कोंबडीच्या पिलाला समज आली तर...! (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar

जनतेमध्ये एक आभास निर्माण करून तिला खूष करायचं व नंतर आर्थिकदृष्ट्या पिळून काढून राज्यकर्त्यांचे धनाढ्य मित्र व कंत्राटदार यांचा फायदा करून द्यायचा, अशा राजकारणाचं लोण सध्या ब्रिटनपासून ब्राझीलपर्यंत व पोलंडपासून युक्रेनपर्यंत अनेक देशांत पसरलं आहे. यातून कोण वाचेल हे आणि कुणाला अंतिम क्षणापर्यंत यातलं काहीच कळणार नाही हे कसं ठरवायचं? ...तर आपल्याभोवती काय सुरू आहे याचं आकलन कुणाला कधी होईल व सत्य समजण्याची समज कुणाला कधी येईल यावर ते अवलंबून असेल!

बर्ट्रांड रसेल हे आधुनिक युगातले थोर विद्वान. विसाव्या शतकातले सर्वात महान तत्त्ववेत्ते म्हणून ते ओळखले जातात. त्यांनी एकदा एका कोंबडीच्या पिलाची गोष्ट सांगितली होती.
एका शेतकऱ्यानं कोंबडीचं नवीनच जन्मलेलं एक पिलू आणलं. शेतकरी त्या पिलाला रोज वेळेवर, चांगला खुराक देत असे. त्यामुळे पिलू आनंदून जाई व शेतकऱ्याबद्दल त्याला आत्मीयता वाटत असे.

नियमितपणे खुराक मिळाल्यामुळे पिलू मोठं होऊ लागलं. शेतकरी दिसल्यावर आनंदानं नाचू लागलं. "हा शेतकरीच आपलं सर्व काही' असं ते समजू लागलं. कोंबडीच्या पिलाला आयुष्यात शेतकऱ्याशिवाय दुसरा पर्याय दिसत नव्हता.
काही काळानं पिलू अगदी गुबगुबीत झालं. शेतकरी नेहमीप्रमाणे आला. त्यानं खुराक दिला. पिलू शेतकऱ्यावरच्या प्रेमापोटी नाचू लागलं. शेतकऱ्यानं पिलाला हातात घेतलं. एवढ्या मोठ्या व्यक्तीनं आपल्याशी जवळीक साधली, हे पाहून पिलाला अतिशय आनंद झाला. शेतकऱ्यानं पिलाची मान मुरगळली. काही क्षणात पिलू मरण पावलं; पण शेवटच्या क्षणापर्यंत शेतकऱ्याच्या मनातलं कारस्थान, त्यानं निर्माण केलेला प्रेमाचा आभास व त्याचा उद्देश हे काही पिलाला समजलंच नाही.
मारलेलं पिलू शेतकऱ्यानं श्रीमंत व्यापाऱ्याला विकलं. गावातल्या पाच-सहा श्रीमंतांनी एकत्र येऊन त्या त्या पिलाची मेजवानी झोडली!
वास्तविक, कोंबडीचं पिलू अवतीभवती पाहत असायचं. मधूनमधून गुबगुबीत झालेली पिलं नाहीशी होतात, हे त्याला कळायला हवं होतं; परंतु अमर्याद स्वार्थ व वास्तवतेपेक्षा शेतकऱ्यानं निर्माण केलेल्या आभासाची लालसा यामुळे सत्य काय आहे हे पिलाला समजलंच नाही.

जगातल्या अनेक देशांत धूर्त व स्वार्थी राजकीय नेते जनतेला कोंबडीच्या पिलासारखे उल्लू बनवतात व आपल्या भोवतालच्या वर्तुळातल्या धनाढ्य लोकांचं त्यांना भक्ष्य बनवतात. एकदा राष्ट्रभक्ती, स्वाभिमान, मोठेपणा असा खुराक दिल्यावर सर्वसामान्य लोक मोहित होतात. राष्ट्रभक्तीचा खुराक देणाऱ्या नेत्यावर भाळतात. अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांना काहीच कळत नाही.
रसेल यांनीच याचं स्पष्टीकरण दिलं आहे. रसेल यांच्या मते, जे क्रूर, कपटी, नालायक राजकीय पुढारी असतात त्यांचा आत्मविश्वास खूप दांडगा असतो. जे विद्वान, वैचारिक समतोल राखणारे पुढारी असतात ते गोंधळलेले असतात, त्यांना आत्मविश्वास नसतो. त्यामुळे लोकांना लायकी नसलेले; पण मोठा आत्मविश्वास असलेले पुढारी आवडतात व सर्वसामान्य लोक विचारी व कर्तबगार; परंतु आत्मविश्वास नसणाऱ्या व आपापसात भांडणाऱ्या नेत्यांना अव्हेरतात.
रसेल यांच्या सिद्धान्ताचा अलीकडच्या काळात पाश्‍चिमात्य देशांमध्ये अनेकदा अनुभव आलेला आहे. याची सुरवात ग्रीसमध्ये झाली; पण तिथल्या जनतेला शेवटच्या क्षणाआधी अक्कल आली.

