यश नको; आनंद मिळवा (संदीप वासलेकर)

संदीप वासलेकर
रविवार, 1 जुलै 2018

निरोगी, सुखकर आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी पैसे मिळवणं आवश्‍यक आहे आणि ते केलंच पाहिजे. मात्र, केवळ स्टेटस आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जेव्हा आपण अभ्यास करतो आणि पैसा व यशाचा पाठपुरावा करतो, तेव्हा आपण आयुष्यात बरंच काही हरवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करतो. म्हणून युवकांनी यश नव्हे, तर आनंद मिळवण्यासाठी साधना केली पाहिजे.

निरोगी, सुखकर आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी पैसे मिळवणं आवश्‍यक आहे आणि ते केलंच पाहिजे. मात्र, केवळ स्टेटस आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जेव्हा आपण अभ्यास करतो आणि पैसा व यशाचा पाठपुरावा करतो, तेव्हा आपण आयुष्यात बरंच काही हरवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करतो. म्हणून युवकांनी यश नव्हे, तर आनंद मिळवण्यासाठी साधना केली पाहिजे.

मे महिन्यात "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) या उपक्रमातर्फे "सकाळ' समूहानं विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिरं आयोजित केली होती. मला नवी मुंबईतल्या शिबिरात विद्यार्थ्यांबरोबर गप्पा मारण्याची संधी मिळाली. मला "यिन' उपक्रम दोन कारणांसाठी आवडतो. विद्यार्थ्यांना राजकारण आणि धर्मकारण बाजूला ठेवून राष्ट्रकारण कसं करायचं हे शिकायला मिळतं. दुसरं म्हणजे विविध क्षेत्रांत नैपुण्य मिळवलेल्या व्यक्तींचे अनुभव कळतात. अशी संधी दैनंदिन महाविद्यालयीन जीवनात सहसा मिळत नाही.

विद्यार्थ्यांच्या कार्यशाळांत आणि संमेलनांत वडील माणसं जातात, तेव्हा ते एकच सल्ला देतात ः ""अभ्यास करा - परिश्रम करा - यश मिळवा.'' राजकीय नेते, उद्योजक, सनदी अधिकारी हे सर्वच जण "अभ्यास, परिश्रम, यश' हा मंत्र एकमतानं म्हणतात. मी "यिन'च्या शिबिरातल्या विद्यार्थ्यांकडे उलटा विचार व्यक्त केला ः "अभ्यास नको; मजा करा. परिश्रम नको; उत्कटतेनं प्रयत्न करा. यश नको; आनंद मिळवा.' हे ऐकून तिथं उपस्थित असलेल्या सर्वांना खूप आश्‍चर्य वाटलं. मला वाटतं, आपण स्वतःला आणि समाजाला काही मूलभूत प्रश्‍न विचारण्याची वेळ आली आहे ः "अभ्यास आणि परिश्रम म्हणजे काय आणि ते ज्यासाठी करायचे ते यश म्हणजे काय? तसेच मजा व उत्कटता म्हणजे काय? आनंद म्हणजे काय?'
या प्रश्‍नांवर चर्चा करण्याआधी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसभेत दिलेल्या एका महत्त्वाच्या माहितीचा आपण विचार केला पाहिजे. 2014 ते 2016 या काळात 26 हजार विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. त्या अनुषंगानं अनेक विश्‍लेषकांच्या मते, वर्षाला आठ ते दहा हजार या प्रमाणात 2008 ते 2018 या काळात सुमारे एक लाख विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असावी. म्हणजे भारतात सरासरी दर तासाला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचं महाराष्ट्र, पश्‍चिम बंगाल, तमिळनाडू आणि राजस्थानातलं कोटा हे गाव इथं प्रमाण सर्वाधिक आहे. आयआयटीसारख्या शैक्षणिक संस्थांच्या प्रवेश परीक्षांसाठी प्रशिक्षण देणारी केंद्रं कोटा इथं प्रामुख्यानं आहेत. ती "अभ्यास करा, परिश्रम करा, यश मिळवा' या तत्त्वानुसार चालतात आणि विद्यार्थ्यांना दिवसाला 17-18 तास अभ्यास आणि परिश्रम करण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणतात. हे सर्व कशासाठी? तर यश मिळावं म्हणून! यांच्या कल्पनेतलं यश म्हणजे काय? ः आयआयटीची परीक्षा पास होणं, नंतर अमेरिकेतल्या उच्च शिक्षणासाठी जाणं, तिथं काही करून ग्रीन कार्ड आणि नोकरी मिळवणं, बंगला घेणं, गाडी घेणं आणि दिवसभर "येत्या रविवारी पुण्यात सांस्कृतिक कार्यक्रम काय आहेत?' किंवा यशप्राप्ती करणारे इंजिनिअर दक्षिणेतले असतील, तर "रजनीकांत आणि कमलहासन एकत्र येणार का?' या विषयांवर मंथन करणं.

आता आपण मी नवी मुंबईत "यिन'च्या शिबिरात मांडलेल्या मूलभूत प्रश्‍नांकडे वळूया. अभ्यास म्हणजे काय? मजा म्हणजे काय?... "थ्री इडियट्‌स' या हिंदी चित्रपटात या प्रश्‍नाची चांगली उकल करण्यात आली आहे. रांचो हा विद्यार्थी गंमत म्हणून गणिताकडे पाहतो आणि त्याला गणितात सहज प्राविण्य मिळतं. बाकी विद्यार्थी आयुष्यात यश मिळावं म्हणून कष्ट करून गणिताचा अभ्यास करतात. त्यांना या विषयात फारसं स्वारस्य नसतं. मात्र, चांगले गुण मिळवण्याची गरज वाटते. जेव्हा आपण यशाच्या पाठी धावून, आपल्याला आनंद मिळतो का नाही याचा क्षणभरही विचार न करता दिवस-रात्र एखाद्या विषयासाठी अथवा परीक्षेसाठी मेहन करतो, त्याला मी "अभ्यास' म्हणतो. जेव्हा आपण आल्हाद मिळतो, गंमत वाटते आणि मजा अनुभवायला येते म्हणून आपण एखाद्या विषयात मग्न होतो, त्याला मी "मजा' समजतो.

