युवकांसाठीचा मंत्र (संदीप वासलेकर)

sundeep waslekar
sundeep waslekar

आपल्याकडं कोणा राजकीय अथवा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्तीशी ओळख झाली, तर आयुष्यात बदल होईल, असं अनेकांना वाटतं. हे 99 टक्के चुकीचं आहे. बऱ्याच युवकांना आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन वृद्धिंगत करावा असंही वाटतं; परंतु याचा अर्थ "आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयावर परदेशात जाऊन एक पदवी प्राप्त करणं आणि मग संयुक्त राष्ट्रांत (यूएन) नोकरी करणं अनेक जण समजतात- तो पूर्णतः हानिकारक आहे. चीनमधले उद्योगपती जॅक मा यांनी युवकांसाठी दिलेल्या मंत्रातला गर्भितार्थ समजून घेतला आणि त्यानुसार नितांत प्रामाणिकपणा, कल्पनाशक्ती व प्रयत्न यांची सांगड घालून आयुष्याची आखणी केली, तर खूप समाधान मिळतं.

एकदा बीजिंगमध्ये एका कार्यक्रमात चीनच्या प्रमुख अर्थशास्त्रज्ञांच्या सत्काराचा सोहळा होता. व्यासपीठावर सत्कारमूर्ती असलेले अर्थशास्त्रातले प्राध्यापक आणि संशोधक बसले होते. श्रोतृवृंदात पहिल्या रांगेत यशस्वी उद्योगपती बसले होते. मी पाहुणा म्हणून दुसऱ्या रांगेत होतो. कार्यक्रमाला सुरवात होण्याआधी एका मित्रानं पहिल्या रांगेतल्या उद्योगपतींच्या ओळखी करून देण्यासाठी मला नेलं. त्यापैकी एक माझ्यापेक्षा 3-4 वर्षांनी कमी वय असणारा; पण तरणाबांड आणि चैतन्यशील दिसणारा एक उद्योगपती होता. माझ्या मित्रानं ओळख करून दिली ः ""हे मिस्टर मा. "अलीबाबा' या अतिशय यशस्वी समूहाचे संस्थापक.''

मी मित्राला म्हटलं ः ""जॅक मा आणि इतर लौकिक प्राप्त झालेले उद्योगपती खाली बसले आहेत आणि अर्थशास्त्राचे प्राध्यापक वर बसले आहेत. थोडं आश्‍चर्य वाटतं.'' मित्र काही बोलण्याआधी जॅक मा उत्तरले ः ""हे तज्ज्ञ आहेत, ते विचारांची निर्मिती करतात. देशासाठी नीती ठरवतात. मी आणि इतर जण कृती करतो आणि संपत्ती निर्माण करतो. वैयक्तिक आयुष्यात आणि देशाच्या कारभारात योग्य विचार करणं सर्वांत महत्त्वाचं आहे. विचारांची बैठक बसली तरच कृती करता येते.''
जॅक मा पुढं म्हणाले ः ""विचार हे कृतीपेक्षा मोठे असतात आणि नीती ही संपत्तीपेक्षा महान असते; पण तरीही माध्यमं आमची प्रसिद्धी करतात. विचारांची निर्मिती करणाऱ्यांकडं दुर्लक्ष करतात. म्हणून आम्ही अर्थशास्त्रातल्या विचारवंतांचा मोठा सत्कार करतो.''

नंतर कार्यक्रम सुरू झाला आणि मी माझ्या जागेवर परतलो; परंतु जॅक यांचे विचार मला खूप प्रभावी वाटले. म्हणून त्यानंतर त्यांची प्रत्यक्षात भेट झाली नाही, तरी मी त्यांचे विचार माध्यमांतून ऐकण्याचा प्रयत्न करू लागलो. अलीकडं जॅक मा "अलीबाबा'तल्या सर्वोच्चपदावरून निवृत्त झाले आणि विविध मार्गांनी शैक्षणिक कार्य करायचं असं त्यांनी ठरवलं. डावोस परिषदेत युवकांना संबोधित करताना त्यांनी एक मंत्र दिला. तो जगभर पसरला आहे; परंतु त्याकडे महाराष्ट्रातल्या युवकांनी लक्ष देणं मला आवश्‍यक वाटतं. म्हणून मी तो या लेखात मांडत आहे.

जॅक मा म्हणतात ः "तुमचं वय वीस-तीस वर्षं असतं, त्या काळात मोठ्या कंपनीत नोकरी शोधण्याचा मूर्खपणा करू नका. त्याऐवजी सकारात्मक दृष्टिकोन असणारा, चांगलं मार्गदर्शन करणारा, सर्जनशील प्रवृत्तीचा "बॉस' जिथं मिळेल त्याच्या अधिकाराखाली काम करा व अनुभव घ्या. तुमचं वय तीस-चाळीस वर्षं असेल, त्या कालखंडात एखाद्या उद्योगाची अथवा संस्थेची अथवा इतर कशाचीही निर्मिती करायची इच्छा असेल तर करा. तुम्ही चाळीस-पन्नास वर्षं वयोगटात असाल, तेव्हा प्रस्थापित केलेला उद्योग अथवा सुरू केलेलं कार्य बळकट करण्यावर जोर द्या. जेव्हा तुम्ही पन्नास-साठ वर्षं वयोगटात असाल, तेव्हा पुढची पिढी तयार करण्यावर लक्ष केंद्रीत करा. एकदा पन्नाशी ओलांडली, की नवीन काही प्रस्थापित करण्यात फारसा अर्थ नाही. काही जण करू शकतातदेखील; पण सर्वसाधारणपणे या कालखंडात पुढची पिढी सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले, तर जास्त हिताचं ठरेल. तुम्ही वयाची साठ वर्षं पूर्ण कराल, तेव्हा अर्थार्जन करण्यास महत्त्व देणं हळूहळू कमी करा आणि आपल्याला आनंद मिळण्यासाठी जे काही करायला आवडतं ते करण्यात वेळ खर्च करा. कोणाला शेतीत अथवा बगिच्यात प्रयोग करण्यास आवडेल. कोणाला प्रवास करायला आवडेल. कोणाला नातवंडांबरोबर खेळायला आवडेल. प्रत्येकाची आवडनिवड वेगळी असते; पण स्वतःची आवड ओळखून त्यात वेळ रमवा.'

