अल्टिमेट टेबल टेनिसचा थरार

प्रीमियर बॅडमिंटन लीगने जोर पकडल्यानंतर बॅडमिंटनच्या क्षेत्रात उत्साहाचं वारं संचारलं, अगदी तसंच २०१७ मध्ये सुरू केलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस लीगने केलं आहे.
Table Tennis
Table Tennissakal

पुणे-मुंबई महामार्ग चालू होत असताना डावीकडे बालेवाडी भागात शिवछत्रपती क्रीडा संकुल वसवलं गेलं आहे. अगोदर जवळपास दुर्लक्षित अवस्थेतल्या या संकुलात गेली पाच वर्षं चांगलीच उत्साही धामधूम आहे. प्रो कबड्डी लीगचे सामने या संकुलात व्हायला लागले, ज्याला उत्तम प्रतिसाद लाभला.

दर्जेदार खेळाडू चांगला खेळ केल्यावर मांडीवर पंजा मारून आवाज काढतात, त्याला शड्डू ठोकणे म्हणतात, त्या आवाजाने संकुल दुमदुमलं. गेल्या दोनपेक्षा अधिक आठवडे या संकुलामध्ये ‘टकटक’ असा आवाज येतोय, कारण भारतातील सर्वांत मोठी दर्जेदार अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धा सुरू आहे, ज्याचा अंतिम सामना आज होतो आहे.

आयपीएलच्या यशानंतर बाकीच्या खेळांनी कित्ता गिरवत मोठ्या प्रोफेशनल लीग चालू केल्या. इंडियन सुपर लीगने भारतीय फुटबॉलमध्ये जोम आला. हॉकी इंडिया लीगने हॉकीला नवसंजीवनी लाभली. प्रो कबड्डी लीगने भारतीय खेळाला जगमान्यता लाभली.

प्रीमियर बॅडमिंटन लीगने जोर पकडल्यानंतर बॅडमिंटनच्या क्षेत्रात उत्साहाचं वारं संचारलं, अगदी तसंच २०१७ मध्ये सुरू केलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस लीगने केलं आहे. स्वतः दर्जेदार टेबल टेनिस खेळलेले उद्योगपती नीरज बजाज यांनी विटा दाणी यांच्यासोबत भारतात जागतिक स्तराची टेबल टेनिस लीग चालू करायचा घाट घातला.

मोठा उद्योग सांभाळणाऱ्‍या दोन नामांकित व्यक्ती एकत्र आल्याने योजना आखण्याला बळकटी आली. विटा दाणी भारतातील सर्वांत मोठ्या फुटबॉल लीगमध्ये संघ मालकीण होत्याच. विटा आणि जलज दाणींचा मुलगा मुदीत स्वतः उच्च स्तरावरचं टेबल टेनिस खेळत असल्याने खेळातील रस होताच. त्याच खेळप्रेमाला मूर्त स्वरूप देताना नीरज बजाज आणि विटा दाणींनी उचल खात २०१७ मध्ये अल्टिमेट टेबल टेनिस लीगची मुहूर्तमेढ रोवली.

अल्टिमेट टेबल टेनिस लीग चालू करताना भारतातील खेळाडूंना जगातील खेळाडूंसोबत दर्जेदार स्पर्धेत खेळता यावं, ज्यातून खेळाचा प्रचार प्रसार होऊन टेबल टेनिस खेळणाऱ्‍या मुला-मुलींचं प्रमाण वाढावं, हा मुख्य उद्देश नीरज बजाज आणि विटा दाणींचा होता.

स्पर्धेच्या निमित्ताने जगातील आणि भारतातील सर्वोत्तम प्रशिक्षक फिजिओ ट्रेनर आणि खेळ मानसोपचारतज्ज्ञ यांच्यासोबत खेळाडूंना काम करता यावं आणि खेळात सुधारणा करणं शक्य व्हावं, हासुद्धा महत्त्वाचा उद्देश होता. अंतिम ध्येय २०२४ मध्ये पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भारतीय टेबल टेनिसपटूने पदक जिंकावं, हे नक्की करण्यात आलं. जेव्हा उद्योगाच्या क्षेत्रात चांगलं काम करणारे लोक एकत्र येऊन अत्यंत चांगल्या विचारांनी दर्जेदार लीग सुरू करतात, तेव्हा प्रगतीच्या पथावर पहिलं पाऊल योग्य दिशेला पडलेलं असतं.

२०१७ मध्ये स्पर्धा चालू केली होती, तरीही जगातील खेळाडूंना अल्टिमेट टेबल टेनिस लीगमध्ये खेळायला यायचा तो मोह पडत नव्हता. लीगची सुरुवात असल्याने प्रेक्षकांचा प्रतिसाद जोरकस नव्हता. स्पर्धा टीव्हीवर दाखवण्यासाठी बरीच फिल्डिंग लावावी लागली.