मला शाळेत असताना इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र या विषयांची आवड होती. आमच्या चाळीतला बाळ्या पोस्टाची तिकिटं जमवायचा. त्याला पाहून मी ही तिकिटं जमवायला लागलो. नंतर नाणी, झेंड्यांची चित्रं, ऐतिहासिक प्रसंग या संबंधी माहिती जमवायला लागलो. बाजूच्या कुटुंबातल्या सुशीलानं एका रद्दीच्या दुकानदाराशी लग्न केलं. ही माझ्या दृष्टीनं पर्वणी ठरली. मी रद्दीवाल्या भाऊजींना नेहमी माझ्यासाठी इतिहास, भूगोल, समाजशास्त्र या विषयांवरची पुस्तकं अथवा नियतकालिकं आणण्यासाठी विनंती करत असे. ती वाचून मी शाळेतल्या समाजशास्त्रांच्या पुस्तकांना पूरक असं ज्ञान मिळवलं.

मला लहानपणी शाळेत आपला प्रथम क्रमांक यावा, अथवा शालांत परीक्षेत भरघोस गुण मिळवावे, असा विचारच मनात आला नाही. माझं लक्ष बाळ्याबरोबर नवीन पोस्टाची तिकिटं पाहून काय माहिती मिळेल आणि सुशीलाच्या यजमानांकडून नवीन कोणती पुस्तकं मिळतील यावर असायचं. त्यातून मला प्रचंड आनंद मिळत असे. हे सर्व मी ज्ञानप्राप्तीच्या आनंदासाठी करत असे. ज्ञानाचा साधन म्हणून वापर करून आपण काही करिअर बनवावं हे माझ्या मनातही आलं नाही.

माझ्या संशोधन संस्थेत 35 वर्षांपेक्षा कमी वय असलेले युवक व युवती काम करतात. त्यांना मी सहानंतर कधीही काम करायचं नाही आणि ऑफिस बंद करायचं, असे सक्तपणे सांगितलं आहे. या युवकांनी गेल्या काही वर्षांत दहशत हल्ले थांबवण्यापासून संयुक्त राष्ट्रसंघाचा अजेंडा बदलण्यापर्यंत अनेक प्रकारचं बहुमोल योगदान दिलं आहे. त्याबद्दल त्यांचं अनेक जागतिक नेत्यांनी कौतुकही केलं आहे. संशोधक जगावर परिणाम करण्याचा जो असामान्य आनंद मिळतो त्या भावनेनं हे युवक त्यांचं काम करतात. त्यांचे परिश्रम फक्त दहा ते सहा या वेळेत होतात; पण उत्कटता आणि स्वारस्य 24 तास असते. त्यातून नवीन कल्पनांचा उगम होतो. आमच्याकडे पदोन्नती नावाचा प्रकार नाही. मानपान नाही. वरिष्ठ - कनिष्ठ नाही.
भारतीय समाजात यश, सामाजिक स्थान (स्टेटस) आणि प्रतिष्ठा यांचं स्तोम माजलं आहे आणि लहानपणापासून आपण मुलांना या कल्पनांच्या मागं धावायला लावून त्यांना आनंद आणि समाधान यापासून कळतनकळत दूर करतो. काही जणांना यश मिळतं, म्हणजे ते राजकीय नेते, सनदी अधिकारी, खासगी क्षेत्रातले वरिष्ठ अधिकारी होतात आणि स्वतःच्या मुलांना त्याच शर्यतीत ढकलतात. शालांत परीक्षेत मुलाला 98.2 टक्के गुण मिळवले म्हणून आपल्या मुलाचं फेसबुकवर अभिनंदन करतात. मुलगा मात्र 98.5 टक्के मिळाले नाही म्हणून रडतो. आपला समाज यशासाठी एवढा हपापलेला आहे, की आपण दिवस-रात्र इसवीसन 499 मध्ये आर्यभट्टानं लावलेल्या शोधाचं गुणगान गातो अथवा अमेरिकेत 25 वर्षं स्थायिक झालेल्या भारतीय वंशाच्या व्यक्तीची कामगिरी हे आपल्या देशाचं महान राष्ट्रीय यश कसं आहे, याचा डंका पिटविण्यासाठी जिवाचा आटापिटा करतो; मात्र देशाच्या संसदेत जेव्हा गृहराज्यमंत्री विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी सादर करतात त्याकडे आपण दुर्लक्ष करतो. दर तासाला भारतातला एक विद्यार्थी आत्महत्या करतो. तो आपलाच कोणी तरी असू शकतो, हा विचारही आपल्या मनात येत नाही. जेव्हा कळतं तेव्हा खूप उशीर झालेला असतो. निरोगी, सुखकर आणि आनंददायी जीवन जगण्यासाठी पैसे मिळवणं आवश्‍यक आहे आणि ते केलंच पाहिजे. मात्र, केवळ स्टेटस आणि प्रतिष्ठा मिळवण्यासाठी जेव्हा आपण अभ्यास करतो आणि पैसा व यशाचा पाठपुरावा करतो, तेव्हा आपण आयुष्यात बरंच काही हरवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू करतो. म्हणून युवकांनी यश नव्हे, तर आनंद मिळवण्यासाठी साधना केली पाहिजे, असं मी समजतो.

Web Title: sundeep waslekar write article in saptarang