त्यानं छंद जोपासला...

आमच्या मुलानं-मुलीनं स्पोर्टस् मॅनेजमेंटमध्ये परदेशात जाऊन पदवी घेतली आहे. आयपीएल संघ व्यवस्थापनाकरिता संधी मिळू शकते का?
Sunandan Lele writes practiced hobbies to success in life
Sunandan Lele writes practiced hobbies to success in life sakal
Summary

आमच्या मुलानं-मुलीनं स्पोर्टस् मॅनेजमेंटमध्ये परदेशात जाऊन पदवी घेतली आहे. आयपीएल संघ व्यवस्थापनाकरिता संधी मिळू शकते का? ही अशी विचारणा कधीतरी नाही हो, आठवड्यातून एक-दोन वेळा अशा प्रकारची सारखीच विचारणा माझ्याकडं होत असते.

सर मला क्रिकेटची खूप आवड आहे आणि तुमच्यासारखं पत्रकार बनायचं आहे... जग फिरायचं आहे... काय करावं लागेल त्यासाठी?

सर मला कॉमेंटरी करायला खूप आवडतं... मला हर्षा भोगलेंसारखी कॉमेंटरी करायची आहे... कशी आणि कुठून सुरुवात करू मी ?

सर मला टीव्ही पत्रकार म्हणून काम करायचं आहे... क्रिकेट सामने आणि ऑलिंपिक्सचं वार्तांकन करायचं आहे... काय शिक्षण घ्यावं लागेल त्यासाठी?

आमच्या मुलानं-मुलीनं स्पोर्टस् मॅनेजमेंटमध्ये परदेशात जाऊन पदवी घेतली आहे. आयपीएल संघ व्यवस्थापनाकरिता संधी मिळू शकते का? ही अशी विचारणा कधीतरी नाही हो, आठवड्यातून एक-दोन वेळा अशा प्रकारची सारखीच विचारणा माझ्याकडं होत असते. कित्येकवेळा कॉम्प्युटर इंजिनिअर झालेली मुलं, घरच्यांनी सांगितलं म्हणून शिक्षण पूर्ण केलं; पण आम्हाला त्या क्षेत्रात काम करायचं नाही, आम्हाला क्रीडा क्षेत्रातच काम करायचं आहे, असं म्हणतात तेव्हा अंगावर काटा येतो. कसं समजवायचं या तरुण मुला-मुलींना किंवा त्यांच्या पालकांना, मला कळत नाही. बहुतांश वेळा मी सल्ला देतो की, तुम्हाला आवडतं त्या क्षेत्रात कोणत्याही स्तरावर पहिलं काम करणं सुरू करा. कामात सातत्य राखून किमान दोन वर्षं जम बसवायचा प्रयत्न करा. मग पुढची संधी आपोआप मिळेल.

आज माझ्याच एका सख्ख्या मित्राची कहाणी तुम्हाला सांगतो, ज्यानं आपला ‘छंद’ प्राणपणानं जपला आणि त्याचं खरं चांगलं फळ त्याला ३० वर्षांच्या मेहनतीनंतर मिळालं, त्याचं नाव आहे प्रकाश वाकणकर.

प्रकाश वाकणकरचं सुरुवातीचं शालेय शिक्षण केंद्रीय विद्यालयात झालं, कारण प्रकाशचे वडील गोपाळ वाकणकर भारतीय सैन्यात उच्च अधिकारी होते. त्यांची बदली पुण्यात झाल्यावर प्रकाशनं ज्ञानप्रबोधिनी शाळेत प्रवेश घेतला. ज्ञानप्रबोधिनी शाळेत अप्पासाहेब पेंडसेंच्या कडक शिस्तीत आणि राष्ट्रप्रेमाच्या संस्कारात प्रकाश मोठा झाला.

