आशा वाढवणारं वर्ष... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Aashish Kasodekar
आशा वाढवणारं वर्ष...

आशा वाढवणारं वर्ष...

संपूर्ण मानवजातीची कठोर परीक्षा बघणारं २०२१ संपलं. देशातल्या क्रीडाजगताचा विचार करता २०२१ हे वर्ष चांगलं गेलं, ज्याला मी आशा जिवंत ठेवणारे वर्ष संबोधलंय. येणारे वर्ष आशा वाढवणारे आहे यात शंका नाही.

टोकीयो ऑलिंपिकची जमेची बाजू

भारत सरकार आणि क्रीडा प्राधिकरण यांनी मिळून विविध क्रीडा संघटनांबरोबर योग्य समन्वय साधल्याचा सकारात्मक परिणाम ऑलिंपिक स्पर्धेतील भारतीय चमूच्या कामगिरीवर झाला. देशानं सात पदके मिळवली. ट्रॅक अँड फिल्ड खेळात भारतीय खेळांडूनी पहिल्यांदा ऑलिंपिक सुवर्णपदक जिंकण्याची किमया साधली हे २०२१ या वर्षांतलं सर्वात मोठं यश म्हणावं लागेल. नीरज चोप्राच्या भालाफेकमधील अभूतपूर्व कामगिरीने संपूर्ण भारतात आनंदाची लाट पसरली.

पाठोपाठ मीराबाई चानूने वेट लिफ्टींग आणि रवी कुमार दाहीयाने कुस्तीत रजतपदक कमावले. कुस्तीगीर बजरंग पुनियाबरोबर पी.व्ही. सिंधूने बॅडमिंटन तर लवलिना बोर्गेननं मुष्टियुद्धात कांस्य पदकाची कमाई केली. टोकीयो ऑलिंपिकने भारतीय खेळातील अजून एक उपवास तोडला. ४१ वर्षांनंतर भारतीय हॉकी संघाने पदकाची वाटचाल जिद्दीने पूर्ण केली. पुरुष हॉकी संघाने कांस्य पदकाची कमाई केली ज्याने हॉकीला नवसंजीवनी मिळाली असेच म्हणावे लागेल. जर नेमबाजांनी अपेक्षित कामगिरी केली असती तर पदकांनी दोन आकडी मजलही मारली असती. वर्ष सरत असताना श्रीकांत कंदंबीने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरीत धडक मारून आशा निर्माण केल्या आहेत.

जोकोविचने कमाल केली

२०२१ या वर्षांवर नोवाक जोकोविचने जबरदस्त ठसा उमटवला. ऑस्ट्रेलियन, फ्रेंच आणि विम्बल्डन अशा तीन मुख्य स्पर्धा जिंकून जोकोविच खरे खुरे ग्रँन्ड स्लॅम पूर्ण करायच्या जिद्दीने पेटला होता. सतत सर्वोच्च स्तरावर खेळून पूर्ण थकल्या अवस्थेत जोकोविच टोकीयो ऑलिंपिक खेळायला गेला ते केवळ देशप्रेमाच्या ओढीने. शेवटच्या ग्रँन्डस्लॅम स्पर्धेत, म्हणजेच अमेरिकन खुल्या स्पर्धेत डनिल मेडवडेवने फारच अफलातून खेळ करून जोकोविचला नामोहरम केले. सरळ तीन सेटमध्ये जोकोविचला पराभूत करून ग्रँन्ड स्लॅम पूर्ण करायच्या त्याच्या स्वप्नाला सुरुंग लागला. तरीही मी म्हणेन की २०२१ या वर्षांवर नोवाक जोकोविचचा शिक्का आहे.

स्टीफानो स्तितीपास, डनिल मेडवडेव आणि अलेक्झांडर झेवरेव हे तीन तरुण खेळाडू नोवाक जोकोविच, रफाएल नदाल सारख्या जुन्या जाणत्या खेळाडूंसमोर सतत आव्हान निर्माण करत आहेत. दुखापतीतून सावरलेला अँन्डी मरे एकीकडे पुनरागमन करायला धडपडतो आहे. दुसरीकडे टेनिसचा बादशाह रॉजर फेडरर मोठ्या शस्त्रक्रियेतून सावरून टेनिस कोर्टवर पाऊल ठेवायचा प्रयत्न अजूनही करतो आहे. २०२२ मध्ये कोणता खेळाडू नोवाक जोकोविचच्या सातत्याला धक्का देण्याची हिंमत करतो हे बघणे रंजक ठरणार आहे.

