नेतृत्व म्हणजे काय? (संदीप वासलेकर)

sundeep waslekar write article in saptarang
sundeep waslekar write article in saptarang

नेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे. नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ कौशल्याला महत्त्व दिलं, तर हुकूमशहा, दहशतवादी आणि गॅंगस्टर निर्माण होण्याचा धोका असतो.

काही दिवसांपूर्वी पुण्यातल्या ज्ञानप्रबोधिनी संस्थेच्या काही विद्यार्थिनींनी माझ्याशी संपर्क साधला. युवकांमध्ये "नेतृत्व' या संकल्पनेबद्दल चर्चा घडावी, अशी त्यांची इच्छा होती. त्या म्हणाल्या, की "युवकांमध्ये नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी अनेक उपक्रम आहेत. युवकांनी नेतृत्व करण्यासाठी सक्षम व्हावं म्हणून अनेक व्याख्यानं आयोजित करण्यात येतात. सर्व जण "नेतृत्व' या शब्दाचा काही अर्थ आपापल्या परीनं गृहीत धरतात. नेतृत्वगुण कसे वाढवावे, हे युवकांना माहिती असतं; परंतु मुळात "नेतृत्व' म्हणजे काय हा प्रश्‍न खोलवर जाऊन विचारला, तर त्याचं उत्तर बहुतेक लोकांना ठाऊक नसतं, म्हणून या संकल्पनेवरच सखोल आणि सविस्तर चर्चा होणं गरजेचं आहे. मी त्या विद्यार्थिनींना माझ्या घरी चर्चेसाठी बोलावलं. त्या सकाळी सिंहगड एक्‍सप्रेस पकडून मुंबईला आल्या. आल्यावर प्रथम प्रश्‍न त्यांनी विचारला ः ""नेतृत्व म्हणजे काय?''

मला वासिलिस पोलिटिस यांची आठवण झाली. प्रा. वासिलिस पोलिटिस हे जगप्रसिद्ध तत्त्वज्ञानी आहेत. ते डब्लिन इथल्या ट्रिनिटी कॉलेजमध्ये अध्यापन आणि संशोधन करतात. वासिलिस पोलिटिस यांनी मला एकदा कॉफीपानासाठी आमंत्रण दिलं आणि विचारलं ""नदी म्हणजे काय? अग्नी म्हणजे काय? आपण नदीकाठी उभे राहिलो, तर समोर दिसणारं पाणी म्हणजे नदी का? परंतु, या क्षणी आपल्यासमोर असणारं पाणी काही तासांनी समुद्राचा भाग झालेलं असतं. प्रत्येक क्षणाला आपल्यासमोर नवीन पाणी असतं आणि काही तासांनी ते सागरात लुप्त झालेलं असतं. म्हणजे समोरचं पाणी काही काळ नदी, तर काही काळ समुद्र असं म्हणता येईल का? बरं, आपण म्हटलं, की पाणी म्हणजे नदी नाही तर रिकामं पात्रही नदी होऊ शकत नाही. पाणी आणि पात्र आहे तिथंच राहिलं आणि पाणी पुढं समुद्रात मिलन होण्यासाठी गेलं नाही, तर ते सरोवर होतं. मग नदी म्हणजे काय?
""तसंच अग्नी म्हणजे काय? समोर दिसणाऱ्या आणि काही क्षणांनी लुप्त होणाऱ्या ज्वाळा? का धूर? का उष्णता?''
प्रा. पोलिटिस म्हणाले ः ""आपण बऱ्याचशा संकल्पनांचे अर्थ शोधत नाही आणि म्हणूनच जगात अचानक कधीतरी गोंधळ होतो. आपण विचार न करता स्वातंत्र्य म्हणजे काय हे गृहीत धरतो आणि ते आपल्यापासून हिरावल्याचं एके सकाळी हिटलरनं अथवा मिलोशेविचनं दाखवलं, की जागृत होतो. आपण विकास म्हणजे काय, स्थैर्य म्हणजे काय आणि नेतृत्व म्हणजे काय हे प्रश्‍न स्वतःलाच विचारत नाही.''

