काही शंकांचं निरसन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Indian Cricket Team

‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेचं वार्तांकन करून ऑस्ट्रेलियामधून परतलो आणि मित्र-मैत्रिणी तसंच ओळखीच्या बऱ्याच लोकांनी मला भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारले, ज्यांत साम्य होतं.

काही शंकांचं निरसन

‘टी-२०’ विश्वचषक स्पर्धेचं वार्तांकन करून ऑस्ट्रेलियामधून परतलो आणि मित्र-मैत्रिणी तसंच ओळखीच्या बऱ्याच लोकांनी मला भारतीय संघाच्या कामगिरीबद्दल प्रश्न विचारले, ज्यांत साम्य होतं. भारतीय संघ ज्या प्रकारे उपांत्य सामना हरला, त्याचा भारतीय क्रिकेट चाहत्यांना खूप राग आलाय. बाकी कोणत्याही खेळाडूंपेक्षा भारतीय खेळाडूंना ‘टी-२०’ क्रिकेटचा इतका प्रचंड अनुभव असतानाही भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही हे या रागाचं मुख्य कारण आहे. अनेकांच्या मनात असलेल्या शंकांचं निरसन करायचा प्रयत्न इथे करतो.

आयपीएलचा उपयोग काय

आयपीएल जगातील नामांकित स्पर्धा आहे, ज्यातील खेळाचा दर्जाही उच्च आहे. भारतीय संघातील सर्वच्या सर्व खेळाडू इतकी वर्षं आयपीएल खेळतात, मग त्याचा प्रत्यक्ष फायदा भारतीय संघाला का होत नाही? आयपीएल स्पर्धेत सर्वस्व झोकून देऊन खेळणारे भारतीय खेळाडू जागतिक स्पर्धेत नको त्या वेळी निराशाजनक कामगिरी कसे करतात, हा प्रश्न बऱ्‍याच लोकांना भेडसावत आहे.

भारताने ‘टी-२०’ स्पर्धा जिंकली, त्यानंतर आयपीएल सुरू झालेलं आहे. आयपीएल सुरू झाल्यानंतर भारतीय संघाचं ‘टी-२०’ विश्वकरंडकावर नाव कोरलेलं नाही, हे सत्य कोणालाच नाकारून चालणार नाही. तरीही मी म्हणेन की, भारतीय संघाच्या ‘टी-२०’च्या विश्‍व करंडकातील खराब कामगिरीला आयपीएल स्पर्धेला जबाबदार मानता येणार नाही.

सामान्यांचा असाही आरोप आहे की, भारतीय खेळाडू जीव लावून आयपीएल खेळतात, तसं भारतीय संघाकडून इतर वेळी खेळताना सर्वस्व पणाला लावलं जात नाही. पत्रकार म्हणून वार्तांकन करताना एक गोष्ट स्पष्ट दिसते ती म्हणजे, भारतीय संघातील सर्वच्या सर्व खेळाडूंना भारतीय संघाची कॅप डोक्यावर घालून खेळायचा प्रचंड अभिमान आहे. देशाकरिता खेळणं हाच सगळ्यांचा प्राधान्याचा विषय आहे. भारतीय संघाला मोठा पराभवाचा दणका बसला की, अशा प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. फक्त त्यात भावना जास्त आणि तथ्य कमी असं मला तरी वाटतं.

जर भारतीय संघाच्या अपयशाचं कारण शोधायचं असेल, तर ते संघनिवड, योजना आखणी आणि त्याची अंमलबजावणी यात झालेल्या चुकांमध्ये जास्त दिसतं.

विश्वकरंडक स्पर्धेला २०१९ मध्ये जाणाऱ्‍या संघात विजय शंकर या खेळाडूची निवड अष्टपैलू म्हणून आणि त्यापेक्षा धक्कादायक बाब म्हणजे चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून केली गेली होती. तशीच काहीशी चूक ‘टी-२०’ विश्वचषक संघनिवडीच्या संदर्भात झाली असं म्हणावं लागेल. २०२२च्या ‘टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाच्या पहिल्या तीन क्रमांकांच्या खेळाडूंमध्ये तोडफोड फलंदाज नव्हता. रोहित शर्मा, के. एल. राहुल आणि विराट कोहली एका पठडीतले फलंदाज होते. जम बसवायला थोडा वेळ घेऊन मग आक्रमक फटके मारणारे फलंदाज. अगदी सत्य बोलायचं तर ‘टी-२०’ क्रिकेट आता त्या प्रकारे खेळलं जात नाही. सुरुवातीला आक्रमण करून समोरच्या गोलंदाजांवर दडपण वाढवू शकणारे संघच यशस्वी झाल्याचं दिसतात. विश्वचषक स्पर्धेला जाण्याअगोदर भारतीय संघ भरपूर ‘टी-२०’ सामने खेळला होता, तरीही बुमराला दुखापत झाल्यावर समर्थ पर्याय निवडीकरिता उपलब्ध नव्हता.