मी हा मंत्र अलीकडं ऐकला. मी माझ्या आयुष्याची सुरवात केली, तेव्हा हा मंत्र माहिती नव्हता. योगायोगानं तरीही मी याच मंत्रानं आयुष्य जगल्याचं माझ्या लक्षात आलं आणि व पुढच्या वर्षांसाठी मी केलेलं नियोजनदेखील मा यांच्या मंत्रामध्ये सांगितल्याप्रमाणं आहे.
या मंत्राचं अनुकरण केल्यानं मला आयुष्यभर समाधान मिळाले. कार्यक्षेत्रात सर्वांशी कायम चांगले संबंध राहिले आणि गेल्या काही वर्षांत भारतासहित अनेक देशांतल्या युवक व युवतींना संशोधन, समांतर राजनीती, राष्ट्रघडण अशा नावीन्यपूर्ण क्षेत्रात सक्षम करण्याचं भाग्य मिळालं. युवकांशी झालेल्या माझ्या संवादामध्ये काही गोष्टी नजरेत आल्या. सध्याचे युवक नवीन शिकण्यासाठी, आपलं विश्‍व विस्तृत करण्यासाठी, धडपड करण्यासाठी उत्सुक आहेत, याचा मला आनंद वाटतो. विशेषतः भारतातले युवक आशादायी दिसतात. परिस्थितीत अनेक अडचणी असताना, संधी खूप मर्यादित असताना युवक काहीतरी घडण्यासाठी आणि घडवण्यासाठी तयार आहेत. तुलनेनं अरब आणि आफ्रिकी राष्ट्रांतले आणि अमेरिकेच्या अनेक राज्यांतले युवक निराशाजनक दिसतात; परंतु भारतातल्या युवकांमध्ये काही दोषही आहेत.
आपल्याकडं एक मोठा गैरसमज आहे. कोणा राजकीय अथवा आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या व्यक्तीशी ओळख झाली, तर आयुष्यात बदल होईल, असं अनेकांना वाटतं. हे 99 टक्के चुकीचं आहे. मला अनेक युवक संपर्क करून पंतप्रधान, मुख्यमंत्री, उद्योगपती यांच्याशी ओळख करून द्या म्हणून विनंती करतात. दर महिन्याला तीस-चाळीस जण तरी अशी मागणी करण्यासाठी संपर्क करतात. मी अशा युवकांना बिलकुल प्रतिसाद देत नाही. कारण स्वतःचं कार्य परिणामकारक आहे हे सिद्ध न करता केवळ कोणाची तरी ओळख काढण्यासाठी जिवाचा आटापिटा करणं मला पूर्णपणे व्यर्थ वाटतं. अनेक युवकाकडं चांगल्या कल्पना असतात; परंतु त्या कल्पनांना मूर्त स्वरूप देण्यासाठी पद्धतशीर प्रयत्न करण्याची तयारी नसते. एखादा युवक केवळ त्याच्या डोक्‍यात एखादी कल्पना आल्यावर त्यानं काही करण्याआधी संपूर्ण जगानं त्याला मदत करावी असा आग्रह माझ्याकडं धरतो, तेव्हा मी काहीही प्रतिसाद देत नाही.

बऱ्याच युवकांना आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन वृद्धिंगत करावा असं वाटतं. हा खूपच चांगला बदल आहे; परंतु याचा अर्थ "आंतरराष्ट्रीय संबंध' या विषयावर परदेशात जाऊन एक पदवी प्राप्त करणं आणि मग संयुक्त राष्ट्रांत (यूएन) नोकरी करणं अनेक जण समजतात- तो पूर्णतः हानिकारक आहे. हे असे पदवीक्रम करण्यासाठी पंचवीस-तीस लाख रुपये खर्च येतो. त्या अभ्यासक्रमाला जगात काही किंमत नसते आणि ते करून कोणी आंतरराष्ट्रीय संघटनांत नोकरी देत नाही; पण तरीही अनेक युवक "ग्लॅमर'मुळं आकर्षित होतात आणि नंतर कर्ज फेडताफेडता आयुष्याची माती करतात.
या दोषावर मात करून जर जॅक मा यांच्या मंत्रातला गर्भितार्थ समजून घेतला आणि त्यानुसार नितांत प्रामाणिकपणा, कल्पनाशक्ती व प्रयत्न यांची सांगड घालून आयुष्याची आखणी केली, तर खूप समाधान मिळतं, असा माझा स्वतःचा अनुभव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com