सलमान, दीपिका आणि नाचणीचे लाडू! (संदीप वासलेकर)

sundeep waslekar write article in saptarang
sundeep waslekar write article in saptarang

भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी-ज्वारी-बाजरीचं जागतिक पातळीवर नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं, तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल.

मी  सानफ्रान्सिस्कोला हॉटेलच्या बाहेर टॅक्‍सीत बसलो. टॅक्‍सीचालक मूळचा इजिप्तचा होता; परंतु गेली २५-३० वर्षं अमेरिकेत स्थायिक झाल्यामुळं तो पूर्णतः अमेरिकीच झालेला होता. त्यानं स्वतःहून सांगितलं नसतं तर तो मूळ इजिप्शियन आहे, हे मला समजलंही नसतं. त्यानं गप्पा मारायला सुरवात केली. - मी भारतातून आलो आहे आणि आता परत चाललो आहे, हे मी त्याला सांगितलं.
तो लगेच म्हणाला ः ‘‘मी दर आठवड्याला हिंदी सिनेमा आवर्जून पाहतो. अलीकडंच मी सलमान खान व कतरिना कैफ यांचा चित्रपट पाहिला. त्यात दोघांनी गुप्तहेराचं काम केलं आहे.’’

त्यानं मला त्या सिनेमाचं सगळं कथानक सांगितलं. योगायोगानं मीही तो सिनेमा मुंबईत पाहिला होता; परंतु मला नाव आठवत नव्हतं. त्यालाही नाव आठवलं नाही. मग तो इतर सिनेमे, सानफ्रान्सिस्कोमधलं जीवन, डोनाल्ड ट्रम्प अशा विविध विषयांवर बोलला.  विमानतळावर पोचल्यावर मी भाडं चुकतं केलं. त्यानं सामान काढायला मला मदत केली. तो परत टॅक्‍सीत बसणार तेवढ्यात अचानक मागं फिरला व मोठ्या आनंदानं म्हणाला ः ‘‘आठवलं! त्या सिनेमाचं नाव आहे ‘टायगर जिंदा है.’ मी हसून त्याचा निरोप घेतला.
***

मी ‘लुफ्तांझा’च्या विमानानं मुंबईला परतलो. त्या विमानातल्या जर्मन हवाई-परिचारिकेनं मला मुंबईबद्दल प्रश्‍न विचारले. तिला पहिल्यांदाच भारतात जाण्याची संधी मिळाली होती; परंतु फक्त एका दिवसासाठी.  पुन्हा मुंबई ते फ्रॅंकफर्ट या प्रवासाकरिता तिची नेमणूक होती. ती मला म्हणाली ः ‘‘मुंबईत मला ‘पद्मावत’ सिनेमा पाहायचा आहे. कुठं पाहायला मिळेल? एका दिवसात तेवढंच करायची इच्छा आहे.’’
मला वाटलं की हा सिनेमा चर्चेत असल्यामुळं तिनं त्याबद्दल ऐकलं असावं; पण ते तसं नव्हतं. ती म्हणाली ः मी दीपिका पदुकोनचे सगळे सिनेमे पाहते. ती माझी सगळ्यात आवडती अभिनेत्री आहे.’’

गमतीची गोष्ट म्हणजे, त्या अमेरिकी टॅक्‍सीचालकाचा व जर्मन हवाई-परिचारिकेचा भारताशी यापूर्वी कधीही संबंध आलेला नव्हता. त्यांना कुणीही स्थानिक भारतीय मित्र-मैत्रिणी नव्हत्या; पण दोघांनाही हिंदी सिनेमांची खूप आवड होती.
कदाचित अमेरिकेत व जर्मनीत मोठ्या प्रमाणात भारतीय लोक वास्तव्याला असल्यामुळं या दोन्ही देशांत हिंदी सिनेमा लोकप्रिय झाले असतील असं आपल्याला वाटेल; परंतु आफ्रिकेच्या एका कोपऱ्यात असलेले सेनेगल व मॉरिटानिया यांसारखे देश, पश्‍चिम आशियातले सतत युद्धाच्या सावलीत राहणारे सीरिया, जॉर्डन व इस्त्राईल हे देश, तर पूर्व आशियातले कम्बोडिया व व्हिएतनामसारखे देश... या देशांत तर मोठ्या प्रमाणात भारतीय नाहीत, तरीही तिथं हिंदी सिनेमा खूप मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. ज्यांचा भारताशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही, अशा लोकांना हे सिनेमा भुरळ घालत आहेत. पाकिस्तानात भारतातले हिंदी सिनेमा, त्या सिनेमांतली गाणी व कलाकार एवढे लोकप्रिय आहेत, की तिथल्या बऱ्याच वृत्तपत्रांत बॉलिवूडच्या बातम्या प्रसिद्ध करणं आवश्‍यक झालेलं आहे.
***