माझी आणि त्याची भेट तो अकरावीकरिता नूमवि शाळेत आला तेव्हा झाली. पुण्यातील नेहरू स्टेडियमवर १९७८-७९च्या काळात उन्हाळ्याच्या सुट्टीत क्रिकेटचं प्रशिक्षण शिबिर भरायचे, ज्यावर बाळ ज. पंडित सरांचं बारीक लक्ष असायचं. मे महिन्याच्या प्रशिक्षण शिबिराचा शेवट सगळ्या मुलांना प्रशस्तिपत्रक देऊन व्हायचा, या समारंभाला बाळ पंडित सर नामांकित व्यक्तीला बोलवायचे. त्या समारंभाकरिता प्रसिद्ध समालोचक सुरेश सरैया आल्याचं मला आठवतं; आणि त्याच समारंभानंतर बाळ पंडितांनी प्रकाश वाकणकरला एक ओव्हरची कॉमेंटरी करायला सांगितलं होतं. अकरावीमध्ये शिकत असलेल्या प्रकाश वाकणकरने अत्यंत विश्वासाने एका ओव्हरची कॉमेंटरी सादर केली, ज्यात त्याचं इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व, त्याचं क्रिकेटच्या खेळाचे बारकावे टिपण्याचं कसब दिसून आलं होतं. स्वत: सुरेश सरैया प्रकाशच्या कलेने प्रभावित झाले होते आणि त्यांनी जवळ घेऊन त्याची पाठ थोपटली होती. इतकंच नाही, तर पुण्यात होणाऱ्‍या एका प्रथम श्रेणीच्या सामन्यात अगदी थोड्या काळासाठी कॉमेंटरी करायची संधीही प्रकाशला बाळ पंडित सरांनी दिली.

त्यानंतर नूमवि शाळेच्या वरिष्ठ संघातून आम्ही क्रिकेट पहिल्यांदा एकत्र खेळलो. १९७८ मध्ये क्रिकेटमहर्षी दि. ब. देवधरांनी देवधर ट्रस्टची स्थापना करून महान प्रशिक्षक राजाभाऊ ओक यांना नेमत निवडक मुलांना प्रशिक्षण देणं सुरू केलं. देवधर ट्रस्टच्या प्रशिक्षणाच्या पहिल्या बॅचचे मी, प्रकाश वाकणकर विद्यार्थी होतो. लगेच १९८० मध्ये महाराष्ट्राच्या १९ वर्षांखालच्या संघातून आम्ही एकत्र खेळलो.

प्रकाश अभ्यासात खूपच हुशार होता. क्रिकेटचं वेड जपताना प्रकाशनं अभ्यासावरचं लक्ष कधीच कमी केलं नाही. पुण्यातील बीएमसीसी महाविद्यालयातून बी.कॉम.ची पदवी घेतल्यावर प्रकाशने सिम्बायोसिस संस्थेत एमबीएकरिता प्रवेश घेतला. दोन वर्षांच्या अभ्यासक्रमातही प्रकाश वाकणकरचं नाव नेहमी सर्वोत्तम गुण मिळवणाऱ्‍यांच्या यादीत बघायला मिळायचं. एव्हाना क्रिकेट खेळणं त्याच्यासाठी छंद बनला होता आणि मुख्य लक्ष अभ्यासात गेलं होतं. मला आठवतं की, एमबीएची पदवी घेण्याअगोदर कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये प्रकाशला दोन-तीन मोठ्या कंपन्यांनी भरघोस पगाराच्या ऑफर्स दिल्या होत्या. १९८५ मध्ये मोठ्या आंतरराष्ट्रीय औषध कंपनीत प्रकाश नोकरीला लागला आणि पुण्याबाहेर पडला. त्यानंतर त्याची प्रगती फार झपाट्याने झाली. दोन नोकऱ्‍या बदलून बघता बघता तो कोकाकोला कंपनीत चांगल्या पदावर पोहोचला.

