जुन्यांचा वाजला भोंगा आणि नव्यांचा डंका

टाटा आयपीएल २०२२ च्या पहिल्या महिन्याचा खेळ आणि लागलेले निकाल क्रिकेट जाणकार समजल्या जाणाऱ्यांच्या अंदाजांना सुरुंग लावणारे ठरले आहेत.
TATA IPL
TATA IPLSakal
Summary

टाटा आयपीएल २०२२ च्या पहिल्या महिन्याचा खेळ आणि लागलेले निकाल क्रिकेट जाणकार समजल्या जाणाऱ्यांच्या अंदाजांना सुरुंग लावणारे ठरले आहेत.

टाटा आयपीएल २०२२ च्या पहिल्या महिन्याचा खेळ आणि लागलेले निकाल क्रिकेट जाणकार समजल्या जाणाऱ्यांच्या अंदाजांना सुरुंग लावणारे ठरले आहेत. मुख्य लिलावाने जम बसलेल्या संघांना लागलेला धक्का स्पर्धा चालू झाल्यावरच दिसून येत आहे. इतिहासात जबरदस्त कामगिरी करणाऱ्‍या संघांना एका मागोमाग एक पराभवाचे धक्के बसले आहेत. दुसऱ्‍या बाजूला नव्याने दाखल झालेल्या संघांनी चांगलीच घोडदौड केली आहे. नुसते संघांच्या कामगिरीचे अंदाज चुकलेले नाहीत, तर खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीच्या अंदाजांनाही धक्का लागला आहे. कशामुळे होते आहे असं, जरा अभ्यास करूयात.

संघबांधणी विस्कटली

२००८ मध्ये आयपीएल स्पर्धा सुरू झाल्यापासून सर्वाधिक यश चेन्नई आणि मुंबई संघांनी मिळवलं. विजेतेपदाचे तेच मुख्य दावेदार ठरले. २०२२ची स्पर्धा सुरू होण्याअगोदर बीसीसीआयने दोन संघांना नव्याने स्पर्धेत दाखल करून घ्यायचा घाट घातला. दोन संघ दाखल होणार असल्याने अगोदरच्या आठ संघांना प्रत्येक संघाला चार खेळाडू राखून ठेवण्याचा अधिकार देण्यात आला. मग उरलेल्या खेळाडूंमधून नव्याने स्पर्धेत सहभागी होणाऱ्‍या संघांना काही खेळाडू लिलावाअगोदर विकत घेण्याची मुभा देण्यात आली. उरलेले सगळे खेळाडू मुख्य लिलावाच्या यादीत नोंदले गेले.

आठ संघांनी चार खेळाडू राखून ठेवायला बराच विचार केला. बऱ्‍याच संघांनी चारपैकी तीन योग्य निवड करून खेळाडूंना राखलं. पण, असं करताना एक खेळाडू राखताना क्रिकेट संघांनी बांधणीपेक्षा भावनिक विचार जास्त केला. साहजिकच संघाची बसलेली घडी पार विस्कटली. त्याचा थेट परिणाम संघांच्या कामगिरीवर झालेला दिसतो.

मुंबई-चेन्नई संघांची वाताहत

मुंबई संघाने ट्रेंट बोल्टला सोडून देताना कायरन पोलार्डला राखून ठेवलं. तसंच, ईशान किशनला प्रचंड रक्कम खर्ची करून संघात घेतलं आणि भविष्याचा विचार करून जोफ्रा आर्चरवर वारेमाप पैसा गुंतवला. याचा विपरीत परिणाम मुंबई इंडियन्सच्या संघबांधणीवर झाला. एकीकडे भारतातील उदयोन्मुख खेळाडू निवडताना मुंबई संघ जरा गोंधळला आणि दुसरीकडे जसप्रीत बुमराचा साथीदार ट्रेंट बोल्ट निघून गेल्याने गोलंदाजीतला डंख कमी झाला. दुष्काळात तेरावा महिना म्हणजे, रोहित शर्माच्या बॅटमधून धावांचा ओघ आटला आणि कोट्यधीश ईशान किशनने चांगली सुरुवात करून नंतर फलंदाजीची लय गमावली. तरीही मुंबई संघाने सलग आठ सामन्यांत पराभव पत्करला आहे आणि अजून तरी त्यांची पाटी गुणतक्त्यात कोरी आहे, हे स्पष्ट दिसूनही मनाला पटत नाही.

चेन्नई संघाचं तेच झालं. धोनीचा उत्तराधिकारी योग्य वेळी नेमून भविष्यातील मार्गाची आखणी करताना चेन्नई संघ कमी पडला. चेन्नई संघाने विचार केला होता की, त्यांचा लाडका खेळाडू फाफ डु प्लेसिसला लिलावात परत संघात दाखल करून घेऊ. बेंगलोर संघाने फाफ डु प्लेसिसला आपल्या संघात ओढण्याकरिता आठ कोटींची बोली लावल्याने चेन्नई संघाचा नाइलाज झाला. त्यातून गेल्या मोसमातील फलंदाजीचा मुख्य हिरो ऋतुराज गायकवाडला फक्त एकाच सामन्यात फलंदाजीची चांगली लय गवसलेली दिसली. यापेक्षा मोठा धक्का चेन्नईला सहन करावा लागला तो म्हणजे, दीपक चहरला झालेल्या दुखापतीचा. चहर असा गोलंदाज होता, जो चेन्नईला पहिल्या चार षटकांत हमखास फलंदाज बाद करून मस्त सुरुवात करून द्यायचा. दीपक चहरचं दुखापतीमुळे पूर्ण मोसमात संघात नसणं चेन्नई संघाला चांगलंच महागात पडलं आहे.

