जिंकायचा अट्टहास; पण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhya Pradesh Cricket Stadium

भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्‍यावर असताना वीरेंद्र सेहवाग उपाहाराअगोदर शतक करायच्या अगदी उंबरठ्यावर होता, तो सामना मला आता आठवला.

जिंकायचा अट्टहास; पण...

भारतीय संघ वेस्ट इंडीजच्या दौऱ्‍यावर असताना वीरेंद्र सेहवाग उपाहाराअगोदर शतक करायच्या अगदी उंबरठ्यावर होता, तो सामना मला आता आठवला. तो सामना कुठं आणि इंदूर कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून पहिल्या दोन तासांच्या खेळात संपूर्ण भारतीय संघ बाद होण्याची शक्यता कुठं... दोनही गोष्टी सामन्याच्या पहिल्या दिवशी उपाहाराअगोदरच्या होत्या. त्यातील बदलाने मला बसलेल्या धक्क्यातून मी अजून सावरत नाहीये. विचार येतो, किती बदललं आहे क्रिकेट ! शांतपणे विचार करता मग लक्षात येतं की, क्रिकेट बदलत नाहीये, क्रिकेट अट्टहास करून बदललं जात आहे. मनात साठलेल्या रागाला कारण आहे भारतात खेळलेला अजून एक सामना तिसऱ्‍याच दिवशी संपला आहे.

ऑस्ट्रेलियन संघ चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारतात येताना ज्या योजना आखल्या जात होत्या, त्यात विचार एकच होता, कसंही करून जिंकायचं आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळायचं. ऑस्ट्रेलियन संघाने आयसीसीने ठरवून दिलेल्या कालचक्रात चांगला खेळ केलेला असल्याने भारतासमोरची मालिका सुरू होण्याअगोदरच त्यांचा एक पाय अंतिम सामन्यात ठेवला गेलेला होता. प्रश्न भारताचा होता.

भारतीय संघाला ऑस्ट्रेलियासमोरची मालिका जिंकायचं आव्हान होतं. तसं म्हणायला गेलं तर, मायदेशात भारताला ऑस्ट्रेलियाला नमवणं अजिबातच अशक्य नव्हतं. फरक इतकाच होता की, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाला कोणताही किंतु-परंतु ठेवायचा नव्हता.

जिंकणं नक्की करायच्या ठाम मताने मालिकेअगोदर योजना आखल्या गेल्या, त्यात फिरकीला मदत करणाऱ्‍या खेळपट्ट्या तयार करायची योजना अजिबात चुकीची नव्हती. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळायचं, या एकमेव ध्येयाचं भूत मानगुटीवर बसल्याने त्याचा गेल्या तीन सामन्यांत झालेला अतिरेक त्रास देतो आहे.

घरच्या मैदानावर कसोटी सामने खेळताना यजमान संघाला साजेशा खेळपट्ट्या बनवणं हा हक्क आहे. प्रत्येक पाहुण्या संघाला कोणत्याही दौऱ्‍यावर गेल्यावर स्थानिक परिस्थितीशी सामना करायला लागणं स्वाभाविक आहे, तसंच त्यात कसोटी क्रिकेटची मजा आहे. एक गोष्ट सुरुवातीलाच मान्य करावी लागेल की, गेल्या काही वर्षांत कोणत्याही दौऱ्‍यावर भारतीय संघ गेला असताना तिथल्या खेळपट्ट्यांविषयी भारतीय संघाने एका ओळीचीही तक्रार केलेली नाही, नाराजीही दर्शवली नाही.

२०१८ सालच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील जोहान्सबर्ग कसोटी सामन्याची खेळपट्टी इतकी वेगवान गोलंदाजांना मदत करणारी ठेवली गेली होती की, बोलायची सोय नाही. तशीच खेळपट्टी २०२१ च्या भारताविरुद्धच्या पिंक बॉल कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाने अ‍ॅडलेडला ठेवली होती. त्यावर कडी करणाऱ्‍या तीन खेळपट्ट्या नागपूर, दिल्ली आणि इंदूरच्या सामन्यात चढ्या क्रमाने बघायला मिळाल्या म्हणून बोलण्यावाचून, लिहिण्यावाचून पर्याय उरला नाही.

नागपूर कसोटी सामन्याअगोदर ऑस्ट्रेलियन माध्यमांनी भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळपट्टीशी खिलवाड केल्याच्या बातम्या छापल्या. अगदी खरं सांगायचं तर नागपूर कसोटीत बोललं गेलं तेवढी खेळपट्टी फिरकीला साथ देणारी किंवा खराब नव्हती. तीच गोष्ट दिल्ली कसोटीत झाली. ऑस्ट्रेलियन संघाला पहिल्या दोन कसोटींत नाणेफेक जिंकून पहिली फलंदाजी करायची संधी मिळाली होती. सामना सुरू होण्याअगोदरच ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी खेळपट्टीचा इतका धसका घेतला होता की बोलायची सोय नाही. मग काय, व्हायचा तो परिणाम झाला.