सगळ्यांच्या मनात प्रश्न होता की, नीरज बजाज आणि विटा दाणींनी मोठ्या जोमाने सुरू केलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस लीग आयोजनातील उत्साह किती वर्षं टिकून राहील. स्पर्धेचं उद्दिष्ट बघून इंडियन ऑइल कंपनीने मुख्य प्रायोजकत्व दिलं, तसंच भारतीय टेबल टेनिस संघटनेसह आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस संघटनेने अधिकृत पाठबळ दिलं, ज्याचा खूप सकारात्मक परिणाम झाला.

स्पर्धेने योग्य परिणाम साधला होता आणि चांगली लय सापडली असताना कोरोना महासाथीचं संकट जगावर घोंघावलं. बाकी खेळांच्या लीगप्रमाणे अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेला धक्का बसला. तीन सीझन यशस्वी करून दाखवले असल्याने यंदाच्या वर्षी परत एकदा अल्टिमेट टेबल टेनिसचा घाट घालताना अडचण आली नाही. प्रायोजकांनी विश्वास दाखवला तसंच स्पोर्टस् १८ चॅनेलने स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करायला पाऊल पुढे टाकलं.

अल्टिमेट टेबल टेनिसचा खरा फायदा काय आहे, असा प्रश्न भारतीय टेबल टेनिस संघासोबत काम करणाऱ्‍या खेळ मानसोपचार तज्ज्ञ गायत्री वर्तकला विचारला असता ती म्हणाली, ‘‘सहा संघातील तरुण उभरत्या खेळाडूंना खरा फायदा होताना मला दिसतो आहे. मोठे खेळाडू खातात काय, व्यायाम काय करतात, सामन्याअगोदर तयारी कशी करतात आणि सामन्यातील चढ-उतारांना तोंड कसं देतात, या सगळ्या गोष्टी हाताच्या अंतरावरून शिकता येत आहेत.

त्याचबरोबर अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेची धाटणी अशी आहे की, नेमके तुम्ही कोणत्या प्रतिस्पर्ध्यासमोर खेळणार आहात, हे फक्त एक तास अगोदर कळतं. तसंच सामना दोन सलग गेम्स हरून गमावला तरी संघाच्या प्रवासाच्या दृष्टीने तिसरी गेम जास्त जोमाने खेळावी लागते, जिंकावी लागते.’’

‘याच सर्व आव्हानांमुळे आत्मविश्वास, कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्याची तयारी आणि धाडसी निर्णय घेण्याची क्षमता खेळाडूंची वाढते आहे. मला वाटतं, भारतीय टेबल टेनिसच्या विकासाच्या दृष्टीने या सर्व गोष्टी भविष्यात खूप मोलाच्या ठरणार आहेत.

मला भावलेली अजून एक गोष्ट म्हणजे, लीग घडवणारे नीरज बजाज आणि विटा दाणी स्वतः खेळात इतके समरसून गेले आहेत, की ते नुसते कर्तेकरवते नसून स्वतः सामन्याचा आनंद खेळप्रेमी म्हणून घेताना दिसतात, ज्याचा खूप मोठा सकारात्मक परिणाम खेळाडूंवर होतो आहे.’’ गायत्री वर्तकने अभ्यासपूर्ण भावना व्यक्त केल्या.

यंदाच्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत भारतातील शरथ कमल, मनिका बत्रा, साथियनसारख्या दर्जेदार खेळाडूंसह जागतिक क्रमवारीत ५०च्या आत असलेले काही परदेशी खेळाडू सहभागी झाले. स्पर्धेची गुणवत्ता बघून जगातील अजूनही काही खेळाडू अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेसाठी पुढील वर्षी नाव नोंदणी करतील यात शंका नाही.

खेळ मग तो कोणताही असो, त्याची प्रगती तेव्हाच होते, जेव्हा तळागाळात खेळाचा प्रसार होतो. तरुण खेळाडूंना जडणघडणीच्या काळात योग्य मार्गदर्शन लाभतं, तंदुरुस्तीची जाग खेळ गांभीर्याने खेळायला चालू केल्यावर लगेच येते आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे, सतत आव्हानात्मक परिस्थितीत खेळायला मिळतं, देश-विदेशांतील सर्वोत्तम खेळाडूंसमोर खेळून आपल्या खेळाची खोली तपासता येते.

अल्टिमेट टेबल टेनिस लीगने नेमकं हेच दालन खेळाडूंसाठी खुलं केलं आहे. खेळाला खेळप्रेमी उद्योजकांचा पाठिंबा लाभतो तेव्हा काय जादू घडते, हेच अल्टिमेट टेबल टेनिस लीगच्या निमित्ताने बघायला मिळतं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com