कोहलीच्या फॉर्मची चर्चा

बेंगलोर संघाच्या प्रशिक्षकांशी बोलल्यावर कळलं की, विराट कोहली नित्य नियमाने व्यायाम आणि सराव करत आहे. सरावादरम्यान कोहली चांगली फलंदाजी करत आहे. क्रिकेट हा असा काही विचित्र खेळ आहे की, कितीही प्रयत्न केले आणि शिस्त पाळली, तरी फलंदाजाला अपेक्षेप्रमाणे धावा जमा करता येतीलच असं नाही. विराट कोहली तीच दशा आत्ताच्या घडीला अनुभवतो आहे. बॅड पॅच म्हणजे फलंदाजीला लागलेलं काय ग्रहण असतं हे कोहलीला कळत आहे. दिसायला प्रत्येक सामन्यात मोठ्या विश्वासाने मैदानात फलंदाजीकरिता उतरणाऱ्‍या कोहलीला मनातून अपयशाची धास्ती वाटत आहे, हे स्पष्ट दिसून येत आहे. कोहलीचा खंदा समर्थक रवी शास्त्रीने विराटने क्रिकेटपासून काही काळ लांब जाणे, विश्रांती घेणे गरजेचं असल्याचं बोलून दाखवलं आहे. विराट कोहली मनाने आणि शरीराने कितीही थकला असला तरी ते मान्य करून तो लगेच क्रिकेटपासून लांब जाईल असं वाटत नाही. खास करून आयपीएलचा हंगाम मध्यावर सोडणं त्याला शोभणार नाही आणि बेंगलोर संघाच्या मनोधैर्याला झेपणार नाही.

नव्यांचा डंका

रोहित शर्मा आणि विराट कोहली हे मुरलेले खेळाडू फलंदाज म्हणून अपयशी ठरत असताना आयपीएल स्पर्धेतील नावारूपाला न आलेले खेळाडू कमाल कामगिरी करत आहेत. जम्मू भागातून भारतीय क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आलेला उमरान मलिक आपल्या अचूक वेगवान गोलंदाजीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. उमरान मलिक नुसता वेगाने मारा करत नाहीये, तर त्याच्या गोलंदाजीत टप्पा दिशाही आहे. बीसीसीआयसुद्धा उमरान मलिककडे बारीक लक्ष ठेवून आहे आणि लवकरच त्याला मुख्य भारतीय संघात दाखल करून घेण्याची चर्चा कानावर यायला लागली आहे. फलंदाजीत एकीकडे नामांकित फलंदाजांना पाव शतकी मजल मारताना नाकी नऊ येत असताना जोस बटलरने राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळताना तीन शतकं ठोकली आहेत. तसंच, युझवेंद्र चहल आणि कुलदीप यादवच्या फिरकीला चांगलीच धार आल्याचं दिसून येत आहे.

चालू मोसमात गुजरात टायटन्स संघाने केलेली आत्तापर्यंतची कामगिरी सगळ्यांना थक्क करून गेली आहे. गुजरातचा संघ कागदावर परिपूर्ण वाटत नाही, त्यांचा कर्णधार हार्दिक पंड्याकडे नेतृत्वाचा अनुभव नाही, तरीही गुजरात टायटन्स संघाने भल्याभल्या संघांना पराभवाची धूळ चारली आहे. तीन सामने त्यांनी अशक्य परिस्थितीतून जिंकून दाखवले आहेत. यातील प्रत्येकी दोन वेळा राहुल तिवाटिया आणि राशिद खानने केलेली निर्णायक फटकेबाजी तोंडात बोटं घालायला लावणारी होती.

हवामानाचे आकडे ४०चा आकडा पार करत असताना प्रथितयश संघ आणि खेळाडू हेलकावे खात आहेत. दुसऱ्‍या बाजूला प्रसिद्धीचं वलय नसणारे खेळाडू आणि संघ जबरदस्त कामगिरी करून लक्ष वेधून घेत आहेत. प्रेक्षकांची अडचण एकच होत आहे ती म्हणजे, सगळ्याच संघांतील खेळाडू इकडे-तिकडे विखुरले गेल्याने नक्की कोणत्या संघाला पाठिंबा द्यायचा, हा संभ्रम निर्माण होत आहे. हेच कारण असेल की, यंदाच्या आयपीएल हंगामाचे टेलिव्हिजन प्रेक्षक कमी झाल्याची चर्चा रंगत आहे. कोणी काही म्हणो, हवेतील वाढत्या उष्णतेबरोबरच टाटा आयपीएलचा उत्तरार्ध अजून रंगतदार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com