क्रिकेटमधला यश अपयशाचा झोपाळा

भारतीय क्रिकेट संघात खूप मजेदार घटना २०२१ मध्ये घडल्या. २०२१च्या सुरुवातीला भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला त्यांच्या मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूत करायचा चमत्कार करून दाखवला. २०२१मध्ये संपलेल्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यात अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना दुखापती झाल्या. अनुभवी खेळाडूंच्या जागी संधी मिळालेल्या नवख्या खेळाडूंनी निडर खेळ करून ‘आ रे ला का रे’ करणारा आक्रमक खेळ करून ऑस्ट्रेलियाला धूळ चारली. २०२१च्या मार्च महिन्यात ऑस्ट्रेलियात झालेल्या महिलांच्या वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने अंतिम सामन्यात प्रवेश केला जी कामगिरी लक्षणीय होती.

मायदेशात विराट कोहलीच्या भारतीय क्रिकेट संघाला पराभूत करणे भल्याभल्या संघांना जमलेले नाही. उन्हाळ्यात इंग्लंड दौर्‍यावर गेलेल्या भारतीय संघाने थेम्स नदीच्या दोन किनार्‍यांवर असलेल्या ओव्हल आणि लॉर्डस् मैदानावरचे कसोटी सामने जिंकून इंग्लंडमध्ये कसोटी मालिका जिंकण्याकडे भक्कम वाटचाल केली. कोविडच्या प्रादुर्भावाने शेवटचा सामना पुढे ढकलावा लागला.२०२१ हे वर्ष पूर्णपणे यशस्वी झाले असे मात्रं नक्कीच म्हणता येणार नाही कारण आखातात झालेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाची कामगिरी अत्यंत खराब झाली आणि बाद फेरीत भारतीय संघाला जाता न आल्याने मोठी नामुष्की सहन करावी लागली.

नवे वर्ष मोठ्या स्पर्धांचं

२०२२ हे नवं वर्ष भारतीय क्रिकेटकरता खूप महत्त्वाचं ठरणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला १९ वर्षां खालचा विश्‍वकरंडक स्पर्धा वेस्ट इंडीजमधे रंगणार आहे. नंतर लगेच न्यूझीलंडमधे महिलांचा ५० षटकांचा वर्ल्डकप होणार आहे. मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ नुसताच बाद फेरीत पोहोचतो का शेवटची पायरी जिद्दीने ओलांडतो हे बघायला मजा येणार आहे. आणि ऑक्टोबर -नोव्हेंबर महिन्यात ऑस्ट्रेलियात टी२० वर्ल्डकप होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली कामगिरीची उत्सुकता असेल.

ही झाली कहाणी मोठ्या स्तरावर खेळणार्‍या खेळाडूंची आणि संघांची जे भारताचे प्रतिनिधित्व करतात. पण तुम्हांला सांगतो की जास्त गाजावाजा न करता एक खेळाडू केवळ स्वत:च्या क्षमतेला मोठे आव्हान देऊ बघतोय. होय पुणे विद्यापीठाच्या आवारात अत्यंत शांतपणे आशिष कसोदेकर चमत्कारिक विश्वविक्रम करायच्या जिद्दीने वाटचाल करतोय. आशिष कसोदेकर काय करायला बघतो आहे हे इथे नुसते वाचून तुम्हांला दम लागेल किंवा बसल्याजागी घाम फुटेल. ६० दिवस ६० मॅरेथॉन पळण्याचा प्रयत्न आशिष कसोदेकर करतोय. २८ नोव्हेंबर २०२१ ला आशिषने या उपक्रमाला सुरुवात केलीय. म्हणजेच हा लेख तुमच्या हाती पडेपर्यंत आशिषनं निम्मे उद्दिष्ट पार केले असेल. २६ जानेवारी २०२२ ला आशिष कसोदेकर साठावी मॅरेथॉन पळेल असा आत्मविश्वास त्याला आहे. लक्षणीय बाब अशी की आशिष कसोदेकर पोरसवदा तरुण नसून ५० वर्षांचा अशक्य जिद्दीचा माणूस आहे. हेच कारण आहे की मला वाटते, २०२१ आशा जिवंत ठेवणारे आणि २०२२ आशा वाढवणारे वर्ष ठरणार आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :sportsSunandan Lele
loading image
go to top