हिंदी सिनेमांच्या लोकप्रियतेचा फायदा अनेक उद्योजक कल्पकतेनं घेत असतात. या सिनेमांमुळं भारतातली राहणी, दैनंदिन जीवनातला संघर्ष, आहार, पोशाख हे सगळं जगभर प्रसिद्ध झालं आहे. हे पाहून अनेक उद्योजकांनी भारतीय पोशाख व खाद्यपदार्थ विकण्याचे नावीन्यपूर्ण प्रयोगसुद्धा केले आहेत व त्यातून अर्थार्जन करण्याचे नवीन मार्ग शोधले आहेत.
सानफ्रान्सिस्कोत मार्केट स्ट्रीट या विभागात प्रमुख व्यापारी-केंद्र व आर्थिक केंद्र आहे. तिथं मोठ्या बॅंकांच्या व उद्योगसमूहांच्या केंद्रीय कचेऱ्या आहेत. तिथं रस्त्यारस्त्यावर डोसा व खिचडी विकणाऱ्या गाड्या दिसतात. मला प्रथम वाटलं, की तिथं स्थायिक झालेल्या तमिळ लोकांनी हा व्यवसाय सुरू केला असावा; परंतु जवळून पाहिलं तर डोसा तयार करणारे, तो विकणारे व विकत घेणारे हे सगळे अमेरिकी लोक आहेत, असं आढळून आलं. तिथं भारतीय वंशाचे लोक दिसत नाहीत. भारतीय लोकांनी अनेक वर्षांपूर्वी जी रेस्तराँ उघडलेली आहेत, तिथं फक्त पंजाबी खाद्यपदार्थ मिळतात; परंतु डोसा वगैरे गाड्यांवरचे विक्रेते अमेरिकी आहेत.
***

अलीकडंच मला कॅनडातलं एक जोडपं भेटलं होतं. त्यापैकी पती आधुनिक तंत्रज्ञानात आंतरराष्ट्रीय कीर्ती मिळालेला व नावीन्यपूर्ण विचारांचा जगात प्रसार करणारा विख्यात तज्ज्ञ आहे. त्या जोडप्याचा पुढील उपक्रम म्हणजे, भारतातून नाचणीचं पीठ आयात करायचं व त्यात साखर न घालता गोडी आणणारे इतर काही पदार्थ वापरायचे व नाचणीचे लाडू कॅनडातल्या आणि अमेरिकेतल्या बाजारपेठेत विकायचे.
जगातल्या अनेक देशांतले शहरी लोक सध्या लठ्ठपणा या विकारानं त्रस्त आणि ग्रस्त आहेत. त्यामुळं हृदयविकारा, रक्तदाबाचा त्रास व इतर अनेक व्याधी त्यांना होतात. हा विकार केवळ वयानं मोठ्या असलेल्या व्यक्तींपुरताच मर्यादित नसून, अनेक शाळकरी मुलांमध्येही तो पसरत आहे. म्हणून कॅनडातल्या व अमेरिकेतल्या मुलांना तेलकट व आरोग्याला हानिकारक खाद्यपदार्थांपासून परावृत्त करण्यासाठी नाचणीचे लाडू विकायची योजना या जोडप्यानं आखली आहे.