ग्रीसची ओळख आपल्याला शाळेत असताना इतिहासाच्या पुस्तकातून होते. ग्रीसची संस्कृती खूप मोठी. सुमारे अडीत-तीन हजार वर्षांपूर्वी ग्रीसमध्ये सुवर्णयुग होतं. अर्थातच ग्रीसच्या नागरिकांना आपल्या संस्कृतीचा व राष्ट्राचा खूप अभिमान आहे.
अशा या ग्रीसमध्ये काही धनाढ्य उद्योगसमूह आहेत. ते बरीच वर्षं कर भरत नाहीत. राजकीय नेत्यांशी संधान साधून विविध सवलती घ्यायच्या व सर्वसामान्य लोकांच्या कष्टांच्या पैशावर आपण मेजवानी मारायची, अशी त्यांची रीत. यामुळे ग्रीसची आर्थिक व्यवस्था खिळखिळी झाली, तरीही ग्रीसच्या नेत्यांनी अमेरिकेतल्या बॅंकांशी संगनमत करून खोटी आकडेवारी जाहीर करून युरोपीय समुदायात प्रवेश मिळवला. मोठ्या खर्चानं ऑलिम्पिक केलं व आपण महान राष्ट्र असल्याचा देखावा केला. सर्वसामान्य लोकांना देशभक्तीचा खुराक देऊन या "शो'बाजीची किंमत चुकती करायला सांगितली. त्यांनी ग्रीसच्या जनतेच्या राष्ट्रप्रेमाच्या ओव्या गाऊन तिचं असं "कोंबडीचं पिलू' केलं की सर्वसामान्य लोकांनी युरोपचं कर्ज घेण्याच्या अटी नामंजूर करायचं ठरवलं.

सन 2015 मध्ये युरोपच्या रिझर्व्ह बॅंकेनं ग्रीसच्या नागरिकांवर कडक निर्बंध घातले. नवीन निवडून आलेले पंतप्रधान ऍलेक्‍सी सिप्रास यांनी सार्वमत घेतलं व ग्रीसच्या जनतेला, राष्ट्रप्रेम सर्वोच्च ठरवून रिझर्व्ह बॅंकेची (म्हणजे तिकडची युरोपीय सेंट्रल बॅंक) शिस्त धुडकावण्यास सांगितलं. नागरिकांनी मोठ्या फुशारक्‍या मारत युरोपीय सेंट्रल बॅंकेच्या अटी नाकारल्या. परिणाम असा झाला की युरोपीय सेंट्रल बॅंकेनं अटी अधिकच कडक केल्या. सिप्रास वाटाघाटीला बसले होते. पहाटे चारला त्यांना घाम फुटल्याची छायाचित्रं युरोपभर झळकली!

आता ग्रीसमध्ये कोंबडीच्या पिलाला समज आली. तिथल्या नेत्यांनी व नागरिकांनी सार्वभौमत्व, मोठेपणा, "महादेशभक्ती' हे सगळं बाजूला ठेवलं व देशाच्या आर्थिक सुधारणांसाठी सर्व अटी मान्य केल्या. तीन वर्षं नागरिक "आर्थिक तुरुंगा'त शिस्तबद्धपणे राहिले. अखेरीस अलीकडंच म्हणजे ऑगस्ट 2018 मध्ये ग्रीसची या "तुरुंगा'तून सुटका झाली. ग्रीस आता खऱ्या स्वाभिमानानं जगू लागला.
दरम्यान, ग्रेट ब्रिटनच्या महान नागरिकांनी ग्रीसच्या परिस्थितीपासून काही धडा घेतला नाही. स्वतःच्या चुकांमुळं आर्थिक परिस्थिती बिघडली हे मानायचं सोडून ते बाहेरून येणारे स्थलांतरित कामगार, युरोपची नोकरशाही, पश्‍चिम आशियातला दहशतवाद अशा बाबींमध्ये परिस्थिती बिघडल्याची कारणं शोधू लागले. राजकीय स्वार्थासाठी बोरिस जॉन्सन व इतर नेत्यांनी या मानसिकतेचा फायदा घेतला आणि राष्ट्रप्रेमाची आरोळी दिली. ब्रिटनच्या नागरिकांना देशभक्ती, आपला ऐतिहासिक मोठेपणा, परकीय शक्तींचं आव्हान असा खुराक रोज दिला. अडचणीत असलेल्या; पण मूलतः सुदृढ असलेल्या ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेचा गळा "ब्रेक्‍झिट' सार्वमताच्या रूपानं मुरगळला.

युरोपच्या घटनात्मक संस्थांनी ब्रिटनच्या सरकारला ब्रेक्‍झिटच्या वाटाघाटींत पूर्णतः नाकी नऊ आणलं आहे. या वाटाघाटी अपूर्ण राहिल्या तर ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेवर व घटनात्मक ऐक्‍यावर दरड कोसळेल. अनेक लोकांचं जीवन उद्‌ध्वस्त होईल. स्कॉटलंड व उत्तर आयर्लंड विभक्त होऊन युरोपीय समुदायात प्रवेश मागतील. अर्थात जर ब्रिटनच्या जनतेला शेवटच्या क्षणी समज आली व प्रचंड मोठे मोर्चे काढून, सत्याग्रह करून त्यांनी दुसरं सार्वमत घेण्यास सरकारला भाग पाडलं तर शेवटच्या क्षणी अरिष्ट टळूही शकेल.

जनतेमध्ये एक आभास निर्माण करून तिला खूष करायचं व नंतर आर्थिकदृष्ट्या पिळून काढून राज्यकर्त्यांचे धनाढ्य मित्र व कंत्राटदार यांचा फायदा करून द्यायचा, अशा राजकारणाचं लोण सध्या ब्रिटनपासून ब्राझीलपर्यंत व पोलंडपासून युक्रेनपर्यंत अनेक देशांत पसरलं आहे. यातून कोण वाचेल हे आणि कुणाला अंतिम क्षणापर्यंत यातलं काहीच कळणार नाही हे कसं ठरवायचं? ...तर आपल्याभोवती काय सुरू आहे याचं आकलन कुणाला कधी होईल व सत्य समजण्याची समज कुणाला कधी येईल यावर ते अवलंबून असेल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com