या पार्श्‍वभूमीवर असे मूलभूत प्रश्‍न उभे करणाऱ्या त्या महाविद्यालयीन विद्यार्थिनींचं मला कौतुक वाटलं. प्रा. पोलिटिस यांनी मला सांगितलं होतं, की "प्रत्येक कल्पनेच्या खोल अंतर्भागात सत्त्व असतं. नेतृत्व या संकल्पनेचं सत्त्व नौतिक मूल्य हेच आहे.'
त्या विद्यार्थिनी म्हणाल्या ः ""नेतृत्व हे कौशल्य आहे, असं आम्हाला अनेक वरिष्ठ सांगतात.''
मी त्यांना सांगितलं, की नेतृत्वाचे शंभर पदर आहेत. त्यापैकी नैतिकता आणि सद्‌सद्विवेकबुद्धीनं समान प्रमाणात नैतिक मूल्यं अंमलात आणणं हे 99 पदर आहेत. उरलेला एक पदर कौशल्य, संघटनशक्ती, टीम बनवण्याची कला, संवादकला अशा अनेक गुणांनी बनलेला असतो. तो दुय्यम महत्त्वाचा आहे.
नेतृत्वाचा विचार करताना नैतिक मूल्यांकडे लक्ष न देता केवळ कौशल्याला महत्त्व दिलं, तर हुकूमशहा, दहशतवादी आणि गॅंगस्टर निर्माण होण्याचा धोका असतो. ओसामा बिन लादेनकडे असामान्य कौशल्य होतं. अफगाणिस्तानच्या गुहेत बसून अमेरिकेच्या राजकीय आणि आर्थिक केंद्रांवर हल्ला घडवून आणण्यासाठी खूप मोठी संघटनशक्ती, युवकांना प्रेरित करण्याची क्षमता, एक लक्ष्य गुप्तपणे ठेवून मोठी टीम तयार करण्याचं कसब हे सर्व नेतृत्वाचा शंभरावा पदर भक्कम असल्याचं दाखवतं; परंतु आतले 99 पदर विध्वंसक मनोवृत्तीनं तयार झाल्यानं अशा नीतिशून्य कौशल्यास नेतृत्व म्हणणं चुकीचं होईल.

स्टॅलिन, हिटलर, मार्कोस, पॉल पॉट, पिनोशेत यांसहित सध्याच्या जगात अनेक राजकीय नेत्यांची "महान कौशल्य; परंतु अपूर्ण अथवा शून्य नीतिमूल्यं' अशी अनेक उदाहरणं आहेत. साम, दाम, दंड, भेद अशा सर्व मार्गांनी स्वतः लोकांमध्ये प्रिय होणं आणि सत्तेत राहणं हे कौशल्य झालं. हे नेतृत्व नव्हे. सत्ता काबीज करणारा कुशल राजकारणी कधीही खोटं न बोलता कायम सत्यवचन आणि सत्याधारित वर्तन करत असेल, सद्‌सद्विवेकबुद्धी प्रमाण मानून समाजातल्या सर्व घटकांना समान न्याय देत असेल, राजकारण आणि राष्ट्रकारण यांतला फरक समजून निर्णय घेत असेल, तरच त्या राजकीय कारागिराकडे नेतृत्व आहे, असं मानायला हवं. नाही तर त्याच्याकडे आतून पोकळ असणारा आणि शंभराव्या पदराचा वापर करणारा केवळ नेतृत्वाचा आभास असतो. लोकांना नीतिमूल्यं आणि सद्‌सद्विवेकबुद्धीवर आधारित सत्त्वशील आणि केवळ कौशल्यानं भारलेला नेतृत्वाचा आभास यांतला फरक कळत नाही, तेव्हा देशाचं नुकसान होतं. जर्मनी, रशिया, पाकिस्तानचा इतिहास दाखवतो, की वेळेआधीच जाग आली नाही, तर केवळ नुकसान नव्हे, तर संपूर्ण विध्वंस होऊ शकतो.
सद्‌सद्विवेकबुद्धीवर विश्‍वास ठेवणाऱ्या नेत्यासही कधी मानसिक ठेच लागते. अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी लिबियावर हवाई हल्ले केले. हे सर्व परराष्ट्रमंत्री हिलरी क्‍लिंटन यांच्या आग्रहानं झाले. हजारो निरपराध लोक मृत्युमुखी पडले. ओबामांनी नंतर ही चूक केल्याचं जाहीरपणे मान्यही केलं; परंतु स्वतःच्या सद्‌सद्विवेकबुद्धीला न पटणारा निर्णय घेणं ही ओबामांची मानसिक वैचारिक घसरण होती. नेतृत्वाचा अभाव होता. तसंच त्यांनी नोबेल पुरस्कार घेणं अयोग्य आहे, हे समजूनदेखील मोहानं घेतलं, ही त्यांची कमकुवता होती; परंतु दोन-तीन निर्णय सोडले, तर बराक ओबामांनी बहुतांशी नेतृत्व दाखवलं.