वास्तविक, भारतातल्या शेतकऱ्यांनी व कृषिक्षेत्राशी संबंधित उद्योजकांनी नाचणी, ज्वारी आणि बाजरीचं नावीन्यपूर्ण पद्धतीनं मार्केटिंग केलं तर अरब देशांतल्या तेल-उत्पादकांसारखं अथवा दक्षिण आफ्रिकेतल्या सोन्याच्या खाणींच्या मालकांप्रमाणे त्यांना खूप श्रीमंत होता येईल.लठ्ठपणाच्या विकारामुळे सध्या जगभर ‘क्विनोआ’ला खूप मागणी वाढली आहे. दक्षिण अमेरिका खंडात पेरू व बोलिव्हिया या देशांत ‘क्विनोआ’चं पीक घेतलं जातं. त्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रचंड मागणी निर्माण झाली आहे. क्विनोआप्रमाणेच ज्वारी, बाजरी व नाचणी यांनाही जगभर खूप मोठी मागणी येऊ शकते. एकीकडं आरोग्याच्या कारणांमुळं जगातल्या सगळ्याच देशांत शहरी लोकांना ज्वारी, बाजरी व नाचणीचं महत्त्व पटेल. दुसरीकडं हिंदी सिनेमांच्या लोकप्रियतेमुळं भारतीय जीवन व खाद्यपदार्थ यांबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. याचा लाभ घेऊन उद्योजकांनी जर पिठलं-भाकरी विकण्याची केंद्रं सानफ्रान्सिस्को, न्यूयॉर्क, शिकागो, लंडन, पॅरिस, फ्रॅंकफर्ट, बर्लिन, सिडनी अशा ठिकाणी काढली तर खूप मोठा वाव आहे.

एकदा परदेशात पिठलं-भाकरी लोकप्रिय झाली, की भारतातल्या शहरी लोकांना आपल्या या देशी खाद्यपदार्थांचं महत्त्व पटेल! मी जेव्हा मुंबई-पुण्यात पिठलं-भाकरी मिळण्याची ठिकाणं शोधतो, तेव्हा हे पदार्थ मिळणारी ठिकाणं या दोन शहरांत तुरळकच असल्याचं आढळतं. पुण्यात मी पिठलं-भाकरी मागतो तेव्हा त्यावर नाक मुरडून ‘हे काय विचारता राव? आमच्याकडं पिझ्झा आहे की’ असं उत्तर मला अनेकदा मिळालेलं आहे. मात्र, एकदा म्युनिचमध्ये पिठलं-भाकरी व नाचणीचे लाडू लोकप्रिय झाले, की मुंबईकरांना या पदार्थांचं महत्त्व समजेल व फिलाडेल्फियातही हे पदार्थ मोठ्या प्रमाणात गेले, की पुण्याच्या पंचतारांकित हॉटेलांना ते ठेवण्यात कमीपणा वाटणार नाही. कल्पक भारतीय उद्योजकांनी जगभरातल्या सर्वसामान्य लोकांच्या आवडी-निवडी, मानसिकता, सामाजिक प्रवाह यांचा अभ्यास करून नाचणीतून व ज्वारी-बाजरीमधून कोट्यवधी रुपये कमावण्याची संधी गमावली तर तीच संधी साधून परदेशी व्यापारी तिचा नक्कीच फायदा घेतील. काही वर्षांपूर्वी भारताला हळदीच्या पेटंटसाठी कायद्याची लढाई करावी लागली होती. कदाचित आपल्याला नाचणीच्या पेटंटसाठीही लढाई करावी लागेल.

आपल्याकडं सध्या ‘दूरदृष्टी’ ही संज्ञा उद्योजकांमध्ये व राज्यकर्त्यांमध्ये प्रिय झाली आहे. ‘व्हिजन २०२२’, ‘व्हिजन २०४७’ हे केवळ गप्पा मारायचे विषय नाहीत. दूरदृष्टी केवळ गुळगुळीत पानांच्या ब्रोशरमध्ये सापडत नसते, तर ती आपल्या शेतातल्या काळ्या-पिवळ्या दाण्यांतही सापडू शकते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com