‘टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेत भारतीय संघाने उपांत्य फेरी गाठली; पण महत्त्वाच्या सामन्यात एकदाही चांगली सुरुवात भारतीय फलंदाजांना करता आली नाही. सलामीला जाऊन दोन वेळा राहुलने पहिलं षटक निर्धाव खेळून काढलं. धक्का याचा बसला की, प्रशिक्षक राहुल द्रविडने त्याच्यावर ठाम उपाययोजना केल्याचं दिसलं नाही. के. एल. राहुल शेवटपर्यंत चाचपडत आणि त्याच्याच शैलीत खेळत राहिला. संघ व्यवस्थापनाने के. एल. राहुलच्या क्षमतेवर संपूर्ण विश्वास दाखवून त्याला समर्थन दिलं हे सत्य असलं, तरी के. एल. राहुलने त्याचा परतावा योग्य प्रकारे प्रयत्न करून दिला असं अजिबातच म्हणता येणार नाही. सलामीला जाऊन धडाकेबाज खेळ करायची त्याची मानसिकता नव्हती, हे वारंवार दिसून आलं. जर राहुलला आत्मविश्वास जाणवत नव्हता, तर निदान पहिला चेंडू रोहित शर्माने खेळायला काय हरकत होती? प्रशिक्षक म्हणून योजना आखण्यात राहुल द्रविड कमी पडला असंच दिसून आलं.

कमजोर अंमलबजावणी

भारतीय संघ व्यवस्थापनाने कागदावर आखलेल्या योजनांची कठोर अंमलबजावणी केली असं म्हणता येणार नाही. मग ती पहिल्या सहा षटकांतील फलंदाजी असो वा पहिल्या सहा षटकांतील गोलंदाजी असो. भारतीय संघात त्याच फिरकी गोलंदाजांना संधी मिळाली, ज्यांनी जास्त काही चमक दाखवली नाही. कप्तान रोहित भांबावलेला दिसला, तसंच प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविडकडे वेगळ्या उपाययोजना होत्या असं दिसलं नाही. दिनेश कार्तिकला पाठिंबा द्यायचा का रिषभ पंतला संधी द्यायची यावरूनही संदिग्धता बघायला मिळाली.

विचार बदलावे लागतील

दोन वर्षांनंतर होणाऱ्या ‘टी-२०’ विश्वकरंडक स्पर्धेसाठी बांधणी करताना निवड समितीला खूप वेगळे विचार करावे लागतील. पहिली गोष्ट म्हणजे निवड समिती आणि प्रशिक्षणात ‘टी-२०’ क्रिकेटचा नुसता अभ्यास नव्हे तर गाढा अनुभव असलेल्या लोकांना सहभागी करून घेणं गरजेचं ठरणार आहे.

इंग्लंड संघ विश्वविजेता ठरला याच्या मागे बराच विचार दडला आहे. गेली काही वर्षं इंग्लंड संघ पांढऱ्या चेंडूचं क्रिकेट वेगळ्याप्रकारे खेळू लागला आहे आणि त्यासाठी वेगळे खेळाडू त्यांनी राखून ठेवले आहेत. बेधडक क्रिकेट खेळण्याकडे इंग्लंड संघाचा प्रवास अचानक झालेला नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला अशाच पद्धतीचा विचार करावा लागणार आहे. कुठल्याच खेळाडूला कसोटी, एक दिवसीय आणि ‘टी-२०’ असं तीनही प्रकारचं क्रिकेट खेळणं शक्य होणार नाहीये. निर्भेळ यश मिळवायचं झाल्यास कसोटीसाठी वेगळा कप्तान आणि एक दिवसीय तसंच ‘टी-२०’ क्रिकेटसाठी वेगळा कप्तान असं गणित मांडण्यावाचून पर्याय राहणार नाही. इंग्लंडने तर प्रशिक्षकही वेगळे नेमले आहेत, लाल चेंडू आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटसाठी.

गेली नऊ वर्षं मुख्य स्पर्धांमध्ये अपेक्षित यश न मिळाल्याचं शल्य बीसीसीआय आणि खेळाडूंना वाटत असणार यात शंका नाही; पण भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि भारतीय संघ व्यवस्थापन कुठल्याच चुकीची कबुली देत नाही. त्या सगळ्याचा विचार करता बदल करणं अनिवार्य झालं आहे. थोडक्यात सांगायचं तर, हार्दिक पंड्या कसोटी क्रिकेटचा ताण सोसण्यापासून काहीसा लांब गेला असताना त्याच्या हाती निदान तरुणांच्या ‘टी-२०’च्या संघाची जबाबदारी देणं क्रमप्राप्त झालं आहे, असं नाही का वाटत तुम्हाला?