उद्योग व्यवसायातही नैतिकतेची कसोटी लावून नेतृत्व समजलं पाहिजे. जेआरडी टाटांनी नीतिमूल्यांवर आधारित उद्योगसमूहाची वाढ केली. भौतिकशास्त्र आणि सामाजिकशास्त्र यात भारत देशास सक्षम करण्यासाठी संशोधन संस्थांची स्थापना केली. ते कधी राडिया टेपसारख्या प्रकरणात गेले नाहीत अथवा राजकीय नेत्यांच्या मागं लागले नाहीत. आपल्यानंतर कमालीची नैतिकता आणि प्रगल्भता दाखवणारे भारतीय सैन्यातले अधिकारी कर्नल लेस्ली सॉनी हे टाटा समूहाचे अध्यक्ष व्हावेत, असं त्यांचं स्वप्न होतं; परंतु कर्नल सॉनींचा अकाली मृत्यू झाला. सध्याच्या भारतात स्वतःला अब्जाधीश बनवण्याचं कौशल्य असणारे अनेक उद्योजक आहेत; परंतु सर्वार्थानं नैतिक सत्त्वपरीक्षा पास होऊ शकेल, असं नेतृत्व भारतीय उद्योगक्षेत्रात आहे का?

संशोधन क्षेत्रातल्या नेतृत्वाबद्दल काही लिहिण्यासारखं नाही. परदेशात आधी शोध लागलेली वस्तू भारतात प्रथम निर्माण करायची आणि लोकांनी "भारतातले पहिले अमुक-तमुक' म्हणून नेतृत्वगुण आहेत असं समजायचं याची आपल्याला सवय लागली आहे. आर्यभट्टानं मानवतेच्या इतिहासात प्रथम अंकांचा शोध लावला. ब्रह्मगुप्तानं पृथ्वीवर प्रथमच शून्याचा शोध लावला, म्हणून आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांना जग मानतं. ब्रह्मगुप्तानं जगात शून्याचा वापर होत असताना केवळ भारतातलं पहिलं शून्य शोधलं असतं आणि मोठेपणाचा दावा केला असता, तर आजच्या भारतात त्यांना भरपूर मानसन्मान मिळाला असता; परंतु जगानं मानवी ज्ञान आणि संस्कृती पुढं नेण्यातलं एक नेतृत्व म्हणून त्यांना मानलं नसतं.

... बोलताबोलता दुपार झाली. संवाद संपला. ज्ञानप्रबोधिनीच्या या मुलींनी "नेतृत्व' या कल्पनेबद्दल जो मूलभूत प्रश्‍न विचारला त्यावर आपले असंख्य युवक विचार करतील, अशी मला आशा आहे. अशा विचारमंथनातून देशाची वैचारिक दिशा, मानसिकता आणि चारित्र्य घडत असतं, म्हणून मूलभूत प्रश्‍न विचारणं हे एका दिशेचा शोध घेण्यासाठी आवश्‍यक आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com