात. झालेला सगळा त्रास विसरून त्याच उत्साहाने आपल्या संघांना पाठिंबा देतात हे संयोजक जाणून आहेत.

कोरोना महासाथीनंतर कोणत्याही कारणासाठी परदेश प्रवास करणे प्रचंड महाग झाले आहे. विमान प्रवासाचा खर्च कमीतकमी दीडपटीने वाढला आहे. हॉटेल्सचे राहण्याचे दर आकाशाला जाऊन भिडले आहेत.

सगळ्यांना कोरोना महासाथीच्या काळात झालेले नुकसान भरून काढायची घाई झाली आहे. ऑफिसच्या कामासाठी जाणार्‍या लोकांना याचा काही फरक पडत नाही कारण सर्व व्यवस्था ऑफिस करत असते. भरडला जातो तो सामान्य पर्यटक किंवा खेळाचा खेळाचा चाहता.

खर्च थोडा कमी करायला एकच उपाय उरतो तो म्हणजे नियोजन अगोदर करायचे. विमानाचे तिकीट अगोदर बुक करायचे. आणि हॉटेल किंवा एअर बी एन्ड बी सारखे पर्याय डोके वापरून शोधून काढायचे. आयसीसी, एशियन क्रिकेट कौन्सील आणि बीसीसीआयला क्रिकेट चाहत्यांशी काही घेणे देणे आहे असे वाटत तरी नाही.

कारण ना अजून एशिया कपच्या तारखा आणि सामन्याच्या जागा पक्क्या केल्या गेल्या आहेत ना ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या मुख्य एक दिवसीय विश्‍व करंडकस्पर्धेच्या.

पॅरिसला २०२४ मध्ये ऑलिंपिक स्पर्धा भरवल्या जाणार आहेत. याच स्पर्धांची सर्व ठिकाणे वेळा दोन वर्ष अगोदर जाहीर करून त्याची तिकीट विक्री चालू गेली होती. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पुढील चार वर्षांमध्ये संघ कोणाविरुद्ध आणि कुठे कसोटी सामने कधी खेळणार याची यादी सादर केली आहे.

याचा परिणाम असा होतो की सामन्याचा आनंद मैदानावर जाऊन घेण्याचा कल असणारे क्रीडा रसिक प्रेक्षक योजना आखू शकतात. असे काहीही आपल्या क्रिकेट जगतात होताना दिसत नाही.

वेस्ट इंडीज दौर्‍याच्या तारखा पहिल्या सामन्याअगोदर तीन आठवडे जाहीर केल्या गेल्या. गेल्या दोन वर्षात वेस्ट इंडीजला जाण्याचा खर्च इतका वारेमाप वाढला आहे की पत्रकार किंवा क्रिकेट चाहत्याला वेस्ट इंडीजला जाऊन सामन्याचा आनंद घेण्याचा विचार मागे ठेवावा लागेल.

अगदी तीच गोष्ट एशिया करंडक आणि मुख्य एक दिवसीय जागतिक करंडक स्पर्धेची आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान लढतीचा आनंद घ्यायला चाहते आसुसले आहेत. दुसर्‍या बाजूला संयोजक राजकीय पेचांमुळे वेळापत्रक जाहीर करू शकत नाहीयेत. उशिराने होणार्‍या या सगळ्या नियोजनाचा फटका फक्त क्रिकेट चाहत्यांना पडणार आहे इतका विमान प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च हाता बाहेर जाणार आहे.

संयोजकांना त्याची काडीमात्र जाणीव आहे असे वाटत नाही कारण ते जाणून आहेत की कितीही अन्याय केला तरी प्रेक्षागृह रिकामी राहणार नाहीत. क्रिकेट चाहते सगळ्या गैरसोयी सहन करून अखेर मैदानावर हजेरी लावण्यासाठी जिवाचा आटापिटा करणारच.

एशिया करंडक स्पर्धा सप्टेंबरमध्ये आणि मुख्य एक दिवसीय क्रिकेट विश्‍व करंडक स्पर्धा ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यात भरवल्या जाणार आहे. वेळापत्रक तयार करून संयोजक सज्ज आहेत पण पाकिस्तान क्रिकेट नियामक मंडळ त्यांच्या आडमुठ्या सरकारच्या परवानगीची वाट बघत हात चोळत बसले आहेत. क्रिकेट जगत आपल्या अनुमोदनासाठी वाट बघत आहे याचीच नशा पाकिस्तान सरकारला चढत आहे.

पाकिस्तानात चालू असलेले अराजक क्रिकेट जगतात पसरावे म्हणूनच जणू काही प्रयत्न चालू आहेत असे अत्यंत खराब विचार मनात येत आहेत. वाईट एकाच गोष्टीचे वाटते आहे की सामान्य क्रिकेट फॅन या सगळ्या अनागोंदी कारभारात होरपळून निघतो आहे आणि त्याच्याकडे लक्ष द्यायला आयसीसी, एशियन क्रिकेट कौन्सिल आणि बीसीसीआयला वेळ नाहीये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com