कामात कितीही व्यग्र असला तरी प्रकाशचं क्रिकेटप्रेम कमी झालं नाही. क्रिकेट सामन्यांचं समालोचन करायची आवड नोकरीत स्थिरावल्यावर उफाळून आली. प्रकाशला खरी आवड रेडिओ कॉमेंटरीची होती. चांगला आवाज, क्रिकेटचं ज्ञान आणि रेडिओवर कॉमेंटरी करताना काय करायचं आणि काय करायचं नाही, हे कुशाग्र बुद्धीने टिपून घेतलेल्या प्रकाश वाकणकरला भारतातील सामन्यांदरम्यान ऑल इंडिया रेडिओवर कॉमेंटरी करायची संधी मिळायला वेळ लागला नाही. सुरुवातीच्या काही सामन्यांतच प्रसारभारतीला आपल्या कॉमेंटरी संघात दर्जेदार माणूस दाखल झाल्याचं समजलं होतं.

नोकरीत जबरदस्त प्रगती करून नव्या जबाबदाऱ्‍या पार पाडताना वेळात वेळ काढून प्रकाशने क्रिकेट सामन्यांचं समालोचन रेडिओवर करणं सोडलं नाही. त्याचा फायदा असा झाला की, भारतीय क्रिकेट संघ विश्‍व करंडकासारख्या मोठ्या आयसीसी स्पर्धेत खेळत असताना इंटरनेट रेडिओवर प्रकाशला सुनील गावसकर, सर गॅरी सोबर्स, जेफ्री बॉयकॉटसारख्या महान खेळाडूंबरोबर कॉमेंटरी करायची संधी मिळाली. जो आनंद नोकरीतील मोठं काम करून मिळाला नाही, ती प्रकाश वाकणकरला मोठ्या स्पर्धांतील क्रिकेट सामन्यांची रेडिओ कॉमेंटरी करताना मिळाली.

मोठी संधी मोठा मान

क्रिकेट सामन्यांच्या रेडिओ कॉमेंटरीकरिता मापदंड मानला जातो तो इंग्लंडमधील ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन म्हणजेच बीबीसीचा. प्रकाशची कॉमेंटरी ऐकून २०१२ मध्ये बीबीसीने प्रकाशला एकदा त्यांच्यासोबत कॉमेटरी करायला बोलावलं. पहिल्याच सामन्यात प्रकाशने अशी काही कॉमेंटरी केली की, बीबीसीचे लोक खूश झाले. तेव्हापासून भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध खेळत असताना किंवा विश्‍व करंडकसारखी स्पर्धा चालू असताना बीबीसीच्या कॉमेंटरी संघात प्रकाशचं नाव हमखास असतं.

महिंद्र आणि महिंद्र कंपनीच्या तीन विभागांचा आंतरराष्ट्रीय कारभार प्रकाश वाकणकर सक्षमतेने संभाळतो. कंपनीचे सर्वेसर्वा आनंद महिंद्र यांनाही प्रकाशच्या रेडिओ कॉमेंटरी छंदाचं कौतुक आहे. म्हणून विश्‍व करंडक स्पर्धा चालू असताना कंपनीचा मोठा कारभार सांभाळत असूनही कंपनी प्रकाशला कॉमेंटरी करायला जायची परवानगी देते. इतके दिवस भारताच्या सामन्यादरम्यान कॉमेंटरी करायला बीबीसी प्रकाशला बोलावत असे. त्यात अजून एक मान प्रकाशला दिला गेला. इंग्लंड विरुद्ध न्यूझीलंड दरम्यानच्या तिसऱ्‍या कसोटी सामन्याच्या बीबीसी टेस्ट मॅच स्पेशल कॉमेंटरीसाठी प्रकाशला बोलावलं गेलं आहे.

प्रकाश वाकणकरची कहाणी मांडण्याचा उद्देश एकच आहे की, ज्या कोणाला खेळाच्या क्षेत्रात नाव कमवायचं आहे, त्यानं वीस वर्षं न थकता आणि जास्त मोठ्या फळांची अपेक्षा न ठेवता काम करायची तयारी ठेवायला हवी. व्यावसायिक क्षेत्रात प्रचंड मोठ्या जबाबदाऱ्‍या सांभाळून प्रकाश वाकणकर आपला रेडिओ कॉमेंटरीचा छंद जोपासून आनंद मिळवत आहे, यातून आपल्यालाही शिकण्यासारखं खूप काही आहे, असं नाही का वाटत तुम्हाला?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com