भारतीय संघाने लागोपाठचे दोन कसोटी सामने दणक्यात जिंकून ऑस्ट्रेलियासोबत वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात एक पाय ठेवला. आता भारत - ऑस्ट्रेलिया संघांदरम्यानच जून महिन्यात अंतिम सामना रंगणार, अशी औपचारिकता निर्माण झाली. सलग दोन कसोटी सामन्यांतील विजयाचा आनंद मनात साठवत भारतीय संघातील खेळाडू हाती लागलेल्या ५-६ दिवसांच्या सुट्टीचा आनंद घ्यायला आपापल्या घरी परतले. दुसऱ्‍या बाजूला पाहुणा ऑस्ट्रेलियन संघ गोंधळलेल्या आणि पराभवाने खचलेल्या मनोअवस्थेत थोडी विश्रांती घेऊन परत कामाला लागला.

मोठी ढवळाढवळ

नागपूर कसोटी सामन्याअगोदर राहुल द्रविडने विदर्भ क्रिकेट संघटनेने तयार केलेली खेळपट्टी बदलली असल्याचं वृत्त एका टीव्ही पत्रकाराने दाखवलं, त्यावरून गदारोळ झाला. ऑस्ट्रेलियन माध्यमांनी त्याचा दाखला देत तिखट-मीठ लावून बातम्या दिल्या. दिल्ली कसोटीच्या खेळपट्टी बनवण्यावरूनही भारतीय संघ व्यवस्थापनाकडून भरपूर सूचना दिल्या गेल्या असंही समजलं. त्याच ढवळाढवळीचा कडेलोट तिसऱ्‍या कसोटीत झालेला दिसला.

हिमाचल प्रदेश क्रिकेट संघटनेच्या धरमशाला मैदानाची तयारी पूर्ण झाली नसल्याने बीसीसीआयने अचानक सामना इंदूरला हलवला. मध्य प्रदेश क्रिकेट संघटना इंदोरची खेळपट्टी तयार करू लागली. स्थानिक जाणकार आणि अनुभवी माळ्याने एक खेळपट्टी तयार केलीसुद्धा. भारतीय संघ पाच दिवसांची सुट्टी साजरी करून इंदूरला आला आणि संघ व्यवस्थापनाने खेळपट्टी बघून साशंकता व्यक्त केली. तयार केली खेळपट्टी अपेक्षेइतकी फिरकीला साथ देईल याची खात्री संघ व्यवस्थापनाला वाटली नाही आणि त्यांनी बनवलेल्या खेळपट्टीशेजारची खेळपट्टी तिसऱ्‍या कसोटी सामन्यासाठी तयार करायचा आग्रह धरला. मग काय, कमी अवधीत तयार केलेल्या खेळपट्टीने भलतेच रंग कसोटी सामन्यात दाखवले, ज्याला स्थानिक प्रशासन नव्हे, तर भारतीय संघ व्यवस्थापनाची ढवळाढवळ कारण ठरली आहे.

इंदूर कसोटीसाठी तयार केलेल्या खेळपट्टी सामन्याच्या पहिल्या दिवशी पहिल्या अर्ध्या तासापासून फिरकीला मोठी मदत करणारी झाली. ऑस्ट्रेलियन संघाने त्याचा फायदा घेत बाजी भारतीय संघावर उलटवली. कोणी कबूल करो वा न करो, भारतीय संघ व्यवस्थापनाने नागपूर आणि इंदूर कसोटीची खेळपट्टी कशी असावी यावरून केलेली ढवळाढवळ घातक परिणाम कसोटी क्रिकेटवर करून गेली आहे. भारतातील गेले कित्येक सामने तिसऱ्‍याच दिवशी संपत आले आहेत, ज्याला फलंदाजांना सळो की पळो करून सोडणाऱ्‍या फिरकीला साथ देणाऱ्‍या खेळपट्ट्या हेच एकमेव कारण आहे.

कसंही करून जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात खेळायच्या वेडाने भारतातील कसोटी क्रिकेटला धक्का लागला आहे. त्याचबरोबर भारतीय फलंदाजांनाही टोकाची परीक्षा घेणाऱ्‍या फिरकीला साथ देणाऱ्‍या खेळपट्ट्यांवर खेळून मोठं अपयश सातत्याने येत आहे. खराब खेळपट्टीवरून टीकेचा सूर मध्यप्रदेश क्रिकेट संघटनेला दिला जाणार असला, तरी त्याला खरे जबाबदार ते नसून, भारतीय संघ व्यवस्थापन आहे हे नाकारून चालणार नाही. मायदेशात खेळताना बनवल्या जाणाऱ्‍या खेळपट्टीचा स्वभाव यजमान संघाला मदत करणारा असण्यात काहीच गैर नाही; पण योजना राबवताना कृतीत अतिरेक झाला तर त्याचा फटका कसोटी क्रिकेटला बसतो आहे, हे लक्षात घेतलंच पाहिजे.